"रंगांची दुनिया-१०":
"चित्रदर्शन-२":
"मराठी चित्रपट वयात आला!":
"प्रवास"
योगायोगाने नुकताच मी अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला
"प्रवास" हा चित्रपट पाहिला.
"जीवनाचा अर्थ व हेतूंचा शोध व बोध" आपण केला पाहीजे, असे सांगणार्या ह्या चित्रपटाने मला जाणवले की, जे जे आपल्याजवळ अनुभव व ज्ञान आहे, त्यातील उपयुक्त असे ज्यांना ज्यांना देता येईल, ते आपण देत राहावे, हाच आपला या पुढचा जीवनाचा हेतू आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या प्रयत्नांची वाटचाल अशीच सुरू ठेवली पाहिजे. अर्थात हे माझ्यापुरते हो. इतरांनी त्यांचे आपआपल्या परिने हेतू ठरवावेत.
एका सामान्य माणसाचा जीवनाचा अर्थ व हेतू शोधून देणारा हा चित्रपट आहे. अभिजात इनामदार एक साधा माणूस असतो आणि आपलं आयुष्य मुलांच्या बायकोच्या आपल्या सगळ्या संसारासाठी वेचत असतो. मुलगा अमेरिकेला जातो, इथे एकाकी हे व्रुद्ध दापत्य व त्यातील CKD ने त्रस्त असा कर्ता पुरुष अभिजातला दोन वेळा आठवड्यातून डायलिसिस करून घ्यायचं जीवघेणं दुःख असतं. एका रात्री आयत्या वेळेला रिक्षासुद्धा सहजी मिळत नाही, त्याला हाँस्पिटलमध्ये न्यायला, केवढा त्रास होतो बायकोला, असे काही प्रसंग दाखवून त्याच्यातून पूर्वकल्पना दिली आहे पुढे काय होणार त्याची.
अमेरिकेतला मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही काहीतरी चेंज घ्या, फोकस बदला, तुमचं जीवन त्याच त्या गोष्टीत अडकलयं. अभिजात अंतर्मुख होऊन, आपल्या जगण्याचा अर्थ काय, हेतु काय, याचा शोध घेत राहतो आणि त्याला अचानक जाणवतं की, आपण आहोत, त्यापेक्षा असे अनंत गरीब व दुःखी कष्टी लोक आहेत, ज्यांना काही ना काही गरज आहे. त्यांच्यासाठी आपण काही ना काही केले पाहिजे.
विचार करता करता, त्याला एकदम "युरेका युरेका" सारखं काहीतरी सापडतं आणि ते म्हणजे आपली स्वतःची गाडी आहे, तिला अँम्ब्युलन्स बनवून आपण तिचा उपयोग, अशाच दुःखी कष्टी आणि गरजु रोग्यांना हाँस्पिटलमध्ये नेण्यासाठी करावा. नंतर तो कुठेही मागेपुढे पाहत नाही आणि आपल्याला या कामात अक्षरशः दिवस नाही, रात्र नाही, स्वतःला झोकून देतो. पाहता पाहता त्याचे रिपोर्टस् नॉर्मलला येतात. डॉक्टरही चकित होतात. अँम्ब्युलन्स मँन म्हणून त्याचा आंतरराष्ट्रीय सन्मान होतो.
जीवनाचा प्रवास करताना, आपल्याला जर आपण कां जगतो आहोत, कोणासाठी कशासाठी, जगत आहोत, आपला हेतू काय आहे, हे जर उमजले, तर आपल्याला आपला मार्ग सापडत जातो. अशा तर्हेचे अतिशय अनमोल विचार मांडणारा हा चित्रपट मला पाहायला मिळाला आणि त्यामुळे मला माझ्या जीवनविषयक अभियानासाठी प्रेरणा मिळाली......
"विकून टाक !" :
मराठी चित्रपट आता प्रायोगिक नाटकं सारखे काही वास्तववादी प्रयोग करायला लागले आहेत असे दिसते. जीवनातील कौटुंबिक नातीगोती आणि त्याच्यातील ताणतणाव ह्या चाकोरीबद्ध अशा विषयांना सोडून, वास्तवातील काही दाहक अशा घटनांकडे अथवा विषयांकडे चित्रपट आपले लक्ष देऊ लागले आहेत, ही खरोखर स्तुत्य गोष्ट आहे.
नुकताच आम्हाला एक असाच चित्रपट पाहायला मिळाला, नाव होते "विकून टाक". वरवर पाहता हा एखादा फार्स असेल, अशा तर्हेचे एकंदर त्याचे शीर्षक आणि जाहिरातीतील दृश्य होते. परंतु प्रत्यक्ष चित्रपट पाहायला गेल्यावर, सध्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळी परिस्थितीत गांजलेल्या अनेक खेडेगावातील पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माणसांचे, एक मनाला चटका लावून टाकणारे असे प्रतिनिधिक चित्र पहायला मिळाले.
त्या पार्श्वभूमीवर एका खेड्यातील, एका अभागी शेतकर्यांने आत्महत्या केल्यानंतर, त्याच्या कुटूंबियांना भरपाई म्हणून मिळायचे पैसे राहिले दूरच, परंतु अचानक त्याच्या मुलावर आपली किडनी विकण्याचा आरोप येतो आणि चित्रपटामध्ये उत्तरोत्तर रंग चढत जातो. दुबईमध्ये नोकरी करणार्या या मुलाचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात होणार असते. परंतु अचानक असे काही विचित्र घडते की त्या मुलावर जेलमध्ये जायची वेळ येते.
जे हाती येईल, ते "विकून टाक" असे म्हणणे सोपे असते. ऑनलाइन अशा तर्हेच्या वेगवेगळ्या साईट्समुळे, आली हातात वस्तू की ती विकली जाते, हे वास्तव मोठ्या गमतीशीर रीतीने चित्रपटात अधोरेखित केलेले आहे. नायकाच्या, भंगार विकणाऱ्या मित्राच्या रूपाने, त्यामुळे चित्रपटातील वस्तूविक्रीचे नाट्य वेगळेच वळण घेत, अधिक रंगतदार होत जाते.
मित्राबरोबर दारू पीत असताना हा नायक भंगार विकणाऱ्या साइटवर, आपली किडनी विकायची आहे, अशी माहिती टाकतो आणि त्याच्यावर उत्तरोत्तर संकटांची मालिका येत राहते. त्याच्या भाग्यामध्ये क्षणोक्षणी चढ-उतार होत राहतो. त्यामुळे अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांतून चित्रपटाची कथा आपली उत्सुकता वाढवत नेते. किडनी विकत घेऊ इच्छीणारे, दुबई मधील श्रीमंत अरबाच्या रूपात आलेले पात्र व त्याचा उंट या कथेमध्ये अधिकाधिक मसाला भरत जातात.
उत्तरार्ध मात्र ह्याहूनही एका भयानक अशा खेळाचा भाग आहे, हे ध्यानात येऊन आपल्याला खरोखरच धक्का बसतो. किडनी विकणाऱ्या एका टोळीचा तो भाग आहे, असा आरोप नायकावर होऊन, त्याला जेलची हवा खावी लागते. अखेरीस तो हिकमतीने त्यामागच्या दुष्ट टोळीचा छडा कसा लावतो आणि त्याची या चित्तथरारक नाटकातून सुटका कशी होते, ते प्रत्यक्ष चित्रपटातच बघायला मिळेल.
किडनी विकार हा खरोखर भयानक असून डायलिसिस जर सातत्याने करता येणे कठीण झाले तर, किडनी प्रत्यारोपणाचे माणसांवर किती तरी दडपण येते. कारण नियमात बसवून, सहजासहजी किडनी मिळणे, कठीण असते. अशावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी काय काय उद्योग करतात, त्याचे भेदक वास्तव चित्रपटात मध्यंतरानंतर पहायला मिळते. कलियुगात माणूस पशुवत वागायला लागल्याचे ते भयानक रूपच होय.
चित्रपटाचा पहिला भाग विश्वसनीय आणि उत्कंठा वाढविणाऱ्या पद्धतीने चित्रित केला आहे. त्या तुलनेत दुसऱ्या भागात मात्र बऱ्याचशा गोष्टी विस्कळीत आणि ओढून ताणून, कशाही जोडून अखेरीस या किडनी रॅकेटकडे आणून सोडलेल्या वाटतात, असे जरी असले, तरी सध्याच्या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण जनतेच्या दुरावस्थेचे आणि आरोग्यविषयक किडनी प्रत्यारोपणाच्या विषयाचे गुन्हेगारी चित्राची हाताळणी, ह्या चित्रपटात केली आहे.
मात्र त्याच हाताळणीत असलेले काही दोष वगळता, कल्पना येणार नाही, अशा विषयाला ऐरणीवर आणणारा "विकून टाक" चित्रपट पहावा असाच आहे. एक गोष्ट मात्र खरी, मराठी चित्रपटांना थिएटर व योग्य वेळ मिळणे दुरापास्त, तसेच, काही अपवाद वगळता फक्त एक आठवडा ते जेमतेम तग धरून राहतात ही. सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करण्याजोगी ही गोष्ट आहे.
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा