"लाँकडाऊनचे कवित्व": "संसाराचा सारीपाट":
लाँकडाऊन सुरू होऊन नुकतेच २४ सप्टेंबरला सहा महिने पूर्ण झाले. कोरोनासारख्या महा संकटाने जगाला वेढा घातला असल्यामुळे, सारे जनजीवन ठप्प झालेले आपण पाहिले. जगाप्रमाणे आपल्या देशातही हा अनुभव खरोखर नवीन होता. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवसांचे कुतुहूल नाहीसे झाल्यावर, या सगळ्या प्रपाताचे काय काय भयंकर परिणाम होऊ शकतात, ते हळूहळू ध्यानात यायला लागले.( मास्कने )तोंड दाबून (आणि चार भिंतींमध्ये कोंडून घेऊन)
बुक्क्यांचा मार, अशीच जणू स्थिती पाहता पाहता झाली. एक नवीनच जीवनशैली सगळ्यांनाच अंगीकारायला लागली. मास्क, सोशल डिस्टंसिंग, सँनटायझर, लॉंगडाऊन,
हेडशील्ड वा ppe असे अगदी नवीन शब्द तोंडी येऊ लागले आणि सगळ्यांच्याच पहाता अंगवळणी पडले.
कोरोनामुळे अत्यंत भयानक अशी अवस्था निर्माण झाली आहे की ज्येष्ठ नागरिक जणू असून नसल्यासारखेच होऊन गेले आहेत. कारण सगळ्यात जास्त धोका त्यांना असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी (कारण त्यांना बहुतेकांना काही ना काही प्रॉब्लेम काही ना काही तरी आणि ) त्यामुळे त्यांनी शक्यतो बाहेर जाऊ नये, अशीच अपेक्षा ठेवली जाते. जणू काही त्यांना तुरुंगात टाकल्यासारखे वाटू लागते. सहाजिकच म्हणून ज्येष्ठ नागरिक अक्षरशः जगाच्या दृष्टीने नकोसे झाल्यासारखे वाटायला लागतं.
आतापर्यंत बरं होतं, कुठेतरी कोपऱ्यात जगाच्या चक्री वादळाने नुकसान व्हायचं, किंवा कुठेतरी सुनामीमुळे हाहाःकार उडायचा, तर कुठे एखाद्या राज्यात देशात भूकंप अथवा इतर नैसर्गिक संकटांच्या बातम्या यायच्या. परंतु परदुःख शीतल याप्रमाणे फक्त बातम्या ऐकायच्या आणि काही दिवसांनी विसरल्या ही जायच्या. आपल्याला काय त्याचे, आपल्याला तर काही होत नाही ना, असं समजून बाकीचे जग पुढे जायचं. परंतु
कोरोनासारख्या महाविशाल महा संकटाने संबंध जगावर आपली काळी पाखर टाकल्यामुळे सगळे जण एकाच पातळीवर आणि समान अशा दुःखाच्या सागरात गटांगळ्या खात आहेत अशी अवस्था झाली आहे. त्यावर लस मिळत नाहीये किंवा तिला वेळ लागतोय, जालीम उपायाचे कुठलेही औषधही सध्या नाही. सर्वांवर त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आलेली आहे.
समाजातील विविध स्तरावरील गटातील मंडळींची बिकट परिस्थिती आणि एकंदर आर्थिक विवंचना, त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांचे हाल व
आपआपल्या गांवी त्यांचे जायचे प्रयत्न, ह्रदयाला पाझर फोडणारे होते. ती कष्टकारक चित्रे आपण बघितली. हळूहळू प्रत्येकजण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ लागला.
माणूस हा खरोखर जात्याच झगडणारा आणि संकटांचा सामना करणारा प्राणी आहे, म्हणूनच जंगली अशा अश्मयुगांतून आजच्या आधुनिक युगापर्यंत तो येऊन पोचला आहे. परंतु जगाच्या इतिहासात कोरोनासारख्या अतिसूक्ष्म भस्मासूराचे हे पहिलेच असे उदाहरण असावे की, ज्याने पहाता पहाता साऱ्या जगावर आपले पाश फेकून त्याला अक्षरशः बंदीवान केले, त्याला आर्थिक दृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या मानसिकदृष्ट्या ही गलितगात्र केले.
अशा विदारक स्थितीपायी, एकंदर सर्वच वयोगटातील माणसांच्या जीवनात उलथापालथ झालेली आपण बघत आहोत. आपली आरोग्यव्यवस्था किती कमकुवत होती आणि आरोग्यासारख्या अति महत्त्वाच्या क्षेत्राकडे आपले गेल्या कित्येक वर्षात दुर्लक्ष झाले, त्याचे परिणाम आपण आता भोगत आहोत. दोन कोरोनाग्रस्तांनी सुरुवात झालेली, आता कोरोना ग्रस्तांची संख्या केवळ सहा महिन्यात देशात ६० लाखांच्या वर गेली आहे, लवकरच मरण पावलेल्यांची संख्या भारतामध्ये एक लाखाचा टप्पा पार पाडेल. सुरवातीला अगदी तळाला असलेला आपला देश, जगामध्ये लवकरच सर्वात जास्त कोरोनाग्रस्त अशा नागरिकांचा होईल अशी विचित्र चिन्हे दिसत आहेत. ह्या लेखात आम्ही विविध कौटुंबिक जीवनावर लाँकडाऊनचे आणि कोरोनाचे काय परिणाम झाले आहेत, त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे.
जन्मानंतर जर दुसरं काही वळण सगळ्यात महत्त्वाचं कुठलं असेल तर तो म्हणजे माणसाचा विवाह. दुसरी व्यक्ती त्याच्या जीवनात आल्यानंतर त्याच्या जीवनाचे रंग रूपच पूर्णपणे बदलून जाते आणि संसाराची जुगलबंदी सुरू होते.
संसारातली ही जुगलबंदी सुरु करण्यापूर्वी, माणूस जेव्हा विवाह करतो, त्या वेळेला फार तर पत्रिका, रंग रूप, शिक्षण नोकरी आर्थिक बाजू इत्यादी गोष्टी फार तर तपासतो आणि तो विवाह वेदीवर मोठ्या अपेक्षेने चढतो. जसजसे दिवस जातात तसतसे एकमेकांमध्ये जसे गुण आतापर्यंत लक्षात येतात, तसेच दोषही लक्षात येऊ लागतात. हा सर्व दूर सर्वकालीन सर्वांचाच अनुभव आहे.
सध्याच्या लॉकडाउनच्या काळामध्ये २४ तास एकमेकांच्या सहवासात राहायची वेळ आल्यामुळे, एकमेकांना समजून घेण्याची अधिक परीक्षा चालू आहे. विवाहापूर्वी काय पाहिले आणि अनेक काय पदरी पडले, याचा लेखाजोखा आपोआपच सगळ्यांना अगदी पारदर्शकतेने अनुभवायला मिळतोय. जीवनातले ताणतणाव वाढत जात असताना एकमेकांना सांभाळून कसे घ्यायचे, ही तारेवरची कसरत घरोघरी चालू आहे. अशावेळी विशेषतः जेष्ठ नागरिकांच्या संसारात तर तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, अशा अनेक घटना घडत असलेल्या दिसतात.
मात्र लाँक डाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थितीमुळे आता सारेच २४ तास घरातच असतात. पूर्वी निदान दोघं किंवा नवरा तरी नोकरीनिमित्ताने बराच वेळ बाहेर असायचा. दोघांच्या सहवासाचा मर्यादित असल्यामुळे असे वादविवाद व जुगलबंदी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता कमी होती.
पण लाँकडाउनमध्ये काय काय होतं ते बघा: विविध ठिकाणची पती-पत्नीची वादविवादाची काही क्षणचित्रे:
"संसाराचा सारीपाट":
# ही बाई कायम जे धोकादायक आहे तशाच तर्हेने काम करत असते: असं नवऱ्याला लक्षात येतं की, ती काय करते गॅस चालू आहे, त्याच्या जवळच समजा गोड तेल भरायचं कसं, तर ते तिथेच जवळ उभी राहुन भरते. अर्थातच त्याचा तीळपापड होतो. तिला तो सांगू पाहतो, असे करू नको किंवा दुसरीकडे सुरक्षित जागी काम कर. तसेच कधी कधी, गँसवर दूध किंवा दुसरं काही ठेवलेलं असतं आणि कुठेतरी बाहेर जाऊन मैत्रिणींशी बोलत रहायची खोड, त्यामुळे पुन्हा वादावादी!
# दुसरं हे उदाहरण पहा: हा नवरा तिला रूचत नाही, म्हणून सिगारेट ओढण्यासाठी पूर्वी बाहेर जाऊन त्या ओढायचा, जेव्हा पाहिजे तेव्हा. पण आता लाँकडाऊनमुळे, सारखं सारखं दरवेळेला सिगरेटी फुकायला, हा बाहेर निघाला की तिची बोंबाबोंब सुरु. हा पण त्याला दूरूत्तरे देणार. झाला वाद सुरू. याच्या उलट ती कधी टीव्हीचा रिमोट हरवेल, मुलखाची विसरभोळी म्हणून कधी मोबाईल चार्जरच कुठेतरी टाकलेला असेल, अथवा घरातल्या खोलीतून बाहेर दुसऱ्या खोलीत जाताना, चालू असलेला पंखा बंद करणार नाही, तसाच ठेवून दुसरी कडे जाऊन फोनवर तासनतास गप्पा मारत बसेल. सहाजिकच नवरा ओरडणार! नवरा बायको चौविस तास घरातच असण्याचे हे दुष्परिणाम.
# हिला आपल्या आरोग्याची इतकी काळजी की, ती केव्हाही मनात येईल तेव्हा वेळेचं भान न ठेवता फँमिली डॉक्टरला फोन कर, त्याला काय होतय सांग, तो बिचारा कुठलं तरी औषध सांगणार. मग ही ताबडतोब नवर्याला बाहेरून औषध आणायला लावणार. कधी कधी तर, तिला ऍसिडिटीचा त्रास नेहमी असून देखील, तेलकट मसालेदार खायची तिला जास्त सवय, म्हणून नवरा नको नको म्हणत असताना देखील, डोसे किंवा पावभाजी असे न चालणारे प्रकार करत राहणार, खाणार व रात्री बेरात्री आजारी पडणार. पूर्वी एक वेळ ठीक होतं, परंतु आता लाँकडाऊनच्या काळात हे संभाळणं कठीणच होऊन बसतं. मग दोघांमध्ये वाद होतच रहात. थोडक्यात स्वभावांचे वेगवेगळे प्रकार या लाँकडाऊनच्या काळामध्ये घरोघरी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चिडचिड होते, कधी कधी काही घरांमध्ये कडाक्याची भांडणेही होतात.
# स्त्रियांवर हिंसाचाराच्या देखील घटना घडत आहेत. लहान मुलांचे विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांचे तर विचारूच नका. त्यांचे प्रश्न वेगळे आणि त्यापायी विशेषतः आईला होणारा मनस्ताप व ताण वेगळाच. त्यांना बिचार्यांना बाहेर खेळायला जाता येत नाही, सारखं मोबाईल मध्ये किती डोकं लावून बसणार? अशात काही महत्त्वाच्या स्पर्धात्मक जीवनाची दिशा ठरविणार्या परीक्षा ज्यांच्या मुलांच्या आहेत, त्या कधी होणार, ह्या सातत्याच्या चिंतेने त्यांच्या घरचे तर स्वरूप एखाद्या युद्धभूमी सारखे पाच महिने राहीले होते. अखेर आता त्या घेतल्या जात आहेत हे बिचार्यांचे नशिबच. कुठे बाहेर जायचं तरी धोका. ह्या मुलांचा अभ्यास अशा तर्हेच्या वातावरणात खरोखर कसा झाला असेल व तशा कुटुंबांनी काळ कसा काढला असेल, त्याची कल्पनाच करता येत नाही.
म्हणूनच, लहान असो मोठे असो नवविवाहित मूलबाळ वाले असो अथवा फक्त दोघेच राहणारे ज्येष्ठ नागरिक असोत, सगळीकडे या
लाँकडाऊनमुळे खरोखर विविध प्रकारची भांडणे वाद-विवाद आता सुरू झाले आहेत आणि हा संकटाचा जो काळ आहे, तो कधी संपणार ते माहीतच नसल्यामुळे प्रत्येकजण अधिकच तणावात आहे. खरच कधी नव्हे अशी परीक्षा सर्वांची बघितली जात आहे, संसाराचा सारीपाट असा चालू आहे.
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृति किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच कां वागतो, ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आह्वान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग हया तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो. तर हे असे सगळे विचित्र वातावरण अनिश्चित काळापर्यंत सगळ्यांनीच पचवायला शिकायचे आहे.
आता सरते शेवटी.....
# "करावे तसे भरावे":
दुनियेतील अनंत पापांचा अखेर भरला घडा,
शिकवितो, निसर्ग कोरोनारुपी भस्मासुराचा धडा!
आता तरी व्हा शहाणे, अन् गिरवा मूल्यांचा पाढा,
पाळा नियम, घ्या काळजी, सुटेल संकटाचा वेढा!
आणि.....
अखेरीस........
# "अदभूत प्रेरणादायी संदेश......."
२७ सप्टेंबर'२० रोजी शारजा येथे IPLमधील, किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये झालेल्या चित्तथरारक सामन्याबद्दलचा सोशल मिडीयावरचा एक अविस्मरणीय संदेश, "लाँकडाऊनचे कवित्व" हा लेख पूर्ण करतेवेळी वाचनात आला. म्हणूनच, ह्या लेखाची सांगता करताना, त्याचा सारांश येथे मांडणे उचित ठरेल:
"ह्या iPL सामन्यामध्ये सतराव्या षटकापर्यंत संथ खेळणार्या, मॅच हातातून सुटतेय आणि पराभवाला आपण कारणीभूत ठरणार आहोत, हे फलंदाजी करणाऱ्या राहूल तेवतियाला समजलं नसेल कां? सगळं जग त्याच्यावर 'ब्लेमगेम' खेळत होतं. याने मॅच घालवली, पंजाब विरुद्धची मँच राजस्थान रॉयल्स हरली, असंच जणू ठरवून सारेजण मोकळे झाले होते.
कदाचित त्यालाही हे माहित नव्हतं की, आता अठराव्या ओव्हरला आपण गेम चेंज करणार आहोत. पण टप्प्यात आलेला बॉल आणि संधी त्याने अचूक हेरली आणि तेवतीया गेम चेंजर बनला. २०२० वर्ष आणि २०२० सामन्यातील तिवतीयाची ती न भूतो न भविष्यती इनिंग हाच संदेश देत आहे.
"पिच सोडू नका, स्वतःहून रिटायर्ड आऊट होऊ नका".
ध्यानात असू द्या, २०२० वर्षात एखादी गेम चेंजर ओव्हर प्रत्येकाच्या आयुष्यात आलीच आहे, नसेल, तर ती येणारच आहे. फक्त तोवर उभं राहायचं आहे. जीव तोडून प्रयत्न करायचा आहे. "क्यूकी पिक्चर अभि बाकी हैं मेरे दोस्त!"
२ टक्के जिंकण्याची शक्यता १०० टक्क्यांवर आणणारा तेवतीया, 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे चावून चावून चोथा झालेलं वाक्य प्रत्यक्षातही लागू होतं, हे त्याने दाखवलं आहे.
सध्या टीव्हीवर एक #जाहीरात दाखवत आहेत, "पता नहीं कैसे पर बडा ऑर्डर मिल गया! इस साल कुछ तो अच्छा होना ही था ना!"
२०२० सामन्यातील राहुल तेवतीयाचा ती खेळी, आणि २०२० वर्ष व कोरोना हा एक संदेश आहे बस तो समजून घ्यायला हवा. "स्वतःहून रिटायर्ड आऊट होऊ नका. दिवा तेवत ठेवा". *क्योंकि इस साल कुछ तो अच्छा होने ही वाला हैं !!!*"
सध्याच्या कसोटीच्या वेळी, असा मनाला भिडणारा व प्रेरणा देणारा संदेश लिहिणार्या त्या अनामिकाला साष्टांग नमस्कार!
🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा