शनिवार, १४ मार्च, २०२०

"रंगांची दुनिया-१३": "टेलिरंजन-२": "मराठी मालिका": काहीही हं !":

"रंगांची दुनिया-१३": "टेलिरंजन-२":
"मराठी मालिका": काहीही हं !":

"रंगांची दुनिया", या सदरामध्ये आत्तापर्यंत आम्ही साहित्य चित्रपट आणि नाटकं यांचा परामर्श अथवा रसास्वाद जितका घेत असतो, तितकं मराठी मालिकांबद्दल काही वेळ वाया घालवून लिहावे असे खरंच वाटत नाही. त्यामुळे ह्या सदरामध्ये आमचे मालिकांवरचे लेख दुर्मीळ आहेत.

आपले डोके गहाण ठेवून जे खेळखंडोबे किंवा कारनामे मराठी मालिकांमध्ये दाखवले जातात, त्यांच्यावर आपलं डोकं वापरून उगाचच काहीतरी खरडावं हे काही योग्य नव्हे, असंच आम्हाला वाटतं. पण आम्हाला वाटते म्हणून, त्यांचा जो काही संसार मालिकांचा चालू असतो तो काही बंद पडणार नसतो, सारखे पाणी घालत घालत कितीही दिवस आठवडे मालिका पुढे नेल्या जातात. म्हणूनच आम्ही आजच्या टेलीरंजन लेखाला "मराठी मालिका": काहीही हं!" असं शीर्षक दिले आहे.

बहुतेक मालिकांमध्ये नायक आणि त्याची हक्काची बायको, या जोडीला त्याचे एक
प्रेमपात्र, कधीकधी अजून दुसरे किंवा आणखीही! अशाच कल्पनेभोवती मालिका कां गुंतलेल्या असतात कळत नाही! कदाचित प्रतिभाशक्ती उरलीच असावी किंवा समाजाची अभिरुची खालावत चाललेली असावी. उदाहरणार्थ "लग्नाची बायको आणि वेडिंगची वाइफ" असे उघड-उघड दोन बायकांचं नाव घेणारी मालिका, खरोखर इतकी अयोग्य वाटते की बोलायची सोय नाही. फॉरेनला फालतू ड्रायव्हर असलेला मदन त्याच्या प्रेम पात्राला इकडे इंग्लंडची राजकुमारी म्हणून आणून, संबंध गावाला नुसत्या कुटुंबालाच नव्हे तर चक्क गावाला फसवत राहतो. एवढंच काय तर सगळ्यांच्या देखत तिच्याशी वेडिंग म्हणजे विवाहही घडवून आणतो. तिच्या बरोबरचं हे असं नातं, सारखं, लपून-छपून अगदी सातत्याने प्रत्येक भागात संभाळत राहू शकतो. पण एवढे लोक बुद्दू आहेत की काय कळत नाही. केव्हा तरी ते उघडकीला येणार यात काही नवल नसतं.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

अगदी नावाजलेली सगळ्यांना आवडणारी अशी मालिकाही घेतली "आई कुठं काय करते?" तर तिथेही हीच कथा आहे. नायक (की खलनायक?!) तीन तरूण मुलांचा बाप, अनिरुद्ध आणि त्याची पत्नी साधी भोळी अरूंधती हे जोडपे, अन् इथेपण ऑफिस मधली संजना हे त्याचं ठेवलेलं प्रेमपात्र, या त्रिकोणात चालतेच आहे. खरं तर होती, ही तशी कौटुंबिक मालिका, पण फिरत जाते या दोन्ही बायकांना खेळवत. आता तर त्या दोघींचं एकाच दिवशी एकाच ठिकाणी अनिरुद्धशी लग्नही लावण्यात येणार आहे!
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

वर्षांमागून वर्षे प्रेक्षकांचा अंत पहाणारी मालिका कोणती, तर "माझ्या नवऱ्याची बायको". तर त्यामध्ये गुरुनाथ ग्रहिणी असलेल्या पत्नीला- राधिकेला फसवून, शनायाच्या नादी लागतो हे तर केव्हाच आपण बघितलं, शेवटी कधी न होणारा घटस्फोट झाल्यावर तोच पुढे खेळ चालवत, आता जणु खो खो खेळासारखा तिसर्‍याच तरुण स्त्रीच्या प्रेमात पडून तो तिलाही लग्नाचं आश्वासन देताना प्रेक्षक अगदी उघड्या डोळ्याने बघत आहेत. अरे कायदा म्हणून काही आहे असे वाटतच नाही, ह्या मंडळीना! खरं म्हणजे असा अनैतिक तमाशा योग्य देखील नव्हे. सहाजिकच
सोशल मीडियावर नुकताच एक प्रश्न टाकण्यात आला होता की, कोणती मालिका ताबडतोब बंद झालेली तुम्हाला आवडेल? तर त्यामध्ये ही वर्षानुवर्ष जाणारी "माझ्या नवऱ्याची बायको" ही मालिका अग्रक्रम मिळवून गेली, यातच काय समजायचं ते समजा.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

म्हणूनच, मालिका मर्यादित भागांच्या हव्यात आणि त्यांना नियंत्रण म्हणून केल्या जाव्यात हे आग्रहाने प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे.

"सुखांच्या सरींनी मन बावरे" या मालिकेमध्ये तर कहर चालला आहे. कोणती पात्र मध्येच गायब होतील आणि कथा मात्र तशीच पुढे जात राहील ते मुकाट्याने पहायचे. श्रीमंत उद्योजक, नायक सिद्धार्थने खरोखर एखाद्या विधवा आणि आधी मूल होऊन गेलेल्या वयाने मोठ्या असणार्‍या गरिब घरातील अनुशी चक्क प्रेमात कां पडावे व विवाह कां कशासाठी करावा हा प्रश्न मनात असताना, त्याच्यावर एक तर्फी प्रेम करणाऱ्या खलनायिक सानवीने इथे कोणते कोणते, दिवे लावले आहेत ते बघून तिच्यासारखं आपल्यालाही वेड लागेल असं वाटतं. "डर" पिक्चरची आठवण व्हावी अशी एकामागून एक कृत्ये ती बिनविरोध करते, ती खरोखर अशक्यप्राय अशीच आहेत. यशस्वी उद्योजिका असलेली दुर्गा मध्येच गायब होते, नंतर निष्प्रभ वाटणारी एक अभिनेत्री त्या रूपात येऊन मालिका पुढे ढकलताना शेवटी या खलनायिकेलाच महत्त्व देत, नायिका अनुच परदेशात निघून गेल्याचे दाखवतात. म्हणजे प्रेक्षक गृहीत धरला जातो आणि सिद्धार्थ बायकोशी एकनिष्ठ असला तरी, इथे दुसरी डर चित्रपटातील खलनायकाची जणु काँपी असलेली एकतर्फी प्रेम करणारी सानवी ही तरुणी, त्याला मिळवण्यासाठी काय काय अमानुष व मुळीच न पटणारी क्रुत्ये करीत रहाते.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

असले, नको त्या पात्राच्या नादी लागण्याचे खेळ रात्रीतच चालतात, याचा प्रत्यय आणून देणारी "रात्रीस खेळ चाले" या मालिकेचे बद्दल तर बोलायलाच नको. उघड-उघड खलनायक असलेला इथला अण्णा, घरी हक्काची बायको आणि बाहेर चवचाल, मादक सौंदर्याचा अँटम बाँम्ब, प्रेमपात्र असलेली शेवंता, यांच्याभोवती ही मालिका चक्क दुसऱ्या भागाची मजल मारत पुढे जात आहे, यावरूनच प्रेक्षकांना आंबटशौकीपणा पहायला अधिकाधिक आवडत आहे, समाजाची अभिरुची रसातळाला जात हेच खरे.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":

काहीही करून कुणाचं तरी पाऊल असं वाकडं पडलेलं सातत्याने दाखविल्याशिवाय मराठी मालिका जणू काही बनवताच येत नाही असाच संभ्रम या साऱ्या मालिकांवरून वाटतो.
शेवटी काय तर, "मराठी मालिका": काहीही हं !":
---------------------------
विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
आपल्या राशीचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य
व राहू केतूच्या राश्यंतराचे परिणाम जाणण्यासाठी.......
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandsun

आणि विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......

wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा