मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

"रंगांची दुनिया-८": "शारदोत्सव-५": "एक व्रतस्थ आत्मचिंतन": "अंतस्थ कोणी":


"रंगांची दुनिया-८": "शारदोत्सव-५":
"एक व्रतस्थ आत्मचिंतन":
"अंतस्थ कोणी":
लेखक: डॉ. गिरीश दाबके.

रवींद्र पिंगे यांचे "साहित्य संचार" हे पुस्तक वाचल्यानंतर मला जर त्याच्यातून काही मिळालं असेल, तर ते म्हणजे विविध लेखकांच्या विविध विषयांवरची पुस्तकांची अत्यंत संग्राह्य अशी यादी. हे जसं खरं, तसंच डॉ गिरीश दाबके यांच्या
"अंतस्थ कोणी" या पुस्तकाच्या वाचनानंतर मला वैशिष्ट्यपूर्ण व अंतर्मुख करणाऱ्या विचारांचा
इतका काही खजिना मिळाला, की त्याला तोड नाही.

वरील पुस्तकांच्या यादीतून खरं म्हणजे मी नेहमी वाचनालयातून कोणतं ना कोणतं तरी पुस्तक आणावं, अशा मूड मध्ये होतो. परंतु त्या दिवशी काय झालं, कुणास ठाऊक. त्या यादीत नसलेलं, "अंतस्थ कोणी" असे अनोखे शीर्षक असलेले हे श्री गिरीश दाबके यांचं पुस्तक मला मिळालं.
श्री. गिरीश दाबके आणि माझा परिचय असल्यामुळे मी ते पुस्तक घ्यायचं ठरवलं.

पुढे जाण्यापूर्वी, मी आमच्या ह्या परिचयाची पार्श्वभूमी सांगतो:

आम्ही सायनला बालपणी केवळ तळमजला असलेल्या बैठ्या चाळवजा बरँक्समध्ये रहायचो.
तिथे आमच्या शेजारीच पहिल्या खोलीमध्ये नित्सुरे कुटुंब रहायचे आणि त्यांच्याकडे गिरीशचे वडील, ज्यांना आम्ही जनाकाका म्हणायचो तेही रहायचे. ते त्यावेळी अविवाहित होते. कालांतराने आम्ही सारेजण वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर झालो आणि अचानक केव्हातरी मध्यंतरी, काही वर्षांपूर्वी, माझी आणि गिरीशची फोनवर भेट झाली. तो मालाडला आणि मी माहीमला हे जसे ध्यानात आले, तसेच तो काही लेखनही करतो एवढेच बोलताना समजले होते.

परंतु नंतर पुष्कळ वर्षे आमचा संपर्क आला नाही आणि आज अचानक हे पुस्तक घेतल्यामुळे, पुढे अशा काही घटना घडल्या की, आमचा पुन्हा संपर्क जोडला गेला. मी घरी आल्यावर हे पुस्तक आणि मासिकं चाळत होतो. मासिकं माझी वाचून पूर्ण झाली, व ह्या पुस्तकांतील मी कुठलं तरी प्रकरण वाचताना, मला त्यावेळी तरी ते कंटाळवाणं वाटलं आणि त्यामुळे मी पुस्तक बाजूला ठेवलं. खरं म्हणजे सहाजिकच मी ते पुस्तक न पुढे वाचताच, वाचन पूर्ण झालेल्या मासिंकांबरोबर वाचनालयात परत करणार होतो.

पण योगायोगाने तसे काही घडले नाही आणि तिथेच मोठा सुयोग जुळून आला. कारण नंतर पुन्हा जेव्हा सवड मिळाली, तेव्हा मी हे पुस्तक उघडले आणि सरळ 'अंतस्थ कोणी' ह्याचउत्कंठावर्धक प्रकरणाचं पान उघडलं गेलं. ते प्रदीर्घ उत्कंठावर्धक प्रकरण वाचल्यानंतर, मी अक्षरशः अचंबित झालो, त्यापाठोपाठ "नरेंद्रायण" हे प्रकरणही वाचलं आणि ठरवलं त्याच्याशी संपर्क साधायचा. हे पुस्तक पूर्ण वाचून नंतरच वाचनालयात परत करायचं. त्या प्रमाणे ठरवून मी व्हाट्सअँप वर माझा हा प्रतिसाद पाठवला:

"डॉ गिरीश दाबके,
सादर वंदन.

मी सुधाकर नातू, माझा मोबाईल नंबर तुझ्या संग्रही असेलच ही शक्यता नाही, म्हणून ही सुरवात.

मी सध्या तुझे "अंतस्थ कोणी" हे पुस्तक वाचत आहे आणि अक्षरशः थक्क झालो आहे. हिमनगाचे पाण्यावरचे टोक इतकीच मला आतापर्यंत गिरीश दाबके ह्या माणसाची माहिती होती, कारण ह्या पुस्तकातील, तू आता डॉक्टर गिरीश दाबके असून तुझ्या साहित्यिक सांस्कृतिक व राजकीय वर्तुळातील उत्तम कामगिरी व थोरा मोठ्यांच्या आश्चर्यकारक इतक्या लोकसंग्रहामुळे वाटून गेले.

इथेच हा मोबाईल नं मिळाला. लगेच हा संदेश लिहीण्यास उद्युक्त झालो. मी 'किस्रीम' दिवाळी अंक'१९ मधील तुझ्या लेखावर माझा प्रतिसाद तुला मेसेंजरवर धाडला होता. त्याला उत्तर आले नाही वा तो पाहिल्याचे निदर्शनास आले नाही. म्हणून आता तो संदेश येथे पुढे पाठवत आहे:

१६ जानेवारी'२० रोजी तुला मी मेसेंजरवर पाठविलेला संदेश:

'नुकताच मी "किस्रीम दिवाळी अंक'१९ वाचला आणि त्यात तुझा संपर्कसंदर्भ मिळाला. तो क्रमांक wapp चा नव्हता. म्हणून येथे फेसबुक मेसेंजरवर संदेश.

अंकामधील डॉ शामाप्रसाद मुखर्जींविषयीच्या इतिहासाची तपशीलवार कहाणी तू मांडली आहेस. ती निश्चितच चटका लावणारी आहे व मला ह्या घडामोडी अपरिचित असल्याने त्यांची दाहकता अधिकच होती. कालौघात बदलणारे देशाचे नेत्रुत्व, देशाच्या भवितव्याला कलाटणी देणारे असते ही जाणीव मला झाली.

तुझ्या उत्तुंग योगदानाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.
सुधाकर नातू'

हा संदेश पाठवल्यावर आमची पुन्हा फोनवर गाठ पडली आणि मनसोक्त गप्पा झाल्या. असो.
आता ह्या पुस्तकाकडे येवू.

जीवनाकडे किंवा व्यक्तींकडे प्रसंगांकडे, अनुभवांकडे, तटस्थ व्रतस्थ दृष्टीने बघून, त्यातून अम्रुतमंथनासारखे, काही ना काहीतरी तात्विक आणि शाश्वत असे अम्रुततुल्य विचार मांडण्याचे फक्त निवडक लेखकांनाच जमत असते आणि अशा लेखकांमध्ये डॉ गिरीश दाबके यांचा निश्‍चित समावेश करावा लागेल. त्यादृष्टीने जर तुलना केली तर 'वपुं'चं लेखन देखील नेहमी जीवनाचे काही ना काही तरी शाश्वत तत्त्वज्ञान सांगणारे असेच असे. "आपुल्याच आरशात पहावी, आपुलीच प्रतिमा" असे विश्राम बेडेकरांच्या "एक झाड दोन पक्षी" ह्या आत्मचिंतनाशीही, हे पुस्तक साधर्म्य साधू शकते.

"अंतस्थ कोणी" या पुस्तकाच्या वाचनानंतर, मला जे काही जीवन तत्त्वज्ञान अथवा मौलिक असे विचार मिळाले त्यातील ( जागे अभावी) फक्त निवडकच पुढे मांडतो आहे. त्यावरूनच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आणि लेखकाची कर्तृत्वाची झेप किती उत्तुंग आहे हे समजावे. त्यामुळे दाबके यांनी कशावर काय लिहिलं आणि कसं लिहिलं यापेक्षा त्यांच्या सार्‍या लेखन प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून काय जाणवलं काय मिळालं ते यातून समजावं.

नामवंतांचे चरित्रलेखन हे कदाचित डॉ गिरीश दाबकेंच्या लेखनाचे बलस्थान असावे. कारण त्याने आतापर्यंत डॉक्टर हेगडेवार, श्री नरेंद्र मोदी धीरूभाई अंबानी यांची चरित्रे लिहिली आहेत आणि ती विलक्षण लोकप्रियही झाली आहेत. आमच्या फोनवरच्या भेटीत समजलं की त्याने आता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे चरित्र, जे कदाचित मराठीमध्ये पहिलेच असावे, ते लिहून पूर्ण केले आहे आणि त्याच्या प्रकाशन समारंभालाही त्याने मला आमंत्रण केले.

योगायोग काय असतो कुणास ठाऊक! दोन माणसं केव्हा कधी किती काळाकरता एकत्र येतात याचे काही गणित नाही हेच खरे! पण या पुस्तकामुळे मला जीवनाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन जसा मिळाला आहे, तसाच लेखनकला साधीसुधी कला नसून त्यामागे मुबलक वाचनाची आणि चिंतनाची तसेच अथक परिश्रमाची गरज असते हे त्याच्या चरित्र ग्रंथांमागच्या वेळकाढू, जबरदस्त प्रचंड अशा कष्टांवरून समजले.

"अंतस्थ कोणी" यामध्ये लेखकाने आपल्या भूतकाळाचा मागोवा मनाच्या कोपऱ्यात असलेल्या स्मरणजंत्रीवर भाष्य करीत घेतलेला आहे. तिथे काय काय नाही, तर सगळं काही आहे! आई वडील, दोन जिवलग मित्र, भगवान श्रीराम, संत रामदास, हमो, जीए, शिरवळकर माननीय स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री नरेंद्र मोदी, एवढेच काय तर कार्ल मार्क्सही आहे व महत्वाचे म्हणजे लेखकाचे साहित्यिक-सांस्कृतिक आणि करमणुकीच्या विश्वातले अनुभव व कर्तृत्व, ज्यात यशापेक्षा अपयशांच्याच दाहक प्रसंगाचा सविस्तर मागोवा इ.इ. नुसतेच वाचावे व बाजूला ठेवावे असे नाही, तर त्यातील तात्विक चिरंतन निरीक्षणांवरील लेखकाची भाष्ये, हेरिटेजसारखी जपून ठेवावीत.
त्यामधीलच ही निवडक भाष्ये:
"अंतस्थ कोणी" पुस्तकातील
"मौलिक विचारमौक्तिके":

# दिवस नेहमीच हरणाच्या चपळाईने काळाच्या आड नाहीसे होतात.

# ललित लेखनात खरं म्हणजे कुठल्याही स्रुजनात फक्त निर्मिती असते आणि नंतर रसिकाने घेतलेला आस्वाद असतो. देवकीने सृजनाच्या कळा भोगायच्या, कारावासात बद्ध करून घ्यायचं आणि मोहनाच्या सगळ्या लीलांचे लाघव यशोदेने अनुभवायचे, हाच सृजनाचा व्यवहार आहे.

# रसिकांची भरभरून मिळणारी दाद हेच लेखकाचं खरं वैभव असते.

# खजुराहोच्या मूर्तींना कुठे वय असते?

# मनोविश्लेषणा शिवाय कोणताही लेखक पुढे सरकू शकत नाही. मनोविश्लेषणाची नुसती पोज लेखकाने घेतली, की सृजनाची माती होते. म्हणजे असं की, अभिनय मी आता करतोय अशी पोज अभिनेत्याने जर घेतली, तर त्या भूमिकेचा चोथा होतो तसं!

# चित्रात्मक कथन हे कोणत्याही शैलीत श्रेष्ठ म्हणायचं आणि परिणाम करण्याचं गमगच म्हणायला हवं. मनःपटलावर दिसलेली नानाविध चित्र लेखक शब्दबद्ध करत असतो. ही चित्र निर्माण करीत असताना लेखक कळत-नकळतपणे अनेक मिश्रणं करत असतो. ही चित्रं म्हटल्यास काल्पनिक असतात, म्हटल्यास ती फार फार खरी देखील असतात. कारण वास्तव, कल्पनेचे बोट धरल्याशिवाय आविष्कृत होऊ शकत नाही, कल्पना वास्तवाच्या फार पलीकडे जाऊ शकत नाही.

# वय जसं वाढत जातं, तसतसं कितीही नाही म्हटलं तरी अंतःकरणातील आर्द्रता कोरडी पडू लागते. वाढीव वयात ओळखी होतात, परिचय होतात, पण इतक्या सहजपणे स्नेह जुळत नाहीत अथवा मैत्री साधत नाही. खूप काही पाहिलेलं असल्यामुळे, व्रुत्तीत एक प्रकारचा कोरडेपणा येतो. यात काय विशेष आहे असा विचार एकदा मनात आला की, मैत्री संभवतच नाही.

# यक्षानं युधिष्ठिराला विचारलं "जगातली सर्वात मोठी विसंगती कोणती?

युधिष्ठिर म्हणाला "सर्वत्र आणि कधीही पेटत्या चिता दिसत असूनही मी आणि माझे आप्तेष्ट चिरंजीव आहोत, असं गृहीत धरूनच माणूस जगत असतो, हीच मोठी विसंगती आहे."

या विसंगतीवर थोडी फार मात करण्याचं सामर्थ्य फक्त शब्दात असतं, निरपेक्ष भावनेने काढलेल्या आठवणींत असतं, म्हणूनच केवळ हा अक्षरप्रपंच!

# मुळातच सृजन ही खूप गुंतागुंतीची आणि तरल अशी घटना असते. "धुक्यात कोरीत बसतो धुक्याच्याच आकृती" अशीच लेखकाची अवस्था असते.

# स्रुजनाबद्दल कोणीही, अगदी कोणीही ठामपणे सांगू नये, प्रत्येक लेखकाने फार तर स्वतः बद्दल बोलावे, तेही अदमासाने बोलावे.

# अनुभवाचा कोणता साठा, कोणत्या रूपात कधी व्यक्त होईल याची गणितं नसतात वा नियम नसतात. स्रुजनांतून मी दूर सारावा असं कितीही म्हटलं तरी, मी दूर किती सारता येतो, याला मर्यादा आहेत. कारण जीवनानुभवाचे आकलन होते तेच मुळी 'मी' च्या माध्यमातून होत असते. त्यामुळे हा 'मी' कधीही टाळता येत नाही.

# खरं म्हणजे हे सगळं जग म्हणजेच 'मी' चा व्यापार असतो, 'मी' या स्थानकावरच जीवनाची घडी सुरू होते आणि शेवटी 'मी' ह्या स्थानकावरच थांबते. मधली सगळी स्थानकंही या 'मी'ला शोषणारे, तोषविणारे वा अन्य अशी असतात. तेव्हा 'मी' दूर होत नाही, होऊ शकत नाही, तसेच केवळ 'मी' चा अनुभव हा काही लेखनयोग्य विषय होऊ शकत नाही.

# ललित साहित्याच्या दृष्टीने सत्य आणि कल्पित असं काही वेगळं नसतच मुळी.

# ललित सृजनाच्या अंगणात कधी कधी सत्य कल्पनेहूनही खरं असतं आणि कल्पना सत्याचं रूप घेऊन 'मी आहे हो' अशी दवंडी पिटत असते.

# सृजनाच्या प्रदेशात काळालाही फारसा अर्थ नसतो कारण काल हा त्या वेळचा आजच असतो आणि आज हा उद्याचा काल असतो! तेव्हा काळ आणि सत्य या दोन गोष्टींचा तारतम्याने उपयोग करूनच सकस सृजनाची निर्मिती होत असते.

# ह्या सृजनाला ओढ असते ती माणूस नावाच्या प्राण्याची, त्याच्या मर्यादांची, त्याच्या अमर्याद अभिलाषेची, त्याच्या अदम वासनेची आणि मूलतः त्याच्या वेदनेची....

# मी सदाचारी असावं, कारण सदाचार देवाला प्रिय आहे. मी दुराचारी नसावं, कारण दुराचार त्याला अप्रिय आहे. जर सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर असे लक्षात येईल की, देव ही संकल्पना निर्माण करून आम्ही सृजनशीलतेचा अविस्मरणीय चमत्कार घडवून आणला आहे. आम्हाला जे-जे उदात्त उन्नत महन्मधुर वाटते तोच देव आहे. ही आमची धारणा आहे आणि तो आमचा संकलित आदर्श आमच्यावर नजर ठेवून आहे. आमच्यावरचा वचक आहे आणि तोच आमचा दिलासा आहे.
होय मी आस्तिक आहे.

# मार्क्सने 'अर्थ' प्रमाण मानून जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर फ्रॉइड यांनी 'कामा'ची मुलभुत म्हणून स्थापना केली. पण आपल्या पूर्वजांनी चार पुरुषार्थ, त्यांचा विचार केला 'अर्था'चे महात्म्यही आम्हाला ज्ञात होते आणि 'कामा'ची विलक्षण व्यापक गुंतागुंत देखील आम्ही नजरेआड केली नव्हती. आपल्या पूर्वजांनी पाहिला चतुरंगी पुरुषार्थ. पुन्हा ह्या देशी, तो रूजो, समृद्ध होवो हीच आपली आशा....

मुद्दामून गोळा करावी, अशी जणु अनंत मौलिक विचारमौक्तिके या पुस्तकांत मला सापडली. त्यातील फक्त निवडकच इथे मी नोंदविण्याचे कष्ट घेतले आहेत.

माझे स्नेही डॉक्टर गिरीश दाबके यांचे लेखन 'वपुं'च्या मानवी भावभावना व जीवनशैली बद्दलच्या चिंतनात्मक भाष्यासारखे आहे, असे जे मी म्हणतो, ते ह्याच करता.

अशा प्रकारचे लक्षात ठेवावेत, जपून ठेवावेत असे शब्दब्रम्ह मला तरी अजून कुठल्याच पुस्तकात सापडलेले नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने आवर्जून वाचावे, असे "अंतस्थ कोणी" हे पुस्तक आहे, असे मला वाटते. त्याकरता माझा स्नेही डॉक्टर गिरीश दाबके ह्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील लेखन वाटचालीसाठी शुभेच्छा.

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा