रविवार, २६ एप्रिल, २०२०

"ह्रदयसंवाद-१९": "एक रोमांचक सिलसिला"!:


"ह्रदयसंवाद-१९":
"एक रोमांचक सिलसिला"!:

# सुरुवातीलाच सर्वात महत्वाचे.....
"एक रोमांचक सिलसिला":
" माझी कथा" ही जणू लक्ष वेधून घेणार्या मुखपृष्ठाप्रमाणे भासणारी एक सुवर्ण संधी, कुणालाही व्यक्त होण्यासाठी 'फेबु'वर उपलब्ध आहे. तिचा मी गेले कित्येक दिवस दररोज न चुकता लाभ घेतो आहे. जे जे पहातो, वाचतो वा अनुभवतो, त्याचा सर्वकालिक सर्वमान्य अर्थ-Concepts, लावण्याचा प्रयत्न करणारी शब्दचित्रे अथवा कधी कधी गतकाळातील स्मरणक्षणांची दर्शनचित्रे असे माझ्या कथेचे रूप राहिले आहे.

तेव्हापासून दररोज किती वाचक अथवा प्रेक्षक माझी कथा पाहतात किंवा वाचतात हे आजमावण्याचा छंदही एक कुतूहल म्हणून मला लागला आहे. मला लक्षात आले की, दर्शन चित्रे अधिक बघितली जातात, त्या मानाने शब्दचित्रे वाचणारे कमी. त्यामागील कारण, "काही वाचण्यापेक्षा, बघणे हे कदाचित कमी श्रमाचे कार्य" हे तर नव्हे?

दर्शन चित्रांबद्दल बोलायचे तर ती वेगवेगळ्या ठिकाणची आणि वेळेची अन् अनोख्या मूडमधील लक्षणीय रंगरूपातील, भावचित्रे पुनश्च येथे मांडणे, हा एक असीम आनंददायी अनुभव मला वाटत आला आहे. कारण त्यावेळचे आपले रंगरूप भावपटल किती आगळे वेगळे होते, हे जसे कळते, तसेच बदलत्या काळामध्ये माणूस कसा आमुलाग्र बदलून जातो तेही उमजते. खरोखर काळ तुम्हाला असा कसकसा अन् किती किती बदलून टाकतो हे एक गूढच आहे. त्या तुलनेत शब्दचित्रे मात्र वर्तमान काळातील मनातील स्पंदनांचे सर्जनशील प्रकटीकरण असते.

सहाजिकच, इथे दर्शनचित्र रूपाने भूतकाळ जागवला जातो, तर शब्दचित्रांच्या माध्यमातून वर्तमानाचा भविष्याची दिशा आणि वेध दाखविण्याचा, प्रयत्न माझ्याकडून होऊन जातो. हा सिलसिला खरोखर रोमांचक असाच आहे, आणि तो होता होईल तो चालूच राहणार आहे.

आशा आहे की, असेच वाढत्या संख्येने दर्शक अन् वाचक मला प्राप्त होत रहातील!

तेव्हां जरूर पहा वा वाचा, 'फेबु'वरील:
"माझी कथा" अर्थात्
"एक रोमांचक सिलसिला"!
----------------------------
# "ह्याला जीवन ऐसे नांव-१!":
जीवनाच्या रँट रेसमध्ये, माणसाला हवी हवीशी असलेली गोष्ट मिळणे, जेवढे दुरापास्त असते त्याहीपेक्षा ती गोष्ट, जेव्हा हवी त्याच वेळी मिळणे, हे महाकर्म कठीण असते.

म्हणूनच समाधानी माणसांपेक्षा, असमाधानी माणसांचेच प्राबल्य जगामध्ये जास्त असते.

आपल्याकडे जे आहे ते न बघता जे नाही त्याचाच विचार सतत करणे हे असमाधानी माणसांचे लक्षण असते.
--------------------------
# "ह्याला जीवन ऐसे नांव-२!":
नामवंत घराण्याचा मूळ पुरुष जितका धोरणी, कर्तबगार व नेत्रुत्वगुण, दूरद्रुष्टि असणारा असतो, तेवढे व तसे कार्यक्षम त्याचे नंतरचे वारसदार अभावानेच निपजतात.

राणा भीमदेवी थाटाने अशा वारसदारांनी कितीही वल्गना केल्या, तरी केव्हा ना केव्हातरी त्यांचे पितळ उघडे पडतेच.

कुठल्याही क्षेत्रातील नावाजलेल्या घराण्यांची घसरगुंडी, जरी लगेच दुसर्याच पिढीत झाली नाही, तरी तिसर्या वा चौथ्या पिढीनंतर र्हास सुरु होतो, ह्याला इतिहास साक्ष आहे.
--------------------------
# "शहाणपणाचे बोल"':

* "जे नापसंत, ते करावे बेदखल."
* "टीका करण्यापूर्वी, दुसर्याच्या नजरेतून बघावे, तसेच संभाव्य परिणाम प्रथम आजमाववावे."

*"तुम्हीच, तुमच्या जीवनाचे शिल्पकार: मानसिक स्थितीनेच आपले भवितव्य अधिक घडते. दैवी शक्ती ही मनाला फक्त तथास्तु म्हणत असावी."

* "निराशेच्या अंधकारातून नवप्रेरणेच्या उत्साही मार्गाकडे":
"जेव्हा जेव्हा सगळे रस्ते बंद होतात, त्यावेळेला काय करावे, कुठे जावे काही सुचत नाही आणि अशा वेळेला अचानक आपल्याला एक नवा मार्ग सापडतो, ज्यामुळे चैतन्याच्या, नवनिर्मितीच्या उत्साहात आपण जीवनात अर्थ भरू शकतो.
म्हणून कधीही निराश होऊ नका.

* "सौहार्दाचे परस्परसंबंध नेहमीच आवश्यक"
आपण कुणाचे भले करु शकत नसलो, तरी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, ह्याची सातत्याने दक्षता घ्यावी.

* "जीवन जगण्याचा अर्थ":
"क्षणा क्षणातच रंग भरा"!:
"जीवन म्हणजे असणे, अन् जगणे म्हणजे जीवन अर्थपूर्ण करत रहाणे, हा खराखुरा फरक.
जीवनातील जगणे, अर्थपूर्ण करण्यासाठी आपण प्रथम मनाचे दार उघडले पाहिजे.

*वेळ ही गोष्ट आपल्या हातात नसते. वेळेचा अपव्यय करून आपणच आपले खूप नुकसान करून घेत असतो. वेळेची किंमत जो जाणतो, तोच प्रगती करतो.

* आयुष्यात योगायोगाने गोष्टी घडत जातात व माणसाचे भवितव्य आकार घेत रहाते. विभिन्न प्रव्रुत्तीच्या माणसांशी जुळवून घेण्याची कलाच-Human Engineering, ज्यांना जमते, तेच यशस्वी होतात.

* जो माणूस, योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी असतो आणि परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय व तशी क्रुती करत, तोच सामान्यांतून असामान्यत्व मिळवतो.
-------------------------
# "आजचा दिवस, माझा !":
नेहमी, मी रोज सकाळी, काल काय केलं, त्याची कित्येक दिवस एका वहीत नोंद करत आलो आहे आणि आता तर अशा उपक्रमाची आवश्यकता आहे. कारण आपण वेळेचा उपयोग अधिक चांगल्या कामासाठी करू शकतो, याची जाणीव बहुदा व्हायला हवी. कारण वेळच वेळ सगळ्यांना आता उपलब्ध आहे.

ह्या संवयीमुळे, आजचा दिवस, कालच्या पेक्षा चांगला कसा करायचा, हे त्यामुळे उमजेल, रोजच रोज!
हे मी आत्ता सकाळीच लिहिले आहे.
--------------------------
# "अति तेथे माती!"
आपण आपल्याच मस्तीत, आपलेच गुणगान ऐकायला मिळावे, ह्या लालसेपोटी एखाद्या प्रवाहपतितासारखे केव्हां कसे वाहवत जातो, ते आपले आपल्यालाच कळत नाही........

कुठे थांबायचे, कसे व कां, तेच आपल्याला कळत नाही, आणि त्यातून गर्व, अहंकार इतका काही फुलतो की, अखेर आत्मनाश होणे, किती जवळ आले, ते आपल्या खिजगणतीतही नसते.......

प्रत्येकाला मर्यादा असतात. आपण आपल्या मर्यादा न ओळखता, असा अट्टाहास जर केला, तर तो सहन केला जात नाही आणि अखेरीस नकारघंटा सगळीकडून केव्हा वाजायला लागतात, ते समजतही नाही........

म्हणून जागे व्हा, जागे रहा.
लक्षात असूं द्या:
"अति तेथे माती"!
----------------------------
# विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी...
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandson

आणि मार्गदर्शन करणारे राशीभविष्य आणि अनेक उपयुक्त विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......
हा संदेश wapp grp वर शेअरही करा......

तसेच
असेच शंभराहून अधिक वाचनीय लेख
वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा