शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

"वाचा आणि फुला, फुलवा-४": "दाहक वास्तवता":


"वाचा आणि फुला, फुलवा-४":
"दाहक वास्तवता":
वाचण्यासारखा छंद नाही, वाचण्यासारखा आनंद नाही, कारण त्यामधून आपल्याला अनेक व्यक्तींचे अनेक तर्‍हेचे विचार पाहायला, वाचायला अनुभवायला मिळतात. पुन्हा पुन्हा उजळणी करावी असे जर काही मला वाचनातून मिळत गेले, तर ते माझ्या ह्या अभिनव सदरातून मांडणे मी सुरु केले आहे. ही एक प्रकारची आनंदयात्राच आहे आणि तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.पहिल्या लेखाप्रमाणे, दुसऱ्या लेखनपुष्पातही "जीवन तत्त्वज्ञान" विषयावरील कविवर्य विंदा करंदीकर, ह्यांच्या आठ गझला मी मांडल्या होत्या. आता त्यातीलच ही अखेरची, तितकीच अर्थपूर्ण गझल!:
९."निर्वाणीचे गझल":मौज दिवाळी अंक"२०११:कविवर्य विंदा करंदीकर:
"त्याला इलाज नाही":धिक्कारली तरीही सटवीस लाज नाही;
श्रद्धा न पाठ सोडी,, त्याला इलाज नाही.
देवांतुनी जगाला ज्याने विमुक्त केलेंत्यालाच देव करिती! त्याला इलाज नाही.

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे! त्याला इलाज नाही.
तत्वज्ञ आणि द्रष्टे एकमेका खंडून एकमेकांकथिती विरुद्ध गोष्टी; त्याला इलाज नाही.

तें भूत संशयाचें ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना; त्याला इलाज नाही.

विज्ञान ज्ञान देई; निर्मि नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती; त्याला इलाज नाही.
बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटे अनेक रूपे! त्याला इलाज नाही.

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी! अस्वस्थता टळेना; त्याला इलाज नाही.

ज्यांना अनेक छिद्रें असल्याच अनेक नावा
निर्दोष ना सुकाणू; त्याला इलाज नाही.
वृद्धापकाळ येतां जाणार तोल थोडा;
श्रद्धा बनेल काठी! त्याला इलाज नाही.
कविवर्य विंदा करंदीकर.


या सगळ्याचा अर्थ एवढाच की बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण त्या बदलू शकत नाही आणि कितीही अट्टाहास केला की आपल्याला असे असे हवे, तरी तसे काहीही घडत नाही. तेव्हा त्याला इलाज नाही, असे म्हणून पुढे जायचे.

थोडक्यात ज्या गोष्टी आपण बदलू शकतो, ज्या बदलण्याची आपल्यामध्ये कुवत असते, परिस्थिती असते, अशाच गोष्टीच फक्त बदलण्याची शक्यता असते. नाहीतर ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत परिस्थिती व बाह्य अशा कितीतरी गोष्टी आपल्या शक्तीपलीकडे आहेत, त्या बदलण्याचा अट्टाहास न करता आपण आपल्या मार्गाने पुढे जावे. त्यामुळे उगाचच शक्ती वाया जाणार नाही आणि मनाची ही अवस्था नैराश्याकडे जाणार नाही, हाच बहुदा या गझलेचा अन्वयार्थ.
कविवर्य विंदा करंदीकरांच्या आपणापुढे सादर केलेल्या नऊ गझला, खरोखर अंतर्मुख करणाऱ्या आहेत. मी जसा त्या २०११ साली नोंदवुन ठेवल्या आणि आज आता त्यांचा हा असा उपयोग मला करता आला, तसाच कायम तुम्हाला ह्या गझलांचा निश्चित उपयोग होईल, याची मला खात्री आहे. म्हणून या नऊही गझला आपण आपल्या संग्रही निश्चित ठेवा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल, तेव्हा तेव्हा त्यांची उजळणी करा. पुन्हा तुम्हाला नवीन उमेद येईल आणि तुमच्या नव्या प्रेरणा जागृत होतील याची मला खात्री आहे.
--------------------------
"लोकमत"'उत्सव' दिवाळी अंक'१९:"सोशल मीडिया आणि सोशल एकटेपणा"लेखक: अमर दामले

सध्या एकटेपणांतून सुटका म्हणून, सोशल मीडियामध्ये आपण सगळे कसे वहावत चाललो आहोत, त्या विषयावर भारावून टाकणार्या वरील लेखांतील निवडक अंश म्हणूनच पुढे देत आहे:
"खरंच एकटेपण इतकं वाईट असतं कां?:खरंतर 'स्वतः निवडलेले एकटेपण' आणि 'लादले गेलेले एकटेपण' यात फरक आहे.
एकटेपणाकडे अनेकदा 'बिचारेपणाच्या' दृष्टीकोनातून बघितले जाते आणि गल्लत होते. त्याऐवजी ती स्वतः जवळ जाण्याची संधी म्हणून बघितले जाऊ शकते. कारण स्वतःशी संवाद हीच आता एक दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी खूप बोलतो. आपण, अगदी भरभरून बोलतो. पण स्वतःशी? स्वतःशी केव्हा बोलतो? मधून मधून स्वतःची बोललो पाहिजे हे अनेकांच्या गावीही नसतं. इतरांशी बोलणं सोपं आहे, पण स्वतःशी बोलणं, स्वतःला समजून घेणे कठीण असतं. 'जाणावे आपणाशी आपण' असं समर्थ' सांगतात ते यासाठी बहुदा.

खरंतर आज तंत्रज्ञानाने सोशल मीडिया नावाचं केवढं मोठं घबाड आपल्याला दिलंय. एकमेकांशी संपर्क ठेवायचा म्हटला तर 'फास्ट कम्युनिकेशन' साठी एवढे पर्याय आपल्या हाताशी. मात्र त्याच वेळी एक मान्य करावं लागतं की, आपण तुटत चाललो आहोत एकमेकांपासून. आपण जोडले गेलो आहोत, पण जुळलेले नाही. एकटे पडतोय, विलग होतोय, खूप लोकांच्या संपर्कात राहूनही, घट्ट मैत्री कुणाशीच नाही. सगळं वरवरच.

गर्दीतही आपण एकटे ही जाणीव मनाला थकवते. जीवाला जीव देणारे हाकेला धावून येणारे लोक आजूबाजूला हवे असतील तर त्यासाठी वेळ ईन्व्हेस्ट करावा लागतो. इथे तर सगळा मामलाझटपटचा."
"अर्थात तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती इतकी प्रचंड आहे की, सतत काहीतरी नवं आपल्यावर लादलं जातंय आणि आपणही त्या भूरळीला बळी पडतोय. आपल्याला या सगळ्याची गरज आहे की नाही, याचा विचार न करता, त्याच्या आहारी जातोय. सोशल मीडियाला बळी पडलेले आपण हे त्याचंच उदाहरण."
"कळप प्रवृत्ती हेदेखील माणसाचं एक खास स्वभाववैशिष्ट्य. कळपात राहिल्याने कदाचित सुरक्षित वाटते. एकटे पडण्याची शक्यता कमी होते."
"आम्ही झोपेतून जागे होणार नाही, हे जणू ठरवलेच आहे. 'अति तेथे माती' हे माहित आहे आपल्याला. पण तेवढा विचार करण्याची उसंत कोणाला आहे? त्याच्या पाशात आपण नुसते गुरफटलो नाहीत, तर सद्सद्विवेकबुद्धी हरवून बसलो आहोत. त्यातून अनेक जटिल मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत.
आपलं चुकतंय अशी बोचणी कुठेतरी जाणवते. त्यातून मग भावनांवर ताबा ठेवता न येणं, चिडचिड होणं, सर्जनशीलतेचा अभाव असल्याने रोजचं आयुष्य यंत्रवत वाटणं. कोणतेही काम करण्यात उत्साह नसणं. त्यातून बळावलेली नैराश्याची भावना, आपल्यात काहीतरी कमी आहे असा विचार वारंवार येणं, हे सगळं ओघानं आलंच. हळूहळू आपण कुटुंबापासून समाजापासून दूर पडतोय, ही भावना बळावते. एकटेपणाची भावना होते."
"प्रचंड बौद्धिक ताकदीच्या भरवशावर आपण ग्रह-तार्‍यांना कवेत घ्यायला निघालोय. मात्र हे सगळे करताना, स्वतःचीच बोलायचं राहून जातंय की काय? मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या धुंदीत, लहान सहान गोष्टीतील आनंद आपण हरवतोय काय? याचा विचार करावा लागेल."लेखक: अमर दामले----------------------------
ह्या लेखात लेखकाने एकटेपण आणि समाज माध्यमांचा आपल्यावर होणारा अनिष्ट परिणाम, याचे विश्लेषण खरोखर अभ्यासपूर्ण रीतीने मांडलेले आहे. ते आपल्या सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारे आहे. सोशल मीडियाच्या आहारी किती जायचे, त्याचा उपयोग आपल्या भल्यासाठी कसा करायचा, हे ज्याचे त्याने ठरवायला हवेच, तशी वेळ आता आलेली आहे असेच म्हणायचे.
--------------------------विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:माझ्या चँनेलचे नांव:
moonsun grandsun
आणि संपूर्ण वार्षिक राशीभविष्य व इतरही जीवनोपयोगी विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......तसेच...शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगचीही लिंक उघडा......wapp grp वर शेअरही करा......


http//moonsungrandson.blogspot.com


धन्यवाद

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा