"रंगांची दुनिया-६":
"चित्रदर्शन-१":
"द गुड न्यूज":
"रोमहर्षक धुमाकूळ":
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक समाज सेवकांनी उंबरठ्याच्या आत अडकलेल्या स्त्रीला बाहेर काढून शिक्षण प्रसाराचा जो घाट घातला. त्यानंतर पुढील शतकामध्ये सामाजिक शैक्षणिक वैचारिक व सांस्कृतिक उलथापालथ झाली. त्यामध्ये स्त्री, पुरुषाच्या बरोबरीने जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आपली कामगिरी उत्तम रीतीने करू लागली. त्याच बरोबर विसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या झपाट्याच्या गरुडझेपीमुळे व जागतिकीकरणामुळे, एकंदर मानवाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आणि आता एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी, तर संपूर्ण क्रांती झाल्यासारखे मोकळे पुढारलेले पाश्च्यात्यांचे अनुकरण करणारे वातावरण आपल्याला समाजामध्ये आढळते.
त्यामुळे परंपरागत कल्पना, त्याचप्रमाणे समजुती व स्त्री-पुरुषांमधील संबंधांच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन देखील आमुलाग्र बदललेला आढळतो. सध्याच्या युगामध्ये पूर्वी कधी स्वप्नातही वाटले नसतील, इतके बदल आपल्याला झालेले आढळतात. त्यामुळे विवाहपूर्वी स्त्रीला दिवस जाणे, ही जी तोबा तोबा मानली जाणारी गोष्ट, आता कशी स्वीकारली जाऊ शकते, त्याचे चित्र "दादा एक गूड न्यूज आहे" ह्या नाटकामध्ये मराठी रंगभूमीवर सध्या गाजत आहे. आपल्या अविवाहित बहिणीला प्रेम प्रकरणातून विवाहापूर्वी दिवस जाऊनही, तिचा भाऊ तिला कसं स्वीकारतो, त्याचे चित्रण या नाटकांमध्ये आहे.
मानवामध्ये पुनर्निर्मितीचा जो अनुभव असतो, तो सर्वात आनंददायी असतो. त्यातून स्त्रीला तर मातृ पद मिळणं ही एक अत्यंत स्वर्गसुखाची, सन्मानाची गोष्ट मानली जाते. ज्या काही अभागी स्त्रिया यापासून मुकतात, त्यांची अजूनही अवहेलना समाजात वावरताना होताना दिसते, त्यांना अपमान अवहेलना सहन कराव्या लागतात.
तंत्रज्ञानाची कमाल अशी की, आयव्हीएफ सारख्या आधुनिक पद्धतीने मूल न होऊ शकणार्या, दांपत्यांना देखील आता संततीसुख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज काल दोन तीन दिवसाआड आयव्हीएफ वरील मोठमोठ्या जाहिरातीही वर्तमानपत्रांत आपण बघतो. कदाचित विवाह मर्यादा वाढल्यामुळे अथवा गतिमान जीवनामुळे तंत्रज्ञानाचा झपाटा त्यामुळे मानवाची पुनरुत्पादन शक्ती थोडी थोडी कमी होऊ लागलेली असू शकते. पूर्वी जी मंडळी गुपचूप राहायची आणि आपले दुःख सहन करायची, ती आता ह्या नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपल्याला मूल होण्याचे भाग्य अनुभवत आहेत.
तर याच तंत्रज्ञानावर आधारित एक धमाल हिंदी चित्रपट "गुड न्यूज" आम्हाला नुकताच पाहायला मिळाला. मराठी रंगभूमीवर जशी विषयप्रधान नाटके येत असतात, ते लोण अशा आशयघन हिंदी चित्रपटात येत आहे, ही चांगली बाब आहे. या चित्रपटातमध्ये सध्याचे असे एक आधुनिक दाम्पत्य, आपल्याला मूल न झाल्यामुळे व्यथित आहे आणि त्यातील स्त्री तर जणू झपाटल्यासारखी आपल्या नवऱ्या मागे, मूल होण्यासाठी लागली आहे. कुणीतरी सुचवल्याप्रमाणे ही दोघे आयव्हीएफ तंत्राचा आधार घेऊन संततीची स्वप्ने बघत असतात आणि त्याच वेळी चंदीगडचं अगदी याच नावाचं एक निःसंतान जोडपं, त्याच हॉस्पिटलमध्ये मूल व्हावं आयव्हीएफचाच आधार घेत असते.
त्या दोघांनाही संतती होण्यासंबंधी यश मिळाल्याची वार्ता देताना जे काही सांगितले जाते, ते खरोखरच दोघांसाठी धक्कादायक असते: गर्भधारणेसाठी, दोन्ही दांपत्यांमधील पुरुषांच्या दिलेल्या वीर्यांची अदलाबदल झाल्याचे वृत्त ते असते! त्यामुळे पुढे चित्रपटांमध्ये, आता काय करावे हे न सुचणे, अगदी गर्भपात करुन घ्यावा ह्या टोकापर्यंत येणे, दुसर्या दांपत्याचा संशय, राग राग इ.इ.. जो काही हलकल्लोळ आणि धूम धमाल होते, ती खरोखर पडद्यावरच पाहण्यासारखी आहे. एका महत्वाच्या आगळ्यावेगळ्या आधुनिक विषयावर, अशा तर्हेचा तोही निखळ विनोदी चित्रपट, निर्माण करणे, हे धाडसाचे जसे होते, तसेच ते अतिशय कौशल्याचे कठीण काम होते. यामध्ये एकापाठोपाठ एक, अशा नाट्यमय व भावनाप्रधान प्रसंगांमुळे खरोखर चित्रपट कधी संपतो, ते न कळता, प्रेक्षक वर्ग अक्षरशः अचंबित होऊन बाहेर पडतो.
अक्षयकुमार करीना कपूर, दिलजीत दुसांज आणि कियारा अडवानी या कलाकारांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका, खरोखर समरसून केल्यामुळे चित्रपटाची रंगत कमालीची शिगेला पोहोचते. दोन अगदी वेगळ्या सामाजिक वास्तववादी सामाजिक स्थितीच्या "तरुण आहे रात्र अजुनी" व "हरवलेल्या पत्यांचा बंगला" नाटकांनंतर आम्हाला हा तसाच चाकोरीबाहेरचा "गुड न्यूज" हा चित्रपट बघायला मिळणे, ही निश्चितच या नव्या वर्षारंभाची एक उत्साहवर्धक योगायोगाची गोष्ट होती. आता हिंदी चित्रपट त्याच त्या, घिशा पिट्या मनोरंजनाच्या फाँर्मुल्यांमधून बाहेर पडून, अधिक प्रगल्भ होत, वयात आल्याचे हे सुचिन्ह आहे. प्रेक्षकवर्गही झपाट्याने कात टाकत, अशा चित्रपटांचे भरभरून स्वागत करत आहे, हेसुद्धा नवलच!
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा