रविवार, ३१ जानेवारी, २०२१

"ह्रदयसंवाद-३४": "सारा हा, ऊन-पावसाचा खेळ!":

"ह्रदयसंवाद-३४": 

"सारा हा, ऊन-पावसाचा खेळ!":

माझ्या मुलीने मला पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कॅराव्हान ही इन्स्ट्रुमेंट भेट म्हणून दिली. तेव्हापासून आम्ही दररोज सकाळी अतिशय सुमधुर अशी भावगीते त्यावर ऐकत, चहा वगैरे पीत असतो. दिवसाची आमची सुरुवात ही माणिक वर्मा आणि अरुण दाते यांच्या सुरेल आवाजातील आल्हाददायक अशा गीतांनी होत असते. "शुक्र तारा मंद वारा" "सूर जुळले शब्दही जुळले" किंवा "घननीळा लडिवाळा" "क्षणभर उघड नयन देवा" "सावळ्या विठ्ठला" अशी एकापेक्षा एक अशी गाणी ऐकत, आमची सकाळ बहारीने जाते. 

आज मी अशीच गीते ऐकताना, मला लक्षात आलं की कोणत्याही गायक गायिकेची काही गीते आपल्याला आवडतात, मनाला भावतात, तर काही आपल्याला बिलकुल आवडतच नाहीत! असं कां होतं ह्याचं उत्तर शोधताना, मला लक्षात आलं की, बहुतेक सगळ्याच बाबतीत हे असंच होत असतं. कुठलाही चित्रपट निर्माता हिरो-हिरॉईन घ्या. त्यांचे काही मोजके चित्रपट सुपरहिट होतात, तर बाकीचे फ्लॉप! खरं म्हणजे प्रत्येक वेळेला तीच मेहनत, तीच गुणवत्ता, तीच निष्ठा व परिश्रम सारं करून ती कलाकृती बनवली जात असते, परंतु सगळ्याच कलाकृती यशाचे दिवस बघतातच असं नाही. नाटकांचही तसंच.

खेळाडूंचे बाबतीतही वेगळं काही नाही. असाच एखादा ख्यातनाम खेळाडू शतका मागून शतकं मारतो खरा, परंतु तोच सिलसिला प्रत्येक सामन्यात त्याला करता येत नाही. बऱ्याच वेळेला तो फ्लाँप जातो, कधी कधी तर शून्यावरही आऊट होतो. काही मामुली रन्स काढतो. खेळाडूंचं जे, तेच राजकारण्यांचही. बघा, कुणी राजकारणी एखादा, काही वर्ष अक्षरश: डोक्यावर घेतला जातो, जिकडेतिकडे त्याचा उदोउदो होतो. परंतु बघता-बघता काळ बदलतो आणि डोक्यावर होता तो आता पायदळी तुडवला गेल्यासारखा, कुठेतरी अंधःकारमय दुनियेत फेकला जाऊन विसरलाही जातो. 

घरी दारीही तोच अनुभव पहायला मिळतो. घरांमध्ये दोन तीन मुलं असली तर त्याच्यातला एखादा तरी फुकट जातो, बाकीचे थोडेफार यशस्वी होतात. म्हणजे उडदामाजी काळे-गोरे हा जो काही स्थायीभाव आहे, तो सातत्याने आपल्या नजरेस येतो. 

हे असं का होतं हे मी जेव्हा शोधायला लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलंः अरे कदाचित हा निसर्गनियमच आहे. बघा सकाळची वेळ प्रसन्न आल्हाददायक असते, तर दुपार तापदायक, परत संध्याकाळी पुन्हा वेगळीच भावना आणि रात्र तर अगदी पूर्ण गहिरी, वेगळीच! म्हणजे एकाच दिवसात चार वेगवेगळे बरे-वाईट अनुभव आपल्याला सतत येत असतात. तेच ऋतूंचे बाबतीत सुध्दा! तीन-चार महिने पावसाळा सगळीकडे हिरवीगार रम्य सृष्टी नंतरचा हवाहवासा वाटणारा गुलाबी हिवाळा. तो संपतो न संपतो, तोच रखरखीत असा तापदायक उन्हाळा. असे हे ऋतुचक्र युगानुयुगे चालू आहे. 

सारांश काय तर नित्य नवीन बदल हाच निसर्गाचा अलिखित नियम आहे. काही चांगलं, तर काही त्रासदाररयक, काही सुखदायक तर काही दुःखदायक; अशा तर्‍हेचे विविध अनुभव घेणं हेच तर जीवन असतं! म्हणूनच सुखदुःख ही आलटून-पालटून येत रहाणारच असतात. सुखान हुरळून जाऊ नये अन् दुःखाने त्रासून! सगळ्यांचे सगळेच आयुष्य काही दु:खी किंवा सुखी समाधानी नसते.

प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल ही त्याच्या त्याच्या नशिबाने म्हणा प्रारब्धाने म्हणा, ही अगदी आगळी वेगळी असते. पहा, गीते ऐकताना विचार करता करता, कुठे होतो आणि कुठे आलो! पण ह्या मंथनातून, एक चांगलं साधलं, उमजलं ते म्हणजे आपल्या सभोवताली जे घडत असतं जे आपल्याला अनुभवायला येत असतं, ते जसंच्या तसं स्वीकारणं आणि पुढे जाणं हाच खरा पुरुषार्थ आहे.

स्थितप्रज्ञ व्हा, हे जे भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवलयं, ते खरोखरच अनुकरणीय आहे. अशी द्रुष्टी येणं, असा स्वभाव बनणं निश्चित कठीण आहे. पण ते तसं आपल्याला जमलं तर आपले जीवन अधिक संतोषजनक होईल.

धन्यवाद.
सुधाकर नातू

असेच अनेक विचारप्रवर्तक लेख वाचण्यासाठी 
माझ्या ब्लॉगची लिंक उघडा, शेअर करा:

http//moonsungrandson.blogspot.com

शनिवार, ३० जानेवारी, २०२१

रंगदर्शन-७": "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला": "हा तर 'कन्यावासा'चा ईमला!":


"रंगदर्शन-७":

"हरवलेल्या पत्त्यांचा बंगला":
"हा तर 'कन्यावासा'चा ईमला!"

"हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" या नाटकाच्या शीर्षकातच 
तुमचे कुतुहूल जागवण्याची विलक्षण ताकद आहे आणि त्यामुळे हे नाटक आहे तरी काय ते बघितलेच पाहिजे, असे वाटून आम्ही या नाटकाला गेलो.

बदलत्या वेगवान जीवनशैलीचा जो उच्चभ्रू समाजावर आणि मध्यमवर्गातून उच्चभ्रू समाजाकडे धावत जाणाऱ्या वर्गावर जो अनिष्ट परिणाम झाला आहे, त्याचे विदारक चित्र "तरुण आहे रात्र अजुनी" या नाटकात बघायला मिळाले होते. योगायोगाने त्यापाठोपाठ सध्या जेष्ठ एकाकी नागरिकांची स्थिती, ज्यांची मुले परदेशात गेल्यामुळे झाली आहे, त्या विषयीचे सामाजिक कौटुंबिक व भावनिक आंदोलनांचे चित्र प्रभावी पणे मांडणारे नाटक 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' पहायचा योग आला. 

त्या संदर्भात आम्ही वाचलेली माहीती अशी की, ह्या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या नाट्यलेखन करण्यास नवेनवे चेहरे येत नाहीत अशी जी काही ओरड चालू होती. त्याला उत्तर वा उपाय म्हणून एक चांगला उपक्रम घेण्यात आला, त्यात नाट्यलेखनाची स्पर्धा घेण्यात आली. प्रतिष्ठित तज्ञ परिक्षकांकडून सार्‍या स्पर्धकांनी लिहिलेल्या नाटकांची छाननी करून, अखेरीस जे नाटक सर्वोत्तम ठरले, ते म्हणजे हे स्वरा मोकाशी लिखित, "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला". 

असे समजते की, जवळजवळ दोन हजाराच्यावर नाटकांच्या संहिता या स्पर्धेमध्ये आल्या होत्या. त्यामुळे या नाटकाचे खरोखर वैशिष्ट्य हे की ते सर्वोत्तम ठरले. तर असे हे नाटक, ज्यामुळे मराठी रंगभूमी त्रिगुणात्मक-व्यवसाय, कला व नवा विचार, नवी द्रुष्टी अशा पायावर मोठ्या दिमाखाने उभी आहे हे उमजून येते.

ही एका अशा आईची कहाणी आहे, जिचा मुलगा परदेशात स्थायिक झालेला आहे, मुलगी मात्र बदलापूरसारख्या उपनगरात आणि ही आई इथे शहरात एकटी, नुकत्याच रीडेव्हलप झालेल्या चाळीतून दोन रूमच्या सदनिकेत रहात आहे. तिला सोबतीला म्हणून एक तरुण मुलगी तिच्याबरोबर राहत आहे. अशा प्रारंभाने हे नाटक सुरू होते. तेव्हाच थोडीशी कल्पना येते की सध्या जवळजवळ घरटी, एखादा तरी मुलगा किंवा मुलगी परदेशात स्थायिक झालेल्या कुटुंबांमध्ये काय उलथापालथ होते ते.

हे दोन अंकी नाटक जसजसे उलगडत जाते, तसतसे सध्याच्या वास्तवतेचे चित्र आपल्यासमोर वेधक व भेदकपणे उभे राहते. आतापर्यंत सासुरवास अथवा सूनवास अशा तऱ्हेचे अनुभव आपण चित्रपट, मालिका वा नाटकातून घेतलेले आहेत. परंतु या नाटकात बदलापूरला राहणारी विवाहित मुलगी, आपल्या आईला गृहीत धरून कशा कशातर्हेने त्रासदायक असे अनुभव तिला घ्यायला भाग पाडत जाते. म्हणजे इथे सूनवास वा सासुरवास नसून 'कन्यावास' असा नवा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. त्यासाठीचे जे विविध भावनाप्रधान प्रसंग उभे केले आहेत, ते प्रत्यक्ष बघण्यातच मौज आहे. 

आपल्या स्वार्थासाठी ती मुलगी शेवटी आईच्या घरी शहरात आपल्या सोयीसाठी, कुटुंबासहित राहू इच्छिते आणि तिच्या आजारी सासूच्या सोबतीला आपल्या आईने मात्र एकटीने बदलापूरला जावे, अशा तर्‍हेची आग्रहाची इच्छा व्यक्त करते! ह्यावरूनच या मुलीने आईला "कन्यावास" किती बिनदिक्कतपणे आणि कसा दिला असेल ते कळेल. ह्या वेळेपर्यंत, आई बिचारी होता होईल तो तिचे सारे हट्ट, मागण्या निमूटपणे पुर्‍या करत असते. परंतु शेवटी ही अशी वेळ येते, तेव्हा अखेर आपला मनातला उद्रेक आई ज्या तळमळीने व्यक्त करते तो मनाला चटका लावून जातो. अखेरीस मतलबी मुलीपेक्षा, परकी पेईंग गेस्ट तरूणीच कशी आईला जिव्हाळ्याची सहाय्यक ठरते! वास्तववादी असेच हे कौटुंबिक व भावनिक चित्र आहे. 

आपल्या देशामध्ये सद्यस्थितीत परिस्थितीवश, गुणवंतांना ज्या संधी मिळायला हव्यात व त्यांची भरभराटीची स्वप्ने पुरी व्हायला हवीत, ती होत नसल्यामुळे मुलं परदेशात गेली, मात्र त्या वैभवाचा थोडा फार फायदा ज्येष्ठ नागरिकांना झाला खरा, परंतु अखेरीस दुर्दैवाने त्यांच्यावर एकाकी अगतिकतेची वेळ कशी येते, त्याचे चित्र या नाटकात पाहायला मिळते. म्हणूनच बदलत्या काळाचे बदलते रूप चपखल उभे केल्यामुळे हे नाटक खरोखर वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ते सहकुटुंब जाऊन पाहावे असेच नाटक आहे, असे म्हणावेसे वाटते.

आपल्या वाट्याला आलेले एकाकीपण, शहाणपणाने स्विकारून, कर्तबगार आणि समंजस अशा आईच्या भूमिकेत वंदना गुप्ते यांनी आपल्या कारकिर्दीतील मानाचा तुरा ठरावी, अशी अभिनयाची उंची गाठली आहे. त्याला तोडीस तोड म्हणून, तिच्या मुलीच्या रूपात प्रतीक्षा लोणकर यांनीदेखील आपल्या भूमिकेला नव्या युगातील मध्मवयीन स्री म्हणून यथातथ्य न्याय दिला आहे. सोबत म्हणून पेईंग गेस्टच्या रुपात रहाणार्या तरुण मुलीच्या व्यथा आणि तिचे ह्या जेष्ठ आई बद्दल असणारे आपुलकीचे नाते अतिशय हळुवारपणे मांडणार्या, भूमिकेत दीप्ती लेले यांनीदेखील चांगले काम केले आहे. गुणी जावई झालेले अभिनेते व ह्या आजीचा नातू दोघे नाटकात आपल्या वाट्याला आलेली कामगिरी ठीक बजावतात. चाळीचा विकास होऊन निर्माण झालेला दोन रूमचा फ्लॅट देखील अतिशय कलात्मरितीने या नाटकात उभा केलेला आहे. 

सारांश अगदी आगळ्यावेगळ्या आधुनिक जगातले, 'तरुण आहे रात्र अजुनी' नाटका पाठोपाठ, पूर्वीच्या जमान्याची आठवण करून देणारे हे नाटक आम्हाला पाहायला मिळाले हा गंमतीशीर योगायोग. अगदी अल्पावधीत या नाटकाने रौप्यमहोत्सवी प्रयोग करण्याइतकी मजल गाठली यातच सारे काही आले. अर्थातच अधिकाधिक नाट्यरसिक या नाटकाला आश्रय देऊन लवकरच त्याचा शतकमहोत्सव झाला तर नवल वाटणार नाही. सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

अशाच अनेक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......
wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी.....
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandsun

आणि संपूर्ण वार्षिक राशीभविष्य व इतरही जीवनोपयोगी विडीओज् पहा: 
चँनेल subscribe करा......

सुधाकर नातू

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

"हटवलेले संदेश-कथा व व्यथा":

 "हटवलेले संदेश-कथा व व्यथा":

हटवलेले की हरवलेले संदेश ?!

झालात ना आश्चर्यचकीत? एक out of box असा हा सहसा दुर्लक्षित रहाणारा मुद्दा घेऊन मी माझ्या कल्पनावक्तीला येथे थोडा ताण देणार आहे.

पुष्कळ वेळा आपल्याला आपण जो संदेश पाठवतो, तो पाठवल्यावर लक्षात येतं की, हा आपण काढून टाकायला हवा, म्हणून आपण लगेच हटवतो. हटवलेला संदेश म्हणजे जणू काही प्रेम व्यक्त न करणे, मनात असूनही प्रेम व्यक्त करण्याची टाळाटाळ करणे ! दररोज तुम्ही whatsapp वर किती संदेश कुणी कुणी हटवलेले आहेत, ते जरूर पहा आणि डोक्याला थोडा ताण देऊन काय असेल त्या अंतर्धान पावलेल्या संदेशात त्याची कल्पना करा. त्यासाठी तेथीलच मागच्या संदेशांचे वाचन कदाचित उपयुक्त ठरू शकेल. हा एक अंधारात तीर मारण्याचा खेळ खेळून तर बघा !

संदेश हटवण्याची कारणे अनेक असू शकतात. पुष्कळ वेळा समोरच्याला तो आवडणार नाही, बहुधा कधी कधी तो विश्वसनीय नाही वा अनुचित आहे, असं आपल्याला लक्षात येतं आणि आपण तो हटवतो. मात्र अशावेळी तो कुणाला मिळाल्यानंतर, त्याने तो वाचण्या आधीच, तो हटवून टाकणे गरजेचं असतं. नाहीतर जे काय रामायण-महाभारत व्हायचं, ते होतच. आजकाल व्हाट्सअप वर एक सोय चांगली झाली आहे, की समोरच्याने तो संदेश जर पाहिला अथवा वाचला असेल, तर हिरव्या दोन खुणा येतात. त्यामुळे आपल्याला संदेशाचे वाचन झालं आहे वा निदान तो नजरेखालून गेला आहे, हे समजतं.

ह्या संदर्भातला, हा अनुभव:
एका दुर्मिळ असा आवाज असणाऱ्या जुन्या लोकप्रिय गायकाचे संबंधी चांगला माहितीपूर्ण संदेश होता, त्यामध्ये त्याच्या दहा सर्वोत्तम
गीतांसंबंधी माहिती व ती गीते आहेत असे मांडले होते आणि तो सामायिक करण्याचीही सोय होती. त्यामुळे घाईघाईने मागचा पुढचा विचार न करता, ज्यांना संगीताची आवड आहे, अशा निवडक दोन-तीन स्नेह्यांना संदेश समाईक केला. नंतर गीते ऐकण्यासाठी, जेव्हा पूर्ण उघडला, तेव्हा माहिती तर होती गीतांची, पण शेवटी सर्व गीते ऐकायला मिळतील म्हणून मी मी पुढचं काही करणार, तेवढ्यात तिथे शब्द होते की, सर्व गीते ऐकण्यासाठी युट्युब वर जावे लागेल ! आता डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ माझी होती. उगाचच नसता खटाटोप झाला होता. त्यामुळे ताबडतोब, मला हे सर्व संदेश हटवावे लागले. एक गोष्ट बरी झाली होती की, कुणीही तो बघितला नव्हता. मात्र असं नेहमी होतं असं नाही. ह्याकरता एक गोष्ट नक्की की, आपण स्वतः पूर्ण शेवटपर्यंत तो वाचला पाहिजे आणि नंतरच योग्य व्यक्तींना पुढे पाठवला पाहिजे.

माणसाच्या मनात काय चाललंय, हे कधी कोणाला कळत नाही. त्याच प्रमाणे आपल्याला व्हाट्सअप वर असे हटवलेले संदेश काय होते, हे कधी कळतच नाही. हे गुपित फक्त ते पाठवणार्यालाच माहित असते. व्हाट्सअप वर ही हटवाहटवा तशी सोपी आहे, कारण आपल्याला कुणाला तो संदेश पाठवला हे निश्चित माहीत तरी असते. परंतु कधीकधी अशी वेळ येते आणि ती बहुतांश फेसबुकवर येते. एखाद्या ग्रुपवर आपण एखादा संदेश टाकतो, तो संदेश ॲडमिनकडे जातो आणि त्यांनी तो मान्य केल्यानंतर त्या
ग्रुपवर तो दिसू शकतो.

अशा वेळेला आपल्याला संदेश प्रदर्शित करताना विशेष काळजी घ्यावी लागते. माझ्या बाबतीत एकदा अशी चूक झाली की, मी एक संदेश एका ग्रुपवर प्रदर्शित केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की, त्यात महत्त्वाच्या अशा अनेक चुका होत्या. त्यामुळे आता काय करायचे, याचा विचार करत असताना नशिबाने मी तो ग्रुप उघडला आणि तो संदेश तेथे नुकताच मान्य करून ॲडमिनने पुढे प्रदर्शित केला होता. लगेच मी तो हटवला. पण हे जर जमलं नसतं किंवा माझ्या चुका लक्षात आल्या नसत्या, तर खूपच गोंधळ झाला असता कारण एखाद्या समूहावर बरेच सभासद असतात, त्यापैकी कोणी वाचला, कोणी नाही वाचला हे काही आपल्याला कळू शकत नाही.

थोडक्यात शक्यतोवर पूर्वीची माझी जी पद्धत होती की, कुठलाही संदेश, चित्र, वा व्हिडिओ उगाचच पुढे पाठवायचा नाही, हे योग्य होतं. कुठलाही संदेश पुढे पाठवताना विशेष काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला नंतर कदाचित बराच मनस्ताप होऊ शकतो.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
जाता जाता, एक प्रश्न तुम्हाला..
तुम्ही हटवलेल्या संदेशांचा अनुभव सांगा !

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

"शारदोत्सव !": "बहरला पारिजात दारी": 

 "बहरला पारिजात दारी": 

आमच्या लहानपणी ज्या घरामध्ये आम्ही रहायचो, ते घर म्हणजे एक मजली टुमदार कौलारू चाळ होती. प्रत्येकाच्या घरासमोर छोटेसे छान अंगण बनवण्याजोगी मोकळी जागा होती. माझा मामा कोकणातला असल्यामुळे, त्याने तिथे चांगली जागा बनवून अंगण छान सपाट करून घेतले होते. भोवताली अनेक फुलझाडे, वेली त्याने लावल्या होत्या. 

तिथेच एका बाजूला पारिजातकाचे झाड त्याने लावले होते. शिवाय अंगणात बसायला त्याने एक बैठा ओटाही बनवून घेतला होता. विशेषतः पुष्कळदा सकाळी आम्ही त्या ओट्यावर बसायचो आणि पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. लाल चुटूक देठं आणि कोवळ्या पांढऱ्याशुभ्र टवटवीत पाकळ्यांचा तो फुलांचा ताटवा आणि त्याच्या मंद सुगंधाचा दरवळ आसमंत व आमची मनं आनंदाने प्रसन्न करून जायचा. 

आपोआपच ते मधुर प्रेमगीत मनामनात गुंजारव करायचे:

 "बहरला पारिजात दारी,  फुले कां पडती शेजारी !" 

 एकंदर तो अनुभव न विसरण्याजोगाच, त्यामुळे मिळणारे समाधान व आनंद शब्दातीत आहे. ते मोजकेच अवघ्या चरचराशी तादात्म्य पावल्याचे मनपसंत बहारीचे क्षण कायमचे पकडून ठेवावेत असेच. आज अचानक त्यांची आठवण व्हायला, अशाच तर्‍हेचे अनेक क्षण आपल्या आयुष्यात येत असतात, पण आपले त्याकडे लक्ष नसते, हे जाणवले. 

 म्हणूनच माझ्या ब्लॉगवरील "ह्रदयसंवाद" "रंगांची दुनिया-रंगदर्शन, शारदोत्सव", "वाचा फुला आणि फुलवा" "आजोबांचा बटवा" अशा बहुविध लेखमालिकांमधून, मी त्या बहार आणणार्या पारिजातकाच्या फुलांच्या आठवणींच्या, स्वर्गीय अनुभवाचा पुनःप्रत्यय देण्याचा माझा प्रयत्न सातत्याने करत असतो. आतापर्यंत ३२५ हून अधिक लेख गेल्या ४/५ वर्षांत लिहूनही झाले.

 अल्पावधीतच ५०००० हून अधिक व्ह्यूअरशिप मिळालेल्या माझ्या ब्लॉगची लिंक येथे देताना, सहाजिकच मनांत त्याच सुमधूर आठवणींचा जागर होत आहे...... 

 माझ्या ब्लॉगची ही लिंक आपल्या संग्रही अगत्याने ठेवा....... विरंगुळा म्हणून उघडत जा.....

 https://moonsungrandson.blogspot.com 

 लेख पसंतीस आले तर.... 

लिंक शेअरही करा..... 

 धन्यवाद 

सुधाकर नातू

"टेलिरंजन-७": "मालिका-पीडणार्या, भरकटलेल्या !":

 "टेलिरंजन-७": 

"मालिका-पीडणार्या, भरकटलेल्या !":

मार्केटिंग मधली संकल्पना- 'प्रॉडक्ट लाइफ सायकल' आणि टीव्हीवरील मालिका यांच्यात खूप साम्य आहे. आपल्याला सुरुवातीला हळूहळू आवडत जाणाऱ्या मालिका नंतर अधिकच चांगल्या वाटत जातात. जसे नवे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आल्यावर हळूहळू त्यांची विक्री वाढू लागते लोकांच्या पसंतीला ते आले की माऊथ पब्लिसिटी मधून त्यांची विक्री वाढत जाते. पण त्याला मर्यादा असतात. केव्हा तरी ही विक्री स्थिर होते आणि हळूहळू ती कमी होते आणि कदाचित तो मार्केट मधून प्रॉडक्ट काढून घ्यायला लागतो. मालिकांचही तसच आहे. सुरुवातीला आवडणाऱ्या मालिका नंतर नकोशा होतात ह्या लेखामध्ये अशाच माझ्या नजरेतून अर्थहीन मालिकांचा थोडक्यात परामर्श घेतला आहे.

सुरुवातीला बघाव्यात असे वाटणाऱ्या मालिका नंतर नकोशा होतात. त्या मालिका माझ्यामते अशा
"जीव झाला वेडापिसा", "अग्गबाई सासूबाई"
"रंग माझा वेगळा" "फुलाला सुगंध मातीचा"
"सुख म्हणजे काय असतं" "माझा होशील ना !" इ.इ. या मालिका सुरुवातीला आकर्षक वाटल्या. परंतु जसजसा काळ गेला, तशी त्यामधली रंगत कमी होत गेली आणि पुष्कळदा न पटण्याजोग्या घटना दाखवत तोचतोचपणा आल्यामुळे मालिकांमधल्या नाट्याची रंगत जाऊन, त्या बघूच नये अशा पद्धतीने सादर होऊ लागतात. सहाजिकच मी तरी त्या मालिका बघणं बंद करतो.

"जीव झाला (केला ?) वेडा पिसा":
या मालिकेचा नावातच दर्शकाला किंवा प्रेक्षकाला वेडपीसा करण्याचं सामर्थ्य होतं. अडाणी शिवा गावातल्या राजकारणी आत्या बाईचा जणु (अँग्री) मँन फ्रायडे आणि त्याचे कारनामे बिनधास्त रहाण्याचे, या जोडीला गांवांतील मास्तरांची मुलगी सिद्धी आणि तिचा प्रियकराबरोबर होणारा विवाह, यामध्ये शिवाची थरारक एन्ट्री आणि नंतर मालिका रंगत जाणे, एवढेच काय, पण शिवाने मास्तरांच्या मुलीचे अपहरण करून तिला कोंडून ठेवणे, तिचे लग्न मोडणे, नंतर तिचे शिवाबरोबरच लग्न होईपर्यंत ही मालिका उत्कंठा पूर्ण होती. पण हळूहळू आत्याबाई आणि तिचा प्रतिस्पर्धी यांचे कारनामे वाढत गेले, तसेच अधूनमधून भेट देणारा शिवाचा बाप लष्करे, कशाला घरी यायचा ते त्यालाच ठाऊक. त्याची कारस्थानी बायको व तिला साथ देणारा तिचा दीर ह्यांच्या नको त्या उचापती येथपर्यंत सारे ठीक होते. पण हळूहळू काय झाले कुणास ठाऊक, या साऱ्या नाट्याचा अतिरेक व्हायला लागला. 'पाणी' घालून घालून मालिका वाढवत आहेत असे वाटू लागले आणि नंतर मी ती मालिका पहाणे सोडून दिले. म्हणजे हे प्रॉडक्ट लाइफ सायकल सारखं झालं-उंच भरारी नंतर खाली खाली !

"अग्गबाई सासूबाई": "आता मुळ्ळी नकोच बाई !":
सुरुवातीला उत्सुकता वाढवणारी वेगळ्या बाजाची ही मालिका. आपल्या मुलावर-बबड्यावर, नको इतके अतिरेकी प्रेम करणारी विधवा असावरी आणि "कोंबडीच्या" अशी आरोळी देणारा सासरा, यांच्यामध्ये त्या बबड्या वर प्रेम करणारी, शुभ्रा स्वतःहून आपले लग्न जुळवते धिटाईने. येथपर्यंत सगळं आनंददायी होतं. नंतर असावरीच्या जीवनात कसा कुठून कोण जाणे, वयस्क शेफ अभिजीत राजे येतो काय व आश्चर्य म्हणजे आपल्या विधवा सासूचा विवाह जुळण्यासाठी तरूण सून शुभ्रा स्वतःहून
आटापिटा करते. सासऱ्याचा विरोध, मुलाच्या तर पूर्ण मनाविरुद्ध असे हे (कारणे न पटणारे) लग्न अशी मालिका रंग तर जाते खरी. या दोघांचा विवाह ही होतो तोपर्यंत सारं सुसह्य होतं. पण त्यानंतर बबड्याचा सूड आणि उलट-सुलट अशा बिलकुल न पटणार्या घटना इतक्या काही वेगाने भरकटत जातात, की या मालिकेचे ताळतंत्रच उडून जाते. दिसते. जी मालिका आवर्जून पाहावी असं वाटत होतं, ती दिशाहीन व हास्यास्पद होत, नक्को नक्को ग बाई अशी म्हणायची आता वेळ आली आहे.

"माझा होशील ना":
ह्या मालिकेमध्ये सुरवातीला उत्सुकता वाढत गेली. चार नटखट अविवाहित (?) मामा, त्यांचा लाडका पोरका असलेला भाचा आदित्य व मधून मधून कधी तरी डोकावणारे ह्या मामांचे वडील अर्थात आदित्यचे आजोबा, यांच्यामध्ये लाडावलेली नटखट आणि मनस्वी तरुणी सई बिराजदार येते काय आणि हळूहळू आदित्य आणि सई मजेशीरपणे जवळ कसे येत जातात हे बघणे खरोखर उत्सुकता पूर्ण होते. परंतु हा जो खेळ होता तो मोठा दादा मामाच्या आजारपणा पर्यंत ठीक चालला होता. मात्र तो बरा झाल्यानंतर आदित्य त्याला वचन काय देतो की गावच्या मेघनाशी विवाह करीन. तिथून या मालिकेचा गाडा असा काही विचित्रपणे कसाही एखाद्या दारुड्यासारखा वेडावाकडा घसरत चालला आहे की त्याला तोड नाही. सईंने चक्क आदित्याच्या पाठोपाठ दापोलीला जाणे, नंतर तिचा डॉ सुयशशी साखरपुडा काय ! एवढ्या सगळ्या गडबडीत आदित्यचा कमालीचा उद्वेगजनक हुमेपणा-मेघना की सई प्रश्नाचे पोरखेळ, हे सगळं उबग आणणारं न बघण्याजोगं वाटत गेलं. "माझा होशील ना" मालिकेला आपल्याला रामराम ठोकावा असं वाटावं, इतकी वेळ या भरकट जाणाऱ्या मालिकेत आली. ह्या मंडळींना कळत कसं नाही कुठे थांबायचं आणि जर काही पुढे वाढवायचं असेल तर त्यात काही तारतम्य हवं की नको? पण लक्षात कोण घेतो?

"रंग माझा वेगळा":
"रंगाचा आता बेरंग की हो झाला !":
रंग माझा रंग माझा वेगळा ची देखील आणि काही वेगळे नाही ही मालिका देखील सुरूवातीपासून चांगली रंग जाते क***** रंगाचा दुस्वास करणारी सौंदर्य आणि संसारातील लोकमत या सगळ्यामध्ये मोठा मुलगा हा कार्तिक डॉक्टर एका काळा मुलीच्या प्रेमात काय पडतो आणि त्यानंतर उलटसुलट घटना घडत दोघांचा विवाह ही होतो पुढे सौंदर्याचे क***** रंगाच्या वर असलेला राग याची ही कहाणी निश्चितच उत्कंठा वाढवणारी होती परंतु तो काळा गुंड जेव्हा घरी येऊन तमाशा करतो आणि त्याला तुरुंगात टाकलं जातं त्यानंतर मालिकेत पाणी घालण्यासाठी डॉक्टर तनुजा चे जे काही खेळ चालतात ही पर्यंत मालिका कशीबशी बघावीशी वाटत होती परंतु डॉक्टर कर्जाचा खेळ खलास झाल्यावर उगाचच
दीपाचं बाळंतपण श्वेताचं बाळंतपणाचं नाटक.. हे सगळे नको असणारे खेळ आता बघवत नाहीत आणि अर्थातच रंग माझा वेगळा चा बेरंग होऊन गेलेला आहे कशाकरता पुन्हा करता मालिका बघायची हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

"फुलाला सुगंध मातीचा":
" आता मातीमोल होतायत की हो फुले !":
"फुलाला सुगंध मातीचा" मालिकेमध्ये देखील एक आगळी वेगळी अशी प्रेम कहाणी आहे. सुशिक्षित मुलगी कीर्ती आणि केवळ सातवी पास झालेला एक मिठाईचे दुकान असलेला शुभम यांचा नाट्यपूर्ण अशा तऱ्हेच्या फसवाफसवीनंतर झालेला विवाह. त्या एकत्र कुटुंबातील सासूबाई जीजीक्काचा सर्वांवर कर्णकर्कश्श दरारा प्रथम पाहण्याजोगा होता. परंतु नंतर त्या माजखोर वागण्याचा अतिरेक होतो. मोठी सूनबाई कीर्ती, पदवी परिक्षेत राज्यात तिसरी आली आणि नंतर मिडीयासमोर ह्या अडाणी जहांबाज जीजीक्का जे काही तारे तोडतात, त्यांची लाज वाटावी. तेव्हापासून या मालिकेला खरोखर काहीही अर्थ उरत नाही. धाकट्या वहिनीचा वेगवेगळ्या प्रसंगी दिसणारा स्वार्थीपणा, त्याला कीर्तीने दिलेले चोख प्रत्युत्तर, हा सगळा आधीचा भाग बघण्याजोगा होता. परंतु सगळ्याच गोष्टीचा आता अतिरेक होऊन ही मालिका खरोखर नकोशी वाटत चालली आहे. इथे "फुलाला सुगंध मातीचा", ऐवजी मातीमोल होतायत की हो फुले, असे वाटायला लागले आहे. बस्स करा हा धेडगुजरी एकत्र कुटुंबातील ओढून ताणून चालवलेला तमाशा ! केव्हा ही मालिका संपेल असे झालं आहे. उगाचच लोकांना ती बघण्याची शिक्षा दिली जात आहे, दुसरे काय !

" सुख म्हणजे नक्की काय असतं ( की नसतं !) !"
या मालिकेमध्ये आपला जीव वाचवणार्या दिवंगत मित्राच्या पश्चात त्याच्या पोरक्या मुलीला संभाळणाऱ्या एका खानदानी बापाची दादासाहेब आणि त्याच्या एकत्र कुटुंबाची कथा आहे. उद्योजक असे हे श्रीमंत कुटुंब आहे. त्यांचा धाकटा मुलगा जगदीप फॉरेन रिटर्न असून इतर दोघे भाऊ तितकेसे कार्यक्षम नाहीत. त्यांची मोठी सून ही तर कारस्थानी बाई आहे. एका राजकारण्याची मुलगी असलेली ही स्त्री मालिकेमध्ये एकापेक्षा एक वेगळी कारस्थाने रचत जाते. स्वार्थापायी गौरीला मिळणाऱ्या दहा टक्क्यांवर ह्या मंडळींचा डोळा. त्यासाठी अनेक उपद्व्याप करत शेवटी कथा वेगळेच वळण घेत गौरीचे लग्न गुंड प्रव्रुत्तीच्या बनेल अनिल बरोबर विलक्षण नाट्यपूर्ण घटनेनंतर मोडल्यावर दादासाहेबांना हार्ट अटँक आल्याने, ते आपल्या धाकट्या मुलाला जगदीपला गौरीशी विवाह करायला भाग पाडतात. खरं म्हणजे जगदीप आणि त्याची लंडनमध्ये त्याच्याबरोबर असलेली मैत्रीण जणु लिव्ह इन रिलेशनशिप इतके जवळ असणारे. यावेळेपर्यंत मालिका बघण्याजोगी वाटायची. पण जगदीपच्या विवाहानंतर, पुन्हा फॉरेन रिटर्न मैत्रीण ज्योतिका यांच्याच घरी काय रहायला येते आणि पुढे नको असे, अनेक न पटण्याजोगे वेडेवाकडे काहीही प्रसंग घडत काय जातात, शेवटी आपल्याला सगळ्यांचा कंटाळा येतो. गौरीचा विवाह झाल्यानंतर ही मालिका संपवणे ठीक होते. पण पाणी घालत शेवटी कशीही मालिका भरकटत नेली जात आहे. त्यामुळे ही मालिका "सुख म्हणजे नक्की काय नसतं" हेच जणू काही दाखवत आहे आणि प्रेक्षकांना ताप देत आहे.

ह्या पार्श्वभूमीवर दुसरे चित्र पाहू..
"टिकाऊ तीन/पाच":
प्रत्येक वाहिनीवर अनेक मालिका प्रदर्शित केल्या जातात. परंतु इथेही मार्केटिंग मधला नियम लागू होतो. मार्केटिंगमध्ये, बाजारातील स्पर्धेत शेवटी केवळ उत्तम असे तीन वा जास्तीत जास्त पाच प्रॉडक्टस् उरतात, बाकीचे मार्केट बाहेर फेकले जातात, असा अनुभव असतो. त्याच प्रमाणे बहुतेक वाहिन्यांवरील एक वा दोन मालिकाच पुष्कळ काळ बघितल्या जात टिकू शकतात, बाकीच्या हळूहळू अंतर्धान पावतात वा दुर्लक्षित रहातात.

सहाजिकच प्रेक्षक दररोज किती मालिका बघणार याला मर्यादा असल्यामुळे, प्रत्येक प्रेक्षक शेवटी स्वतःही जास्तीत जास्त तीन किंवा पाच मालिका नियमाने बघत राहतो. बाकींकडे दुर्लक्ष केले जाते असे आढळून येईल. सध्या ज्या काही मालिका चालू आहेत, त्यामध्ये निदान मला तरी पुढील मालिका अजून तरी नियमाने बघाव्यात अशा वाटत आहेत:
"चंद्र आहे साक्षीला" "श्रीमंताघरची सून"
"आई कुठे काय करते" "शुभमंगल आँनलाईन"
"चांदणे शिंपीत जाशी"
आता आताच ह्या यादीतील "आई कुठे काय करते मध्ये नको इतका तमाशा झाल्यावर व अरूंधतीचे वाभाडे काढून, अपमान करुन झाल्यावर, येन केन प्रकारेण अनिरुद्धचा अपघात व त्याचे प्रेयसी संजनाला सोडून पुन्हा घरी आल्याचे दाखवल्यावर ही मालिका नकोशीच होणार हे निश्चित....

"पिंडे पिंडे मतीर्भीनः !":
तर काही काही मालिका अशा असतात की,
"बघू नको ग वेड्यावाणी, तुझ्या डोळ्यात आलं पाणी" याप्रमाणे आपण त्या सुरुवातीपासूनच कां कुणास ठाऊक टाळतो. अर्थात प्रत्येकाची आवड वेगवेगळी. माझ्या द्रुष्टिने त्यांतील काही:
"राजा राणीची गोष्ट" "बाळूमामाचं चांग भलं" "सहकुटुंब सहपरिवार" "सावित्रीच्या ज्योती" इ.इ. अनेक उरलेल्या. ह्या मालिका मी कधी बघितल्याच नाहीत. प्रत्येकाच्या अशा नावडत्या वा कधीच न बघितलेल्या मालिका असू शकतात. अशी प्रत्येकाची आवड वेगवेगळी:
"पिंडे पिंडे मतीर् भीनः" हा नियम येथे लागू होतो.

सारांश काय, तर छोट्या पडद्यावरील मालिकांचा हा एक फंडा दिसतो. सुरुवातीला उत्सुकता वाढवत मिळणारे असे प्रसंग दाखवायचे आणि मालिकेच्या कथेचा जीव इवलासा असल्यामुळे, तो एकदा संपला की, नंतर वेडेवाकडे कसेही त्यात नवनवे प्रसंग, बेलगाम नाट्य, नवीनच प्रवेश करणार्या एखाद दुसर्या पात्राद्वारे ती फरफटत न्यायची आणि मालिकेचा संसार आहे तो तसाच पुढे रेटत न्यायचा. प्रेक्षकांच्या एकंदर सहनशक्तीचा अंत पाहत राहायचं, असंच काहीसं मालिकांच्या बाबतीत म्हणावसं वाटतं.

टी-20 सामन्यात प्रमाणे मर्यादित अशा निश्चित बंदिस्त कथानक असलेल्या आणि नंतरच निर्मिती केलेल्या मालिका आता आवश्यक आहेत. त्यामुळे जेव्हा छोटा पडदा काही दशकांपूर्वी
सुरु झाला त्यावेळेच्या बहारदार करमणुकीचे, रंगतदार मालिकांचे नाट्यमय आणि खरोखर संस्मरणीय असे जे कार्यक्रम होत होते, ते आता पूर्ण नाहीसे होऊन, जाहिरातींचा रतीब असलेले आणि कसेही करून, काहीही दाखवत बसायचे अनेक वाहिन्यांचे ओझे, आता अक्षरशः असह्य झाले आहे. कधी होणार ही सारी मंडळी शहाणी? कोण, कसा चाप लावणार ह्या निरर्थक सादरीकरणांना? कोणतेही कार्यक्रम आधी सेन्सॉर करूनच प्रदर्शित कधी कसे होणार? वेळेचा अपव्यय न करता, दर्जेदार कार्यक्रम व अर्थपूर्ण मालिका कधी पाहायला मिळणार?

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात, तेवढेच पाहणे आता आपल्या हातात आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, २५ जानेवारी, २०२१

"रंगदर्शन-6": " तरुण आहे रात्र अजुनी!":

 

"रंगदर्शन-6":

लाँकडाऊनच्या कसोटी पहाणार्या कालखंडांनंतर आता मराठी माणसाला प्रिय अशी रंगभूमीवरील नाटकांची नांदी पुनश्च सुरु झाली. त्या निमित्ताने निवडक नाटकांचा रसास्वाद आपणासाठी सादर करण्याचा मी उपक्रम सध्या करत आहे. त्यातील हा रसास्वाद.......

"अशी, कशी ही, रंगांची दुनिया?":

" तरुण आहे रात्र अजुनी!":

योगायोगांची मला मोठी गंमत वाटते. वर्ष अखेर आणि वर्षारंभच्या आठवड्याच्या कालखंडात सेलिब्रेशन म्हणून, केवळ करमणूक भेटीसाठी खेळ ह्यात आपण वेळ नेहमीच घालवत असतो. माझेही तसेच झाले, पण त्यामध्ये मनोरंजन प्राधान्याने होते. खरोखर विचार करण्याजोग्या, कोड्यात पाडणार्या अशा काही तीन कलाकृती बघायचा योग आला: दोन नाटकं एक चित्रपट.

"तरुण आहे, रात्र अजुनी" हे आणि "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" अशी अगदी भिन्न प्रकृतीची दोन नाटकं, तर आधुनिक जगातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम असलेले आयव्हीएफ तंत्र खुबीने आणि अत्यंत मजेशीर रीतीने धक्के देत उभा केलेला Good News हा चित्रपट.

मराठी रंगभूमी ही खरोखर अविस्मरणीय अद्वितीय अशीच आहे कारण ह्या रंगभूमीवर जी नाटकं चांगली वाटतात, तेथे तीन गुणांचा म्हणजे धंदा कला आणि नवा विचार नवी द्रुष्टी ह्यांचा त्रिवेणी संगम झालेला पहायला मिळतो.

समाजात जे घडते बदलत्या काळानुसार जशी माणसं बदलत जातात, तसे परस्परसंबंध देखील बदलत जातात आणि अगदी वेगळ्या अशा जीवनशैलीचे मिश्रण आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ही दोन्ही नाटके खरोखर अगदी परस्पर विरुद्ध अशा वास्तवतेचे चित्रण करत आहेत. त्यामुळे मला ती एकाच वेळेला पाहण्याच्या योगाची मोठी गंमत वाटते.

"तरुण आहे रात्र अजुनी":

श्रीमंती आणि त्यातून सामान्यांना नवश्रीमंती मिळाली की माणसं कशी बदलत जातात आणि स्त्री-पुरुष आपले आनंदाचे शारीरिक सुखाचे क्षण कसे अगदी वादग्रस्त पद्धतीने वेचत जातात, त्याचे वेधक भेदक असे चित्रण "तरुण आहे रात्र अजुनी" मध्ये उभे केलं आहे.

पूर्वी हिट अँड हॉट अशी नाटकं यायची आणि त्यामध्ये जे कदाचित सर्वसामान्य प्रेक्षकाला बघायला कठीण वाटेल लाज वाटेल अशा तऱ्हेचे काहीतरी असायचे. ते एक खरोखर धाडसच होते त्यावेळेला. अशा नाटकांची लाट आली अन् पहाता पहाता, ती ओसरूनही गेली.

परंतु "तरुण आहे रात्र अजुनी" नाटकाची झेप त्या तुलनेत शब्दांपलीकडची आहे, आपण विचारच करू शकणार नाही, असा मुद्दा येथे उलगडून दाखविला आहे. पुरुष आणि स्त्री यामध्ये आपापली शारीरिक भूक भागवण्याचे मार्ग नेहमीच विभिन्न राहिले आहेत. पुरुषाला एक सोय आहे, तो घरामध्ये आपल्याला जे मिळत नाही, ते शोधण्यासाठी बिनदिक्कत बाहेर जात आला आहे. परंतु स्त्रीच्या बाबतीत मात्र खूपच बंधने असल्यामुळे, तिच्या नशिबात जे काही भोग वाट्याला येतील ते सोसत, मन मारुन पतीशीच एकनिष्ठ राहिलेच पाहिजे अशी बिचारीवर सक्ती असते. त्याहून समस्या ही की, लग्न होऊ शकणार्या प्रौढ तरुणी त्यांची ही भूक भागविण्यासाठी काय करणार?

नवश्रीमंती आली, लगेच अपरिहार्यपणे किटी पार्टी आल्या आणि त्या नवश्रीमंत स्त्रियांच्या क्लब मध्ये काय काय चालते याचे एक विदारक चित्र या नाटकांमध्ये आहे. नाटकात एक विवाहित स्त्री आपल्याला घरामध्ये जे सुख नवर्याकडून हवे आहे, ते मिळत नाही म्हणून, चक्क फोन करून एखादा पिझ्झा किंवा पास्ता मागवावा अशा तऱ्हेने एका गिगोलोला अर्थात् 'तसे' सुख देणाऱ्या पुरुष वेश्येला बोलावते. पुढे काय होते याचे

धक्क्या मागून धक्के देणारे असे नाट्यमय प्रसंग आपल्यापुढे येत राहतात.

नाटकाचा पहिला अंक सुरुवातीला आपली उत्सुकता, उत्कंठा खूपच जागी करतो. परंतु त्या प्रौढ स्त्रीने बोलावलेला तरुण रंगमंचावर आल्यावर, तो ज्या काही नको त्या गोष्टी तिला सांगत रहातो, त्यामुळे आपल्या मनात हे काय चाललंय असाच संभ्रम होतो. खरं म्हणजे त्याची इच्छा असते की ही अशा बाबतीतली "पहिलटकरीण!!?, घाबरता आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी उमलावी, फुलावी म्हणून तो खास दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच्या दोन्ही गोष्टी पूर्ण अप्रस्तुत असल्याने, रसभंग करतात आणि त्यामुळे उगाचच लांबलेला पहिला अंक आपल्या पदरी निराशाच पदरी टाकतो.

मात्र ह्याची सगळी भरपाई दुसर्या अंकात, रंगमंचावर हे दोघे एकांतात असताना अचानक

त्या बाईचा नवरा आल्यावर, जे जे काय घडत जाते, संवादांची जी काही जुगलबंदी होत रहाते ते चित्तथरारक असेच आहे. तीनही कलाकारांनी आपआपल्या भूमिका मात्र चोख केल्या आहेत.

जर पहिला अंक अधिक व्यवस्थित आणि काही योग्य त्या सुधारणा करून बसवला तर हे नाटक अधिक परिणामकारक ठरेल असे वाटते.

मात्र सद्यस्थितीत कुटुंबाने एकत्र जाऊन पहावे अशा तऱ्हेचे हे नाटक नाही, असेच म्हणावे लागते. त्यामुळे याचे यश कदाचित मर्यादितच राहू शकते. पण एक वास्तववादी अघोषित समस्या विलक्षण धीटाईने मांडण्याचे जे काही धाडस केले आहे, ते खरोखर रंगभूमीला वेगळीच दिशा दाखवणारे ठरू शकेल.

मराठी रंगभूमीवर व्यवसाय, कला आणि विचार जाग्रुती ह्यांचा त्रिवेणी संगम घडविणारी नाटके येत असतात, म्हणूनच अभिमानाने आपण म्हणतो, मराठी रंगभूमी श्रेष्ठ, अव्वल आहे. हाच प्रत्यय "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" नाटकांत तर अजुनही विलक्षण ताकदीचा भासला. त्याविषयी आता पुढच्या भागात......

सुधाकर नातू

-------------------------------------------------------------------------------------------