सोमवार, ६ एप्रिल, २०२०

"आजोबांचा बटवा-३": "निव्रुत्तीनंतरचे दिवस":


 "आजोबांचा बटवा-३":
"निव्रुत्तीनंतरचे दिवस":

ह्या सदरामध्ये मी माझ्या जीवनातल्या घटनांकडे मागे वळून पहात, विविध प्रसंगांची आठवणींची उजळणी करत आहे. त्याकरता मला माझ्या जुन्या दहा पंधरा वर्षाच्या डायर्‍या उपयोगी पडत आहेत. आज त्यातीलच एका डायरीतील एका पानावर एक नोंद मला सापडली. निवृत्तीनंतर काय काय खरोखर आपण करत आलो, त्याचे एक सुंदर चित्र या नोंदीमध्ये आहे:

"एका दिवाळी अंकात काही मान्यवरांचे आपण आपला दैनंदिन कारभार कसा करतो, याचा लेखाजोखा वाचला. माझाही दिवस मी कसा घालवतो, याचे सार, कवीराज सुरेश भटांच्या शब्दांंत असे सांगता येईल:

"रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा.
गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा!

योगायोगाने हे शब्द लिहीत असताना, टीव्हीवर एका संगीतमय कार्यक्रमात हेच गीत गायले जात होते. कमालच आहे! माझा दिवस, बरोबर सकाळी सहा वाजता 'सूरताल' या झी मराठीवरील सुमधुर गीतांच्या श्रवणाने सुरू होतो. मध्येच ई टीव्हीवरील बातम्यांचीही 'फोडणी' कानांना मिळत असते. मराठीतील एक से बढकर एक सुमधुर भावगीतांचे श्रवण करत, दिवसाची सुरुवात आनंदी व प्रसन्न होत असते. त्यानंतर अर्धा पाऊण तास मोकळ्या वातावरणात चालता-फिरता मॉर्निंग वाँक करण्यात जातो. या दोन्ही गोष्टींची आता श्वासोच्छ्वासाइतकी सवय मला जडली आहे. त्यामुळे गाणी ऐकणे व सकाळचे फिरणे हा माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य, पण एक समृद्ध भाग बनला आहे.

त्यानंतर घरी आल्यावर गरम-गरम घुटके घेत चहापान व साग्रसंगीत संपूर्ण वर्तमानपत्र वाचन करणे हे असते. एकीकडे ई टीव्हीवरील 'संवाद' हा ज्ञानप्रबोधिन करणारा कार्यक्रम, जाणीवेच्या कक्षा आणि विविध क्षेत्रातील बहुरंगी बहुढंगी माणसांच्या अनुभवाचे बोल आपल्याला खूप काही शिकवून जातात. ( ह्याच कार्यक्रमांत पूर्वी माझीही मुलाखत झाली होती ! ) त्याचबरोबर 'झी' टीव्हीवरील दैनंदिन राशीभविष्य ऐकता-ऐकता पोटोबाची सोय म्हणून सकाळचा गरम गरम नाश्ता होतो. त्यानंतर अर्धा पाऊण तास बिछान्यावर पडून आराम करण्याचा-दिवसांतील सगळ्यात महत्त्वाचा आणि 'श्रीमंत' असा काळ असतो. म्हटले तर निर्विकार, म्हटले तर काल काय केले, आज काय व केव्हा करायला हवे, याचे विचारमंथन मनात सुरू असते. ह्या 'क्षणभर विश्रांती'ला समांतर अशा, पत्नीबरोबर गप्पांची रंगतही कधीमधी अनुभवता येते- जर राब राब राबणाऱ्या पत्नीला आपल्या कामातून उसंत मिळाली तरच!

इतके सारे होता होईल तो, आपोआप दहा कधी वाजतात ते कळतच नाही. सार्‍या अवधीत जमेल तेव्हा सुचेल तसे लिहिणे व ज्योतिषाची आवड असल्याने पत्रिकांचे निरीक्षण, अभ्यासही होत असतो. दिवसाची सकाळ ही अशी विविध गोष्टीत घालवल्याने मनाला ताजेतवानेपणा व उभारी येते. त्यानंतर दाढी आंघोळ पूजा. पूजेनंतर जमला तर शारीरिक व्यायाम. खरंच हा व्यायाम करायचा संकल्प मात्र कधीही सुरू झालेला नाही, हे दुःख रोजचेच आहे. मनाला पटूनही गरज असूनही व्यायाम होत नाही, ही खंत उराशी बाळगत मी आयुष्य काढत आलो आहे. कॉम्प्युटरवर काम लेखन मेलस् पाठवणे, त्यानंतरचे दोन तीन तास जर बाहेरची निकडीची व्यावहारीक कामे करण्यात वेळ जातो. घरी येईपर्यंत साधारण एक ते दीड वाजलेला असतो. भोजन व त्यानंतर टीव्हीवरील काल रात्रीच्या मालिकांची उजळणी पहात पेपर मधील शब्दकोडे सोडवत निद्राधीन होणे.

नंतर, चार साडेचारला दुपारच्या वामकुक्षीनंतर चहापान व जमेल तसे वाचन होते. सायंकाळी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम कुठे असेल, तर बाहेर जाणे होते. नाहीतर घरीच आराम सौबरोबर गप्पा व भोजनाबरोबर रात्री साडेसात ते दहा मालिका पाहण्याची नवी "नोकरी" संपता संपता झोप कधी येते, ते समजतच नाही आणि दिवस संपतो.

त्या उलट बरोब्बर, खरोखर आदर्श असे जीवन माझी सौ. जगते असं वाटतंय. दररोज सकाळी फिरणं, थोडासा व्यायाम आणि नंतर संसारात अहर्निश कष्ट घेत, घर नीटनेटके कसे राहील, घरात योग्य वेळी सगळ्यांना वैशिष्ट्यपूर्ण खाणेपिणे करता करता ती सगळा वेळ घालवते. सर्व गोष्टी आपल्यावर जबाबदारी घेऊन कशा करता येतील हा तिचा आतापर्यंत सतत अट्टाहास राहिला आहे.

अशी शिस्तबद्ध दिनचर्या, यामुळे तब्येत ठीक राहते, घराचा गाडा कुठेही न रडता उत्तम पणे संभा पाळला जातो. नातेसंबंधही निकोप रहावेत, अशा पद्धतीने ती नातेवाईक असोत वा इतर शेजारीपाजारी वा स्नेहसंबंध असोत, त्यांच्याशी योग्य पद्धतीने आपुलकीने ती कायम वागते. त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असते आणि ती मदतसुद्धा सहजतेने करते आणि आपण काही विशेष करतो, असा बडा गहजबही करत नाही. जीवनाकडे निकोपपणे पहात, सर्वांशी मिळून मिसळून वागत, आळसाचा मागमूसही नसलेले, एक अखंड उद्योगी, वाहते सळसळते जीवन ती जगत असते-अगदी माझ्याविरुद्ध!

तिच्यामुळे आपल्यावर जवळजवळ भार कोणताही आला नाही, संसारीक कुठल्याही जबाबदार्या अंगावर पडल्या नाहीत. आपण
आपले आयुष्य आरामाचे, आळसावलेले जीवन जगण्यात (निर्लज्जपणे?) भूषण मानत आलो, हे आता माझ्या लक्षात येत आहे.

एक प्रकारे तिच्या सातत्याच्या कार्यतत्परतेमुळे आपल्यात काहीतरी योग्य बदल व्हायला हवा होता, पण त्यामुळे तसे न होता, माझ्या ऐदीपणात भरच पडत गेली हे मी विसरता कामा नये. पण आता वाटते की, काहीतरी धडा घ्यायला हवा. पूर्वीचा नोकरीमध्ये मी असताना, आपला सळसळता उत्साह व काहीना काही नेहमी नवनवे असे करत राहण्याची जिद्द पुन्हा यायला हवी. दुर्दैवाने ती लोप पावली आहे हेही खरे, पण तितकेच बरेही नव्हे. निदान पूर्वीच्या पावपट उत्साह बाळगत, काही चांगलं काम, उद्योगीपणा मी जर करू शकलो, तर माझेच त्यांत हित आहे."

आज ह्या नोंदीला एक दशक उलटूनही आता लक्षात येते, की माझे तर आहे तेच पुढे चालू आहे तर तिचा मात्र उद्योगीपणा तसाच राहिला आहे.
मी, माझी जशी मनीषा होती, तसा सुधारलो नसलो, तरी मला माझ्या मनासारखे मजेत जीवन जगता येत आहे, हेही नसे थोडके!
-------------------------

असेच शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......

wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा