"रंगांची दुनिया-९":
"टेलिरंजन-१":
"छळती किती, आम्हा या मालिका? !":
शीर्षकावरून लक्षातच आलं असेल की, मराठी मालिका पाणी घालत कंटाळवाण्या होतील, इतक्या वाढवत वाढवत, दर्शकांच्या माथी मारल्या जातात. त्या डोके गहाण ठेवून जर बघितल्या, तरच कदाचित सुसह्य वाटू शकतात, यावर हे सगळे विचार असणार हे लक्षात आलं असेल. वेगवेगळे मुद्दे घेऊन मालिकांच्या उदाहरणांसह आम्ही विविध मालिका सर्वसाधारण रसिक समंजस प्रेक्षकाला कसे छळतात, ते दाखविण्याचा प्रयत्न येथे करणार आहोत.
"काळेभोर केसांच्या आजी":
पहिला मुद्दा हा आजी-आजोबांचा आहे. हल्ली मालिकांमध्ये आजी-आजोबा विशेषतः आजी स्वतःला खूपच तरुण समजतात. असेच त्यांचे एकंदर रंगरूप व व्यक्तिमत्व असते. आजी ह्या आपणही तरुण आहोत हे दाखवण्यासाठी काळेभोर केस ठेवण्याचे हट्ट धरतात. ही संहितेची गरज असू नये, सहाजिकच, ती भूमिका साकारणार्या अभिनेत्रींची इच्छा वा हट्ट असेच म्हणावयाचे.
उदाहरणार्थ "घाडगे अँड सून"
"आई कुठे काय करते"
"आंधळ्या प्रेमाच्या खाणा-खुणा!":
मालिकांमध्ये सर्वसाधारण जीवनामध्ये अशक्य अशा तर्हेचे प्रेम जुळवलेले दाखवले जाते. विधवा बाई-अनु, जिला एक मुल देखील होऊन गेलेले आणि अगदी गरीब घरातली, त्याच्यापेक्षा वयाने मोठी, तिच्या प्रेमात, उद्योगपती असलेला सिद्धार्थसारखा देखणा तरुण प्रेमात पडलेला आणि त्याचा विवाह व्हावा म्हणून, अनेक नाट्यमय प्रसंग ओढून ताणून रंगवत जाणारी मालिका म्हणजे "सुखांच्या सरींनी, मन हे बावरे"! इथे कुठल्याही सुखांच्या सरी कधीही कोसळताना दिसत नाहीत! आता बोला, हे शीर्षक कशासाठी?
तीच गोष्ट "अग्गबाई सासुबाई" मधली! इथे तर
आपल्या सासूचा विवाह व्हावा, म्हणून एक चक्क नवविवाहित सून, अक्षरशः धडपडताना दाखवलेली जाते. ज्या बाईला विवाहित मुलगा आहे, चांगला सांभाळून घेणारा सासरा आहे आणि तसं बघितलं तर तिच्या आयुष्यात कुठलाही एकाकीपणा अथवा त्रास, दुःख नाही, अशी ही स्त्री खूपच भोळीभाबडी आहे आणि ती एका प्रौढ अविवाहित शेफ असलेल्या पुरुषात कशी काय गुंतत जाते, हे मान्य होणं, केवळ अशक्यच आहे. समाजातील वास्तवतेवर प्रकाश टाकायचं सोडून, उगाचंच प्रौढ विधवा विवाहाचा एक वेगळा विचार टाकण्याच्या अट्टाहासांत, हा जो काही पोरखेळ चालवला जातो, तो कसा काय पटेल? एखादी एकाकी प्रौढ विधवा स्त्री, जीला मुलगा बिलकुल विचारत नाही आणि जीला काही आधार नाही, उलट जगण्यासाठी अनेक विवंचना आहेत, या सगळ्यांचा खूप त्रास होत आहे, अशावेळी तिला सोबत आधार व सहवास म्हणून एखाद्या समदुःखी प्रौढ पुरुषाबरोबर स्त्रीचा विवाह करावा, असे मनात येणे, अयोग्य नाही, परंतु इथे मालिकेत सगळंच उरफाटं आहे. ह्या दांपत्याने लैला मजनुसारखं वावरणं शोभत नाही. म्हणून तर
"अग्गबाई सासुबाई"
हे शीर्षक मालिकेला दिले की काय!
मालिकांमधील आंधळ्या प्रेमाच्या कळा ह्या खुळ्या, असे आम्ही जे म्हणतो ते ह्याच करता!
"असेही, तसेही काहीही...ही हं..!":
"घाटगे अँड सून"मध्ये अक्षय अमृता आणि टियारा यांचा जो तीन पायाची शर्यत असल्यासारखा प्रेमाचा व विवाह-घटस्फोट असा लपंडाव चाललेला, तो अक्षरशः उबग आणणारा होता. घटस्फोट घेतलेल्या सुनेला मुलगी म्हणून आजेसासूबाईंनी घरातच ठेवून घेणे, हा विचित्र प्रकार केवळ मालिकेतच होऊ शकतो.
"तुझ्यात जीव रंगला" मध्ये धाकटी सून स्वार्थापोटी, जे काही खलनायकी प्रकार आपल्याच कुटुंबाचा नायनाट होईल इतकेच नव्हे, तर स्वतःचा नवराही त्यातून सुटणार नाही, इतक्या थराला जाणारी सून फक्त मालिकेत सापडणार. पाण्यात बुडालेला मेलेला राणा दोन वर्षांनी परत येणे आणि नंतर मालिका वाढवण्यासाठी त्याने
चक्क पोलिसात भरती होणे, हे म्हणजे लांबण लावण्याचे हास्यास्पद लक्षण नव्हे तर दुसरं काय?
असाच कहर केला आहे तो "सुखांच्या सरींनी, मन हे बावरे", ह्या मालिकेत. इथे गोष्ट तर दिमाखात चालू असताना, म्हणजे श्रीमती दुर्गाबाई जी चांगली कर्तबगार धडाडीची उद्योग सम्राज्ञी आहे, ती चक्क घरातून गायब होऊन, कुठे तरी गुरूकडे जाते, केव्हा तर, तिच्या घरामध्ये तिचा एकुलता एक नवविवाहित लाडका मुलगा सिद्धार्थवर, एकतर्फी प्रेम करणारी सानवी घरात येऊन आपल्या आजारी आई बरोबर राहण्यासाठी येताना! ही अशक्यप्राय अशीच गोष्ट नाही कां? नंतर चक्क अभिनेत्रीच बदलून, नवी दुर्गा परत येऊनही, असून नसल्यासारखी निष्प्रभ आणि ही खलनायकी एक तर्फी प्रेम करणारी जवळजवळ वेडी मनोरुग्ण सानवी, घराचाच नव्हे तर कंपनीचाही पूर्ण ताबा घेऊन सगळ्यांना घराबाहेर रस्त्यावर काढते! याला खरोखर काय म्हणायचे, प्रेक्षक मूर्ख आहेत असे समजून, ही मंडळी आपल्याला कसेही वाटेल तसे भरकटलेले कसे दाखवत राहतात, याचेच नवल वाटते.
"माझ्या नवऱ्याची बायको" मालिकेबद्दल तर बोलायलाच नको! तिथे तर नाही नाही ते काहीही कसेही प्रसंग व नवनवीन व्यक्ती आणत मालिका अक्षरशा उबग येईल, इतकी पुढे पुढे बिनदिक्कत नेली जात आहे. गुरुनाथ हा नायकाचा कसलेला व्हिलन होणे आणि त्याहीपेक्षा त्याची पत्नी राधिका, एक मामुली गृहिणी, जणु चमत्कार होऊन, चक्क मसाला विकणार्या
रूपये ३०० कोटींच्या कंपनीची मालकीण होणे, घटस्फोटानंतर नवा गडी नवा राज्य सारखे तिचे मित्राशी लग्न होणे. तिला जणू विकतचे, इतके दिवस न उगवणारे सासू-सासरे मिळणे आणि अशाच अजून एका तिसऱ्या तरूणीच्या रूपाने शनायालाही शह द्यायला मालिकेत प्रवेश करणे, असे कितीतरी उद्वेगजनक न पटण्याजोगे असे प्रसंग दाखवून, या मालिकेचा अक्षरशः चोथा केला आहे. तरीही मालिका चालूच आहे, कारण कदाचित आपले डोके गहाण ठेवून बघणारेच प्रेक्षक ती बघत असावेत.
"रंग माझा वेगळा" मधील एक गर्विष्ठ धनाढ्य आई, ऐश्वर्या आपल्या मुलाने वा कुटुंबातील कोणीही, काळ्या रंगाच्या माणसांशी, संबंध ठेवू नये असा दुराग्रही अट्टाहास कां करत असते, ते तिचं तिलाच ठाऊक, वा ते रहस्य वेळ पडेल ( म्हणजे मालिका लांबवायचे उपाय संपल्यानंतर!) तेव्हा उघड होईल. तिचा मुलगा डॉक्टर कार्तिक तशाच एका गरीब घरातील पण काळ्या मुलीशी प्रेमसंबंध जोडू पाहतो. तर तिथे त्या मुलीची आई, जी सावत्र आहे, तिचा दुस्वास करत, तिच्याच वयाचा मुलगा असलेल्या एका प्रौढाशी तिचा विवाह अक्षरशः जबरदस्तीने तीन दिवसात केलाच पाहिजे, अशी धमकी देऊन करायला लावते! हा सगळा प्रकार खरोखर अतर्क्य आहे, तसेच आयत्या वेळेला, मेचका तिथे डॉक्टर कार्तिक घेऊन त्याने ते लग्न मोडणे, असे अनेक अविश्वसनीय प्रसंग एका पाठोपाठ, या मालिकेत सुरवातीपासूनच बघायला मिळत आहेत.
मारूतीच्या शेपटीसारखे मालिकांचे हे रडगाणे असेच लांबविता येईल. काही सन्माननीय अपवाद वगळता, बहुतेक सर्व मालिकांत, सुरुवातीचे थोडे भाग अतिशय उत्कंठा वाढविणारे व पाहण्यालायक असतात. परंतु कथाबीज जर इवलेसे असले तर, मालिका पहाण्याचा रस नाहीसा होऊन, पुढे काय करायचे असे प्रश्न निर्माण होऊन मालिकेला कसेही कधीही फाटे फोडत जातात. नवीन पात्रं आणि नवीनच काहीतरी वेगळे प्रश्न निर्माण करणे अशा युक्त्या वापरत मालिका लांबवल्या जातात, हे योग्य नव्हे.
ह्याकरता "छळती कां आम्हा या मालिका? !" हेच खरे. चित्रपटांप्रमाणेच सेन्सॉर बोर्डासारखे नियंत्रण मंडळ मालिकांसाठीही अनिवार्य होणे व कोणतीही मालिका मर्यादित भागांतच संपविणे आवश्यक ठरवले जावे. क्रिकेटमधील अत्यंत लोकप्रिय 20-20 सामन्यांपासून बोध घेऊन सर्वांनी असे बदल लौकर घडवून आणावेत.
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा