मंगळवार, २७ जुलै, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-भाग ४": "असामान्य, प्रेरणादायी गरुडभरारी !":

 "वाचा, फुला आणि फुलवा-भाग ४": "असामान्य, प्रेरणादायी गरुडभरारी !":

'कोरोना'च्या महामारीच्या लाँकडाउनच्या काळात लायब्ररीमध्ये अर्थात वाचनालयामध्ये जाणं अशक्य झाल्यामुळे, वाचनाचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला असताना, मला माझ्या मुलाने निवडक दिवाळीअंक संच सप्रेम भेट म्हणून पाठवला. शिवाय एका स्नेही संस्थेने देखील 5 दिवाळी अंकांचा संच मला पाठवला. त्यामुळे दहा ते बारा दिवाळी अंक माझ्याकडे वाचनासाठी जमा झाले आणि ते मला वाचायला बरेच दिवस पुरले. त्यानंतरच्या काळात अचानक परत माझ्या मुलानेच काही पुस्तके ऑनलाईन ऑर्डर करून पाठवली.

त्यामुळे मला पुन्हा वाचन अधून-मधून करता येऊ लागले आणि मी ती पुस्तके एकामागोमाग एक वाचत गेलो. त्या मध्येच अचानक बाजूला तसं पडलेलं, "आधुनिक स्फूर्तीगाथा" हे छोटंसं पुस्तक माझ्या नजरेत आलं. त्याचं नांवही मोठे उत्साहवर्धक होत. आधीच मला चरित्रात्मक पुस्तक वाचायला आवडतात, कारण त्यामधून आपण वेगवेगळ्या जीवनांच्या जणु कादंबर्‍या वाचू शकतो. सहाजिकच मी ते पुस्तक वाचून संपवले.

पूर्वी 'इसापनिती' च्या बोधकथा, आपण बालपणी किंवा उभरत्या वयात वाचल्या असतीलच. त्यामध्ये पशु, पक्षी यांच्या सहाय्याने इसापने योग्य ते समंजस मार्गदर्शन केलेले आपल्याला आढळते. त्यावरून व्यावहारिक जीवनात शहाणपणानं वागायचं कसं, हे समजत असे, किंवा दुसरं जर उदाहरण घ्यायचं झालं तर, आपल्या पुराणात दशावतारांची कथा आहे. दहा विविध सजीव रूपात परमेश्वराने जगावरील संकटे कशी दूर केली त्याचे स्फूर्तिदायी चित्र आपण नेहमीच आठवत राहिलो आहोत. डार्विनच्या सिद्धांताला-Survival of the fittest, द्वारे सजीवांची जलचर उभयचर ते भूचर अशी उत्क्रांती झाली, त्याची आठवण करून देणारे हे दशावतार.

"आधुनिक स्फूर्तिकथा"
(लेखिका: श्रुती पानसे, समकालीन प्रकाशन)

"आधुनिक स्फूर्तिकथा" हे देखील अशाच आधुनिक दशावतारांचे चित्र आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज अशा मंडळींचा जीवनपट मोजक्या शब्दात आणि प्रत्येक सेलिब्रिटीचे त्या त्या क्षेत्रातील समाजोपयोगी योगदान ह्या अप्रतिम वाचनीय मार्गदर्शक पुस्तकात मांडलेले आहे. सुरवातीचीच 'बीज पेरणी' किती प्रत्ययकारी आहे, ते पहा:

"प्रत्येकाचं स्वतःचं असं खास स्वप्न असतं, मोठं झालं की काय व्हायचं, हे जणू काही प्रत्येकाचं ठरून गेलेलं असतं जे मनात असतं ते प्रत्यक्षात आणणं प्रत्येकाला जमतेच असे नाही पण जमतील तेवढे प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. काहींची स्वप्न छोटी असतात तर काहींनी खूप मोठी स्वप्न बघितलेली असतात. स्वप्न छोटी असोत अथवा मोठी असोत, ती पूर्ण करायची असली तर खूप प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो, चिकाटी अंगी बाणवावी लागते, बुद्धी तेज करावी लागते. स्वतःच्या क्षमता सर्वार्थाने वाढवाव्या लागतात, दृष्टीचा पल्ला वाढवावा लागतो, स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची सवय लावावी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वप्न अपडेट करावी लागतात, एक स्वप्न प्रत्यक्षात आलं की आणखी भव्य स्वप्न पहायला शिकावं लागतं.

मोठ्या माणसांच्या चरित्रावरून नजर फिरवली की, लक्षात असतं की, त्याने आपल्या आयुष्यात या गोष्टी सहजासहजी मिळवलेल्या नसतात. स्वतःतील क्षमतांचा बुद्धीचा अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत असतात, पडत, धडपडत ते उत्तम स्थानावर पोहोचलेले असतात. या पुस्तकात ज्या निवडक दहा व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाची जडणघडणीची आणि कार्याची ओळख करून दिली आहे. त्या साऱ्यांच्या आयुष्यात या सूत्राचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं."

"एकसे बढकर एक दिग्गज":
भारतरत्न व भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती श्री नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी, बंगाली लेखिका-समाजसेविका महाश्वेतादेवी, तळागाळातील मजूर गरिब स्रियांच्या पुनरुज्जीवनासाठी 'सेवा' या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक इला भट,
राजस्थानमधील दुष्काळावर-पाणी समस्येवर यशस्वी मार्ग काढणारे राजेंद्र सिंह, त्याचबरोबर डॉ एम एस स्वामीनाथन, ज्यांनी शेतीमध्ये आमूलाग्र क्रांती घडवून आणली आणि भारतात हरितक्रांती घडवत भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी असामान्य योगदान दिले,

"अमूल" या संस्थेद्वारे दुधउत्पादन क्षेत्रामध्ये भारताला जगात अग्र स्थानावर नेऊन पोहोचवणारे डॉ वर्गीस कुरीयन, याच बरोबर अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते डॉ अमर्त्य सेन आणि धडाडीच्या पोलीस महिला पोलीस अधिकारी किरण बेदी- ज्यांनी तिहार जेलचा कायापालट केला, अशा महान व्यक्तींच्या यशोगाथा थक्क करणार्या आहेत. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील ही दैदिप्यमान मांदियाळी व त्यांची सामान्यांतून असामान्यत्व गांठणारी गुणसंपन्नतेची, अद्वितीय योगदानाची गरुडभरारी खरोखरच अदभूत आहे.

लहान थोरांनी मनापासून वाचावे आणि त्या त्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवनाचे अंतर्मुख होऊन मूल्यमापन करावे असे हे पुस्तक आहे. त्यामधून जर धडा घ्यायचा असेल तर तो हा की "आपणही आपल्यातील गुणवत्ता विकसित करून, आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी, आपल्या आवडीच्या, कोणत्याही क्षेत्रात काहीना काही हितकारक योगदान केले तर उत्तम" हाच.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण वाचनीय लेख
वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा