मंगळवार, १३ जुलै, २०२१

"जन्मगांठ?: नव्हे, फसवाफसवीचा खेळ !":

"जन्मगांठ ?: नव्हे, फसवाफसवीचा खेळ !":

"बायको अशी हव्वी !"

कलर्स चँनेलवरील ह्या मालिकेतील डॉक्टर असलेली नायिका, जान्हवी ही, तिच्या वडीलांची शंभर एकर जमीन आपल्याला मिळवून देणारे माध्यम समजून, त्यामुळे आपल्या उद्योगसमुहाला जो रू. 350 कोटींचा प्रचंड कर्जाचा बोजा आहे, तो दूर व्हावा या कुटील हेतूने नायक विभास तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक करतो.  त्याकरिता विभास त्याच्या कुटुंबाचे आदर्श वागण्याचे जे विपरीत खेळ घडवून आणतो. कारण त्यांच्या घरी स्त्रियांना बिलकुल किंमत दिली जात नसते. जान्हवीच्या आईच्या आजारपणाचा फायदा घेऊन प्रेमाचे नाटक करून विभास जान्हवीशी विवाह करतो खरा, पण पुढे काय होते, ते या दोघांतील चित्तथरारक जुगलबंदीमधून समजते. कारण जान्हवीचे वडील देखील बेरकी असतात, म्हणूनच जमीन विकली अशी काही पुडी ते सोडून देतात. त्यामुळेच जो प्रसंग  उद्भवतो तो असा:

"अशी ही जबरदस्त जुगलबंदी !":

"बायको कशी हवी" या कलर्स वरील मालिकेमध्ये तरुण जान्हवी आणि तिचा पती विभास यांच्यामधील जुगलबंदी खरोखर चित्तथरारक होती. विभास हा एका बड्या कुटुंबातील परंतु पोकळ वासा असलेल्या परिस्थितीत, ज्यांच्यावर खूप करोडो रुपयांचे कर्ज आहे. अशा अवस्थेतील विभास त्यातून मार्ग काढण्यासाठी बँकेमध्ये गेल्यावर, जे तेथील कर्मचार्‍यांना बरोबर तसेच स्त्री असलेल्या मँनेजरबरोबर अश्लाघ्य वर्तन करतो, ते जान्हवीला बिलकूल न पटल्यामुळे ती संतापाने विभासला जे काही धडाधड बोलते, ते खरोखर अक्षरशः विखारी शब्दांचेआसूड असतात. 

तिचे प्रत्येक वाक्य हे अत्यंत समर्पक आणि जिव्हारी लागणारे असते. तिला स्त्रीयांवरील पुरुषांची मुजोरी मुळीच पसंत नसते, विभासकडून तिची तशी अपेक्षाही नसते. तिचे तोफेच्या गोळ्यांसारखे धडाधड असे वार जेव्हा होतात, तेव्हा विभास शांतपणे ते ऐकून घेतो, मध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचे असे प्रतिसाद, वाद वा भांडण करत नाही. तिचा हा क्लेशदायक मारा संपल्यानंतर, तो त्याचे स्वार्थी परंतु निश्चित असे जे काही मार्ग होते ते उघड करत, यापुढे हे रिलेशन त्याला टिकवायचेच नाही, असे तो तिला ज्या तडफेने आत्मविश्वासाने निक्षून सांगतो ते गैर असूनही बघण्यासारखे होते. 

त्याने केवळ तिच्या वडिलांच्यापाशी असलेल्या १०० एकर जमिनीमुळे, हे सारे नाटक केले होते आणि जान्हवीशी विवाह केला होता, हे तो स्पष्टपणे सांगतो. यापुढे या रिलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही, ते तोडून टाकू या असेही तो सांगतो. त्याचे स्पष्ट आणि जरी गैर वाटले तरी त्याच्या दृष्टीने बरोबर असे बोलणे हे बघून बहुदा जान्हवी गप्प होईल आणि कदाचित आपल्या वडिलांना ही  जमिन विकल्याबद्दलचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला सांगेल, अशी त्याची कदाचित अपेक्षा असावी.

परंतु ती देखील तशीच शेरास सव्वाशेर असल्यामुळे त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेते आणि बोलणे झाल्यावर हात पुढे करून Done असं तीनदा ज्या पद्धतीने म्हणते ते खरोखरच स्तिमित करण्याजोगे होते. विभास आणि जान्हवीची ही जबरदस्त जुगलबंदी खरोखर बघण्याजोगी, अनुभवण्याजोगी अशीच होती. ह्या दोन्ही कलाकारांनी ज्या पद्धतीने ती सादर केली तेही अवर्णनीय होते.

"फुलाला सुगंध मातीचा":

वरील प्रसंग हेच ध्वनीत करतो की, कोणत्याही विवाहामध्ये वर किंवा वधूकडील बाजूचा स्वतःचा असा स्वार्थ असतो. त्यामध्ये एक बाजू पुष्कळदा फसली जाते, तर दुसरी बाजू फसवली जाते. टीव्हीवरील मालिकांमध्ये, कदाचित हाच ट्रेंड बऱ्याच वेळेला दिसून येतो. "फुलाला सुगंध मातीचा" या मालिकेमध्ये चांगली शिकलेली सवरलेली अशी नायिका कीर्ती आणि केवळ आठवीपर्यंत शिकलेला केवळ स्वयंपाक करून खाद्यपदार्थ विकणारा, असा शुभम यांचा विवाह असाच फसवणुकीवर आधारलेला असतो. नवरा मुलगा शुभम खूप शिकलेला आहे अशी बातमी कीर्तीचा भाऊ तिला देतो आणि हा विवाह त्याच्या स्वार्थासाठी घडवून आणतो. म्हणजे एक बाजू फसली जाते आणि तीही शुभमच्या कुटूंबाच्या नकळत.

"सुंदरा मनामध्ये भरली":

"सुंदरा मनामध्ये भरली" मालिकेमध्ये तर विपरीतच कहाणी आहे. अभिमन्यू आणि लतिका यांची जी विचित्र अशी जोडी, जेव्हा विभक्त होते, तेव्हा संपूर्ण गांवाच्यासमोर विदारक नाट्य घडते. त्यामुळे अभिमन्यूने कशी फसवणूक केली आहे ते समस्त गांवाच्या समोर येतं. सासरे बापूंचे २० लाख रुपयांचं कर्ज डोक्यावर असल्यामुळे आणि आपल्या वडिलांच्या दबावामुळे अभिमन्यू लतिकेशी विवाह करतो. पैसे जमल्यावर कर्ज फेडूनआणि ही लतिका बापूंनी साभार परत तिच्या माहेरी करायची हा त्याचा हेतू साऱ्या साऱ्या समाजापुढे वटपौर्णिमेच्या दिवशी उघड होतो. यातून सगळ्यांना कळून चुकते की कुणाची फसवणूक झाली ते.

"जीव माझा गुंतला":

"जीव माझा गुंतला" या नव्या मालिकेतसुद्धा नायक मल्हारला, श्वेता आपल्या बहिणीची-अंतराची पत्रिका-जीच्यात काही दोष आहे आहे, ती आपली पत्रिका म्हणून देते. ह्या फसवणुकीमधून तिचा मल्हारशी विवाह होण्याचे घाटते. मालिकेत पुढे काय होईल माहित नाही. परंतु पत्रिकांची ही अशी फसवाफसवी हासुध्दा जन्मगांठ जुळवितानाचा एक भयानक प्रकार.

"आई कुठे काय करते":

एवढेच काय,  सध्या गाजत असलेल्या "आई कुठे काय करते" या मालिकेतसुद्धा, झोपेच्या गोळ्या घेण्याचे, जीव देण्याचे खोटे नाटक करून अंकिता अभिषेकचा, त्याला आवडणार्या अनघाबरोबर ठरलेला साखरपुडा काय मोडते आणि त्याला आपल्याशी विवाह करायला भाग काय पाडते ! दुर्दैवाने त्या कूटील कारस्थानामध्ये अभिषेकचे वडील अनिरुद्धदेखील सामील असणे, याला काय म्हणायचे ? 

"जन्मगांठ ?: नव्हे, फसवा फसवीचा खेळ !":

वास्तव जीवनांतही फसवाफसवी हा जन्मगांठी जुळवितानाचा स्थायीभाव आहे की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती असते. हे वरचे सारे मालिकामधील प्रसंग आणि कथानक, वास्तव जीवनातसुद्धा असेच अनुभव पदोपदी येत असलेले पुष्कळदा आढळून येतात, हे दुर्दैव. सहाजिकच मनाविरुद्ध सहजीवनाचे नाटक आणि त्यामधील ताणतणाव सहन करत, किती जोडपी जीवन कंठत असतात, कोण जाणे ! एकाचा स्वार्थ, हा दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत होतो, हे कोणी मुळी लक्षातच घेत नाही आणि फसवणूकीची ही वाटचाल अनेकानेक जन्मगांठीमधून कायम चालू रहाते. हे निकोप समाजाचे लक्षण निश्चितच नव्हे.

धन्यवाद 

सुधाकर नातू.

ता.क.

वैविध्यपूर्ण वाचनीय मजकूर  देणारे चित्रपट रंगभूमी,टेलिव्हिजन,राजकारण, व्यवस्थापनशास्र आणि ज्योतिष अशा विविध विषयांवरील सुमारे 300 लेख आजपर्यंत, केवळ चार वर्षात, माझ्या ब्लॉगवर मी लिहीले आहेत. उत्तरोत्तर हा ब्लॉग चांगला लोकप्रिय होत आहे. त्याची लिंक:

https://moonsungrandson.blogspot.com

क्रुपया ही लिंकही आपल्या स्नेहवर्तुळांत शेअर करावी. आपल्याला कोणत्या विषयांवरील लेख वाचावेसे वाटतात, ते आपण मला, प्रतिसादात जरूर कळवावे. 

धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा