"ह्रदयसंवाद-८":
" मनांतले जनांत":
सोशल मिडिया हे लेखनाला प्रेरणा देणारा अत्यंत उपयुक्त माध्यम असल्याचा मी आनंदाने अनुभव घेत आहे. दररोज मनातले जनात पोहचविण्यासाठी ह्यासारखे दुसरे साधन नाही. माझ्या संग्रहातून निवडक वाचनीय विचार मौक्तिके येथे मांडत आहे:
# "निखळ वास्तवाची जाणीव करून देणारं, अचूक उत्तर मिळविण्यासाठी,
अचूक प्रश्न विचारता येण्याची कला आवश्यक असते."
# "चवीने जीवन कसे जगत रहावे व मन अधिकाधिक समाधानाने सम्रुद्ध कसे करावे",
हे चांगल्या पुस्तकाच्या वाचनामुळे उमजते!
# "समाधानाची सप्तपदी": लिंक उघडा:
https://youtu.be/g_OqskZbfxg
व मिळवा ताणतणावापासून मुक्ती:
१. डोके वापरा
२. दृष्टी बदला.
३. जीभेला आवरा
४. हाताने नेहमी देत रहा.
५. ह्रदयापासून प्रेम करा.
६. मन काबूत ठेवा.
७. पायाने चालत रहा.
"मागले पान, ज्ञानाची खाण!":
# दिनदर्शिकेची पुढची पाने बघायची वेळ ही, केव्हां सुट्टी वा सण आहे, ते जाणून घेण्यापुरतीच मर्यादित असते. सहाजिकच मागील पानांचे दर्शन, केवळ महिना संपल्यावर पान उलटताना होते एवढेच.
पण नुकतेच वर्ष संपल्यावर, जुनी दिनदर्शिका गुंडाळी करून बाजूला ठेवताना, तिच्या मागील पानांकडे लक्ष गेले अन् कळत न कळत ठिय्या मांडून, एका बैठकीत बाराही पानांवरील विविध विषयांवरील, उपयुक्त माहितीपूर्ण असे सर्व लेख वाचून काढले.
आपण इतके दिवस जाणीवा विस्तारणार्या कोणत्या मौल्यवान खजिन्याला मुकलो होतो, ते मला उमजले. आपणही दिनदर्शिकांची मागील पाने अशीच जरूर नजरेखालून घालावी.
# "यक्षप्रश्न":
" काळाच्या घड्याळाचे कांटे उलटे फिरवून
जे घडून गेलंय,
ते कधी बदलता येते कां?"
# °असा 'हा' रोजचा "जमा'खर्च"!:
दररोजचा "जमा'खर्च", रूपयांत मांडायचे दिवस पहाता पहाता सरून जातात अन् निव्रुत्तीनंतर दररोजचा "जमा'खर्च" हा, रोज काय 'पाहिले', काय 'वाचले', काय 'ऐकले' वा 'बोलले', ह्यासोबतच (काही भाग्यवंतांसाठी) काय लिहीले असा बनत, त्या 'उलाढाली'मधून आपण काय 'मिळविले, काय 'घालवले' तसेच आपण इतरांना काय 'दिले' असा बनून जातो. हे असे, ज्यांना लौकर भान येते, ते अन् तेच खरोखर धन्य होत!
# "नियतीचे खेळ!":
गरज ही शोधाची जननी, तशी वेदना ही नवनिर्मितीची, प्रतिक्षा ही फळाची, मीमांसा ही टीकेची, अन्याय वा उपेक्षा प्रतिशोधाची, बंधने ही मुक्ततेची, स्फूर्ती ही प्रतिभेची माता होय. देणे-घेणे, सोसणे-पुसणे, करणे-भरणे, रूसणे-हसणे, उमलणे-फुलणे-कोमेजणे असे नियतीचे खेळ हे सारे चालती अव्याहत!
# "आत्मसमाधानाचे रहस्य":
जे आपल्याला आवडते, जे आपण चांगले करू शकतो, ते करायला मिळणे हे भाग्यच. अशा भाग्यामुळे, जे आत्मसमाधान लाभते ते अद्भुतरम्यच!
"पसंद अपनी अपनी" प्रमाणे ज्याने त्याने वरीलप्रमाणे आत्मपरीक्षण करून
आपआपला मार्ग निवडावा, म्हणजे श्रेयस व प्रेयस एका समयीच लाभते.
# "शब्दांचे अर्थ, एक चिन्ह बदलू शकते.
शब्दांचे अर्थ फसवे असतात,
गर्भितार्थ पूर्ण वेगळाच असू शकतो."
# "शहाणपण':
"जे नापसंत, ते करावे बेदखल."
# "टीका करण्यापूर्वी, दुसर्याच्या नजरेतून बघावे, तसेच संभाव्य परिणाम प्रथम आजमाववावे."
# "संभवामी युगे युगे"!:
"आगळे वेगळे, हे सगळे"!!:
पुराणातले दशावतार आपल्याला माहीत आहेत आणि आपण ह्या संकल्पनेची तुलना, डार्विनच्या 'सजीवांच्या उत्क्रांती सिद्धांता'सारख्या अत्यंत महत्त्वाच्या व जगमान्य गोष्टीशी करू शकतो.
"संभवामि युगे युगे" हे सूत्र आपल्याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. ह्याचाच अर्थ एका जन्मानंतर दुसरा जन्म शक्य आहे हे ध्वनित होते. पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा असे हे सारे आपले संचित आहे.
जर पुनर्जन्म असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या अगोदरच मृत्यू पावते, तिला पुनर्जन्म मिळण्यासाठी जेवढा वेळ लागेल, त्या तुलनेत ज्या व्यक्तीच्या आई-वडिलांचा मृत्यू तिच्या हयातीतच होतो, त्या व्यक्तीला
पुनर्जन्मासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा खूप जास्त असणार हे उघड आहे.
आपण येथे "डी एन ए" ह्या मूलभूत सूत्राची कामगिरी लक्षात ठेवली पाहिजे. कारण कुणीही त्याच आई-वडिलांच्या पदरी जन्माला येऊ शकणार हे सत्य यामागे आहे. कदाचित म्हणूनच आपल्या परंपरेमध्ये स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती लाभो असं तर म्हणत नसतील?
पुनर्जन्माची अशी ही एक जगावेगळी कहाणी!
# "सारीपाट":
माणसाच्या जाणीवांचे विश्व विस्तारत सम्रुद्ध होत असते ते प्रामुख्याने तीन गोष्टींमुळे: एक वाचलेली पुस्तके, दोन आयुष्यात येणारी माणसे आणि तिसरी गोष्ट अवघडलेपणाचे प्रसंग! शेवटी जीवन म्हणजे आंबट गोड अनुभवांचा सारीपाटच तर असते!!
# मागे गेलेले
हे वर्ष: २०१९:
२+१+९=१२=१+२=३
कुणाचे तीन तेरा झाले?
# "भूतकाळातील गौरवात रमण्यापेक्षा, वर्तमानात पिछेहाट कां होते आहे आणि पुनश्च आपले भूषणावह स्थान कसे होईल, ते पहाणे अत्यावश्यक.
# "बिंब-प्रतिबिंब"-विचारमंथन":
एका नाण्याला जशा दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे कोणत्याही विषयाच्याही उलट वा सुलट बाजू असणे स्वाभाविकच असते. ज्या चष्म्यातून आपण जगाकडे, घटनांकडे पहातो, त्याच्या कांचांच्या रंगासारखे जग वा घटना दिसत असते. अमूकच बाजू बरोबर वा चूक असे म्हणता येणे बहुतेकदा कठीण असते.
विव़िध जिव्हाळ्याच्या विषयांवर ह्याप्रमाणे सर्व दिशांनी अभ्यासपूर्ण विचार मांडणे कौशल्याचे काम असते.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा