रविवार, २९ मार्च, २०२०

"ह्रदयसंवाद-१६": "घटका गेली पळे गेली........:


"ह्रदयसंवाद-१६":
"घटका गेली पळे गेली........:

"घटका गेली पळे गेली, तास वाजे ठाणाणा, आयुष्याचा खेळ होतो, राम का रे म्हणाना!"

आज ही गोष्ट किंवा हे म्हणणं, आठवण्याचे कारण म्हणजे सध्या आपण 'कोरोना'च्या महासंकटामुळे आप आपल्या घरांमध्ये बंदिस्त राहून, एक प्रकारे 'लिमिटेड ओव्हर्स'ची (जीवघेणी?) मॅच' खेळत आहोत. त्यामुळे वेळ कसा गेला, ह्यापेक्षा वेळ आपण कसा वापरला, याचा विचार कधी नव्हे, तो अधिक करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.'
हा विचार मला आज सकाळी झोपून उठण्या पूर्वी आला.

नेहमी मला झोप पूर्ण झाल्यावर, काही वेळ असंच अंथरुणात लोळण्याची सवय आहे. त्यावेळेस मला नवनवीन कल्पना सुचत असतात. आज हीच कल्पना मला सुचली की, आपण आताच्या काळात वेळ कसा वापरत आहोत, ते पाहण्याची! त्यासंबंधीत गंमतीशीर गोष्टी मी इथे तुमच्याकरता सांगणार आहे.
मला वाटतं ही कल्पना तुम्हीही उचलून धराल आणि अंतर्मुख होऊन आपण काय काय रोज करत आहोत, याचा आढावा घेत राहाल.

माझी वेळ घालवण्याची, नव्हे चुकलो, वेळ उपयोगात आणण्याच्या अनेक तर्हा आहेत. विशेषतः झोपेमध्ये मला बऱ्याच वेळा अधूनमधून केव्हाही जाग येते. आणि त्यावेळी मी नवनवीन गोष्टी आठवत असतो, वेगळेच विचार करत रहातो. त्यापैकी एक म्हणजे माझ्या जीवनात वेगवेगळ्या काळात कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती आल्या आणि त्यांच्याबरोबर माझे संबंध कसे होते, ते किती काळ, कां टिकले आणि जर कुणाचे बिघडले, तर ते कशामुळे? तो विचार करता करता आपोआप झोप लागूनही जाते.

काही वेळा, मी झोपेतून असा जागा झालो, तर मी ज्योतिषी असल्यामुळे, मला ज्ञात असणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिका आठवतो आणि
त्यांच्या जीवनातील आरोग्य, आर्थिक स्थिती, कौटुंबिक सौख्य, जोडीदार आणि शिक्षण अशा विविध बाबींचा, पत्रिकेतील विविध स्थानातील ग्रहांचे योगांवरून काय ताळमेळ लागतो ते शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे झोप जरी आली नाही तरी, तो वेळ असा बुद्धीला चालना देण्यात जातो आणि असं करता करता आपोआप पुन्हा झोप लागते.
ब्लॉगवर 'लिहिलेला आठव्या शनीचे प्रताप' अशा झोपे'मधील'(?) अभ्यासाचे उदाहरण आहे.

हे झाले काही प्रकार झोपेतून मधल्या अवेळी, वेळ कसा जातो त्याचे. सगळ्यात गंमत येते ती पहाटे साखर झोपेतून जाग येण्यापूर्वीची. अशावेळी मला नेहमी नवनवीन कल्पना सुचतात कारण जवळजवळ झोप सुखाने पूर्ण झालेली असते मन अत्यंत प्रसन्न असते आणि मग मला नवीन काही शब्द, काव्य, लेख कल्पना सुचत जाऊन, काहीतरी नवीन मार्ग मिळत जातो. अशा वेळेला मला नेहमी वाटत आलं आहे की, झोपेमध्ये बरोबर पेन आणि कागद बाजूला ठेवावे, त्यामुळे त्यावेळेला जे सुचते मनात आपोआप उतरून ठेवावे! कारण झोपेतून जागे झाल्यावर ते शब्द न् शब्द सुचतातच असे नाही. मात्र जी काही संकल्पना मनामध्ये आकार घेते त्याप्रमाणे मी पुढचा दिवस त्यावर लेख लिहिण्यात निश्चितच घालवतो. अशाच साखरझोपेतील चाळ्यांमुळे माझे लेख विविध प्रकारचे होत गेले. उदाहरणार्थ "रंगांची दुनिया"-नाटक चित्रपट मालिका.."ह्रदयसंवाद"-ह्या ह्रदयीचे त्या ह्रदयी... वाचनीय साहित्यावर रसास्वाद "शारदोत्सव"... किंवा आपल्या जुन्या नोंदी असतील त्या ट्रेझर बुकमधल्या गोष्टींसाठी 'आजोबांचा बटवा'... अथवा एखादे संस्मरणीय साहित्य वाचलं तर त्यातील निवडक, उत्तम नोंदवताना "वाचा आणि फुला, फुलवा" किंवा वाचा, तरच 'वाचाल' अशासारखे शीर्षके आणि त्यामागच्या संकल्पना नेहमी मला साखरझोपेच्या आसपासच सुचतात. त्यामुळे माझा पुढचा जागेपणीचा दिवस इतका गडबडीत जातो की कळतच नाही.

"करोना"? डरो ना, यह पढों ना", हा सध्याच्या कसोटीच्या काळावर ज्योतिष चिकीत्सा करणार्या लेखाचे शीर्षक अशाच 'कातरवेळी(?) मला सुचले!

याव्यतिरिक्त कधीमधी माझ्या यु ट्युब चँनेलसाठी 'व्हिडिओ' बनवणे असतेच. परंतु सगळ्यात मजा येते, ती सोशल मीडियावर, वेगवेगळ्या प्रकारची खुसखुशीत पोस्टिंग लिहिण्याची! माझ्यामते हा जो संदेश स्वतंत्रपणे बनविण्याचा, काही खेळ आहे, तो माझ्या चिकित्सक वृत्तीला,
निरीक्षणशक्तीला आणि एकंदर कल्पनाशक्तीला योग्य ती दिशा देत शब्दरचनेवर प्रभुत्व मिळवण्याची कला साधण्याचा मार्ग देतो.

म्हणजे असे की, व्हाट्सअपवर अथवा
फेसबुकवर काही संदेश आपल्याला येतात, त्यातील काही संदेश कधीमधी, मला थबकवतात. मला यावर काही अक्कल दाखवत, चपखल प्रतिसाद देता येईल असा माझ्या मनात विचार येतो. मग मी त्यावरच सारं मन बुद्धी कल्पना शक्ती एकाग्र करतो. त्यानंतर यथोचित प्रतिसाद लिहिणे, ही जी काही माझी प्रक्रिया असते, ती मला आनंद तर देतेच, परंतु अशा बहुतेक संदेशांना दादही मिळत जाते. फेसबुकवरच 'माझं पान' जे बऱ्याच वेळेला पुष्कळ जण वाचतात. त्यावरील माझे संदेश हे असेच प्रतिक्रिया म्हणून दिलेले खेळ असतात. तशी दोन उदाहरणे बघा पुढे, त्यावरुन मी काय सांगू इच्छितो ते कळेल:

"ह्रदयी धरा हा बोध खरा":
'कोरोना'च्या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पूर्वापार रुढ परंपरा व जीवनशैलीचा उदो उदो करणारे संदेश, सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. ही एक चांगली गोष्ट असली, तरी ते
आपल्याही डोळ्यात अंजन घालणारे, एक सत्य नक्कीच आहे, हे विसरून चालणार नाही. निदान आतातरी आपण आपल्या पद्धती व परंपरा ह्या वैयक्तिक व समाजोपयोगी आरोग्य निकोप रहावे, ह्या द्रुष्टीने बनविल्या गेल्या होत्या हे मान्य करायला हवे.
( हा परिच्छेद ही सूक्ष्म निरीक्षण व चिकीत्सा नव्हे कां?)

पण तसे करताना, ह्या टप्प्यावर त्याकरीता फुका अभिमान बाळगणे, असंयुक्तिक नाही कां? कारण आपणच मोठ्या ऐटीत west-word बनत जाण्यात, गेली काही दशके आनंद मानत गर्वाने जगण्याचा मार्ग स्विकारत गेलो, नाही कां?
( वरील परिच्छेद हा खरा Rejoinder नाही कां?)

सारांश हाच की नीर क्षीर विवेक करत, आपण आता योग्य तो जीवनशैलीचा मार्ग कटाक्षाने धरला पाहिजे.

"सुदिना"
----------------------------

आमच्या whatsapp ग्रुपवर कुणीतरी कल्पना मांडली की, तुमच्या खिडकीतून बाहेरचे निसर्गाचे फोटो शेअर करा. ते मांडले जात असताना, दुसर्‍या एकाने मध्येच जणु (खवचट) प्रश्न केला, तो असा:

"When was last, we really looked at outside nature with such feel!!"

त्यावर तोडीस तोड मी नीट विचार करून संदेश हा टाकलाः

"Reproducing my unanswered post of 20th March:

"सकाळी घराच्या खिडकीतून बाहेर बघितलं की, उगवणारा सूर्य असा दिसतो, त्याप्रमाणे ह्या झाडावरुन त्या झाडावर किंवा इकडून तिकडे कुठेही झेप घेणारे कावळे व चिमण्या नजरेस येतात. नेहमी मला नवल हे वाटते की, त्यांचे एवढे बारीक डोळे आणि त्याचा उपयोग ठरवून ते कुठे जायचं तो मार्ग कसा काय निवडतात व तेथे पोचतात हा यक्षप्रश्न !
त्याचे उत्तर काय आहे कोणी सांगेल कां?"

यांत प्रतिसादात मूळ विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर उत्तर होतेच, पण त्याचबरोबर शेवटचा अनुत्तरीत प्रश्न बहुधा हे सांगत होता की, तुमच्यापैकी कोणीच काही कधी बाहेर कधी बघत नाही!
--------------------------
समाज माध्यमांवर मी जो असतो तो असा! त्याची आचारसंहिता मी अशाच तर्हेने बनवून प्रकाशित केली होती. मला लेखक म्हणून काही ना काही मिळते कां हे मी नेहमीच पहात राहतो. आलेले मी कुठलेच संदेश पुढे सहसा पाठवत नाही, फोटो व्हिडिओ जर कशाबद्दल आहेत ते लिहिले नसते तर न बघताच सारे डिलीट करतो.

फेसबुक व व्हाट्सऍप, ही माझी लेखक म्हणून मला घडवणारी एक प्रकारची जिम्नॅशियम आहे असे मी मानतो. गेल्या दोन तीन वर्षात तर ह्या जिम मध्ये मी खरोखर 'घाम' घालतोय आणि तो तुम्हाला माझ्या ब्लॉग मधील दीड-दोनशे लेखांमधून समजतोय!
जाताजाता ब्लॉग ची लिंक देऊन जातो:

एकसे बढकर एक शंभराहून अधिक लेख..... वाचण्यासाठी.......
ही लिंक उघडा.......
आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू.

ता.क.
हा लेख प्रदर्शित केल्यावर.....
खुसखुशीत पोस्टिंग करण्याच्या विषयासंबंधी एक आव्हान म्हणून एका ग्रुप वर सद्यस्थितीत कोरोनाबद्दल माहिती देताना कोणती भाषा आवश्यक आहे, ते उलगडणारा व्हिडिओ बघायला मिळाला. तो विख्यात मानसतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा होता.
ते मी असे स्विकारून हा वादग्रस्त (?)
संदेश पहाता पहाता बनवत गेलो.
"बिंब-प्रतिबिंब" असे हे बौद्धिक कोड्याचे उत्तर समजावे ही विनंती:

डॉक्टर साहेबांनी जे विचार अत्यंत संयमितपणे व सध्याच्या काळात एक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर म्हणून नैराश्य येऊ नये, याकरता जे विचार मांडले आहेत. ते वास्तवाचे दर्शन, उगाचच भीती वाटू नये अशा तऱ्हेने व्यक्त कसे करायचे ते समजणार्या भाषेत मांडले आहेत. निश्चितच ते अनुकरणीय आहेत यात वादच नाही.

परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, यातील विचार जर प्रत्यक्षात आणायचे असतील, तर ते सर्वसामान्यांना समजतील, त्यांच्यावर हवा तो परिणाम करतील, असे असायला हवेत. याबाबतीत जर सखोल विचार केला तर, अशा संयमी बाळबोध अशा शब्दरचनेमुळे, 'कोरोना'चे जे संकट आ वासून उभे आहे, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची आवश्यकता पाळली जाण्याची शक्यता कित्पत असेल?

आपण सध्या गर्दी करून सर्वसामान्य हातावर पोट असणारी मंडळी, कशा भयानक धोकादायक तर्हेने वागत आली आहेत, हे पाहतच आहोत. म्हणूनच कदाचित हेही खरे की, सध्याच्या भेदक वेधक अशा शब्दातील दिल्या जाणार्या माहितीमुळेही, ही धायकुतीला येण्याची स्थिती त्यांच्या मनात निर्माण झाली असेल. पण शब्द असे सौम्य ठेवून ह्या विषयाचे गांभीर्य कित्पत राखले जाऊ शकेल ह्याचा विचार अधिक महत्वाचा ठरावा !"


सुधाकर नातू

1 टिप्पणी: