शनिवार, १७ जुलै, २०२१

"मुशाफिरी-अनुभव आणि कल्पनांची भरारी !":

 "मुशाफिरी-अनुभव आणि कल्पनांची भरारी !":

👍👍
"मानाचा मुजरा-'शहेनशहा'ला !":
आमच्या पिढीचे दोन आदर्श म्हणजे दिलीपकुमार आणि देव आनंद. प्रत्येक तरुण त्यावेळेला आपापल्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेशा, आवडीनिवडीप्रमाणे त्यातील एकाला आपला हिरो समजायचे. त्यातील 'शहेनशहा' दिलीपकुमार हा माझ्या कायम लक्षात राहिलेला, एकमेवाद्वितीय असा अभिनयसम्राट होता यात वाद नाही.

आज त्याच्याबद्दल गेल्या रविवारच्या महाराष्ट्र टाईम्समधील प्रभा गणोरकर यांचा दिलीपकुमार वरील, "एकमेवाद्वितीय" हा अप्रतिम लेख अथपासून इतिपर्यंत वाचल्यावर, माझ्या जुन्या अनेक स्मृती जागृत झाल्या. या लेखात त्यांनी दिलीपकुमारच्या वेधक वेचक अशा मोजक्‍याच चित्रपटातील भूमिकांचा यथातथ्य ऊहापोह करून, त्याची अभिनय वैशिष्ट्ये आणि त्या त्या भूमिकेतील खास बारकावे, असे काही जीवंतपणे समोर उभे केले आहेत की, त्यांना तोड नाही. भरीस भर म्हणून, त्या गाजलेल्या चित्रपटांतील नादमधूर अर्थपूर्ण गीताचा चपखल उहापोह करून, संगीतमय अशा एका त्यावेळच्या 'गोल्डन मेलोडी' काळाला जागे केले आहे. त्या चित्रपटांची ही मांदियाळीच पहा"
दीदार, देवदास, अंदाज, मुगले आजम, मेला, तराना, नया दौर, राम और श्याम आणि शक्ती, सौदागर...

तो लेख केव्हा वाचून संपला ते मला कळलेच नाही आणि मी अक्षरशः भारावून गेलो. सहाजिकच माझे हात स्मार्ट फोन मधील "यु ट्युब" कडे वळले आणि एकाहून एक सरस अशी मधुर गीते असलेल्या 'दीदार' चित्रपटांची गाणी मला ऐकावीशी वाटली. त्यामधील "ओ ओ, बचपन के दिन भुला ना देना" हे गीत तर आम्ही त्या काळात स्वतः गुणगुणत होतो. प्रत्यक्ष सुरेल गीते आणि त्यांचा समोरचा चित्रमय असा आभास बघताना,अक्षरशः काळ हरवल्यासारखे वाटले.

हिंदी चित्रपटातील ह्या एकमेवाद्वितीय 'शहेनशहा'ला शतशः सलाम !
-------------------------------------
👍👍
"वाचा आणि विचार करा !":

Whatsapp वरून 'आलेला' संदेश वा विडीओ क्वचित आँडीओ क्लिप (कधी कधी न पहाता/वाचता ) पुढे ढकलण्याचा उद्योग अव्याहत चाललेला असतो. लांबलचक मजकूराचे संदेश फक्त नजरेखालून घालून पुष्कळदा डिलीटही केले जातात. मात्र प्रश्न आहे पुढे ढकललेल्या विडीओज् बद्दलचा.

विडीओज् पुढे पाठवताना त्यांची यथोचित ओळख करून देणार्या मजकूराचे संदेश त्याबरोबर पाठवणे अत्यंत गरजेचे नाही कां? कारण त्यामुळे ते उघडून पहायचे की नाही हे जसे ठरविता येईल आणि पहिलेच तर अधिक योग्य तऱ्हेने समजतील. पण हे कुणी लक्षातच घेत नाही आणि मोबाईलमध्ये अनेकानेक विडीओज् चा कचरा जमा तर होतोच, शिवाय (अनावश्यक) मोबाईल डेटाही खर्च होतो.

ह्या अनुभवामुळे मी तरी शक्यतो तशी ओळख करून देणारा संदेश पुढे पाठवावयाच्या विडीओबरोबर धाडणार आहे. सहाजिकच विडीओचा रसास्वाद बनवण्याची किमया तर साधली जाईलच, शिवाय आपोआपच उगाचच 'आला-पुढे ढकलला' ही चुकीची संवयही त्यामुळे बंद होईल.

बघा, विचार करा आणि आजपासूनच तशी पद्धत कसोशीने अंगिकारा.

--------------------------------------
👍👍

"कल्पनांची भरारी !

# काही वर्षांपूर्वी पूर्वी मी एका मराठी नियतकालिकात 'प्रगतीची क्षितिजे' या नावाचे एक सदर लिहीत असे. त्यामध्ये मी नवनवीन काही संकल्पना सुचवत असे.

# मला आठवते जाहिरात व्यवसाय उत्तरोत्तर महत्त्वाचा होत जाईल आणि आपण जे कपडे घालतो त्यावरही जाहिराती छापून, लोक अशा तऱ्हेचे कपडे घालून वावरतील, असे एका लेखात लिहिले होते. आज ती संकल्पना प्रत्यक्षात आलेली दिसते, जेव्हा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू त्यांच्या गणवेषांवर जाहिराती मिरवताना आपण पाहतो तेव्हा.

# दुसरी एक अफलातून संकल्पना त्या वेळेला माझ्या मनात रस्त्यावरील एकंदर ट्रॅफिक जँममुळे मनात आली होती. (अर्थात आता तर ट्रॅफिक जॅम एवढा भयंकर असह्य झाला आहे.) त्यावेळेला एका लेखात मी कल्पना मांडली होती की, आपण ज्या मोटारीत आहोत ती जर उडवता आली तर किती बहार होईल ! आपोआप ट्रँफिक कोंडीमधून आपण बाहेर पडून, पाहिजे त्या ठिकाणी लवकर आपल्याला जाता येईल. ती त्यावेळेला अक्षरशः वेडगळ कल्पना होती. कदाचित तुमच्याही मनात आजकाल प्रवास करताना तसं काही येतही असेल.

# आज हे आठवायला पुढे पाठवलेली एक व्हिडिओ क्लिप पहायला मिळाली:ज्यामध्ये जगात प्रथमच मोटार हवेतून विमानाने सारखी उडताना दाखवली होती !:
---------------------------------
👍👍
"प्रभावी बोलणे ही एक कला आहे.":
[ ] आपल्या मनामध्ये जे ईप्सित आहे, समोरच्याकडून आपल्याला काही करून घ्यायचंय वा आपल्याला त्याला काही सांगायचं असतं, तेव्हा आपल्या मनामध्ये निश्चित अशी रूपरेखा असली पाहिजे आणि ती योग्य शब्दात समोरच्याला सांगता आली पाहिजे, तरच तुम्ही प्रभावी संवाद करू शकता. त्यामुळे आपल्या बोलण्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत आहे, ते समोरच्याच्या डोक्यात उतरवू शकता, मात्र त्याप्रमाणे कृती करायची की नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती प्रभावीपणे स्पष्टपणे पारदर्शकपणे त्याला समजेल अशा शब्दांत माहिती वा तुमचा हेतू त्याला सांगू शकता, त्यावर तुमच्या संभाषणाचा योग्यायोग्य परिणाम अवलंबून असतो.
--------------------------------
👍👍
"अनुभवाचे बोल":
# आपल्याजवळ नाही त्याची चिंता करण्यापेक्षा आपल्या जवळ जे आहे त्यामध्ये समाधान मानावे जी परिस्थिती आपल्या वर आली आहे ती गोड मानून नेहमी आपला पुढचा मार्ग चालत राहावे.

# ज्या गोष्टी बदलणे आपल्या हातात नाही त्यांच्याबद्दल जास्त विचार करणे किंवा त्या बदलण्याचा अट्टाहास करणे सोडून देऊन आपण ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्यावर जर आपण लक्ष केंद्रित केले तर बरीशी दुःखे कमी होतील.

# नको त्या गोष्टी चिंता करण्यापेक्षा आज आत्ता काय आपण आनंदासाठी समाधानासाठी करू शकतो आणि आजचा दिवस आपल्यासाठी गोड करू शकतो त्याचा सतत विचार करत राहून त्याप्रमाणे वागावे.
-------------------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण वाचनीय लेख
वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा