बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

"वाचा आणि फुला, फुलवा-३": "जीवन तत्त्वज्ञान":


 "वाचा आणि फुला, फुलवा-३":"जीवन तत्त्वज्ञान":
"निर्वाणीचे गझल"मौज दिवाळी अंक"२०११:कविवर्य विंदा करंदीकर:
वरील दिवाळी अंकामध्ये, कविवर्य विंदा करंदीकर यांच्या एकाहून एक सरस अशा रचना मी मुद्दामून माझ्या नोंदवहीत नोंदवून ठेवल्या होत्या.त्यातील चार रचना ह्यापूर्वी, मी पहिल्या भागात दिल्या होत्या. आता हा दुसरा भाग.

तुम्हाला आता "जीवन तत्वज्ञान" व आपले मनोविश्व योग्य तर्हेने बदलण्यासाठी ह्या अप्रतिम गझला निश्चितच तुम्हाला अनुरूप वाटतील, अशी मला खात्री आहे.
अतिशय सोप्या भाषेत जीवन तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या सार्‍या रचना, खरोखर प्रत्येकाने अंतर्मुख होऊन प्रत्यक्षात त्याप्रमाणे वागायला हवे असेच सांगणाऱ्या आहेत:
५."उपयोग काय त्याचा?":
शब्दात भावना नाही, ना वेध अनुभवाचा,
रचना सुरेख झाली; उपयोग काय त्याचा?

व्याहीच पत्रिकेचा, घालीत घोळ बसले;
नवरी पळून गेली! उपयोग काय त्याचा?
सुग्रीण रांधणारी; सुग्रास अन्न आले:
अरसिक जेवणारे; उपयोग काय त्याचा?

जमली महान सेना; शस्त्रे सुसज्ज झाली;
संधी निघून जाता, उपयोग काय त्याचा?

ऐश्वर्य प्राप्त झाले; झाली दिगंत कीर्ती;
स्नेही न एक लाभे; उपयोग काय त्याचा?

सर्वांस स्वास्थ आले; सगळीकडे सुबत्ता;
स्वातंत्र्य फक्त नुस्ले; उपयोग काय त्याचा?

केले गुरु अनेक; यात्रा अनेक केल्या;
शांती न प्राप्त होता, उपयोग काय त्याचा?
कविवर्य विंदा करंदीकर.
६."त्याला तयारी पाहिजे":
अग्नीमुळे प्रगती घडे; हे अन्नही त्याने शिजे;चटका बसेल केव्हातरी; त्याला तयारी पाहिजे.
पुष्पे, फळे, अन् सावली वृक्षातळी या गावली; काटा अभावित बोचता, त्याला तयारी पाहिजे.
आपल्या चुका ना आपणां, इतरांस त्या दिसती परी त्याचीच चर्चा व्हायची, त्याला तयारी पाहिजे.

केले कुणास्तव, किती ते कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती; त्याला तयारी पाहिजे.
डोक्यावरील घेऊनी आज येथे नाचती,घेतील ते पायातळी; त्याला तयारी पाहिजे.
सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांचाही! त्याला तयारी पाहिजे.
पाण्यामध्ये पडलाच ना?- पाणी कसेही असो- आता टळेना पोहणे, त्याला तयारी पाहिजे.
कविवर्य विंदा करंदीकर.
७."आशा दिसते तिथे मला":
हा शब्द जुळवी, गुणगुणे, मस्तीत आपुल्या रंगला; कविता म्हणा न म्हणा कुणी!आशा तिथे दिसते मला.
ज्याने प्रतिष्ठा लाभते ते रूढ रस्ते सोडूनी
हा वाट काढी वेगळी, आशा तिथे दिसते मला.
अंतिमाचा शोध घेणे हे जया जडले पिसे,
त्याला कुणी वेडा म्हणा! आशा तिथे दिसते मला.
ओसाडशा जमिनीतूनी जो पीक काढू पाहतो, करुनी प्रयोग नवेनवे, आशा तिथे दिसते मला.
शक्तिशाली दुर्जनाशी लढण्यास होतो जो खडा, मागे किती पाहीचना! आशा तिथे दिसते मला.
स्वप्न साकारीत असता हात ज्याचे पोळती,
ना ढळे अयशात निष्ठा, आशा तिथे दिसते मला.
सच्चेपणाने काम, जो करण्यात तृप्ती पावतो,
मानो न मानो देव तो, आशा तिथे दिसते मला.
कविवर्य विंदा करंदीकर.
८.
"आनंद घेत जावे":
असहाय्य दु:खिताना आनंद देत जावे;
आनंद देत असता, आनंद घेत जावे.
आनंद मिळविण्याची शक्ती मुलात मोठी;
तो बालयोग स्मरूनी आनंद घेत जावे.

संघर्ष खेळ माना; घ्या प्रेम सत्यसाथी
त्यातूनही व्रतीचा आनंद घेत जावे.

आकाश, माड, दर्या एकत्र पाहताना,तीर्थास भेटल्याचा, आनंद घेत जावे.

आयुष्यवेधी सगळ्या ग्रंथातूनी महान
सर्वात्म जाहल्याचा, आनंद घेत जावे.

सहजीवनात द्यावा सन्मान एकमेका;
प्रेमात मीलनाचा आनंद घेत जावे.

मृत्यू असे म्हणून जगण्यास अर्थ आहे;
अर्थात् मूल्य येण्या, आनंद घेत जावे.
कविवर्य विंदा करंदीकर.--------------------------
ह्यावर अधिक काही वेगळे विवेचन करण्याची गरजच नाही, इतक्या त्या सहज सोप्या भाषेतकविवर्य विंदा करंदीकर ह्यांनी मांडल्या आहेत.अविस्मरणीय अशा ह्या बोधक रचना आपल्याला एक नवी दिशा दाखवतील व द्रुष्टी देतील अशी आशा आहे.
ह्यासारख्याच कविवर्य विंदा करंदीकरांच्या गझला पुढील लेखात.
धन्यवादसुधाकर नातू
ता.क.असेच विविधरंगी लेखवाचण्यासाठी ही लिंक उघडा.....आपल्या wapp group मध्ये शेअरही करा:


http//moonsungrandson.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा