बुधवार, २८ जुलै, २०२१

"ह्रदयसंवाद-३५": "गृहिणींना शतशः सलाम !":

 "गृहिणींना शतशः सलाम !":

दररोज घरात वावरणारी गृहिणी एकापाठोपाठ एक अशी आपली कामे कशी पटापट निगुतीने आणि निमूटपणे पार पाडत असते, हे आतापर्यंत कधी माझ्या लक्षातच आले नव्हते. परंतु कोरोना महामारीच्या काळात अशीच घरातली काही निवडक कामे माझ्या अंगावर आल्यामुळे, विशेषता पाणी भरणे वगैरे, तेव्हा हे मला लक्षात आले की, आपल्यासमोर आपोआपच पुढचे पुढचे काम पुढे उभे राहते आणि ते केल्याशिवाय आपल्याला करमत नाही.

ही भावना माझ्या मनात आल्याबरोबर मला कळून चुकले की, गृहिणीही कशी मन लावून सकाळपासून रात्रीपर्यंत, समोरचे एक एक काम करून पुढच्या कामांकडे वळते, खरंच एक प्रकारची लयबद्धता त्यामध्ये आपोआप येते. मॅनेजमेंट क्लासमधील खूप वर्षांपूर्वी प्रोफेसरांनी सांगितलेले एक महत्वाचे वाक्य त्या क्षणी मला आठवले. त्यांनी म्हटले होते:

"द हाऊस वाइफ इस द बेस्ट अँड द मोस्ट ईफीशिअंट मटेरियल्स मॅनेजर इन द वर्ल्ड !"

सकाळपासून रात्री झोपेपर्यंत घरासाठी ती झटत असताना, कुठलं काम केव्हा करायचं, कोणत्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, काय काय संपलेलं आहे, वगैरे वगैरेंची नोंद ठेवून आपोआपच कधीही काहीही कमतरता भासणार नाही, अशा तऱ्हेने संपूर्ण व्यवस्था सांभाळून घर कायम समाधानी आणि आनंदी ठेवत असते. हे सारं करताना ना तिला कुठला कॉम्प्युटर लागतो, ना कुठली नोंदवही. सारे डोक्यात ठेवत, आपली जबाबदारी अचूकपणे अव्याहत आनंदाने ती पार पाडत असते. Thanks & Hats off to her.

एक संस्मरणीय आठवण":
घरातील गृहिणींबरोबर कशी वागणूक असावी, त्याचा एक आदर्श उदाहरण म्हणून, मला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या बालपणाची ही आठवण वाचल्याचे आठवते. लहानपणी ते आपल्या भावंड व वडिलांबरोबर जेवायला बसलेले असताना मुलांच्या लक्षात आलं की, भाजी काही बरोबर जमली नव्हती, खूप तिखट किंवा खूप खारट झाली होती. मुलं त्याप्रमाणे बोलायला उद्युक्त होती की, ही भाजी कशी कां झाली आहे. पण वडिलांकडे बघून ती गप्प राहिली. संपूर्ण भोजन संपेपर्यंत वडिलांनी कुठल्याही प्रकारचं आईला लागेल असं स्वयंपाकाबद्दल वा भाजीबद्दल बोलणे केले नाही. उलट आज छान स्वयंपाक झाला होता, असंच काहीसं ते बोलले.

त्यामुळे यानंतर जेव्हा मुलांनी आश्चर्य वाटून, आपल्या वडिलांना विचारलं की, असं आपण कां केलंत? तर तेव्हा त्यांनी जे सांगितलं, ते खरोखर प्रत्येकाने आपल्या घरातील प्रत्येकाने, गृहिणींची, स्त्रियांशी वागताना लक्षात ठेवावं असंच होतं ते म्हणाले "तुमची आई दररोज आपला संसार नीटनेटका करते, वा आपल्याला चांगलं वेळेवर खायला मिळावं यासाठी खूप कष्ट घेत असते. अशा वेळेला ती, तिच्या पद्धतीने मन लावून स्वयंपाक करते, एखादे दिवशी समजा भाजी बिघडली, स्वयंपाक बिघडला म्हणून आपण तिला बोलणं बरोबर नव्हे."

किती चांगले व आदर्श विचार होते, त्यांच्या वडिलांचे! पण आपण कधी हे ध्यानात ठेवतो कां, घरात वावरताना आपण कसे आपल्या घरातील स्रियांबरोबर कसे वागतो, हे ज्याचं त्याने पारखून बघावं अशी ही छोटीशी छान गोष्ट आहे.

थोडक्यात काय तर आपण समोर जे घडत असते, त्याकडे इतक्या डोळसपणे, तोपर्यंत कधी बघत नाही, जोपर्यंत आपल्याला स्वतःला तसा अनुभव येत नाहीं !

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा