शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

"हटवलेले संदेश-कथा व व्यथा":

 "हटवलेले संदेश-कथा व व्यथा":

हटवलेले की हरवलेले संदेश ?!

झालात ना आश्चर्यचकीत? एक out of box असा हा सहसा दुर्लक्षित रहाणारा मुद्दा घेऊन मी माझ्या कल्पनावक्तीला येथे थोडा ताण देणार आहे.

पुष्कळ वेळा आपल्याला आपण जो संदेश पाठवतो, तो पाठवल्यावर लक्षात येतं की, हा आपण काढून टाकायला हवा, म्हणून आपण लगेच हटवतो. हटवलेला संदेश म्हणजे जणू काही प्रेम व्यक्त न करणे, मनात असूनही प्रेम व्यक्त करण्याची टाळाटाळ करणे ! दररोज तुम्ही whatsapp वर किती संदेश कुणी कुणी हटवलेले आहेत, ते जरूर पहा आणि डोक्याला थोडा ताण देऊन काय असेल त्या अंतर्धान पावलेल्या संदेशात त्याची कल्पना करा. त्यासाठी तेथीलच मागच्या संदेशांचे वाचन कदाचित उपयुक्त ठरू शकेल. हा एक अंधारात तीर मारण्याचा खेळ खेळून तर बघा !

संदेश हटवण्याची कारणे अनेक असू शकतात. पुष्कळ वेळा समोरच्याला तो आवडणार नाही, बहुधा कधी कधी तो विश्वसनीय नाही वा अनुचित आहे, असं आपल्याला लक्षात येतं आणि आपण तो हटवतो. मात्र अशावेळी तो कुणाला मिळाल्यानंतर, त्याने तो वाचण्या आधीच, तो हटवून टाकणे गरजेचं असतं. नाहीतर जे काय रामायण-महाभारत व्हायचं, ते होतच. आजकाल व्हाट्सअप वर एक सोय चांगली झाली आहे, की समोरच्याने तो संदेश जर पाहिला अथवा वाचला असेल, तर हिरव्या दोन खुणा येतात. त्यामुळे आपल्याला संदेशाचे वाचन झालं आहे वा निदान तो नजरेखालून गेला आहे, हे समजतं.

ह्या संदर्भातला, हा अनुभव:
एका दुर्मिळ असा आवाज असणाऱ्या जुन्या लोकप्रिय गायकाचे संबंधी चांगला माहितीपूर्ण संदेश होता, त्यामध्ये त्याच्या दहा सर्वोत्तम
गीतांसंबंधी माहिती व ती गीते आहेत असे मांडले होते आणि तो सामायिक करण्याचीही सोय होती. त्यामुळे घाईघाईने मागचा पुढचा विचार न करता, ज्यांना संगीताची आवड आहे, अशा निवडक दोन-तीन स्नेह्यांना संदेश समाईक केला. नंतर गीते ऐकण्यासाठी, जेव्हा पूर्ण उघडला, तेव्हा माहिती तर होती गीतांची, पण शेवटी सर्व गीते ऐकायला मिळतील म्हणून मी मी पुढचं काही करणार, तेवढ्यात तिथे शब्द होते की, सर्व गीते ऐकण्यासाठी युट्युब वर जावे लागेल ! आता डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ माझी होती. उगाचच नसता खटाटोप झाला होता. त्यामुळे ताबडतोब, मला हे सर्व संदेश हटवावे लागले. एक गोष्ट बरी झाली होती की, कुणीही तो बघितला नव्हता. मात्र असं नेहमी होतं असं नाही. ह्याकरता एक गोष्ट नक्की की, आपण स्वतः पूर्ण शेवटपर्यंत तो वाचला पाहिजे आणि नंतरच योग्य व्यक्तींना पुढे पाठवला पाहिजे.

माणसाच्या मनात काय चाललंय, हे कधी कोणाला कळत नाही. त्याच प्रमाणे आपल्याला व्हाट्सअप वर असे हटवलेले संदेश काय होते, हे कधी कळतच नाही. हे गुपित फक्त ते पाठवणार्यालाच माहित असते. व्हाट्सअप वर ही हटवाहटवा तशी सोपी आहे, कारण आपल्याला कुणाला तो संदेश पाठवला हे निश्चित माहीत तरी असते. परंतु कधीकधी अशी वेळ येते आणि ती बहुतांश फेसबुकवर येते. एखाद्या ग्रुपवर आपण एखादा संदेश टाकतो, तो संदेश ॲडमिनकडे जातो आणि त्यांनी तो मान्य केल्यानंतर त्या
ग्रुपवर तो दिसू शकतो.

अशा वेळेला आपल्याला संदेश प्रदर्शित करताना विशेष काळजी घ्यावी लागते. माझ्या बाबतीत एकदा अशी चूक झाली की, मी एक संदेश एका ग्रुपवर प्रदर्शित केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की, त्यात महत्त्वाच्या अशा अनेक चुका होत्या. त्यामुळे आता काय करायचे, याचा विचार करत असताना नशिबाने मी तो ग्रुप उघडला आणि तो संदेश तेथे नुकताच मान्य करून ॲडमिनने पुढे प्रदर्शित केला होता. लगेच मी तो हटवला. पण हे जर जमलं नसतं किंवा माझ्या चुका लक्षात आल्या नसत्या, तर खूपच गोंधळ झाला असता कारण एखाद्या समूहावर बरेच सभासद असतात, त्यापैकी कोणी वाचला, कोणी नाही वाचला हे काही आपल्याला कळू शकत नाही.

थोडक्यात शक्यतोवर पूर्वीची माझी जी पद्धत होती की, कुठलाही संदेश, चित्र, वा व्हिडिओ उगाचच पुढे पाठवायचा नाही, हे योग्य होतं. कुठलाही संदेश पुढे पाठवताना विशेष काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला नंतर कदाचित बराच मनस्ताप होऊ शकतो.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
जाता जाता, एक प्रश्न तुम्हाला..
तुम्ही हटवलेल्या संदेशांचा अनुभव सांगा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा