"रंगदर्शन-6":
लाँकडाऊनच्या कसोटी पहाणार्या कालखंडांनंतर आता मराठी माणसाला प्रिय अशी रंगभूमीवरील नाटकांची नांदी पुनश्च सुरु झाली. त्या निमित्ताने निवडक नाटकांचा रसास्वाद आपणासाठी सादर करण्याचा मी उपक्रम सध्या करत आहे. त्यातील हा रसास्वाद.......
"अशी,
कशी ही,
रंगांची दुनिया?":
" तरुण आहे रात्र अजुनी!":
योगायोगांची मला मोठी गंमत वाटते. वर्ष अखेर आणि वर्षारंभच्या आठवड्याच्या कालखंडात सेलिब्रेशन म्हणून,
केवळ करमणूक भेटीसाठी व खेळ ह्यात आपण वेळ नेहमीच घालवत असतो. माझेही तसेच झाले,
पण त्यामध्ये मनोरंजन प्राधान्याने होते. खरोखर विचार करण्याजोग्या,
कोड्यात पाडणार्या अशा काही तीन कलाकृती बघायचा योग आला: दोन नाटकं व एक चित्रपट.
"तरुण आहे,
रात्र अजुनी" हे आणि "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" अशी अगदी भिन्न प्रकृतीची दोन नाटकं,
तर आधुनिक जगातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम असलेले आयव्हीएफ तंत्र खुबीने आणि अत्यंत मजेशीर रीतीने धक्के देत उभा केलेला Good
News हा चित्रपट.
मराठी रंगभूमी ही खरोखर अविस्मरणीय व अद्वितीय अशीच आहे कारण ह्या रंगभूमीवर जी नाटकं चांगली वाटतात,
तेथे तीन गुणांचा म्हणजे धंदा कला आणि नवा विचार नवी द्रुष्टी ह्यांचा त्रिवेणी संगम झालेला पहायला मिळतो.
समाजात जे घडते बदलत्या काळानुसार जशी माणसं बदलत जातात,
तसे परस्परसंबंध देखील बदलत जातात आणि अगदी वेगळ्या अशा जीवनशैलीचे मिश्रण आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ही दोन्ही नाटके खरोखर अगदी परस्पर विरुद्ध अशा वास्तवतेचे चित्रण करत आहेत. त्यामुळे मला ती एकाच वेळेला पाहण्याच्या योगाची मोठी गंमत वाटते.
"तरुण आहे रात्र अजुनी":
श्रीमंती आणि त्यातून सामान्यांना नवश्रीमंती मिळाली की माणसं कशी बदलत जातात आणि स्त्री-पुरुष आपले आनंदाचे शारीरिक सुखाचे क्षण कसे अगदी वादग्रस्त पद्धतीने वेचत जातात,
त्याचे वेधक भेदक असे चित्रण "तरुण आहे रात्र अजुनी" मध्ये उभे केलं आहे.
पूर्वी हिट अँड हॉट अशी नाटकं यायची आणि त्यामध्ये जे कदाचित सर्वसामान्य प्रेक्षकाला बघायला कठीण वाटेल लाज वाटेल अशा तऱ्हेचे काहीतरी असायचे. ते एक खरोखर धाडसच होते त्यावेळेला. अशा नाटकांची लाट आली अन् पहाता पहाता,
ती ओसरूनही गेली.
परंतु "तरुण आहे रात्र अजुनी" नाटकाची झेप त्या तुलनेत शब्दांपलीकडची आहे,
आपण विचारच करू शकणार नाही,
असा मुद्दा येथे उलगडून दाखविला आहे. पुरुष आणि स्त्री यामध्ये आपापली शारीरिक भूक भागवण्याचे मार्ग नेहमीच विभिन्न राहिले आहेत. पुरुषाला एक सोय आहे,
तो घरामध्ये आपल्याला जे मिळत नाही,
ते शोधण्यासाठी बिनदिक्कत बाहेर जात आला आहे. परंतु स्त्रीच्या बाबतीत मात्र खूपच बंधने असल्यामुळे,
तिच्या नशिबात जे काही भोग वाट्याला येतील ते सोसत,
मन मारुन पतीशीच एकनिष्ठ राहिलेच पाहिजे अशी बिचारीवर सक्ती असते. त्याहून समस्या ही की, लग्न न होऊ शकणार्या प्रौढ तरुणी त्यांची ही भूक भागविण्यासाठी काय करणार?
नवश्रीमंती आली,
लगेच अपरिहार्यपणे किटी पार्टी आल्या आणि त्या नवश्रीमंत स्त्रियांच्या क्लब मध्ये काय काय चालते याचे एक विदारक चित्र या नाटकांमध्ये आहे. नाटकात एक विवाहित स्त्री आपल्याला घरामध्ये जे सुख नवर्याकडून हवे आहे,
ते मिळत नाही म्हणून,
चक्क फोन करून एखादा पिझ्झा किंवा पास्ता मागवावा अशा तऱ्हेने एका गिगोलोला अर्थात् 'तसे'
सुख देणाऱ्या पुरुष वेश्येला बोलावते. पुढे काय होते याचे
धक्क्या मागून धक्के देणारे असे नाट्यमय प्रसंग आपल्यापुढे येत राहतात.
नाटकाचा पहिला अंक सुरुवातीला आपली उत्सुकता,
उत्कंठा खूपच जागी करतो. परंतु त्या प्रौढ स्त्रीने बोलावलेला तरुण रंगमंचावर आल्यावर,
तो ज्या काही नको त्या गोष्टी तिला सांगत रहातो,
त्यामुळे आपल्या मनात हे काय चाललंय असाच संभ्रम होतो. खरं म्हणजे त्याची इच्छा असते की ही अशा बाबतीतली "पहिलटकरीण!!?,
न घाबरता आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी उमलावी,
फुलावी म्हणून तो खास दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच्या दोन्ही गोष्टी पूर्ण अप्रस्तुत असल्याने,
रसभंग करतात आणि त्यामुळे उगाचच लांबलेला पहिला अंक आपल्या पदरी निराशाच पदरी टाकतो.
मात्र ह्याची सगळी भरपाई दुसर्या अंकात,
रंगमंचावर हे दोघे एकांतात असताना अचानक
त्या बाईचा नवरा आल्यावर,
जे जे काय घडत जाते,
संवादांची जी काही जुगलबंदी होत रहाते ते चित्तथरारक असेच आहे. तीनही कलाकारांनी आपआपल्या भूमिका मात्र चोख केल्या आहेत.
जर पहिला अंक अधिक व्यवस्थित आणि काही योग्य त्या सुधारणा करून बसवला तर हे नाटक अधिक परिणामकारक ठरेल असे वाटते.
मात्र सद्यस्थितीत कुटुंबाने एकत्र जाऊन पहावे अशा तऱ्हेचे हे नाटक नाही,
असेच म्हणावे लागते. त्यामुळे याचे यश कदाचित मर्यादितच राहू शकते. पण एक वास्तववादी अघोषित समस्या विलक्षण धीटाईने मांडण्याचे जे काही धाडस केले आहे,
ते खरोखर रंगभूमीला वेगळीच दिशा दाखवणारे ठरू शकेल.
मराठी रंगभूमीवर व्यवसाय,
कला आणि विचार जाग्रुती ह्यांचा त्रिवेणी संगम घडविणारी नाटके येत असतात,
म्हणूनच अभिमानाने आपण म्हणतो,
मराठी रंगभूमी श्रेष्ठ,
अव्वल आहे. हाच प्रत्यय "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" नाटकांत तर अजुनही विलक्षण ताकदीचा भासला. त्याविषयी आता पुढच्या भागात......
सुधाकर नातू
-------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा