"ह्रदयसंवाद-१२":
"विचार आणि आविष्कारावर बोलू काही !":
माणूस आणि इतर सजीव यामध्ये जर कुठला फरक असेल, तर तो म्हणजे माणसाजवळ केवळ जगण्यासाठी करावयाच्या विचारांच्या पलीकडे, विचार करायचं आणि शब्दांमध्ये ते व्यक्त करायचं सामर्थ्य! त्यामुळे त्याची जी उत्तरोत्तर प्रगती होत गेली, तिला तोड नाही. शिवाय अजून एक फरक म्हणजे, आपल्या मनात जे विचार येतात ते आणि त्याच्या अंगी असलेली कला याद्वारे विविध प्रकारचे आविष्कार करणं, मग ती चित्रकला असो, साहित्य, नाट्य न्रुत्य वा गायन आदि जणु ६४ कला. ही जी काही किमया आहे, ती केवळ माणसाकडेच आहे. या लेखामध्ये मी विचार आणि आविष्कार यांच्यामध्ये असणाऱ्या कलेचाही जाताजाता लेखाजोखा घ्यायचा अल्पसा प्रयत्न केला आहे. हा लेख म्हणजेही मनातील विचारांचा एक आविष्कारच आहे.
चित्रकला आणि लेखन यामध्ये बरंच साम्य आहे. चित्रकलेमध्ये विचार महत्त्वाचा असतो, तीच गोष्ट लेखनाचीदेखील असते. विचारांचेच पुढे योग्य त्या चित्रात रूपांतर करणं हे चित्रकाराचं काम, तर विचारांना कल्पनेचा आधार देऊन, लेखक आपले कौशल्य दाखवत असतो. चित्रकलेमध्ये जसे लँडस्केप किंवा अँबस्ट्रॅक्ट आर्ट रिअलिस्टिक असे वेगवेगळे प्रकार असतात, तशीच लेखनाची गोष्ट आहे: काव्य, कथा, कादंबरी, नाटक इत्यादी. अर्थात् याचा अर्थ असा नव्हे की, चित्रकार जो आहे, तो लेखकही होईल किंवा उलट. अर्थात् ह्याला सन्माननीय अपवाद आहेतच.
हाच मुद्दा असाच पुढे नेम आपल्याला नेला, तर असे आढळेल की फोटोग्राफी आणि चित्रकला ही जुळी भावंडे आहेत. इथे एक हाताने प्रत्यक्ष जे मनात आले, त्या विचारांप्रमाणे कागदावर उतरवतो; तर दुसरा डोळ्यांच्या माध्यमातून जे समोरचे मनात चितारले गेले, ते फोटोमधून जगापुढे आणतो. याचाच अर्थ असा की, कुठल्याही कलेचा वा आविष्काराचा विचार हा गाभा असतो, तसा तो असायला हवा. कौशल्य म्हणजे त्या विचाराला प्रत्यक्षात आणण्याची जी हातोटी, ती म्हणजे कला !
हाच विचारप्रवाह आपण अजून एका बाबतीत पुढे नेऊ शकतो, ते म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक यांच्या बाबतीत. लेखक जसा आपल्या मनातील विचार आणि कल्पना यांचा संयोग घडवून एक नाट्यमय असे साहित्य कागदावर ठेवतो, तसेच दिग्दर्शक कागदावर जे उमटले आहे त्यावर विचार करून त्याला दृश्य रूपात कुठे कसं कुणाच्या माध्यमातून जगापुढे आणायचं, ह्याचा प्रत्यवाय आणून देतो आपल्या चित्रपटातून.
शास्त्रीय गायकाच्या बाबतीत देखील आपल्याला हाच निकष पुढे नेता येईल. ते असे की, आवाजाच्या दुनियेतील सूर स्वर लय आणि ताल यांचा योग्य तो लेखाजोखा घेत, विशिष्ट अशी निर्मिती, तो गायक जेव्हा आपल्याला नवा अनुभव ऐकवितो, तेव्हा त्यामागे त्याच्याकडे असलेली अंगभूत आवाज वाकवण्याची कला आहे. त्या कलेमध्ये तो आपला विचार मिसळतो तेव्हाच त्याला व आपल्याला हवे ते गवसत असते.
जेव्हा असाच विचार, मी डॉक्टर आणि ज्योतिषी यांच्या बाबतीत करू लागतो, तेव्हादेखील मला त्यामध्ये साम्य आढळते. डॉक्टर रोग्याचे काही निदान करतो, त्याला प्रत्यक्ष तपासणी बरोबरच विविध अशा रिपोर्टस् चा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना करतो. पण अमुकच झालं म्हणून तमुक दिल्यामुळे रोगी बरा होतो असं नेहमी घडतंच असं नाही. डॉक्टर आपल्या अंदाजाप्रमाणे सल्ला आणि सेवा देत असतो आणि रोगी बरा होतो किंवा नाही. निश्चित अशी खात्री मिळतेच असंही सहसा नाही. ट्रायल अँड एरर अशाच प्रकारचं काहीतरी वैद्यकीय सल्लामसलतीमध्ये चालू असल्याचा आपल्याला अनेक वेळा अनुभव येतो. ज्योतिषाचं देखील तसंच आहे. प्रत्यक्ष पहाणी चर्चा आणि त्याबरोबरच ग्रहांच्या पत्रिकांचे भेंडोळे, म्हणजे एक प्रकारे रिपोर्टस् यांचा अभ्यास करून तो आपले अंदाज मांडतो. त्याप्रमाणे पुष्कळदा फळे मिळतातही किंवा बिलकुल मिळतही नाहीत. ह्याचमुळे मला असं वाटतं की, डॉक्टर आणि ज्योतिषी यांच्यामध्ये पुष्कळ साम्य आहे. माझे हे म्हणण्याचा कदाचित कुणाला रागही येईल, पण जी तर्क व वस्तुस्थिती आहे ती मी माझ्या बुद्धी व विचारशक्तीप्रमाणे मांडले इतकेच.
सारांश काय, तर विचार व आविष्कार ह्यांचा लपंडावाचा खेळ माणसांच्या जगात नेहमी घडत असतो.
http//moonsungrandson.blogspot.com
Is the link of my blog, wherein you can read such more than 100 articles on diverse topics.
Please do share this link in your whatsapp groups....
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा