बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

"ह्रदयसंवाद-९": "निर्णयामागचे कवित्व":



"ह्रदयसंवाद-९":
"निर्णयामागचे कवित्व":

कोणत्याही प्रसंगी आपल्याला निर्णय घ्यायलाच लागतो. आपण सातत्याने दिवसांमागून दिवस, तासांमागून तास, सातत्याने कुठले ना कुठले तरी निर्णय घेतच असतो. निर्णय घ्यायला लावणारी गोष्ट म्हणजे एखादा हेतू असतो, समस्या असू शकते किंवा इतरही काही गोष्टी निर्णय घेताना असू शकतात. कधीकधी निर्णय घेण्यावाचून पर्यायही नसतो. परंतु बहुतांश वेळी निर्णयावर कृती करायची की नाही, याला मात्र निश्चितच पर्याय असतोच असतो.

जेव्हा अनेक पर्याय निर्णयामागे उपलब्ध असतात, तेव्हा कळत नकळत आपण कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला अधिक फायदा, अधिक सुखकर वाटेल हे पाहात असतो, तसे पहाणे गरजेचेही असते. त्यामधून आपण त्या वेळेला जास्त फायदा आहे तो निर्णय घेतो आणि कदाचित नंतर कृतीही करतो. शेवटी निर्णय जसा महत्त्वाचा, तशीच कृती देखील महत्त्वाची असते. म्हणजे योग्य तो निर्णय, योग्य त्या वेळी आणि योग्य त्या कृतीने जर घेतला, तर कदाचित आपला हेतू प्राप्त होऊ शकतो. निर्णय आणि कृती यांचा आपल्या जीवनात सातत्याने संचार सुरू असतो. यशस्वी माणसे, योग्य निर्णय योग्य वेळी योग्य कृतीने घेतात, असेच पाहायला येते.

एक साधं उदाहरण सांगतो. मी नेहमी दादरला लायब्ररीत मासिके पुस्तक वगैरे बदलायला जातो. असे कधीतरी बाहेर जाणे हा माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकासाठी एखाद्या प्रकारचा बदल असतो. माझ्या जीवनात मात्र नेहमी उगाचच, मला बाहेर जायला आवडतं असं नाही, कारण मी मुलतः घरकोंबडा माणूस आहे.

त्या दिवशी लायब्ररीमध्ये जावं की नाही हा निर्णय मला घ्यायचा होता. त्यावेळेला मी सहज बघितलं, मासिकं परत करायची शेवटची तारीख कधी आहे ते. तर ती त्याच दिवशी नसून, दुसर्या दिवशी आहे, ते लक्षात आल्यानंतर मला वाटलं, आज दादरला जाऊच नये. त्यात काहीही नुकसान नाही, कारण जर मासिकं वा पुस्तके परत करायला उशीर झाला तरच दंड भरावा लागतो. म्हटलं तर ही चालढकल, आणि म्हंटलं तर हे म्हणजे आपला स्वतःचा कम्फर्ट झोन बघण्याचा प्रकार म्हणून न जाण्याचा निर्णय. इथे माझ्या मुलभूत घरकोंबडा स्वभावाचाही प्रभाव होता. माझ्या मते कोणताही निर्णय जेव्हा माणूस घेतो, तेव्हा तो आपला असा कम्फर्ट झोन हाच प्राधान्याने मनात ठेवत असतो. ह्या उलट जो माणूस, घरात न बसता बाहेर प्रवास करणे पसंत करणारा असेल तो सरळ बाहेर लायब्ररीत जाण्याचा ताबडतोब निर्णय घेईल, माझ्यासारख्या नसत्या उठाठेवी करत वेळ वाया घालवणार नाही.

आता निर्णय घेणे कसे आपल्या पाचवीला पुजलेले असते, ते बघू. जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत सातत्याने आपण कथधी ना कधी कुठे ना कुठे कुठला ना कुठला तरी निर्णय घेत असतो. बाळंतपणासाठी पत्नीला कोणत्या डॉक्टरकडे नांव घालायचे तो निर्णय, मूल झाल्यानंतर आजारपणातले उपचार किंवा मूल होताना सीझेरियन जर करायची वेळ आली तर काय करायचं तो निर्णय, मूल मोठे होऊन शाळेत घालताना कुठल्या माध्यमात, कुठल्या शाळेत घालायचं, तो निर्णय. स्पर्धेच्या जीवनामध्ये कुठल्या विषयाची, कोणाची शिकवणी ठेवायची कां कुठल्या क्लासला घालायचं असा निर्णय. शालान्त परीक्षेनंतर संततीला कुठल्या विभागात पुढे शिकवायचं आर्ट्स कॉमर्स सायन्स कां आणखीन दुसरं काही तो निर्णय. त्यानंतर नोकरी मिळवायची कां कुठला व्यवसाय कां कसा करायचा तो निर्णय. मनाजोगती नोकरीची संधी मिळणं हल्ली कठीण आणि मिळाली तर कुठली स्वीकारायची कोणत्या निकषावर स्वीकारायची हा निर्णय. असे निर्णयांचे शेपूट कधीच थांबता थांबतच नाही.

पुढे विवाह जुळणीच्या वेळेला, "कांदेपोहे करून" विवाह, कां प्रेमविवाह आणि प्रेम विवाह जर झाला किंवा होत असला, तर बहुधा हाचा अनुभव येतो की, दोन्ही बाजूला कोणतीही तक्रार नाही वा अडचण नाही, विरोध नाही, अशा तऱ्हेची निवड फारच क्वचित प्रेम करताना केली जाते, कारण प्रेम आंधळं असतं! त्यामुळे दोन्ही बाजूंपैकी कुठेतरी विरोध, कधी पळून जाऊन लग्न असे अनुभव येत असतात. नंतरही ते प्रेमविवाह टिकतीलच ही खात्री नाही ती नाहीच.

समजा, कांदेपोहे हा मार्ग स्वीकारून विवाहाचा निर्णय जरी घेतला तरी, तो देखील पुष्कळदा इंपल्सिव्हली म्हणजे अनाहूत आवेगाने घेतला जातो आणि बहुतेक वेळा नंतरच बऱ्याच काही गोष्टी अशा लक्षात येतात की, आपला निर्णय बरोबर होता की नाही असे प्रश्न पडावेत. कारण कधी शिक्षण सांगितले त्यापेक्षा कुणाचं कमी असतं, तर कोणाला नोकरीतला पगार सांगितला, तो नसतो, तर कुणाचे आजार वा व्यंग ध्यानात नंतर लक्षात येते, तर कुणी आळशी कामचुकार, तर कुणाच्या जोडीदाराला नको त्या गोष्टींचे व्यसन, तर कुणाचा स्वभाव रागीट वा हट्टी मुडी, तर कुठल्या बाबतीत मुलीच्या आईवडिलांची सारी जबाबदारी मुलीवरच आहे ते विवाहानंतरच लक्षात येते. निर्णय चुकण्याच्या अशा नाना तर्हा जन्मगांठी बांधताना!

थोडक्यात कुठली ना कुठली तरी चूक,
जन्मगांठीची निवड करताना होतच असते. म्हणजे जसं प्रेमविवाह मध्ये आपल्याला कुठलीही खोट नसलेली, निवड करणं कठीण असतं. "कांदेपोह्यां"च्या बाबतीतही अनुरूप अशी सर्व बाजूंनी कुठलीही तक्रार नाही अशा प्रकारचे निर्णय खरोखर घेतले जातातच कां हे संशोधनाचं काम आहे.

निर्णय घेताना विविध पर्याय आणि त्या पर्यायांच्या पासून होणारा लाभ आणि त्यांची तुलना हे करणे खरं म्हणजे आवश्यक असते. परंतु ते केले जात नाही. ह्याकरता खरोखर काही उपायच नाही. कारण हे असेच होत असते. त्या त्या वेळी, ती व्यक्ती, त्या त्या परिस्थितीमध्ये जे आपल्याला योग्य वाटते, तेच ती करत असते. त्यामुळे कधी निर्णय बरोबर येतात, तर कधी निर्णय चुकतात. त्याला काही इलाज नाही. एक गोष्ट मात्र खरी, कुणीही केव्हाही जर आपण निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांना त्याने तोंड द्यायची तयारी ठेवावी. नंतर आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून, दुसऱ्या कुणाला दोष देण्याचे उद्योग कुणी करू नये.

आता हे सारं लिहीण्यापूर्वी काय लिहावं, कसं लिहावं व कोणत्या विषयावर लिहावं, हा निर्णय घेत असताना, बोलता बोलता, नव्हे लिहीता लिहिता, "निर्णय" हाच विषय घेऊन, जे जसे सुचत गेले ते तसतसं काळ्यावर पांढरे असे उतरवित गेलो.

ते चांगले कां टाकाऊ हा निर्णय घेणे मात्र तुमच्याच हातात आहे!

सुधाकर नातू

ता.क.
विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
आपल्या राशीचे संपूर्ण वार्षिक राशीभविष्य
व राहू केतूच्या राश्यंतराचे परिणाम जाणण्यासाठी.......
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandsun

आणि विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा