रविवार, १५ मार्च, २०२०

"वाचा, फुला आणि फुलवा-५"::


"वाचा, फुला आणि फुलवा-५":
मी सहज माझा टेबलमधला खण आवरत होतो, आणि अचानक मला एक जुने नोटबुक दिसले. ड्रॉईंग बुक होते ते. ह्या बहुमोल ड्रॉईंग बुकची मला आठवणच गेले कित्येक वर्षे झाले नव्हती. हे ड्रॉईंग बुक म्हणजे जवळजवळ पाच वर्षांपूर्वी मी एक संकल्पना प्रत्यक्षात आणली होती, तिचेच प्रत्यक्ष स्वरूप होते.
टीव्हीवरील मालिका बघून कंटाळा आला आणि मग लक्षात आलं की आपण आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतो. तर मी ठरवलं की, रात्री रोज आठ ते नऊ प्राइम टाईम मध्ये, मालिका बघायच्या नाहीत, त्या वेळेला आपल्याला जे काही उत्तम, संग्राह्य विचारधन, वेगवेगळ्या वाचनातून मिळतं, त्याची कात्रणे एका ड्रॉईंग बुकमधील कोऱ्या कागदांवर चिटकवायची ही ती संकल्पना. तिची मला खरोखर इतकी गोडी लागली की, जवळजवळ काही दिवसातच ५० पानांचा एक अतिशय बहुमुल्य विचारधन आणि साहित्य असणारं असं ट्रेझर बुक त्यामुळे बनलं. पाच वर्षांनी ते गवसलं आणि लक्षात आलं की माझं "वाचा, फुला आणि फुलवा" ह्या सदरासाठी ते संयुक्तिक आहे. त्या। सदरातील, पहिल्या काही लेखात, मी कविवर्य विंदा करंदीकर ह्यांचे "निर्वाणीचे गझल' सादर केले होते. तोच प्रकार इथे पुढे नेत, ह्या ट्रेझर बुकमधील विचारधन आता मला मांडता येईल. हे साहित्य त्या त्या लेखकाची खरोखर कमाल आहे, अशाच दर्जाचं आहे. आता त्यातीलच काही अंश या लेखात मी मांडणार आहे:
"असे वाटले तर.. ":
चालावे असे वाटले तर-सन्मार्गाने चाला.
पळावे कसे वाटले तर- दुर्गुणांपासून पळा.
धरावे तसे वाटले तर-चांगली संगत धरा.
सोडावे असे वाटले तर-दुर्व्यसन सोडा.
सोडावे असे वाटले तर-आळस सोडा.
गिळावे असे वाटले तर-राग गिळा.
द्यावे असे वाटले तर-प्रेम द्या.
घ्यावे असे वाटले तर-सद्गुणांच्या घ्या.
राहावे असे वाटले तर-समाधानाने राहा.
गावे असे वाटले तर-थोरांचे गुणगान गा.
-अनामिक
-------------------------
"अर्थपूर्ण":
मीरा सहस्त्रबुद्धे यांच्या दोन कविता
"अंतर्नाद" दिवाळी अंक २०११:
१ शैशव:
सानुल्या विश्वात माझ्या बासुरीचा सुर आहे.
जीवनाचा तो विसावा ब्रह्म मी त्यातून पाहे, उमलणारे मुक्त हसणे,
सुखावणारे गोड रुसणे.

आज त्यांच्या बोलण्याला चंदनाचा गंध आहे,
नजर भोळी भुलविणारी,
अंतरंगा फुलविणारी,
भाबड्या प्रश्नांतूनी त्या, अमृताचा पूर वाहे.
भास्कराचे तेज ह्यांचे,
वैनतेयाची भरारी,
चांदण्यांचे स्वप्न सुंदर, सोबतीला आज आहे.
पाहिला मी देव येथे,
पूजिले निष्पापतेला,
घनतमी ह्या जीवनाच्या, जागती ज्योत आहे.
मीरा सहस्त्रबुद्धे.
माझी टीप:
( आमचा चार वर्षांचा गोरापान देखणा लाडका नातू चिरंजीव आर्यनची मूर्तिमंत प्रतिमा मला यात दिसली. )
--------------------------
२.
"अखेरचा ज्ञानी"
पुन्हा अभ्यासली,
सारी वर्णमाला,
वेगळाचि बोध झाला मनी.
अकाराचे स्थान,
आरंभास असे.
परी ज्ञ तो वसे, सर्वा अंती,
आधी अहंकार,
ज्ञान ये नंतर,
ठेविले अंतर सुज्ञपणे.
ज्ञानात नकोरे,
अहंतेचा संग,
पुरता बेरंग अज्ञ करी.
नव्हे अहंकार,
धुमसे अंगार,
ज्ञान वारंवार शांतवी तया.
जीवासवे जन्मे,
जरी आधी कुणी,
अखेरचा ज्ञानी लावी दीप.
मीरा सहस्त्रबुद्धे
------------------------
"माझे एक निरीक्षण":
आपला मुलगा हा वयात आल्यानंतर, वाईट संगतीने वाया जाताना पाहणे, निवृत्तीकडे झुकणाऱ्या माणसांना जड जाते. त्यांच्या काळ्याकुट्ट भवितव्याच्या शक्यतेमुळे चांगल्या सुशिक्षित व सधन कुटुंबातील ही मुले वाया जातात आणि अभ्यास वगैरे सोडून व्यसनी कां बनतात हे कोडेच आहे. हे तरुण म्हणजे आपल्याच हाताने व कृतीने आपल्या आयुष्याची नासाडी करतात, खरोखर हे मोठे दुर्दैव होय. पुष्कळ कुटुंबांच्या गोतावळ्यात, ही अशी वाट चुकलेली मुले आढळतात. त्यांच्यामुळे सुरळीत चाललेल्या, त्यांच्या कुटुंबाचे दैनंदिन जीवन आणि भवितव्य अंधकारमय बनते.
यावर उपाय काय? ह्या प्रश्नाला उत्तर देणे कठीण आहे.
--------------------------
"नोद घ्यावे असे सुविचार":
# मनुष्याचा विवेक हाच त्याचा खरा मार्गदर्शक.
# सखोल विचार करून निर्णय घेणे ही एक उत्तम पायरी यशाची असते.

# आत्मविश्वास ही एक प्रभावी ताकद आहे, ज्यामुळे आपले प्रत्येक पाऊल पुढेच पडते.
# उच्चार विचार आचार यांचा एकत्र आविष्कार म्हणजे व्यक्तिमत्वाची ओळख होय.
# सतत कार्यमग्न राहावे, त्यातूनच अनुभवाची अमोल पूंजी निर्माण होते.
# हातात आलेली संधी कधीही वाया न घालवता, वेळेचा व संधीचा सदुपयोग करा.

# जिद्द असेल तर कठीण स्पर्धाही जिंकता येते.

# वाईट मित्रांच्या संगतीपेक्षा, एकटेपण उत्तम. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचे, रस्ता कधी विस्तारला जाईल हे कळणारही नाही!
----------------------------
असेच एकसे बढकर एक शंभराहून अधिक लेख..... वाचण्यासाठी.......
ही लिंक उघडा.......
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:


http//moonsungrandson.blogspot.com


धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा