बुधवार, २९ जानेवारी, २०२०

रंगांची दुनिया-५": "रंगदर्शन-३": "व्हँक्युम क्लिनर": "एक फार्सिकल फँटसी?"


 "रंगांची दुनिया-५":
"रंगदर्शन-३":
"व्हँक्युम क्लिनर":
"एक फार्सिकल फँटसी?"

"व्हँक्युम क्लिनर" हे नाटक म्हणायचे की एक स्वप्नातली फार्सिकल फँटसी? काही कळायला मार्ग नाही. घसघसशीत चारशे रुपयांची तिकीटे काढून, इतके लोक कां जात असतील ह्या कचाकचा आक्रस्ताळेपणाच्या खेळाला? बहुदा केवळ त्यात, अशोक सराफ सारखा खंदा लोकप्रिय बुजूर्ग अभिनेता आणि निर्मिती सावंत सारखी चतुरस्र अभिनेत्री असल्यामुळेच जात असावेत, नाही तर खरं म्हणजे या धांगडधिंग्यात खास दम आहे, असं काही, मला तरी आढळलं नाही.

असे असूनही, ह्या नाटकाने चक्क दोनशेव्या प्रयोगापर्यंत मजल मारली, हे रंगभूमीच्या प्रेक्षकांची अभिरुची बदलल्याचे लक्षण होय. असाच बाष्कळ खेळ असलेल्या "एका लग्नाची पुढची गोष्ट" नाटकाचीही विक्रमी प्रयोगांकडे दौड सुरुच आहे. डोकं गहाण ठेवून नाही तरी, हल्ली छोट्या पडद्यावरच्या धो धो पाणी घालत, निरर्थक लांबवलेल्या मालिका, बिनडोक झालेले प्रेक्षक पहातातच की! दुसरं कारण वा प्रमुख कारण केवळ नाटकातील सेलिब्रिटी कलाकार पहायला मंडळी हल्ली गर्दी करतात. हलकं फुलकं
काहीही चालतं त्यांना. सहाजिकच अशी नाटके दर्दी नाट्यरसिकांसाठी नसतातच मुळी!

नवल हे की, "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" सारखे त्रिगुणात्मक अभिजात नाटक पाहिल्यानंतर, हा धेडगुजरी फार्स पहायची आम्हाला बुद्धी झाली.

• अजून एक बात मला सांगावी अशी वाटते, की महोत्सवी प्रयोगाला शक्यतोवर आपण जाऊ नये. कारण त्या दिवशी ह्या फँटसीच्या २०० व्या प्रयोगाची तिकीटविक्री जेव्हा प्रथम सुरू होणार होती, त्या दिवशी प्रारंभीच्या वेळेनंतर फक्त एका तासातच जाऊन तिकीट काढायला गेलो, तरी आम्हाला तिकीट मिळालं चक्क M ह्या तेराव्या रांगेतलं! हे काय गौडबंगाल होतं कल्पना नाही. निमंत्रित एवढे प्रचंड किंवा ऑनलाईन बुक करण्यासाठी राखलेल्या, पुढच्या १२ रांगातील सगळ्या जागा राखीव? काय भानगड असते काय माहित नाही. आम्ही नाटके नेहमी जास्तीत जास्त, पहिल्या सात रांगांतल्या जागी बघतो. नाहीतर त्यामागील जागी, विशेषतः ऐकण्यात वा द्रुष्टीदोषापायी वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांना गंमत मिळणार नाही. आमचा हा सारा खेळखंडोबा त्या दोनशेव्या प्रयोगापायी झाला असेल. त्यामुळे शक्यतोवर महोत्सवी प्रयोगाला जाऊ नये, वा कॉन्ट्रॅक्ट शोलाही जाऊ नये, हा धडा आम्हाला मिळाला.

त्या दिवशी प्रयोगाला मात्र एकंदर जो काही प्रेक्षकवर्ग व वातावरणातला माहोल होता, तो पूर्वी रंगभूमी जेव्हा ऐन बहरात होती त्या जमान्यातल्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारा होता. अगदी तसेच चांगले नटून-थटून आलेले विविध वयोगटातील स्री पुरुष, अन् आश्चर्य, त्यामध्ये तरुण वर्गही भरपूर होता, बहुदा महोत्सवी प्रयोगामुळे असे घडले असेल. मराठी माणसाला जी खरीखुरी आवड आहे की, काही करून नाटकाला जाणं, ती तिथे दिसली. दुसरे म्हणजे दादरच्या शिवाजी मंदिर सारख्या हॉलमध्ये जाऊन नाटक बघण्याची जी गंमत आहे, ती इतरत्र मला तरी कुठेही आढळत नाही.

हे नाटक एका चौकोनी कुटुंबाचं आहे. नवरा अनुभवी प्रोफेशनल, स्वतःची कंपनी असलेला आणि पत्नी हाउसवाइफ, एक मुलगा, एक मुलगी आणि जावई. वडिलांचे "नाच्या" मुलाशी हाडवैर अन् जावई लाडका. हाडवैर मुलाबरोबर कारण तो पूर्णवेळ डान्सिंग करण्यात मग्न व आईसुध्दा मुलाला साथ देणारी!

मुख्य म्हणजे नवरा, त्याच्या तापट स्वभावामुळे आक्रस्ताळा इतका की, पहिल्या अंकात केवळ हेच दिसतं की हा माणूस ऑफिसमधून आल्यावर सारखा रेड्याप्रमाणे रेकल्यासारखा सगळ्यांवर डाफरत काय बसतो आणि बायको आहे कायम शॉपिंग मध्ये पैसे उडवणारी पण एक गरिब घरबशी गाय. हा बिचारा नवरा भरपूर मेहनत करतोय धो धो पैसा मिळवतोय, पण बायको मात्र ह्याचं बाहेर काहीतरी लफडं आहे, असा संशय घेणारी. सहाजिकच दोघांची ह्या ना कारणावरून सदान् कदा भांडणं, वादविवाद ज्यात बहुशः नवर्याचेच वीट येईल इतके आकांडतांडव की ते पहिला अंकभर जवळजवळ व्यापून रहाते.

या पार्श्वभूमीवर बायकोने एक महागडा व्हँक्युम क्लिनर आणलेला असतो. तो चालू करून ह्या दोघांपैकी एक जण हात लावल्यावर बसतो, भयानक शाँक! त्याची सुटका करायला जोडीदार पुढे येतो, तर दोघंही फेकले जाऊन बेशुद्ध पडतात. इथे पहिल्या अंकाचा दि एंड.

इथून दुसऱ्या अंकात, जो फार्सिकल फँटसीचा धिंगाणा, ही दोघं शुद्धीवर आल्यावर होतो तो शेवटपर्यंत! कारण जणु काही परकायाप्रवेश केल्यासारखे, मनातून, नवरा होतो बायको आणि बायको नवरा होते! आता पुढचा, थयथयाट नवरारूपी बायकोने घालताना व नवरारूपी बायकोची होणारी तारांबळ, इतक्या काही अनाकलनीय गोष्टी घडत जातात, की बोलायची सोय नाही. शेवट काय होतो, ते नाटकाचे इतके महाभारत वाचल्यावर, ज्यांना पहायची इच्छा उरली असेल, त्यांनी रंगमंचावरच बघावे.

थोडक्यात "व्हँक्युम क्लिनर, उर्फ एक फार्सिकल फँटसी" म्हणजे नवरा व बायको या दोन भूमिका आलटून पालटून करणाऱ्या अशोक सराफ व निर्मिती सावंत ह्यांची फक्त अभिनय स्पर्धाच होय. दोघांमध्ये, भूमिका कशी केली, कोणी चांगली केली ते व ही स्पर्धा बघायची असेल तर नाटक पहा, एवढेच म्हणायचे. आम्हाला विचाराल तर, येथे दुसर्या अंकानंतर नवरा झालेली बायको-निर्मिती सावंत ह्यांचा परफॉर्मन्स अधिक उजवा वाटला.

ह्या मंथनातून जर कोणता धडा संसारी माणसांनी घ्यायचा? तर तो असा:
"संसारात एकमेकांची व्रुत्ती, स्वभाव व गुणदोष तसेच द्रुष्टीकोन नीट समजून घ्यावा, कारण "द्रुष्टी बनवते स्रुष्टी". सर्वात महत्त्वाचे: जोडीदार जसा आहे तसा तो समजून घेऊन त्याचा स्वीकार केला तरच जोडीचा संसार गोडीचा होतो."

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा