सोमवार, १८ जानेवारी, २०२१

"हा, माझा मार्ग एकला": "क्षणा क्षणांतच रंग भरा !:


"हा, माझा मार्ग एकला":                                              "क्षणा क्षणांतच रंग भरा !":


सर्जनशील लेखकाला नवनवीन कल्पना सुचत असतात, त्या कल्पनांमधून एखाद्या मुद्द्यावर विचार निर्माण होत असतात. हे विचार योग्य त्या शब्दातून आपोआपच मनामध्ये जागा घेतात, अशा तऱ्हेने प्रतिभेचे लेणे सातत्याने आकार घेत असते, घडत असते. ज्या वेळेला एका विशिष्ट मुद्यावर विषयाभोवती विचार व्यक्त होऊन त्यांना एकत्र गुंफले जाते तेव्हा एक स्वतंत्र असा लेख तयार होऊन जातो. असे विविधांगी लेख लिहित जाता जाता, शेवटी लक्षात येते की या सार्‍यांचे एकत्रीकरण केले तर एखादा स्वतंत्र असा अंक तयार होऊ शकतो.

ह्या शब्दयात्रेचा अनुभव, मी मला जेव्हापासून..साधारण चार वर्षांपासून.. स्मार्टफोन माझ्या हातात मिळाला, तेव्हापासून घेत आलो आहे. पुढची गंमत तर अशी आहे की
लॉकडाऊनच्या कसोटीच्या कालखंडात घरातच बसून राहण्याची वेळ आल्यावर तर, वसंत ऋतु मध्ये जसे वृक्षवेली, पाने फुले बहरून येतात, त्याप्रमाणे माझेही झाले. अहो, गेले आठ-दहा महिने अनेक लेख अनेक डिजिटल अंक तयार होत गेले "हृदय संवाद° °आजोबांचा बटवा° °नियतीचा संकेत° वगैरे वगैरे. या जोडीला सगळ्यांना एकत्र करून डिजिटल दिवाळीअंक, तर कधी वाढदिवसानिमित्त अंक तर कधी गुढीपाडव्याचे अंक, नववर्षाचे अंक असे शब्दांचे खरोखर मोहोळ तयार होत गेले. शिवाय, या सार्या शब्दजंजाळातून जसे लेख तयार होतात त्याचप्रमाणे ध्वनीचित्रं, व्हिडिओज् देखील तयार होऊ शकतात हे मला उमजले आणि अगदी तसेच मी केले. माझा स्वतंत्र युट्युब चॅनेल
moonsun grandson आणि माझा स्वतःचा ब्लॉग ज्याची लिंकः

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले तर....
लिंक शेअरही करा.....

आता मीच हे सर्व निर्माण केलेले मला तर स्वतःला सातत्याने आनंद देत होतेच, परंतु एखादी आई जशी आपल्या बाळाला मनापासून जोजवते, प्रेम करते आणि तिलाही वाटतं आपल्या बाळाचं इतरांनी कौतुक करावं, तसंच मलाही वाटू लागलं, आपण जे काही निर्माण केलं, ते इतरांनी वाचावं, आस्वाद घ्यावा आणि जमल्यास प्रतिसाद द्यावा. याद्वारे माझे निर्मिती कौशल्य जगापुढे मांडत राहिलो. पण जसजसा मी यामध्ये गुंतत गेलो तसतसं मला लक्षात आलं की, आपण फक्त आपल्यासाठी लिहीत नाही, तर कुणीतरी वाचावं त्यांना आवडावं आणि अधिकाधिक वाचकांनी त्याला आपल्याला चांगलं म्हणावं, अशी आस निर्माण झाली. लाँकडाऊन काळात तर मी जणू झपाटून गेलो. सतत लिहीत राहिलो, काही ना काही नवंनवं निर्मिती करत राहिलो.

आजपर्यंत माझे ब्लॉगवर अडीचशे लेख, you tube channel वर 60 videos शिवाय तीस ध्वनीफिती मी निर्माण केल्या आहेत. परंतु अशा वेळेला भ्रमनिरास होणारच होता. आपल्यासारखे इथं केवळ वाचायला, ऐकायला, बघायला, इतर कोणीही मोकळे नाहीत, हे काही माझ्या लक्षात आलं नाही, माझ्या स्वप्न रंजनामुळे येऊ शकलं नाही. त्यामुळे जितका प्रतिसाद आपल्या निर्मितीला मिळायला हवा तेवढा मिळत नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा वाटलं हा सगळा खटाटोप कशाकरता? कुणासाठी? या प्रश्नांचे उत्तर मी गेले काही दिवस शोधत आहे, परंतु मला निश्चित असा मार्ग दिसलेला नाही.

अगदी अशाच वेळेला मला एक स्नेह्याने सांगितलेली खूप महत्त्वाची एक बाब आठवते. मला माझेच एक पुस्तक काढायचं होते त्यावेळेला; त्याने सांगितले कीः

"तू पुस्तक जरूर निर्माण कर, तो तुला आनंद देणारा असाच काही ना काही तरी उत्तम अनुभव असेल, हे जरी खरं असलं तरी, त्यानंतर आपले पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्यांनी ते आवडून घेतले पाहिजे, अशी तुला इच्छा निर्माण होईल आणि ते होणे सोपे नसल्यामुळे, तुला किती दुःख होईल, कदाचित नैराश्यही येऊ शकेल, ह्या गोष्टींचा तू प्रामुख्याने विचार कर."

ते शब्द जसेच्या तसे सध्या माझ्या मनात सतत पिंगा घालत आहेत. मला मार्ग शोधायचा आहे. तसा मार्ग आहे, पण पण तो अंगीकारणं अत्यंत कठीण आहे, कारण मी काही साधुसंत नाही. तो मार्ग हा आहे की, आपण निर्मिती करतो ते आपल्याला व्यक्त होण्याची अनिवार ओढ आहे म्हणून, आपल्या आनंदाकरता हा असा खटाटोप आपण खरं तर करत आहोत. आपलं वाचलं, कुणी ऐकलं, कुणी बघितलं तर चांगलच, नाही समजा अपेक्षित इतक्यांनी बघितलं नाही, तरी आपण दुःख करायचेच नाही, व्यथित व्हायचेच नाही. प्रतिसाद नाही मिळाला, तरी खंत बाळगायची नाही. फळाची अपेक्षा न करता हे निर्मितीचे व्रत चालूच ठेवायचं, स्वानंद, आत्मसमाधानाकरिता. त्यामध्ये जर कुणी इतर सामील झाले, तर सोनेपे सुहागा. त्यांच्याही आयुष्यात क्षणा क्षणांत रंग भरत रहायचं एवढेच ! बघूया काय होते ते....

"ह्या निमित्ताने जाता जाता, तुम्हाला मी एक नवी द्रुष्टी देतो व सांगतो की, सकाळी दरवाजाला लावलेल्या पिशवीतले दूध काढताना किंवा भाजी बाजारात खरेदी करताना वा मॉलमध्ये आपल्या वस्तू हातगाडीत टाकताना अथवा कुठल्याही रस्त्यावरून, पुलावरून जाताना, एवढंच काय पण आपण ज्या घरात राहतो त्या घराचा विचार करताना, क्रुपया ध्यानात घ्या, ह्या सार्‍या गोष्टी आपल्याला मिळतात सहजपणे, परंतु त्याकरता किती मंडळींचे हात त्यामागे आहेत, किती लोकांनी घाम गाळला आहे, त्यांचे अपार कष्ट आहेत हे नीट समजून घ्या. त्या साऱ्यांच्या संबंधी कृतज्ञतेचा मनापासून सलाम तुम्ही जर करत राहिलात, तर चांगुलपणाच्या या साखळीला अधिक बळकटी येईल आणि ही कृतज्ञतेची साखळी अशीच अव्याहत पुढे पुढे न्यायची आपल्या जीवनामध्ये सवय लावून घ्या."

असं जर तुम्ही करू शकालात, तर तुमच्याच नव्हे तर त्या हजारो अनामिक 'देणेकर्यांच्याही जीवनात क्षणा क्षणाला रंग भरू शकाल. म्हणूनच माझ्या प्रश्नाचे, समस्येचे उत्तर आता मला मिळाले आहेः

"हा, माझा मार्ग एकला":
"क्षणा क्षणांतच रंग भरा !":

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
हा प्रयत्न तुम्हाला भावला, आवडला तर तसा प्रतिसाद जरुर द्या. माझ्या ब्लॉगची लिंक सेव्ह करा... आपल्या परिचय वर्तुळात शेअर करा..
आणि...आणि
ती अधूनमधून उघडून लेख वाचण्याची संवय लावून घ्या....
।। शुभस्य शीघ्रम् ।।

1 टिप्पणी: