"वाचा आणि फुला, फुलवा-२": "जीवन तत्त्वज्ञान".
"वाचा आणि फुला, फुलवा-२": "जीवन तत्त्वज्ञान"
वाचण्यासारखा छंद नाही, वाचण्यासारखा आनंद नाही, कारण त्यामधून आपल्याला अनेक व्यक्तींचे अनेक तर्हेचे विचार पाहायला, वाचायला अनुभवायला मिळतात. त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन काही ना काही तरी घेता येतील म्हणून, जेव्हा जेव्हा काही खरोखर मनाच्या कोपऱ्यात नोंदवुन ठेवावे आणि पुन्हा पुन्हा उजळणी करावी असे जर काही मला वाचनातून मिळत गेले, तर ते माझ्या ह्या अभिनव सदरातून मांडणे मी सुरु केले आहे. ही एक प्रकारची आनंदयात्राच आहे आणि तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ह्या दुसऱ्या लेखनपुष्पासाठी, विषयही कुठला मिळाला तर तो म्हणजे "जीवन तत्त्वज्ञान" हा!
"निर्वाणीचे गझल"
मौज दिवाळी अंक"२०११:
कविवर्य विंदा करंदीकर:
वरील दिवाळी अंकामध्ये, कविवर्य विंदा करंदीकर यांच्या एकाहून एक सरस अशा रचना मी मुद्दामून माझ्या नोंदवहीत नोंदवून ठेवल्या होत्या.
त्यातील रचना दोन भागात अशा तुम्हाला आता इथे देताना मला मनापासून खूप आनंद होत आहे.
"जीवन तत्वज्ञान" विषयाकरिता ह्या अप्रतिम गझला निश्चितच तुम्हाला अनुरूप वाटतील, अशी मला खात्री आहे.
अतिशय सोप्या भाषेत जीवन तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या सार्या रचना, खरोखर प्रत्येकाने अंतर्मुख होऊन प्रत्यक्षात त्याप्रमाणे वागायला हवे असेच सांगणाऱ्या आहेत:
१.
"एवढे लक्षात ठेवा":
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी,
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा !
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा,
मात्र तीही माणसे, एवढे लक्षात ठेवा !
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता,
उद्योग चिंता घालवी, एवढे लक्षात ठेवा !
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी,
सीमा तयाला पाहिजे, एवढे लक्षात ठेवा !
दुपटीने देत जो ज्ञान, आपण घेतलेले,
तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा !
माणसाला शोभणारे युद्ध, एकच या जगी,
त्याने स्वतःला जिंकणे, एवढे लक्षात ठेवा !
कविवर्य विंदा करंदीकर
---------------------
२.
"तेथून दूर जावे"!
सर्वस्व अर्पिती जे, त्यांचेच गीत गावे.
त्याची घडे टवाळी, तेथून दूर जावे!
नसता विनोद काही हसतात, लोक सारे,
चाले असा तमाशा, तेथून दूर जावे!
संगीत ज्या ठिकाणी, रसहीन चाललेले,
बुद्धीस साजवाया, तेथून दूर जावे!
विद्वान कल्पनांचा, काढीत कीस जेथे,
सामान्य माणसांनी, तेथून दूर जावे!
जनतेस नागवूनी, बनतात जे पुढारी,
त्यांचा झडे नगारा, तेथून दूर जावे!
बागेत हिंडताना, कुंजात लाडकीशी,
कुजबुज कानी येता, तेथून दूर जावे!
मोहान्ध होऊनिया, जे दार गाठलेले,
ते उघडण्याच पूर्वी, तेथून दूर जावे!
कविवर्य विंदा करंदीकर.
३.
"ते जरा समजून घे".
ही लाट आहे तोवरी, खुशाल तू गाजून घे!
गाजण्याला अर्थ कितीसा? हे जरा समजून घे.
हे अशिक्षित रांगडे, प्रश्न पुसती भाबडे;
पुसतात हे थोडे नसे! ते जरा समजून घे.
शतकानुशतके जाहली पिळवणूक ज्यांची इथे, सुटल्यास त्यांची सभ्यता, हे जरा समजून घे.
त्या यौवनासह येतसे हा आग्रही उत्साहही;
अतिरेक थोडा व्हायचा! ते जरा समजून घे.
त्यांना न अपुले आवडे, त्यांचे रूचे ना आपणा; बीज प्रगतीचे विरोधी, हे जरा समजून घे.
प्रेमाप्रमाणे रागसुद्धा माणसांना जोडतो, मानवातिल गुढ नाते, ते जरा समजून घे.
टाळ झडती तेवढ्याने मानू नको ही पंढरी,
शूटिंग चाले या इथे, ते जरा समजून घे.
कविवर्य विंदा करंदीकर.
----------------------
४.
"धीर थोडासा हवा."
कालौघ जावा लागतो अवतार घेण्याला नवा
विष्णूस त्या! मग आपण धीर थोडासा हवा.
अंधार दाटे भोवती; हाती असे इवला दिवा;
सारे दिवे पेटवाया, धीरज थोडासा हवा.
मानू नको यांना मुके, हें न अजूनी बोलके;
बोलते होतील तेही, धीर थोडासा हवा.
शेत रूजले, वाढलेही डोलते वाऱ्यावरी,
पीकही येईल हाती; धीरज थोडासा हवा.
स्वर लाभला; गुरुही भला; चाले रियाजही चांगला; जाहीर मैफल जिंकण्या, धीर थोडासा हवा.
'या गुणांचे चीज नाही'- तक्रार दुबळी व्यर्थ ही; चीज होण्या वेळ लागे; धीर थोडासा हवा.
घाई कुणा? वा केवढी? काल ना पर्वा करी;
काला बरोबर नांदण्या, धीर थोडासा हवा.
कविवर्य विंदा करंदीकर.
----------------------
ह्यांवर अधिक काही वेगळे विवेचन करण्याची गरजच नाही, इतक्या त्या सहज सोप्या भाषेत
कविवर्य विंदा करंदीकर ह्यांनी मांडल्या आहेत.
अविस्मरणीय अशा ह्या बोधक रचना आपल्याला एक नवी दिशा दाखवतील व द्रुष्टी देतील अशी आशा आहे.
ह्यासारख्याच कविवर्य विंदा करंदीकरांच्या गझला पुढील लेखात.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा