गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

"रंगदर्शन-३": "ओढून ताणून विणलेली, एका लग्नाची दुसरी गोष्ट!":

 "रंगदर्शन-३":

लाँकडाऊनच्या कसोटी पहाणार्या कालखंडांनंतर आता मराठी माणसाला प्रिय अशी रंगभूमीवरील नाटकांची नांदी पुनश्च सुरु झाली. त्या निमित्ताने निवडक नाटकांचा रसास्वाद आपणासाठी सादर करण्याचा मी उपक्रम सध्या करत आहे. त्यातील हा रसास्वाद.......

"ओढून ताणून विणलेली,
एका लग्नाची दुसरी गोष्ट!":

हल्ली माझा तरी असा अनुभव आहे की, एखादं नाटक किंवा चित्रपट बघायला आपण जातो, परंतु तो पाहिल्यानंतर आपले पैसे वेळ आणि श्रम फुकट गेले असेच वाटत राहते. फारच थोड्या वेळी आपला तो निर्णय सार्थकी लागला असा अनुभव येत रहातो. विशेषतः नाटकांच्या बाबतीत हा अनुभव बऱ्याचदा येतो आणि पूर्वीच्या सारखी नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी नाटके येत नाहीत, असे माझे मत आहे.

त्यामुळे खरोखर आम्ही असं ठरवलं होतं की, शक्यतोवर कुठल्याही नाटकाचं परीक्षण आल्याशिवाय, ते बरे आहे का वाईट आहे ते समजल्या शिवाय आपण नाटकाला काही जायचं नाही. त्यातून पुण्याला अपुर्या व सुलभ सार्वजनिक वहातूक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, नाटकाच्या वेळाही गैरसोयीच्या असल्याने व तेथील नाट्यगृहांच्या जागा व देखभाल यथातथाच असल्याने तिथे फक्त चित्रपट पहायचे, नाटके मात्र नाही, असा आम्ही कानाला खडा लावला होता. परंतु जे होतं नेहमी तेच झालं आणि त्या दिवशी आम्ही "एका लग्नाची दुसरी गोष्ट" ह्या नाटकाचं परीक्षण पहाण्यात आलेलं नसताना, ह्या नाटकाला बालगंधर्व नाट्यग्रुहांतील, दुपारच्या १२-३० वाजताच्या, ( ना धड दुपारचे भोजन घ्यायची, ना धड वामकुक्षी घेण्याची वेळ ) प्रयोगाला गेलो खरे, परंतु आमचा भ्रमनिरास झाला. आणि तो निर्णय कसा चुकीचा होता, ते प्रवाहाविरुद्ध ( कदाचित इतरांचा अनुभव भिन्न असू शकल्याने) विरुद्ध जाऊन मी येथे मांडत आहे.

"एका लग्नाची दुसरी गोष्ट" हे नाटक, त्याचा जितका गाजावाजा करून पुढे आणले गेले, तेवढे काही आगळे वेगळे वा अविस्मरणीय वाटत नाही हे पहिल्यांदाच नमूद केले पाहिजे. ह्या नाटकाचा जो पहिला भाग होता तो जितका भावनाप्रधान कौटुंबिक प्रधान आणि जिव्हाळ्याच्या नात्यांचा नाट्यमय आविष्कार होता, तितकासा हा नाही. किंबहुना, हे एक ओढून-ताणून उभे केलेले नाटक वाटते. सहाजिकच त्या पार्श्वभूमीवर माझ्यासारख्या रसिकाचा अपेक्षाभंग झाला.

वीस वर्षानंतर संसारात कोणत्याही जोडप्याचे खटके उडणं हे साहजिक असतं आणि त्यातून नवरा बाहेर भरकटण्याची शक्यता अधिक असते, त्यांच्यात एकमेकांबद्दलची ओढ कमी होऊ शकते. ह्याच मूलभूत संकल्पनेवर हा सगळा खेळ मांडला आहे खरा, परंतु मुळातच मन्या आणि मनीषा यांचा वीस वर्षानंतरचा संसार, कोण्या एका दिवशी मन्याने आँफीसमधून घरी आल्यावर चिडचिडी केलेल्यावर उभा केला असल्यामुळे, अक्षरश: नाटकाचा पायाच मुळी भुसभुशीत झाला आहे, असे दिसून येते.
मन्याने दुसऱ्या मुलीच्या-आपल्याच ऑफिसमधल्या सेक्रेटरीच्या प्रेमात पडावे, व त्यापुढचा नाट्यमय प्रवास, स्वतः मनीषा, मन्याच्या ऑफिसमधल्या सहकार्याच्या-पुरूच्या मदतीने करते, हे प्रेक्षकांसमोर अगोदरच येत असल्यामुळे, जो काही नाटकाला उठाव यायला हवा होता, तो येत नाही. त्यामुळे, दुसर्‍या अंकात तर हे ओढून-ताणून जमवलेले प्रेम प्रकरण उलट सुलट फिरविल्याने, तितकेसे काही ते मनाचा ठाव घेत नाही, पटत नाही. केवळ प्रशांत दामले आणि कविता (लाड) मेढेकर, ह्या स्टार जोडीपायी हाऊस फुल्ल झालेल्या नाटकात पुरूच्या भूमिकेत अतुल चोडणकर निश्चितच कमाल करतो. प्रशांतच्या रंगमंचावरील सहज सुंदर नैसर्गिक वावरामुळे आणि उत्कृष्ट टायमिंग मुळे, तसेच कविताच्या तितक्याच समर्थ साथीपायी हा खेळ सुसह्य होतो इतकेच, तसेच प्रेक्षकही हसतात व टाळ्या (मात्र, कां?) वाजवतात.

पहिला अंक बर्यापैकी रंगतो मात्र दुसरा उगाचच शेवटी तर कंटाळा येईल इतका ते लांबवला आहे. फक्त प्रशांतचे सुरेल आवाजातील "सुख म्हणजे काय असतं" हे लोकप्रिय गीत ऐकण्यासाठी आणि ह्या यशस्वी जोडीला बघण्यासाठी बहुदा प्रेक्षक मोठ्या ओढीने या नाटकाला गर्दी करत असावेत.
सहाजिकच हे नाटक नसून, एक हलका फुलका कसाही ओढून ताणून बेतलेला फार्सच अधिक आहे, हाच या सगळ्या खेळाचा मतितार्थ म्हणता येईल. सध्या जे दुसरे एक नाटक अशाच जोडीदारांच्या वाट चुकण्यावर आलेले आहे, ते म्हणजे "आमच्या हिचा प्रियकर" हे, ह्या फार्सपेक्षा जास्त प्रभावी म्हणावे लागेल. फक्त तिथे इथल्या जोडीसारखी सुपरस्टार जोडी नसल्यामुळे त्या नाटकाचा असा क्रेझी बोलबाला झालेला नाही एवढेच.
एका लग्नाच्या पहिल्या गोष्टींत गांभीर्य होते आणि त्यावेळच्या कौटुंबिक वातावरणाची वास्तवता अतिशय परिणामक पद्धतीने दाखवली होती. त्या तुलनेत हा दुसरा भाग, विनोदी किंवा फार्सिकल दाखवण्याची खरोखर गरज होती कां, याचा विचार करायला हवा होता. नवरा-बायकोची- मन्या व मनीषाची भांडणं किंवा मतभेद, अधिक विस्ताराने दाखवायला हवे होते की ज्यामुळे खरोखरच त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला हळूहळू जाऊ लागले आणि त्यांच्या परस्परसंबंधांमध्ये गोडवा न राहता दुरावा आणि सारे काही आलबेल नाही असे ध्वनित व्हायला हवे होते, तरच पुढचे काही जे घडते ते पटू शकले असते.

त्यातूनही मन्या तसा साधा सरळ माणूस आणि त्याला परस्त्रीच्या-तरुण सेक्रेटरीच्या नादी लागण्यासाठी प्रशिक्षण घ्यायला लागते, हा प्रकारही खरोखर पोरखेळ सारखा वाटत होता आणि हेच कदाचित कारण या नाटकाला मारक ठरू शकते. संबंधितांनी ह्या निरीक्षणाची जरूर नोंद घेऊन, जर नाटक सखोल विचार करून त्यांत योग्य बदल केला, तर हे नाटकही पहिल्या भागासारखे जनतेच्या रसिकांच्या लक्षात राहील असं वाटतं.

सारांश कोणत्याही यशस्वी कलाकृतीचा पहिला भाग बहुदा सर्वोत्तम असतो, परंतु त्याचा पार्ट २ करायला गेलं तर भट्टी जमत नाही, हेच या एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीवरून अधोरेखित होते.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
हा प्रयत्न तुम्हाला भावला, आवडला, वा कसा वाटला, त्याचा प्रतिसाद जरुर द्या......
माझ्या ब्लॉगची पुढील लिंक सेव्ह करा.....

https://moonsungrandson.blogspot.com

ती लिंक अधूनमधून उघडून, वैविध्यपूर्ण ललित लेख वाचण्याची संवय लावून घ्या.......
योग्य वाटल्यास, ही लिंक......
आपल्या परिचय वर्तुळात शेअरही करा.......




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा