गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

"मोबाईल एक, कल्पना अनेक-३":

 "मोबाईल एक, कल्पना अनेक-३":

व्हाँट्सअँपवर आपल्याला अनेक संदेश येत असतात, अधूनमधून मी मोबाईल फोनमधले ते संदेश पुसून टाकत असतो. पुष्कळदा आलेले काही महत्वाचे व विशेष माहितीपूर्ण संदेश आपल्याकडून वाचले न जाता तसेच पुसलेही जात असतात. आज मात्र ह्या दोन तशा लांबलचक पण उत्कंठावर्धक संदेशांनी माझे लक्ष वेधले......

तेच, मनाला भिडणारे संदेश whatsapp वरचे पुढे देत आहे. दुसरा संदेश, पुढे पाठवलेला कुणा अनामिकाचा, तर पहिला संदेश श्री जयंत केशकामत ह्यांचा आहे. प्रथम ह्या दोन्ही संदेशजनकांचे मनःपूर्वक आभार...

१ "अबला न तू, आहे तू दुर्गा":
( हे शीर्षक मात्र मी दिले आहे.)

# "*हिंदूंचे कोणतेही ग्रंथ उघडून पाहा, अगदी वेदांपासून ते पुराणांपर्यंत - तुम्हाला एकही नायिका अबला आढळणार नाही, एकही नायिका Damsel In Distress आढळणार नाही.*
सीतेला अपह्रत केल्यावर तिने रावणासमोर हात नाही टेकले, तर बाणेदारपणे उभी राहिली रावणाच्या विरोधात. अंबाने आपल्यावरचा अन्याय निवारण्यासाठी कोणत्याही थराला जायचे बाकी ठेवले नाही. द्रौपदीने तर पांडव शिथिल होताहेत असे जरादेखील दिसू लागले तरीही सूडाचा अग्नि सातत्याने चेतवून धगधगता ठेवला आणि अखेरीस महाभारत घडवून आणले!! काय कारण असेल याचे?

*जगात संस्कृती एकतर पुरुषप्रधान असतात नाहीतर स्त्रीप्रधान! परंतु हिंदू संस्कृती ही जगाच्या पाठिवर एकमेव अशी संस्कृती आहे की जी 'समानता-प्रधान' आहे.*
प्राचीन काळापासूनच आमच्याकडे स्त्रियांना आणि पुरुषांना एकमेकांच्या बरोबरीने शिकवले गेले. सुसंस्कृत केले गेले! स्त्रीने उपलब्ध सुयोग्य वरांमधून आपला पती स्वतःच निवडण्याची स्वयंवरासारखी पद्धत केवळ याच देशाची देणगी आहे. युद्धप्रसंगी पुरुषाच्या बरोबरीने लढणाऱ्या किंबहूना पुरुषाहूनही सवाई पराक्रम गाजवून गरज पडल्यास त्याचे रक्षण करणाऱ्या सत्यभामा आणि कैकैयी येथे जागोजाग आढळतील तुम्हाला. गार्गी, मैत्रेयी यांच्यासारख्या बुद्धीशालिनी तर किती होत्या यांची गणतीच नाही! 'शिव' आहे तिथे 'शिवानी' आहेच. 'भव' आहे तिथे 'भवानी' आहेच. 'मृड' आहे तिथे 'मृडानी' आहेच. 'प्राण' आहे तिथे 'रयि' आहेच. लक्ष्मीशिवाय विष्णू अपुरा दिसेल. आणि 'इ' काढून घेतली तर 'शिव'ही 'शव' होऊन बसेल!

जसजसा काळ बदलला तसतसा संस्कृतीऱ्हास होऊ लागला. आधी इस्लामी आणि मग ख्रिस्ती शासनकाळात हिंदूंचे आचारविचार जबरदस्तीने बदलवले गेले. सतीसारखी ऐच्छिक प्रथा सक्तीची झाली ती ह्याच अंधारयुगात. जिथे घरात वावरणाऱ्या स्त्रियांनाही सुलतानाचे लोक कधी उचलून नेतील याचा नेम नसायचा, तिथे शिक्षण-बिक्षणाचा प्रश्नच कुठे येतो? मुसलमान शासक तर स्वतःच अडाणी आणि खुळ्या पोथीनिष्ठेपायी स्त्रिला भोग्यवस्तू समजणारे. इंग्रजांनी मात्र ठरवून आमच्या श्रद्धा, परंपरा आणि ज्ञान मारले. आमच्याकडचे चांगले तेवढे चोरुन नेले आणि इंग्रजी भाषा, कारकूनी इ. त्यांच्या फायद्याच्या पण मुळात सुमार दर्जाच्या गोष्टी आम्हाला शिकायला भाग पाडल्या. ह्या देशात, जिथे सगळे पुरुष नारीला देवी मानायचे आणि सगळ्या स्त्रिया पुरुषाला देव मानायच्या, जिथे अर्धनारीनटेश्वराची पूजा व्हायची, तिथे लिंगभेद जन्माला घातला गेला.

आज आसपास पाहा. काय दिसेल? स्त्रीपुरुष-समानतेच्या नावाखाली काही थोडे अपवाद वगळता 'स्त्रियांचाच तेवढा वरचढपणा' मागितला जातोय. मी माझी कर्तव्ये करणार नाही, मी स्वैर वागेन, My Choice चे गोडवे गाईन - पण तरीही तू मात्र माझा आदरच केला पाहिजे; ही वृत्ती वाढताना दिसेल. कारण, ह्या स्त्रीपुरुष-समानतेच्या वंचनासुद्धा पाश्चात्त्यांचीच देण आहेत! याउलट पाहा, आता ९ दिवसांचा मंगलोत्सव सुरु आहे - नवरात्री!! देवी त्या महिषासुराशी सलग ९ दिवस युद्ध करत होती. एकट्याने सैन्याचे नेतृत्त्व करत होती. आणि अखेरीस तिने तो दैत्त्य मारलाच! ही असते खरीखुरी स्त्रीशक्ती!! ही असते खरीखुरी Woman Empowerment!!!
*प्रत्येक स्त्रीमध्ये देवी पाहाणारा हा देश देवीला "शक्तीरुपेण", "बुद्धीरुपेण", "विद्यारुपेण" आणि "भक्तीरुपेण" संस्थिता मानतो, तिला आदिमाया-जगज्जननी मानतो. ह्या विचारांकडे पुन्हा एकवार जाण्याची आज गरज आहे. त्यासाठी परकीय विचारसरणींची भ्रांति सोडण्याची गरज आहे. आणि त्यासाठी स्त्रियांना पुरुषांनी देवी मानणे व त्याचबरोबर स्त्रीनेही आपले वर्तन देवीसमान ठेवण्याची गरज आहे!! तरच ही नवरात्री खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण होईल.* नुसतीच सांकेतिक घटस्थापना काय कामाची?
...जयंत केशकामत
----------------------------

# "पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य"। ...

अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच/तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना कश्या काय निर्माण करता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं...
हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील ह्या संकल्पना मान्य केल्या आहेत. डेन_ब्राऊन सारखा लोकप्रिय लेखक सुध्दा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर कादंबरी लिहितो.
ही पंच महाभूतं म्हणजे जल, वायू, आकाश, पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे.
आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिर आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ?
फार थोड्या लोकांना. त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिर,भगवान शंकराची मंदिर आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ट्य किंवा रहस्य नाही.

* मग वैशिष्ट्य कशांत आहे...?
पंच महाभूतांच्या ह्या पाच मंदिरांचं वैशिष्ट्य किंवा रहस्य यात आहे की यातील तीन मंदिरं, जी एकमेकांपासून काही शे किलोमीटर लांब आहेत, ती एका सरळ रेषेत आहेत..!

होय. अक्षरशः एका सरळ रेषेत आहेत..!!

]]] ती तीन मंदिर आहेत [[[

श्री कालहस्ती मंदिर
श्री एकंबरेश्वर मंदिर,कांचीपुरम
श्री तिलई नटराज मंदिर,त्रिचनापल्ली

आपण पृथ्वीवर एखादी जागा ठरविण्यासाठी कोआर्डिनेटस चा उपयोग करतो, ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश म्हणतो. यातील अक्षांश (Lattitude) म्हणजे पृथ्वीवर आडव्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा. जसं विषुववृत्त, कर्कवृत्त वगैरे. आणि रेखांश (Longitude) म्हणजे उभ्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा.

या तीन मंदिरांचे अक्षांश–रेखांश आहेत

१. श्री कालहस्ती मंदिर 13.76 N 79.41 E वायू

२. श्री एकंबरेश्वर मंदिर 12.50 N 79.41 E पृथ्वी

३. श्री तिलई नटराज मंदिर 11.23 N 79.41 E आकाश

यातील रेखांश हा तिन्ही मंदिरांसाठी 79.41 E आहे. अर्थात तिन्ही मंदिरं एका सरळ रेषेत आहेत. कालहस्ती आणि एकंबरेश्वर मंदिरांमधील अंतर सव्वाशे किलोमीटर आहे तर एकंबरेश्वर आणि तिलई नटराज मंदिरांमधील अंतर हे पावणे दोनशे किलोमीटर आहे. ही तिन्ही मंदिरं नक्की केंव्हा बांधली, ते सांगता यायचं नाही. या भूभागावर राज्य केलेल्या पल्लव, चोल इत्यादी राजांनी ह्या मंदिरांचे नूतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. पण किमान तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त, ही मंदिरं जुनी असतील हे निश्चितपणे म्हणता येईल.
आता इथे खरं आश्चर्य हे आहे, की साधारण तीन हजार वर्षांपूर्वी, इतक्या लांबच्या लांब अंतरावरील ही मंदिरं एकाच उभ्या सरळ रेषेत कशी बांधली असतील..?
याचा अर्थ, त्या काळात नकाशाशास्त्र इतकं प्रगत होतं की अक्षांश–रेखांशांच ज्ञान त्यांना होतं ? पण अक्षांश–रेखांशांचं परिपूर्ण ज्ञान असलं तरी एका सरळ रेषेत मंदिर बांधण्यासाठी नकाशा शास्त्रा बरोबरच कंटूर मेप चं ज्ञान त्यांना आवश्यक होतंच!
की
इतर कुठली एखादी पध्दत त्या काळात वापरली गेली, जी आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे..?

सारंच अतर्क्य.....!

ही गंमत इथेच संपत नाही, तर इतर दोन मंदिरांबरोबर जेंव्हा ह्या एका सरळ रेषेत असलेल्या मंदिरांना जोडलं जातं, तेंव्हा झालेल्या रचनेतून विशिष्ट कोण निर्माण होतात.

याचा अर्थ, त्या काळातली आपल्या वास्तुविशारदांची झेप लक्षात घ्या. जमिनीच्या, काही हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या भूभागावर ते पंच महाभूतांच्या पाच शैव मंदिरांचा मोठा पट मांडतात. त्या रचनेतून आपल्याला काही_सुचवू पाहतात. आपलं दुर्भाग्य की आपण त्यांची ती ज्ञानाची कूट भाषा समजू शकत नाही.

या पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे, तर उरलेली चार, तामिळनाडू मधे आहेत. यातील वायू तत्वाचं प्रतिनिधित्व करणारं, श्री कालहस्ती मंदिर, हे आंध्र प्रदेशातल्या चितूर जिल्ह्यांत, तिरुपतीहून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. स्वर्णमुखी या लहानश्या नदीच्या तीरावर हे मंदिर उभारलेले आहे. हजारों वर्षांपासून ह्याला ‘दक्षिण कैलास’ किंवा ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते.

हे मंदिर अत्यंत प्राचीन असले तरी मंदिराचा आतला गाभाऱ्याचा भाग पाचव्या शतकात तर बाहेरचा, गोपुरांचा भाग हा अकराव्या शतकात बांधलेला आहे. पल्लव, चोल आणि नंतर विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी आणि बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात. आदी शंकराचार्य ह्या मंदिरात येऊन गेल्याचे उल्लेख अनेक साहित्यात मिळतात. खुद्द शं‍कराचार्यांच्या ‘शिवानंद लहरी’ मधे ह्या मंदिराचा आणि येथील ‘भक्त कणप्पा’ चा उल्लेख आहे.
हे मंदिर पंच महाभूतांपैकी वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करते. याचे काही चित्तवेधक संदर्भ मिळतात/दिसतात.

या मंदिरातील शिवलिंग हे पांढरे असून ते स्वयंभू आहे असे मानले जाते. या शिवलिंगाला (हे वायुतत्व असल्यामुळे) कधीही स्पर्श केला जात नाही. मंदिराचे पुजारी सुध्दा ह्या मुख्य लिंगाला कधीच स्पर्श करीत नाहीत. अभिषेकासाठी आणि पूजेसाठी एक वेगळे उत्सव लिंग बाजूला ठेवले आहे. गंमत म्हणजे ह्या मंदिराच्या गाभार्‍यात एक दिवा सतत जळत असतो आणि तो सतत फडफडत असतो. हे थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. कारण मंदिराचा गाभारा हा लहान असुन त्याला कोठेही हवा यायला जागा नाही. पुजाऱ्यांनी मुख्य द्वार बंद केलं तरी त्या दिव्याच्या ज्योतीचं फडफडणं चालूच असतं..! कुठलाही वारा नसताना, दिव्याची ज्योत फडफडत राहणं हे कां होतं ?
याचं कोणतंही शास्त्रीय कारण आजतागायत मिळू शकलेलं नाही.

मात्र येथील शिवलिंग हे वायुतत्व असल्याने दिव्याची ज्योत सतत फडफडत असते, असं येथील लोकांचं म्हणणं आहे!!

या मंदिरापासून साधारण सव्वाशे किलोमीटर दक्षिणेला अगदी सरळ रेषेत पंच महाभूतांपैकी दुसरे मंदिर आहे – श्री एकंबरेश्वराचे मंदिर.

तामिळनाडूच्या प्रसिध्द कांचीपुरम मधे हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर आहे.
पृथ्वी तत्व असल्याने हे शिवलिंग मातीचे बनले आहे. असे मानले जाते की शिवशंकराच्या प्राप्तीसाठी एका आंब्याच्या झाडाखाली, पार्वती ने आराधना केली. आणि ती देखील मातीच्या शिवलिंगाच्या स्वरूपाची. म्हणूनच ह्याला एकंबरेश्वर म्हणतात. तामिळ मधे एकंबरेश्वर म्हणजे आंब्याच्या झाडाचा देव. आजही मंदिराच्या आवारात एक प्राचीन आंब्याचे झाड उभे आहे. कार्बन_डेटिंग ने ह्या झाडाचे वय साडेतीन हजार वर्षे निघाले आहे, असे म्हटले जाते. ह्या झाडाला चार वेदांचे प्रतीक समजले जाते. असं म्हणतात, ह्या झाडाला चार वेगवेगळ्या स्वादाचे आंबे लागतात.

हे मंदिर, ‘कांचीपुरम’ ह्या मंदिरांच्या शहरात आहे. कांचीपुरम हे ‘कांजीवरम’ साड्यांसाठी जगप्रसिध्द आहे. ह्या मंदिरात तामिळ, तेलगु, इंग्रजी आणि हिंदीत एक फलक लावलाय की हे मंदिर ३,५०० वर्ष जुनं आहे. नेमकं किती जुनं हे सांगता येणं कठीण आहे. पुढे पाचव्या शतकात पल्लव, नंतर चोल आणि पुढे विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी केल्याचे उल्लेख आढळतात.

ह्या दोन मंदिरांच्याच अगदी सरळ रेषेत, दक्षिण दिशेत, ह्या एकंबरेश्वर मंदिरापासून साधारण पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर पंच महाभूतांचे तिसरे मंदिर आहे – तिलई नटराज मंदिर. आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर, तामिळनाडू च्या चिदंबरम या शहरात आहे.

खुद्द पतंजली ऋषींनी स्थापन केलेले हे अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. नेमके केंव्हा बांधले हे सांगणं कठीण आहे. मात्र पाचव्या / सहाव्या शतकात, पल्लव आणि चोल राजांनी याची डागडुजी आणि काही नवीन बांधकाम केल्याचे उल्लेख आढळतात. ह्या मंदिरात ‘भरतनाट्यम’ च्या १०८ विभिन्न मुद्रा दगडी खांबांवर कोरलेल्या आहेत. याचाच अर्थ, अत्यंत विकसित असं भरत नाट्यम हे नृत्य शास्त्र काही हजार वर्षांपूर्वी सुध्दा अस्तित्वात होतं, हे सिध्द होतं..!
----------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
ह्या शिवाय...
साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब उघडा.......आणि.....
चँनेल Subscribe ही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा