मंगळवार, १० मार्च, २०२०

"रंगांची दुनिया-१२": "शारदोत्सव-६":


"रंगांची दुनिया-१२": "शारदोत्सव-६":

"दिसामाजी काही ना काही नवनवे वाचत जावे, काही बघत वा ऐकत जावे आणि त्यातील मनाला भिडलेल्या निवडक मुद्दांवर नीरक्षीर विवेकबुद्धीने जसे जमेल तसे भाष्य करावे, अशी माझी प्रवृत्ती असल्यामुळे मी जेव्हा जमेल तेव्हा रसास्वाद लिहीत असतो. संपर्क संदर्भ मिळाल्यास लेखकाला देखील मी त्याची प्रतिसादात्मक पोचपावती देत असतो.
ह्या लेखात असाच दोन दिवाळी अंकांचा मी परामर्ष घेतला आहे:

१. "दीपावली" दिवाळी अंक'१९: रसास्वाद:

लेखक-श्री. गणेश मतकरी
"फेरा": लघुकथा
जीवाभावाच्या संबंधातील जोडीदारांचे एकमेकांशी असलेले नाते आणि परस्पर ऋणानुबंध कालानुरूप प्रसंग कसे बदलत जाऊन त्याची परिणती अखेर फारकत आणि वियोग यात होऊन जाते अन् मागे राहिलेल्या संबंधितांना त्याचे असह्य ताणतणाव कसे सहन करायला लागतात, ते आपण दीपावली दिवाळी अंक'१९ मधील 'फेरा' ह्या कथेमध्ये ओघवत्या भाषेत मांडले आहेत.

पुढे काय होणार याची हुरहूर, उत्सुकता कायम ठेवणारी ही कथा आहे. प्रथमपुरुषी
निवेदनशैलीमुळे, तिची परिणामकता अधिकच दाहक झाली आहे. त्यावरून एक मात्र जाणवले की, DNAs शारीरिक दृष्ट्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, हे आता जगन्मान्य आहे, परंतु नशिबाचे अथवा प्रारब्धाचेही DNAs हे असे वडिलांकडून मुलीकडे जात असतात किंवा जावू शकतात, ह्या शक्यतेची जाणीव करून देणारी ही एक उत्तम कथा आहे. अभिनंदन व शुभेच्छा.
-------------------------
लेखक: श्री सुहास बहुलकर
ललित लेख:
"चित्रे भंगारात टाकलेली.. वाचलेली..वाचवलेली"

चारशे वर्षापूर्वीची शेक्सपियरसारख्या
जागतिक कीर्तीच्या नाटककाराची स्र्टँटफोर्ड अपाँन अँव्हनमधील, जन्माची जागा, घर आणि इतर चीजवस्तू, डोळ्यात तेल घालून, त्यांना जीवापाड जपत, लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरणारं अशा म्युझियममध्ये रूपांतर करणाऱ्या ब्रिटिशांची खरोखर कमाल आहे. माझ्या सुदैवाने इंग्लंडमधील ती वास्तू आणि त्या अनमोल चिजा, प्रत्यक्ष बघायचा मला योग आला होता. त्याची आठवण, आज दीपावली दिवाळी अंकांमध्ये तुमचा "चित्रे भंगारात टाकलेली.. वाचलेली..वाचवलेली" हा लेख वाचताना आली.

अजरामर ठराव्यात अशा दिग्गज व्यक्तींच्या, अनेक नामवंत चित्रकारांनी चितारलेल्या कलाकृती, कधीही नीट जतन करून ठेवल्या नाहीत आणि त्यातील बऱ्याचशा भंगारात जाऊन नाहीशा झाल्या, हे वाचून मनाला चटका बसला. परंतु अशाही परिस्थितीत तुम्ही स्वतः अथक प्रयत्न करून, वेळप्रसंगी स्वतःच्या खिशाला चाट देऊन, जे काही प्रयत्न या सगळ्या अनमोल ठेव्याला शोधण्यासाठी व पुनश्च पुनर्स्थापित करण्यासाठी केलेत, त्याचे ओघवते वर्णन, आपण आपल्या ह्या लेखात केले आहे. ते खरोखर जसे वाचनीय आहे, त्याचप्रमाणे आपलीच आपल्याला लाज वाटावी अशा प्रवृत्तीची जाणीव करून देणारी देखील आहे. "कालाय तस्मै नमः" किंवा, "हम नही सुधरेंगे" हेच खरे. मात्र एक आवश्यक आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा असा लेख आपण लिहिल्या बद्दल आपले अभिनंदन व शुभेच्छा.
------------------------

लेखिका: वसुंधरा घाणेकर
कथा
"सापशिडी":

दीपावली"दिवाळी अंक'१९ वाचाताना, त्यामधील 'सापशिडी' ही तुमची कथा खरोखर चित्तथरारक आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा किती बुद्धिबळातील खेळा सारखी, एकमेकांवर मात करण्यासाठी टपलेली असते ते, मुसळधार पावसाच्या थैमानामुळे एकत्र आलेल्या
स्वामिनी, सोनाली आणि ओम या त्रिकुटाच्या आकांक्षा व प्रयत्न ह्यांच्या लपंडावातून दिसत रहाते. कथा कळत, नकळत अखेरपर्यंत उत्कंठा वाढवत नेते आणि कोण जिंकेल वा कोण हरेल ह्याचे उत्तर मिळाल्यावर, तर 'सापशिडी' हे नाव कथेला योग्य असल्याची खात्री पटते. अभिनंदन व शुभेच्छा.
------------------------
२.
"शब्द रुची" दिवाळी अंक'१८":

महान चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर ह्यांच्या जगमान्य योगदानाचे चित्र मांडणारा लेख
श्री. रंजन जोशी ह्यांनी ह्या अंकात लिहीला आहे.
त्यामध्ये त्यांनी विविध बिरुदे आणि त्यामागील सामाजिक मानसिकता ह्यांचा समग्र वेध घेतला आहे, तो नोंद घेण्याजोगा आहेः

"विविध बिरुदे आणि सामाजिक मानसिकता":

'अठराशे तीस नंतरच्या काळात रावबहादुर, लोकहितवादी, न्यायमूर्ती, महात्मा आणि लोकमान्य ही बिरुदे लोकोत्तर व्यक्तींना दिली जात असत. लोकहितवादी देशमुख हे इंग्रज सरकारच्या नोकरीत असून भारतीय समाजाला इंग्रजी राजवटीत आलेला आधुनिक विचार मानणारे होते. भारतीय रूढीग्रस्त मानसिकता त्यामुळे नाही शी होईल अशी त्यांची धारणा होती. महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी राजवटीचे समर्थक होते कारण भारतातील हजार वर्षे चार वर्ण आणि जातीव्यवस्थेचे उच्चाटन होऊन शूद्र म्हणून हिणवला गेलेला कष्टकरी मुक्त होईल, या हेतूने त्यांनी सत्यशोधक चळवळ उभी केली. त्यातूनच लोकांनी महात्मा हे सन्माननीय विरोध त्यांना दिले. कोल्हापूरचे शाहू महाराज प्रजाहितदक्ष राजा म्हणून ओळखले गेले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे ब्रिटिशांच्या नोकरीत होते, तरी त्यांचे भारतीय समाज सुधारणांचे प्रामाणिक प्रयत्न लोकांनी अनुभवले. ते सर्वार्थाने न्यायमूर्ती म्हणून ओळखले गेले. लोकमान्य हे बिरूद बाळ गंगाधर टिळक यांना लोकांनीच लावले, कारण ते कष्टकरी तसेच अगदी सुशिक्षित वर्गात देखील देशपातळीवर स्वातंत्र्य चळवळीचे नेते मानले गेले. समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर ओळखले गेले. महर्षी म्हणून धोंडो केशव कर्वे यांच्या शिक्षण देण्याच्या कार्यामुळे समाजाने दिले. महात्मा गांधी अहिंसावादी सामाजिक व राजकीय विचारांच्या धोरणांनी नवयुगाची सुरुवात करणारे म्हणून त्यांची जागतिक पातळीवरही घेण्यात आली. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन करणारे म्हणून मान्यता पावले. अशी काही बिरुदे देशप्रेम व स्वातंत्र्य चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील लोकनायक जयप्रकाश नारायण अशा पद्धतीने मान्य झाले. नंतरच्या काळात ह्रदयसम्राट हे बिरूद उदयाला आले."

धला तुमचा लेख वाचला. रावबहादुर आणि थोर चित्रकार महादेव धुरंधर यांचा व्यक्ती म्हणून आणि चित्रकलेचा एक महान उपासक म्हणून, आपण संशोधनपूर्वक, अत्यंत अभ्यासपूर्ण असा जो हा लेख लिहिला आहे, तो खरोखर एखाद्या डॉक्टर पीएचडी साठी लिहिलेल्या प्रबंधाचा जणू सीनाँपसिस अथवा सारांश असावा इतक्या दर्जाचा झाला आहे. माहितीबरोबरच त्यांनी चितारलेली विविध पद्धतीची अशी प्रत्यक्षदर्शी चित्रे, आपण या लेखासोबत दिली आहेत. त्यामुळे या लेखाची शोभा वाढून दर्जा उच्च झाला आहे.

चित्रकला हा खरं म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांच्या दृष्टीने एक ऑप्शनला टाकू शकणारा विषय. पण त्याचे इतके काही संदर्भ, रूपे आणि प्रकार असू शकतात, हे आम्हाला त्यामुळे कळले. शेवटी चित्रकार आणि लेखक यांच्यात काहीतरी साम्य आहे आणि तेही एक लेखक म्हणून मी जाणू शकतो. ही चित्रे जेव्हा त्यांनी काढली असतील, तेव्हा विचारांची त्यामागे बैठक मजबूत असणार, एवढे निश्चित. एक वाचनीय आणि चित्रकलेबाबत संपूर्ण नवी दृष्टी देणार्या, या
लेखाबाबत लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
--------------------------
"शब्द रुची" दिवाळी अंक'१८ मधला श्री. दिलीप पांढरीपट्टे ह्यांचा "नव्या वाटा, नवे ठसे हा लेख वाचला आणि त्यांनी आपल्या जीवनप्रवासाची विशेषतः साहित्यिक आणि शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीचा लेखाजोखा अगदी मोजक्या शब्दात येथे मांडला आहे. गझल पासून सुरुवात करून विविध साहित्यिक योगदानाप्रमाणे, शैक्षणिक आणि व्यावसायिक अधिकारपद त्यांनी मिळवल्याचे त्यावरून समजले.

असाच आपआपल्या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा संक्षिप्त आढावा ह्या अंकात रत्नाकर मतकरी डॉक्टर अविनाश सुपे रामदास भटकळ यांनी देखील घेतला आहे. त्यामुळे आपल्याला माणूस कसा असतो आणि तो अंगभूत गुणांच्या आणि परिश्रमांच्या जोरावर आपल्याला आवडीचे असे क्षेत्र कसे निवडतो आणि त्यामध्ये आपले गुण प्रदर्शित करत मान्यता कशी मिळवतो ते समजते त्यामुळे विविध अशा क्षेत्रांची तर माहिती होतेच परंतु त्या त्या लेखकाच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात आपल्याला प्रत्यवाय येतो.
-------------------------
जाता जाता,
"विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
आपल्या राशीचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य
व राहू केतूच्या राश्यंतराचे परिणाम जाणण्यासाठी.......
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandsun

आणि विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......

wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा