गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

"ह्रदयसंवाद-१०": "विचारधन":


 "ह्रदयसंवाद-१०": "विचारधन":

"शब्दा'च्या निःशब्द भावकळा-१":
शब्द:
-मुळात शब्द, ही माणसाजवळ असलेली एकमेवाद्वितीय शक्ती आहे,
-मनामनांतले जनांत नेण्याचे, ते एक अद्भुत माध्यम आहे,
-अव्यक्त प्रत्यक्षात आणण्याचे, हे एक सामर्थ्य आहे,
-माणसं जोडण्याचा वा तोडण्याचा, त्याचा गुणधर्म आहे,
-निःशब्द अवस्थेतही, परिणामाची सांगता आहे,
आणि, आणि...

-कोण, कुणासाठी काय, कसा केव्हा वापरतो, त्यामध्येच त्याचे सारे मर्म आहे!

उदाहरण:
"सौहार्द":
शब्दामध्ये सहवासाचा सुगंध आहे,
ह्या हृदयीचे त्या हृदयी समजून घेण्याचा भाव आहे,
माणसामाणसांमधील संबंधांचे माधुर्य आहे.

तुम्ही सुद्धा असाच वेळ मिळेल तेव्हा, मनात येईल तो शब्द घ्या आणि त्याबद्दल जे जे मनात येते ते लिहून काढा...
शब्दा'च्या निःशब्द भावकळा तुम्हालाही उमजतील.....

मराठीबद्दल प्रेम केवळ भाषा दिनीच दरवर्षी २७ फेब्रुवारीलाच फक्त कां येते, आणि नंतर त्याचे काय होते, याचा विचार करायलाच हवा.

सुदिना
--------------------------

# "मूल्यशिक्षण सांस्कृतिक रिनायसन्स!":

परिस्थिती समाधानकारक कां असमाधानकारक, ह्यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे ती माणसांची आणि समाजाची मानसिकता. गेल्या काही दशकांत, ढासळत गेलेली मूलभूत मूल्यव्यवस्था आणि खालावलेली सांस्कृतिक सजगता, ह्या भीषण र्हासाला कारणीभूत आहे, हे खेदाने म्हणावे लागते. शक्य आहे, त्यामागे, अंगिकारलेली मुक्त अर्थव्यवस्था आणि जवळ सगळ्याच गरजांचे अपरिहार्य होत चाललेले बाजारीकरण.

माणसांपेक्षा जेव्हां समाज पैसा आणि फक्त पैशाचाच विचार करतो अन् ध्यास धरतो, तेव्हा कोणतेही मार्ग अंतिमतः सपशेल अपयशी ठरणार हे कटू सत्य आहे.

आज गरज आहे ती तळागाळापासून वरपर्यंतच्या मूल्यशिक्षणाची आणि सांस्कृतिक रिनायसन्सची!

सुदिना

---------------------------

# "घडवा चमत्कार!":
जो तो धावतो आहे, थांबण्याचे नाव नाही, कशाकरता? कुणा कुणाकरता? लोकसंख्या हरणाच्या वेगाने वाढत गेली, त्यातून संधी मात्र, जीवनामध्ये असं मुंगीच्या पावलांनी पुढे येत रहिल्या. सहाजिकच जीवनसंग्रामाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, धापा टाकाव्यात, उर फुटावे, इतक्या वेगात धावणे, अपरिहार्य बनले आहे. कधी कुणी त्या खवळलेल्या समुद्रातून, बाहेर येऊन स्वस्थ आरामखुर्चीत बसला आहे, काहीही न करता, काहीही विचारही न करता? केवळ अशक्यच. कारण धावणे कशासाठी तर अधिकाहून अधिकाचा हव्यास धरणे, हाच आपला जीवनाचा मंत्र बनला आहे म्हणून.

एकदा तरी थांबून बघा. भवतालातील संग्रामाकडे पाठ फिरवून शांतपणे निर्गुण निराकार निर्विष असे बसून बघा डोळे मिटून, कधीही केव्हाही.
प्रयत्न करा आणि बघा काय काय चमत्कार घडतात तुमच्या जीवनात तुमच्या मनोबलात!

आता गंमत बघा, हे देखील मी असाच प्रयत्न करत आरामखुर्चीत बसून हे सारं मांडत आहे, कारण कितीही झालं तरी माणसाच्या मागे विचार करण्याचं भूत लागलं आहे, ते कधी त्याची पाठ सोडतच नाही!

अर्थात् अविचाराने वागण्यापेक्षा, असे विचार करायला लावणारे, विचार करत बसण्यात देखील हवा हवासा अर्थ आहेच आहे.

सुदिना

--------------------------

"मागे वळून पहा":

दिनदर्शिकेची पुढची पाने बघायची वेळ ही, केव्हां सुट्टी वा सण आहे, ते जाणून घेण्यापुरतीच मर्यादित असते. सहाजिकच मागील पानांचे दर्शन, केवळ महिना संपल्यावर पान उलटताना होते एवढेच.

पण नुकतेच वर्ष संपल्यावर, दिनदर्शिका गुंडाळी करून बाजूला ठेवताना, तिच्या मागील पानांकडे लक्ष गेले अन् कळत न कळत ठिय्या मांडून, एका बैठकीत बाराही पानांवरील विविध विषयांवरील, उपयुक्त माहितीपूर्ण असे सर्व लेख वाचून काढले.

आपण इतके दिवस जाणीवा विस्तारणार्या कोणत्या मौल्यवान खजिन्याला मुकलो होतो, ते उमजले. आपणही दिनदर्शिकांची मागील पाने जरूर नजरेखालून घालावी.

अधून मधून मागे वळून पहाणे हिताचेच असते!

सुदिना

---------------------------

# "मुखवटे आणि चेहेरे"!:

विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये, एकवाक्यता ठेवणे, सगळ्यांना जमतेच असं नाही. ते जमण्यासाठी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि निस्पृहता असे मूल्याधिष्ठित गुण अंगी असावे लागतात.

चंगळवाद आणि "अर्थ हाच सर्वार्थ" मानणाऱ्या आजच्या युगात, सहाजिकच हे सारे गुण दुर्मिळ होत चालले आहेत.

सहाजिकच आपल्याला सभोवताली दिसतात, वावरतात, ते मुखवटे आणि चेहेरे, चित्रविचित्र अन् विश्वास न ठेवण्या जोगे!

"कालाय तस्मै नमः" दुसरं काय?!
'सुदिना'

---------------------------

# "लोळणं अन् जगणं!":
दिवसभराच्या परिश्रमांनंतर, आलेली गाढ झोप तर झालेली आहे, परंतु उठायचं, मन काही घेता घेतच नाही. उठायला तर हवं आहे, पण उठून न जाता, त्यापेक्षा डोळे मिटून मऊ,मऊ गादीवर लोळत पडावंस वाटतं, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. प्रत्येक क्षण अन् क्षण लोळत घालवण्यात, जे सुख आहे, ते त्या
झोपेमध्ये देखील नाही, असंच वाटतं.

कारण, उठायची तर हुरहूर, पण लोळत पडायची कसनुशी हवीहवीशी असोशी. खरंच हे लोळत पडण्यातलं सुख विसरता विसरतच नाही, कदाचित् त्यामुळेच तर अपरिहार्य चिरनिद्रेपेक्षा, जागेपणीचं हवहवंस जगणं, त्यांतली सळसळ, हळहळ, कळकळ आणि मळमळही खरोखर सोडाविशीच वाटत नसावी कां?
'सुदिना'
----------------------------------
आणि संपूर्ण वार्षिक राशीभविष्य व इतरही जीवनोपयोगी विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......

शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......
wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू माहीम मुंबई १६
Mb 9820632655

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा