शनिवार, ७ मार्च, २०२०

"रंगांची दुनिया-१२": "चित्रदर्शन-३":


"रंगांची दुनिया-१२": "चित्रदर्शन-३":
"थप्पड":
"पुरुषप्रधान संस्क्रुतीच्या डोळ्यात अंजन":

स्त्रीच्या आत्मसन्मानाचा कदाचित अतिरेक असणारा आणि तो राखण्यासाठी, प्रसंगी स्वतःचा चांगला संसारही मोडणार्‍या, आजच्या स्वाभिमानी स्त्रीचा समाजाच्या एकंदर विचार पद्धतीशी चाललेला झगडा दाखवणारा असा हा चित्रपट नुकताच पाहिला.

तो पाहताना आमच्यासारख्या ज्येष्ठांना त्यातील ग्रहिणी असलेल्या अन् पतीची मनापासून सेवा करणार्या, नायिकेने केवळ एका अनपेक्षित प्रसंगी मनावर ताबा नसलेल्या नवऱ्याने, लंडनला जायच्या निवडीसाठी योजलेल्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये, मारलेली थप्पड तिला सहन होत नाही. त्यामुळे ती इतकी टोकाची भूमिका घेते की, संसार मोडून घटस्फोट घेते, अशा सारांशाचा हा चित्रपट आम्हाला काही केल्या पटला नाही.

कदाचित आमच्या जीवनशैली परंपरागत विचारांमुळे अथवा आम्ही ज्या प्रकारच्या वातावरणात वाढलो, त्यावेळेच्या संस्कारांचा परिणाम असेल, पण केवळ एवढ्या एका चुकीसाठी तिने संसार मोडावा हे आम्हाला काही केल्या पटले नाही. शिवाय एकंदर हा बोलपट इतके काही प्रसंग, इतकी काही भाराभर पात्रे आणि अतोनात असे तेच तेच प्रसंग, संवाद यामुळे बराचसा मनामध्ये प्रारंभी गोंधळ करतो. त्यामुळे हे चाललंय काय आणि ही एवढी अशी अतिरेकी भूमिका कां घेते हे शेवटपर्यंत मनाला पटत नाही. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर मी माझ्या चाळीस-पंचेचाळीस मधील अशा विवाहित मुलाला आणि मुलीला प्रश्न विचारून या बोलपटा बद्दल त्यांचे काय मत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांनी मला वेड्यात ठरवले आणि तिचेच वागणे व निर्णय कसा बरोबर होता हे आग्रहाने पटवून दिले.

नवऱ्याची चूक झाली होती, एवढे खरेच. परंतु त्यामागची पार्श्वभूमी खरोखर नजरेआड करण्याजोगी नव्हती. परदेशगमनाची नितांत इच्छा असणाऱ्या, या दोघांना त्या प्रसंगाला किती विचित्र पद्धतीने सामोरे जायला लागले! त्याला जे आश्वासन कंपनीने दिले होते, ते तोडून त्याला दुय्यम भूमिका लंडनला दिली जाणार असल्यामुळे त्या पार्टीत सहाजिकच त्याचा तोल गेला आणि त्याने आपल्या पत्नीला जी मध्ये त्याला अडवायचा प्रयत्न करत होती, ते तसे बरोबरही होते, जोरात थप्पड मारली आणि सगळ्याचाच पुढे विचका होऊन जातो.

ही शारीरिक थप्पड आणि इतरांना सहन कराव्या लागणाऱ्या मानसिक थपडा यांचे वेगवेगळ्या जोडप्यांच्या वागण्या-बोलण्यांमधून मनोज्ञ चित्र येथे दाखवले आहे. कळत-नकळत नवरे कायम आपल्या पत्नीला घालून पाडून अपमानास्पद असे नेहमी बोलत असतात, त्याही एक प्रकारे थपडाच.

आपली परंपरा आणि संस्कार जे आहेत, त्यामध्ये स्त्रीने निमूटपणे हे सारे सहन करावे असेच मानले जात असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. या चित्रपटाने जणू काही आपले डोळे उघडून असे जाणवून दिले आहे की, पुरुषप्रधान संस्कृतीचा हा जो काही वारसा आहे तो बदलत्या काळात अत्यंत अयोग्य असून, स्त्रीलाही स्वतःचा आत्मसन्मान पुरुषांइतकाच राखण्याचा अधिकार आहे. तो अधिकार गाजवण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी, सध्याची तरुण स्री, पूर्णपणे सक्षम आहे असेच थप्पड या चित्रपटाने दाखवले आहे. यामुळे 'पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने' हे मानून ज्येष्ठांना जे वाटते, ते पुढील पिढीला तसेच वाटेल असे नाही, असे समजून आपण पुढे जायचे.

याच पार्श्वभूमीवर योगायोगाने मी "शब्द रुची दिवाळी अंक'१८ मधील 'अडसर' ही डॉ अपर्णा महाजन यांची लघुकथा वाचली. या कथेमध्ये नवविवाहीत नायिका, आपल्या नवऱ्याच्या अगदी मुलींसारख्या पेहरावात कधीमधी वागण्यामुळे प्रचंड नाराज आणि दुःखी होते. त्याक्षणी कदाचित तिच्या मनात संसार मोडायची वेळही आली असेल.

पण सुदैवाने त्याच वेळेला तिला नॉर्मल काय आणि अँबनॉर्मल काय हे तिची मैत्रीण, जी मानसशास्त्रज्ञ आहे ती पटवून देते. त्यामुळे ती त्याचा जो काही आनंद आहे, तोही आपण मानला पाहिजे, या निर्णयाप्रत येऊन संसार गोडीने चालू ठेवते. म्हणजे इथे महत्त्व कशाला आहे तर संसार टिकून ठेवणे हे. संसाराची दोन्ही चाके योग्य तऱ्हेने एकमेकांचा तोल व चुका सांभाळत जर वागत राहिली, तरच संसार सुखाचा होतो. त्यामुळेच या चित्रपटात नायिका, कशी सध्याच्या काळात योग्य वागली असं असलं, तरी तिनेही समजून घेऊन, संसार मोडायला नको होता असंच आम्हाला वाटलं.

समाजाच्या परंपरागत अशा पुरुषप्रधान जीवनदृष्टीला अक्षरशः थप्पड मारून जागे केले गेले आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आधुनिक एकविसाव्या शतकातील, प्रगत आणि स्वाभिमानी स्त्रीचे हे मनस्वी दर्शन "थप्पड" चित्रपटाने घडवले हेही नसे थोडके !

सुधाकर नातू

ता.क.
हे लिहील्यानंतर मी एका चाळीशीतील विवाहीत तरूणाबरोबर संवाद साधला. त्यात आम्हाला हा चित्रपट कसा बघायला हवा ते चपखलपणे दाखवून दिले.
-------------------------------------
"बाघी३":
"अमानुषतेचा थरार आणि भीमपराक्रमाचा कळस"

ऑनलाइन तिकीट बुकिंगचा कधीकधी काय व कुणाला फायदा होतो आणि कुणाची व्यथा कुणाच्या पदरात चांगलं माप टाकते, सांगता येत नाही. Baaghi3 हा चित्रपट पहायचा योग हा अशाच एका ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना झालेल्या चुकीमुळे, आम्हाला आला.

त्याचे असे झाले की, माझ्या भाच्याने तिकीटे बुक करताना ज्या दिवसाचे तिकीटं बुक करायची, ते करायच्या ऐवजी, त्याच्या आदल्याच दिवसाची तिकीटं बुक झाली. सुदैवाने आम्ही मोकळे होतो आणि त्याने हा चित्रपट पहा, मी आँनलाईन whatsapp वर तिकीटे पाठवतो, असा आग्रह सकाळी पावणे अकराचा शो असताना, आम्हाला दहा वाजता फोन केला. कोणताही चित्रपट पहाण्याची आमची अती आवड, सहाजिकच आम्ही सतर्कतेने त्या संधीचा फायदा उठवला. लगेच त्याने ऑनलाईन तिकीटे आम्हाला पाठवली, कारण त्या दिवशी त्याला ऑफिस होते. धावतपळत वाहन जे मिळेल ते घेत, आम्ही थिएटरवर पोहोचलो.

खरं म्हणजे हा चित्रपट आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी पाहण्यासारखा नाही, याची कल्पना होती व त्याला नकार द्यायचा विचार मनात आलाही, परंतु त्याची कळकळीची विनंती व त्याची तिकीटे फुकट जाऊ नयेत, म्हणून आम्ही जायचे मान्य केले.

माझ्या नातवा कडून बाघी 2 किंवा बाघी या चित्रपटांबद्दल आणि टायगर श्रॉफच्या द्रुष्ट लागावी अशा बळकट शरीरयष्टी व जीवघेण्या स्टंटस्
बद्दल मी ऐकले होते. त्यामुळे त्याचा हा चित्रपट आपल्याला बघायचा आहे, अशी मनाची तयारी केली. चित्रपटात अक्षरशः मनाची धडकी भरवणारी, सातत्याने ढिशूम-ढिशूम अशा तऱ्हेची आधुनिक जगातील भयानक संग्रामाची चित्र सातत्याने या चित्रपटात बघायला मिळतात.

वडील पोलीस अधिकारी असलेल्या दोन भावांची ही कथा. मोठा नेभळट तर धाकटा अत्यंत धडाडीचा. जेव्हा जेव्हा मोठा अडचणीत असेल त्या त्या वेळेला धावणारा हा छोटा भाऊ, त्याच्या मागे पहाडासारखा कसा उभा राहतो हे दाखवणारा हा चित्रपट आहे. नेहमी संकटात सापडत जाणार्या मोठ्या भावाला जणु वाचवणारा श्रीकृष्णच.

परदेशातील टोळीने ओलीस ठेवलेल्या मोठ्या भावाला, त्या क्रूरकर्मा टोळीशी व तिच्या खूनशी कप्तानाशी एकट्याने पराक्रमी सामना करत, दहशतवादाची पाळेमुळे खणायला निघालेला त्याचा हा शूर भाऊ, ह्याची ही अजिबोगरीब चित्रकथा आहे. यातील एक थरारक आणि मनाला व्यथित करणारी गोष्ट म्हणजे माणूस क्रूरतेने माणसांचाच जीव कसा घेतो कां घेतो हा निर्माण होणारा प्रश्न.

दहशतवादाची कल्पनाच करता येणार नाही, असे भेसूर चित्र या चित्रपटात जे दाखवले आहे. ते तसे जर खरोखर असेल तर माणसाच्या
राक्षसीपणाचा तो कळस असेच म्हणावे लागेल. संपूर्ण कुटुंबांना बळजबरीने पकडून परदेशात नेऊन व ओलीस ठेवून तिथे त्यांच्यातील कुणा ना कुणा माणसांना धमकावून आत्मघातकी क्रुत्ये करायला भाग पाडत, स्यूसाईड बाँबर्स बनवणे ही अत्यंत विघातक संकल्पना या चित्रपटात दाखवली आहे. ती खरोखर काळजाचा ठोकाच चुकवणारी आहे. म्हणजे हा 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असाच प्रकार झाला.

नराधम दहशतवादाच्या नायकाला आपल्या चित्रपटाचा नायक एकट्याने राँबिंन हूड किंवा टारझन स्टाईल कसा नामशेष करतो त्याचे थरारकपण येथे आहे. जागोजागी पेरलेल्या भूसुरूंगांचे स्फोट, तीन तीन हेलिकॉप्टर्समधून हल्ला, ती तीन हेलिकॉप्टर एकमेकांशी आदळून त्यावर स्वार होणारा, ह्या चित्रपटाचा नायक व त्याची प्राणघातक स्टंटबाजी, आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना बघणे कठीणच होते. पण हे सारे तरुण पिढीला, विशेषतः जी मंडळी
आपले उद्याचे भवितव्य घडवणाऱ्या तरुणांपुढे असे चित्रपट जर येत असतील आणि त्यांना ते मनापासून आवडत असतील, तर आपले काही खरे नाही, हेच खरे!

मानवाचा दयाळूपणा, माणुसकी, माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागावे, हे सारे विसरून जात, आता माणूस माणसांचाच जीव अखेरीस घेत राहीला, तर पुढे काय काय आपल्यासमोर आणून ठेवणार आहे, हा विचार येऊन खरोखर मन सुन्न झाले.


सुधाकर नातू

३ टिप्पण्या:

  1. नातू सर मी तुमचे लेख whatsapp वर नियमित वाचत असतो, तशी वाचनाची आवड असल्यामुळे मी जे काही साहित्य माझ्याकडे असेल किंवा आपल्या सारख्या लेखकांकडून जे प्राप्त होईल ते मी अगदी चोखंदळपणे मनापासून वाचत असतो.
    आपला लेख वाचला आणि माझ्याही मनात स्रि-विषयी भावनिक भावना जागृत झाली यात नवल असे काही नाही असे मला वाटते कारण आपला देश हा पुरुषप्रधान असल्यामुळे अशा भावना असणे साहजिकच आहे.
    आता वळूया मुद्द्याकडे , आपण लिलिलेला ब्लॉग किंवा लेख हा उत्तमच आहे , आजची स्त्री ही जसे आपण म्हणतो तसे अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते त्यामुळे एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा ती गोष्ट अनपेक्षित पणे घडली तर त्यावेळी त्या स्त्रीचा मानसिक संतुलन बिघडते आणि चुकीचा निर्णय घेऊन आपल्या संसाराची राख रांगोळी करून टाकते , चूक कोणाचीही असो आपण काय करतोय आणि का करतोय याच भान दोघांनाही असले पाहिजे असे मला तरी वाटते.
    मी तो चित्रपट पाहिला नाही तरीही आजपर्यंतच्या समाजात घडत असणाऱ्या गोष्टींतून मी पाहिले आहे , पुरुष उगाचच आपला पौरुषत्व म्हणून आपल्या सहचारिणी सोबत हीन वागत असतो पण असे नाही की पुरुषच असे करतात स्त्रीया ही यात मागे नाही आहेत "आम्ही घर सांभाळतो" एवढे म्हणण्यापूरते जरी त्यांच्याकडे बोलायला शब्द मिळाले तरी त्याही वरचढ शब्द बोलून दाखवून संसार मोडायला तयार असतात.
    का आणि कशासाठी करतोय आपण याचा जराही विचार न करता संसार मोडून उध्वंस होतात दोघेही.....
    माझ्या मते एकदा तरी याचा विचार केला पाहिजे की , जर मला संसार यांच्याशी करायचा न्हवताच तर आजपर्यंत मी यांच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर का राहत होतो किंवा होती ......








    सर काही चुकले असेल तर माफी असावी.... शब्द लिहिताना काही चुकले असेल तर समजून घ्या .

    उत्तर द्याहटवा