गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

"आजोबांचा बटवा-१२": "हा खेळ, सावल्यांचा !:

 "आजोबांचा बटवा-१२": "हा खेळ, सावल्यांचा !":

"स्टार प्रवाह" वरील "आई कुठे काय करते", ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
संजना, अनिरुद्ध आणि अरुंधती ह्या त्रिकोणामधील एकमेकांच्या नात्याचे गुंते वाढत वाढत शेवटी अनिरुद्ध आणि संजनाचे अनैतिक संबंधांचे बिंग, अरूधंतीच्या देखत फुटल्यामुळे, परमोच्च बिंदू गांठलेल्या या मालिकेत खरोखर पुढे काय होणार याची उत्कंठा लागली आहे. मीही काही वेगळा नाही, त्यातून 'अरुंधती' 'अरुंधती' हे नाव त्यामुळे रोजच कानावर पडत असताना, मला अचानक लक्षात आलं, या नांवाशी माझा काहीतरी जुन्या एखाद्या आठवणीचा संबंध आहे.

सहाजिकच मला भूतकाळात थोडे डोकावून पाहावेसे वाटले आणि लक्षात आलं, मी
नागपुरहून बदली होऊन, जेव्हा चार दशकापूर्वी, मुंबईत परत आलो, त्यावेळेला नागपूरमधल्याच एका संपादकांकडून त्यांच्या 'अरुंधती' नांवाच्या मासिकासाठी चित्रपट, नाट्य अशा करमणूक क्षेत्रातील घडामोडी किंवा मुलाखती वा रसास्वाद विषयक काही लेखन नियमितपणे मी करावे असे सुचविणारे मला पत्र आले.

ही मला एक चांगली संधी वाटली आणि 'हा खेळ सावल्यांचा' हे माझे सदर त्या 'अरुंधती' मासिकात सुरू झाले. माझ्या एकंदर लेखन प्रवासाला नवी दिशा लाभली. तसे लहानपणापासून मला चित्रपटांचे प्रचंड वेड होते, मला आठवतं, किंग जाँर्ज शाळेत असताना दादरहून दर शनिवारी भारतमाता सिनेमा लालबाग, येथे असल्यामुळे
आणि तेथे मॅनेजर हे माझ्या आतेबहिणीचे यजमान असल्यामुळे, मी अधूनमधून शनिवारी शाळा सकाळची असायची किंवा दुपारची ती सुटल्यावर ट्राम किंवा बस पकडून भारत माताला जायचो. कारण आतेबहीणचे बिर्हाड थिएटरच्या मागेच होते. त्यामुळे मला शनिवारचा चित्रपट रविवारचा मॉर्निंग शो आणि पुन्हा थोडाफार दुपारचा पिक्चर बघून संध्याकाळी मी माझ्या घरी बसने येत असे, हा उपक्रम तीन-चार वर्षे तरी शाळेत असताना मी केला होता.

तेव्हापासून मला चित्रपटांचे जे वेड लागलं ते अगदी आत्तापर्यंत !. नंतर मी कॉलेजमध्ये असल्यापासून फिल्मफेअर, स्टारडस्ट इ.इ. फिल्मी नियतकालिकेच जास्त करून वाचायचो, तीही अगदी आत्ता आत्ता सत्तरीपर्यंत ! माझे इंग्रजी सुधारायला जसा Business Magazines नी हातभार लावला, तसाच ह्या फिल्मी नियतकालिकांनीही ! त्यामुळे चित्रपट, नाटक आदि एकंदर करमणूक क्षेत्राविषयी मला आवड निर्माण झाली ती कायमच. माझे ते "अरुंधती" मासिकातील नियमित सदरलेखन हा पुढील वाटचालीचा शुभारंभ होता.

त्या निमित्ताने मी नंतरही विविध मराठी मासिके, साप्ताहिके ह्यात चित्रपट नाट्य नंतर दूरदर्शन आल्यावर त्याविषयी विविध सदरलेखन तीन साडेतीन दशके करत आलो. ह्या क्षेत्रातील अनेक कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा मला योग आला. त्यापैकी दोन दिग्गज कलाकारांच्या मुलाखतींची आठवण खरोखर नोंद घेण्याजोगी आहे. कारण दोघांच्या मुलाखतीमधून त्यांचा करमणूक क्षेत्रातील सहभागाबद्दल जो विचार होता, तो खरोखर मार्गदर्शक व आदर्शवत होता. दोघांनीही मुलाखती दरम्यान योगाय़ोगाने म्हणालेले एक वाक्य माझ्या मनात अगदी ठसून गेलेले आहे. ते उदगार असे होते:

" मी व्यवसाय म्हणून ह्या करमणूक क्षेत्रात आहे, त्यामुळे माझी तब्येत आणि व्यक्तिमत्व सुदृढ उत्तम राखणं ही या क्षेत्रातील टिकाव धरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे, नव्हे ते माझे कर्तव्य आहे. त्यामुळे नियमित व्यायाम खेळ आणि आरोग्य याची काळजी घेणं याला मी प्राधान्य देतो."

खरोखर कोणत्याही क्षेत्रातील माणसांनी विचार करावा आणि अंमलात आणावा असाच हा एकंदर दृष्टिकोन नाही कां? म्हणूनच मी तो आजतागायत विसरू शकलो नाही. 'you must first ask a question, "What business you are in" हे आपल्या व्यवस्थापन क्षेत्रातील महागुरु पीटर ड्रकर ह्यांचे वाक्य आहे. ते जणू काही ह्या दोन मान्यवर कलावंतांना माहीत असल्यासारखं त्यांनी आपआपल्या जीवनात अमलात आणलं होतं. दोघांचही करमणूक क्षेत्रातील असामान्य योगदान किती प्रदीर्घ आणि दर्जेदार होतं हे वेगळं सांगायला नको.

करमणूक क्षेत्रातील माझ्या साहित्यिक
मुसाफिरीबद्दल आठवण, 'अरुंधती' या नावावरून ही जशी झाली, अगदी तशीच एक पत्रव्यवहार विषयक आठवण ज्योतिष विषयावर माझं पुढील चार दशक जे लेखन झालं त्यासंबंधीही आहे. माझा विवाह विलक्षण योगायोगाने झाल्यानंतर, कां कशी कुणास ठाऊक, मला ज्योतिषाच्या अभ्यासाची गोडी लागली. तेव्हा मी नागपूरमध्ये होतो, अकोला येथील पंचांग कर्ते राजंदेकर
यांच्या व पुण्यातील भट ह्यांच्या ज्योतिष विषयावरील पुस्तकांवरून
तसेच बंगलोरहून प्रसिध्द होणार्या "Astrological Magazine किंवा इतर काही अभ्यास करून बर्‍यापैकी
ज्योतिषाचे ज्ञान, स्वतःचे स्वतः अभ्यास करून जणु एकलव्यासारखे मी मिळवू शकलो होतो. इंजिनिअरिंगमुळे माझा गणिताचा पाया पक्का असल्यामुळे पत्रिका बनवणे, महादशा काढणे वगैरे काही मला कठीण गेले नाही.

ह्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला भरपूर काही ज्योतिषाबद्दल कळतं असं तेव्हा वाटून, मी पुण्याच्या "रोहिणी" मासिकाचे संस्थापक संपादक वसंत काणे यांना एक पत्र लिहिले की त्यांच्या मासिकातील वधुवर स्थळांना, एक उपयुक्त सेवा म्हणून पत्रिकाजुळणींचे मार्गदर्शन मी
त्यांच्यासाठी करू शकतो. त्या पत्राला, त्यांनी मला जे उत्तर पाठवले ते खरोखर मला नवी संधी देणारे ठरले. (त्यावेळेला इंटरनेट व इतर काही शीघ्र टपालसेवा नसल्यामुळे, ) त्यांनी पत्रोत्तरात लिहीले "माझी सुचना तशी चांगली आहे, परंतु व्यावहारिक दृष्ट्या, ती जमणे कठीण आहे, त्यापेक्षा तुम्ही रोहिणी मासिकासाठी ज्योतिषावर काही नियमीत मार्गदर्शक लिहित जा."

त्यानंतर "नियतीचा संकेत" ही अभ्यासपूर्ण लेखमाला मी रोहिणी मासिकात लिहीणे सुरू केले. तशीच १९७७ च्या रोहिणी दिवाळी अंकांमध्ये त्यांनी वार्षिक राशिभविष्य लिहिण्याची संधी मला दिली व नंतरही जवळ जवळ तीन दशके मी ते लेखन करत असे. त्याला नांवही मी समर्पक असेच दिले: "पुढचं पाऊल". तेव्हापासून आजतागायत, माझा ज्योतिषाचा अभ्यास आणि निमतकालिकांमध्ये राशिभविष्य लिहिणे, हा उपक्रम चालू आहे. त्यानंतर, मी व्यवस्थापनशास्त्र संख्याशास्त्र आणि ज्योतिष यांचा मिलाफ करून ग्रहबदलानुसार प्रत्येक राशीला, महत्त्वाचे ग्रह किती दिवस अनुकूल आहेत यावरून अनुकूल आधारित असे वस्तुनिष्ठ वार्षिक राशिभविष्य विकसित केले व ते उत्तरोत्तर लोकप्रिय होत आहे.

पत्र आणि त्यातून मला मिळालेल्या दोन गोष्टींच्या
संधी: "रंगांची दुनिया" करमणूक क्षेत्र आणि "नियतीचा संकेत" सारखं, वर्तमानात उद्याचा भविष्यकाळ काय?, हे आजमावणारं लेखनक्षेत्र मला खुलं झालं. ही "आठवणींची साठवण" जशी आहे, तशी मला वाटतं तुम्हालाही ती मनोरंजक वाटेल अशी आशा आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
विविध विषयांवरील, साठाहून अधिक एकसे बढकर एक.........
असे विडीओज् पहाण्यासाठी.........
माझ्या you tube वरील
moonsun grandson
चँनेलची ही लिंक......
ताबडतोब save करुन ठेवा......

https://www.youtube.com/user/SDNatu

विडीओज् आवडले,
तर शेअरही करा.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा