गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

"टेलिरंजन-७": "मालिका-पीडणार्या, भरकटलेल्या !":

 "टेलिरंजन-७": 

"मालिका-पीडणार्या, भरकटलेल्या !":

मार्केटिंग मधली संकल्पना- 'प्रॉडक्ट लाइफ सायकल' आणि टीव्हीवरील मालिका यांच्यात खूप साम्य आहे. आपल्याला सुरुवातीला हळूहळू आवडत जाणाऱ्या मालिका नंतर अधिकच चांगल्या वाटत जातात. जसे नवे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आल्यावर हळूहळू त्यांची विक्री वाढू लागते लोकांच्या पसंतीला ते आले की माऊथ पब्लिसिटी मधून त्यांची विक्री वाढत जाते. पण त्याला मर्यादा असतात. केव्हा तरी ही विक्री स्थिर होते आणि हळूहळू ती कमी होते आणि कदाचित तो मार्केट मधून प्रॉडक्ट काढून घ्यायला लागतो. मालिकांचही तसच आहे. सुरुवातीला आवडणाऱ्या मालिका नंतर नकोशा होतात ह्या लेखामध्ये अशाच माझ्या नजरेतून अर्थहीन मालिकांचा थोडक्यात परामर्श घेतला आहे.

सुरुवातीला बघाव्यात असे वाटणाऱ्या मालिका नंतर नकोशा होतात. त्या मालिका माझ्यामते अशा
"जीव झाला वेडापिसा", "अग्गबाई सासूबाई"
"रंग माझा वेगळा" "फुलाला सुगंध मातीचा"
"सुख म्हणजे काय असतं" "माझा होशील ना !" इ.इ. या मालिका सुरुवातीला आकर्षक वाटल्या. परंतु जसजसा काळ गेला, तशी त्यामधली रंगत कमी होत गेली आणि पुष्कळदा न पटण्याजोग्या घटना दाखवत तोचतोचपणा आल्यामुळे मालिकांमधल्या नाट्याची रंगत जाऊन, त्या बघूच नये अशा पद्धतीने सादर होऊ लागतात. सहाजिकच मी तरी त्या मालिका बघणं बंद करतो.

"जीव झाला (केला ?) वेडा पिसा":
या मालिकेचा नावातच दर्शकाला किंवा प्रेक्षकाला वेडपीसा करण्याचं सामर्थ्य होतं. अडाणी शिवा गावातल्या राजकारणी आत्या बाईचा जणु (अँग्री) मँन फ्रायडे आणि त्याचे कारनामे बिनधास्त रहाण्याचे, या जोडीला गांवांतील मास्तरांची मुलगी सिद्धी आणि तिचा प्रियकराबरोबर होणारा विवाह, यामध्ये शिवाची थरारक एन्ट्री आणि नंतर मालिका रंगत जाणे, एवढेच काय, पण शिवाने मास्तरांच्या मुलीचे अपहरण करून तिला कोंडून ठेवणे, तिचे लग्न मोडणे, नंतर तिचे शिवाबरोबरच लग्न होईपर्यंत ही मालिका उत्कंठा पूर्ण होती. पण हळूहळू आत्याबाई आणि तिचा प्रतिस्पर्धी यांचे कारनामे वाढत गेले, तसेच अधूनमधून भेट देणारा शिवाचा बाप लष्करे, कशाला घरी यायचा ते त्यालाच ठाऊक. त्याची कारस्थानी बायको व तिला साथ देणारा तिचा दीर ह्यांच्या नको त्या उचापती येथपर्यंत सारे ठीक होते. पण हळूहळू काय झाले कुणास ठाऊक, या साऱ्या नाट्याचा अतिरेक व्हायला लागला. 'पाणी' घालून घालून मालिका वाढवत आहेत असे वाटू लागले आणि नंतर मी ती मालिका पहाणे सोडून दिले. म्हणजे हे प्रॉडक्ट लाइफ सायकल सारखं झालं-उंच भरारी नंतर खाली खाली !

"अग्गबाई सासूबाई": "आता मुळ्ळी नकोच बाई !":
सुरुवातीला उत्सुकता वाढवणारी वेगळ्या बाजाची ही मालिका. आपल्या मुलावर-बबड्यावर, नको इतके अतिरेकी प्रेम करणारी विधवा असावरी आणि "कोंबडीच्या" अशी आरोळी देणारा सासरा, यांच्यामध्ये त्या बबड्या वर प्रेम करणारी, शुभ्रा स्वतःहून आपले लग्न जुळवते धिटाईने. येथपर्यंत सगळं आनंददायी होतं. नंतर असावरीच्या जीवनात कसा कुठून कोण जाणे, वयस्क शेफ अभिजीत राजे येतो काय व आश्चर्य म्हणजे आपल्या विधवा सासूचा विवाह जुळण्यासाठी तरूण सून शुभ्रा स्वतःहून
आटापिटा करते. सासऱ्याचा विरोध, मुलाच्या तर पूर्ण मनाविरुद्ध असे हे (कारणे न पटणारे) लग्न अशी मालिका रंग तर जाते खरी. या दोघांचा विवाह ही होतो तोपर्यंत सारं सुसह्य होतं. पण त्यानंतर बबड्याचा सूड आणि उलट-सुलट अशा बिलकुल न पटणार्या घटना इतक्या काही वेगाने भरकटत जातात, की या मालिकेचे ताळतंत्रच उडून जाते. दिसते. जी मालिका आवर्जून पाहावी असं वाटत होतं, ती दिशाहीन व हास्यास्पद होत, नक्को नक्को ग बाई अशी म्हणायची आता वेळ आली आहे.

"माझा होशील ना":
ह्या मालिकेमध्ये सुरवातीला उत्सुकता वाढत गेली. चार नटखट अविवाहित (?) मामा, त्यांचा लाडका पोरका असलेला भाचा आदित्य व मधून मधून कधी तरी डोकावणारे ह्या मामांचे वडील अर्थात आदित्यचे आजोबा, यांच्यामध्ये लाडावलेली नटखट आणि मनस्वी तरुणी सई बिराजदार येते काय आणि हळूहळू आदित्य आणि सई मजेशीरपणे जवळ कसे येत जातात हे बघणे खरोखर उत्सुकता पूर्ण होते. परंतु हा जो खेळ होता तो मोठा दादा मामाच्या आजारपणा पर्यंत ठीक चालला होता. मात्र तो बरा झाल्यानंतर आदित्य त्याला वचन काय देतो की गावच्या मेघनाशी विवाह करीन. तिथून या मालिकेचा गाडा असा काही विचित्रपणे कसाही एखाद्या दारुड्यासारखा वेडावाकडा घसरत चालला आहे की त्याला तोड नाही. सईंने चक्क आदित्याच्या पाठोपाठ दापोलीला जाणे, नंतर तिचा डॉ सुयशशी साखरपुडा काय ! एवढ्या सगळ्या गडबडीत आदित्यचा कमालीचा उद्वेगजनक हुमेपणा-मेघना की सई प्रश्नाचे पोरखेळ, हे सगळं उबग आणणारं न बघण्याजोगं वाटत गेलं. "माझा होशील ना" मालिकेला आपल्याला रामराम ठोकावा असं वाटावं, इतकी वेळ या भरकट जाणाऱ्या मालिकेत आली. ह्या मंडळींना कळत कसं नाही कुठे थांबायचं आणि जर काही पुढे वाढवायचं असेल तर त्यात काही तारतम्य हवं की नको? पण लक्षात कोण घेतो?

"रंग माझा वेगळा":
"रंगाचा आता बेरंग की हो झाला !":
रंग माझा रंग माझा वेगळा ची देखील आणि काही वेगळे नाही ही मालिका देखील सुरूवातीपासून चांगली रंग जाते क***** रंगाचा दुस्वास करणारी सौंदर्य आणि संसारातील लोकमत या सगळ्यामध्ये मोठा मुलगा हा कार्तिक डॉक्टर एका काळा मुलीच्या प्रेमात काय पडतो आणि त्यानंतर उलटसुलट घटना घडत दोघांचा विवाह ही होतो पुढे सौंदर्याचे क***** रंगाच्या वर असलेला राग याची ही कहाणी निश्चितच उत्कंठा वाढवणारी होती परंतु तो काळा गुंड जेव्हा घरी येऊन तमाशा करतो आणि त्याला तुरुंगात टाकलं जातं त्यानंतर मालिकेत पाणी घालण्यासाठी डॉक्टर तनुजा चे जे काही खेळ चालतात ही पर्यंत मालिका कशीबशी बघावीशी वाटत होती परंतु डॉक्टर कर्जाचा खेळ खलास झाल्यावर उगाचच
दीपाचं बाळंतपण श्वेताचं बाळंतपणाचं नाटक.. हे सगळे नको असणारे खेळ आता बघवत नाहीत आणि अर्थातच रंग माझा वेगळा चा बेरंग होऊन गेलेला आहे कशाकरता पुन्हा करता मालिका बघायची हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

"फुलाला सुगंध मातीचा":
" आता मातीमोल होतायत की हो फुले !":
"फुलाला सुगंध मातीचा" मालिकेमध्ये देखील एक आगळी वेगळी अशी प्रेम कहाणी आहे. सुशिक्षित मुलगी कीर्ती आणि केवळ सातवी पास झालेला एक मिठाईचे दुकान असलेला शुभम यांचा नाट्यपूर्ण अशा तऱ्हेच्या फसवाफसवीनंतर झालेला विवाह. त्या एकत्र कुटुंबातील सासूबाई जीजीक्काचा सर्वांवर कर्णकर्कश्श दरारा प्रथम पाहण्याजोगा होता. परंतु नंतर त्या माजखोर वागण्याचा अतिरेक होतो. मोठी सूनबाई कीर्ती, पदवी परिक्षेत राज्यात तिसरी आली आणि नंतर मिडीयासमोर ह्या अडाणी जहांबाज जीजीक्का जे काही तारे तोडतात, त्यांची लाज वाटावी. तेव्हापासून या मालिकेला खरोखर काहीही अर्थ उरत नाही. धाकट्या वहिनीचा वेगवेगळ्या प्रसंगी दिसणारा स्वार्थीपणा, त्याला कीर्तीने दिलेले चोख प्रत्युत्तर, हा सगळा आधीचा भाग बघण्याजोगा होता. परंतु सगळ्याच गोष्टीचा आता अतिरेक होऊन ही मालिका खरोखर नकोशी वाटत चालली आहे. इथे "फुलाला सुगंध मातीचा", ऐवजी मातीमोल होतायत की हो फुले, असे वाटायला लागले आहे. बस्स करा हा धेडगुजरी एकत्र कुटुंबातील ओढून ताणून चालवलेला तमाशा ! केव्हा ही मालिका संपेल असे झालं आहे. उगाचच लोकांना ती बघण्याची शिक्षा दिली जात आहे, दुसरे काय !

" सुख म्हणजे नक्की काय असतं ( की नसतं !) !"
या मालिकेमध्ये आपला जीव वाचवणार्या दिवंगत मित्राच्या पश्चात त्याच्या पोरक्या मुलीला संभाळणाऱ्या एका खानदानी बापाची दादासाहेब आणि त्याच्या एकत्र कुटुंबाची कथा आहे. उद्योजक असे हे श्रीमंत कुटुंब आहे. त्यांचा धाकटा मुलगा जगदीप फॉरेन रिटर्न असून इतर दोघे भाऊ तितकेसे कार्यक्षम नाहीत. त्यांची मोठी सून ही तर कारस्थानी बाई आहे. एका राजकारण्याची मुलगी असलेली ही स्त्री मालिकेमध्ये एकापेक्षा एक वेगळी कारस्थाने रचत जाते. स्वार्थापायी गौरीला मिळणाऱ्या दहा टक्क्यांवर ह्या मंडळींचा डोळा. त्यासाठी अनेक उपद्व्याप करत शेवटी कथा वेगळेच वळण घेत गौरीचे लग्न गुंड प्रव्रुत्तीच्या बनेल अनिल बरोबर विलक्षण नाट्यपूर्ण घटनेनंतर मोडल्यावर दादासाहेबांना हार्ट अटँक आल्याने, ते आपल्या धाकट्या मुलाला जगदीपला गौरीशी विवाह करायला भाग पाडतात. खरं म्हणजे जगदीप आणि त्याची लंडनमध्ये त्याच्याबरोबर असलेली मैत्रीण जणु लिव्ह इन रिलेशनशिप इतके जवळ असणारे. यावेळेपर्यंत मालिका बघण्याजोगी वाटायची. पण जगदीपच्या विवाहानंतर, पुन्हा फॉरेन रिटर्न मैत्रीण ज्योतिका यांच्याच घरी काय रहायला येते आणि पुढे नको असे, अनेक न पटण्याजोगे वेडेवाकडे काहीही प्रसंग घडत काय जातात, शेवटी आपल्याला सगळ्यांचा कंटाळा येतो. गौरीचा विवाह झाल्यानंतर ही मालिका संपवणे ठीक होते. पण पाणी घालत शेवटी कशीही मालिका भरकटत नेली जात आहे. त्यामुळे ही मालिका "सुख म्हणजे नक्की काय नसतं" हेच जणू काही दाखवत आहे आणि प्रेक्षकांना ताप देत आहे.

ह्या पार्श्वभूमीवर दुसरे चित्र पाहू..
"टिकाऊ तीन/पाच":
प्रत्येक वाहिनीवर अनेक मालिका प्रदर्शित केल्या जातात. परंतु इथेही मार्केटिंग मधला नियम लागू होतो. मार्केटिंगमध्ये, बाजारातील स्पर्धेत शेवटी केवळ उत्तम असे तीन वा जास्तीत जास्त पाच प्रॉडक्टस् उरतात, बाकीचे मार्केट बाहेर फेकले जातात, असा अनुभव असतो. त्याच प्रमाणे बहुतेक वाहिन्यांवरील एक वा दोन मालिकाच पुष्कळ काळ बघितल्या जात टिकू शकतात, बाकीच्या हळूहळू अंतर्धान पावतात वा दुर्लक्षित रहातात.

सहाजिकच प्रेक्षक दररोज किती मालिका बघणार याला मर्यादा असल्यामुळे, प्रत्येक प्रेक्षक शेवटी स्वतःही जास्तीत जास्त तीन किंवा पाच मालिका नियमाने बघत राहतो. बाकींकडे दुर्लक्ष केले जाते असे आढळून येईल. सध्या ज्या काही मालिका चालू आहेत, त्यामध्ये निदान मला तरी पुढील मालिका अजून तरी नियमाने बघाव्यात अशा वाटत आहेत:
"चंद्र आहे साक्षीला" "श्रीमंताघरची सून"
"आई कुठे काय करते" "शुभमंगल आँनलाईन"
"चांदणे शिंपीत जाशी"
आता आताच ह्या यादीतील "आई कुठे काय करते मध्ये नको इतका तमाशा झाल्यावर व अरूंधतीचे वाभाडे काढून, अपमान करुन झाल्यावर, येन केन प्रकारेण अनिरुद्धचा अपघात व त्याचे प्रेयसी संजनाला सोडून पुन्हा घरी आल्याचे दाखवल्यावर ही मालिका नकोशीच होणार हे निश्चित....

"पिंडे पिंडे मतीर्भीनः !":
तर काही काही मालिका अशा असतात की,
"बघू नको ग वेड्यावाणी, तुझ्या डोळ्यात आलं पाणी" याप्रमाणे आपण त्या सुरुवातीपासूनच कां कुणास ठाऊक टाळतो. अर्थात प्रत्येकाची आवड वेगवेगळी. माझ्या द्रुष्टिने त्यांतील काही:
"राजा राणीची गोष्ट" "बाळूमामाचं चांग भलं" "सहकुटुंब सहपरिवार" "सावित्रीच्या ज्योती" इ.इ. अनेक उरलेल्या. ह्या मालिका मी कधी बघितल्याच नाहीत. प्रत्येकाच्या अशा नावडत्या वा कधीच न बघितलेल्या मालिका असू शकतात. अशी प्रत्येकाची आवड वेगवेगळी:
"पिंडे पिंडे मतीर् भीनः" हा नियम येथे लागू होतो.

सारांश काय, तर छोट्या पडद्यावरील मालिकांचा हा एक फंडा दिसतो. सुरुवातीला उत्सुकता वाढवत मिळणारे असे प्रसंग दाखवायचे आणि मालिकेच्या कथेचा जीव इवलासा असल्यामुळे, तो एकदा संपला की, नंतर वेडेवाकडे कसेही त्यात नवनवे प्रसंग, बेलगाम नाट्य, नवीनच प्रवेश करणार्या एखाद दुसर्या पात्राद्वारे ती फरफटत न्यायची आणि मालिकेचा संसार आहे तो तसाच पुढे रेटत न्यायचा. प्रेक्षकांच्या एकंदर सहनशक्तीचा अंत पाहत राहायचं, असंच काहीसं मालिकांच्या बाबतीत म्हणावसं वाटतं.

टी-20 सामन्यात प्रमाणे मर्यादित अशा निश्चित बंदिस्त कथानक असलेल्या आणि नंतरच निर्मिती केलेल्या मालिका आता आवश्यक आहेत. त्यामुळे जेव्हा छोटा पडदा काही दशकांपूर्वी
सुरु झाला त्यावेळेच्या बहारदार करमणुकीचे, रंगतदार मालिकांचे नाट्यमय आणि खरोखर संस्मरणीय असे जे कार्यक्रम होत होते, ते आता पूर्ण नाहीसे होऊन, जाहिरातींचा रतीब असलेले आणि कसेही करून, काहीही दाखवत बसायचे अनेक वाहिन्यांचे ओझे, आता अक्षरशः असह्य झाले आहे. कधी होणार ही सारी मंडळी शहाणी? कोण, कसा चाप लावणार ह्या निरर्थक सादरीकरणांना? कोणतेही कार्यक्रम आधी सेन्सॉर करूनच प्रदर्शित कधी कसे होणार? वेळेचा अपव्यय न करता, दर्जेदार कार्यक्रम व अर्थपूर्ण मालिका कधी पाहायला मिळणार?

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात, तेवढेच पाहणे आता आपल्या हातात आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा