"वाचा आणि फुला, फुलवा-७":
"मुंगीचे महाभारत आणि दिवाळी अंक":
मी एक चोखंदळ वाचक आहे. मात्र कादंबऱ्या नाटके कथा वाचण्यापेक्षा मला व्यक्तिचित्रे आत्मचरित्रे अशा तऱ्हेचे वाचन करायला प्रामुख्याने अधिकच आवडते. त्यामधून आपल्याला अनेक जीवनांच्या चित्तथरारक कथा आणि अनुभव मिळत असतात. त्यामुळे खरोखर आत्मचरित्र वाचणे, हा एक शिकवणारा, नवी दिशा देणारा, नवी दृष्टी देणारा अनुभव असतो.
'एका मुंगीचे महाभारत' हे प्रा. गंगाधर गाडगीळ यांचे आत्मचरित्र मी वाचले होते, ह्याची आता आठवण झाली. यासंबंधी आपल्याला लक्षात येते की गाडगीळांचे जीवन म्हणजे एका धडपडणाऱ्या महत्त्वाकांक्षी माणसाची अनेक क्षेत्रातील यशस्वी, मनस्वी मुसाफिरी होय. एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा माणूस, स्वकर्तृत्वावर एक क्रांतिकारी लेखक, चतुरस्त्र धोरणी अर्थतज्ञ, साक्षेपी प्राध्यापक आणि खरोखर कार्यक्षम उत्साही संघटक, बदलत्या काळाचे यथातथ्य ज्ञान असणारा समाज सेवकही आणि व्यवस्थापन शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करणारा माणूस, प्रा. गाडगीळ यांच्या रुपाने आपल्या समोर आलेला आहे. म्हणूनच त्यांचे कर्तृत्व खरोखर कौतुकास्पद आहे.
ह्या पुस्तकामध्ये सहजसुंदर ओघवती भाषा व घडणाऱ्या घटनांच्या खरोखर मुळाशी जाऊन त्यांचा मागोवा घेण्याचे गाडगीळ यांचे वैशिष्ट्य दिसते. अशी ही माणसे, मोठी व यशस्वी कां झाली, कशी झाली हा नेहमी माझ्यासारख्या वाचकाला प्रश्न नेहमी पडतो. कदाचित उत्तर असे की, त्यांच्या अंगी काही ना काही उत्तम गुण व कौशल्य असते, परंतु त्या जोडीला कष्टाळूपणा, आपल्या एकंदर ध्येयावर निष्ठा, करू ते उत्तमच झाले पाहिजे हा अट्टाहास, त्यासाठीचे प्रयत्न आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुर्दम्य महत्त्वाकांक्षा असते.
आपण आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर काहीना काहीतरी वेगळे, उपयुक्त आणि समाजावर ठसा उमटवेल असे केलेच पाहिजे, अशी स्वप्ने, ही माणसे बघता आणि ती पूर्ण करण्यासाठी झटतात. त्यांना संधीही तशा मिळत जातात, हे जरी खरे असले, तरी कठीण प्रसंगात मार्ग काढण्याचा प्रयत्न दिसून येतो. तो खरोखर सलाम करावा असाच आहे.
'एका मुंगीचे महाभारत' असे जगावेगळे नाव देऊन गाडगीळांनी आपली प्रतिभाशक्ती किती उच्च प्रतीची आहे ते दाखवले आहे. अशा तर्हेचे आत्मचरित्र वाचून आनंद मिळतो, तो अवर्णनीयच.
आत्मचरित्रांच्या खालोखाल, मला जर दुसरं काही उत्सुकतेने मी वाचायला आवडतं आणि जे मी गेली चार दशके सातत्याने करत आलो आहे, ते म्हणजे दिवाळी अंक. ते वाचायचेच असतात. त्यातील जे जे उत्तम साहित्य असेल, त्याचा रसास्वाद घ्यायचा. ज्यांनी लेख लिहीले, त्यांना आपला प्रतिसाद द्यायचा, हा माझा एकंदर छंद राहिला आहे. त्यामुळे माझे स्वतःचे लेखनकौशल्य तर वाढत जातेच आणि थोरांशी नवीन परिचयही होऊन जातात.
दिवाळी अंक वाचायला एक वेगळीच मजा येते. त्यातील विविध विचार, माहिती व प्रसंग, व्यक्तिविशेष आणि ज्ञानाचे भांडार आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. काही स्वानुभवातील इतिहासाची नॉस्टॅल्जिक उजळणी होते. तर कधीही जे घडतंय ते घडून गेले आहे, त्यामधून उद्या काय घडू शकणार आहे, याची चाहुल लागते. नवीन कल्पना, नव्या प्रेरणा मिळण्याची ही एक अनमोल संधी असते.
कुणीतरी जवळजवळ आठ दहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर, सामग्री गोळा करून नवी दिशा, नवे मार्ग, नवे विचार व नवे अनुभव दिवाळी अंकांमधून देत असतात. आपल्याला मात्र काहीच कष्ट न करता हे सारे पंचपक्वान्नाचे साहित्यिक ताट आस्वाद घ्यायची संधी मिळत असते. मराठी संस्कृती जगताच्या जुन्या समृद्ध अशा पाऊलखुणा जपायचे काम पुष्कळ दिवाळीअंक करतात.
ह्या आनंद यात्रेला नेहमी दिवाळी संपल्यानंतर ते एक दोन महिने गेल्यानंतर सुरू होऊन, ते अगदी पुढपर्यंत हे चालू राहते तेव्हा कुठे दिवाळीअंक बनतात आणि वाचक त्याचा आस्वाद दिवाळीपासून चक्क मार्च-एप्रिल पर्यंत घेऊ शकतात. ही दिवाळी अंकांची परंपरा खरोखर भूषणास्पद आहे. हल्ली मात्र, एकीकडे दिवाळी अंकांची संख्या खूप वाढत चालली आहे, हे खरे जरी असले, तरी त्या मधलं जे साहित्य आहे ते सकस मिळतंच, असं नाही.
पुष्कळ दिवाळी अंक केवळ जाहिराती मिळवण्याकरता काढले जातात. त्यामुळे गुणवत्तेपेक्षा एकंदर आर्थिक बाब महत्त्वाची मानली जाते आणि साहित्यामध्ये रस असलेल्या रसिकांचा हिरमोड सुद्धा होऊ शकतो. कधी कधी इतके अचानक वेगळंच काहीतरी विचार करायला लावणारे दिवाळी अंकात दिले जाते, ते कळतच नाही.
कधीतरी वाचलेल्या एका दिवाळी अंकात मानवी शरीरातील अब्जावधी पेशी, गुणसूत्रे यांचे जे गुढ आहे, ते उकलून दाखवले होते. आणि असा सखोल अभ्यासक विचार हा जो लेखक करू शकतो, त्याला खरोखर माझा सलाम ! इतर प्राण्यांत आणि माणसात फरक तो हा की माणूस स्वतंत्र विचार करतो, नवनवीन कल्पना मांडून त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
नवीन कल्पना निर्माण करून त्यांचे प्रत्यक्षात काही कृतीमध्ये रूपांतर करण्याचा छंद हा मोठा मनोरंजक व आव्हान निर्माण करणारा आहे. आपल्या बुद्धीला चेतवून, जागे करून, तिच्याद्वारे नवनिर्मितीचा आनंद मिळविण्यासाठी हा छंद उपयुक्त आहे. वैयक्तिक प्रगती वा फायदा ह्या कृतीमधून होणे हा त्या छंदाचा बोनस आहे. तिथे पुढे काही पानांपर्यंत, अशा तऱ्हेचे मनातले मांडे मांडण्यासाठी जागा सोडून द्यायला हवी अशा तऱ्हेची कल्पना कृती यामागे काही निश्चित परिणामांची शक्यता आहे अशा कल्पना माझ्याही मनामध्ये अधून मधून येत असतात. काही वेळा यावर प्रत्यक्षात कृती आणणे सुरू असते. थोडक्यात कल्पना कृती हेतू परिणाम याची ही जुजबी नोंद.
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा