बुधवार, १४ जुलै, २०२१

"फिरूनी नवीन जन्मेन मी-अर्थात् कर्म सिद्धांत !":

 "फिरूनी नवीन जन्मेन मी":

"कर्म सिद्धांताचा मतितार्थ":

सध्या मी श्री. हिराभाई ठक्कर यांचं कर्म सिद्धांतावरचे पुस्तक वाचत आहे. त्यामध्ये मला जे उमजले ते थोडक्यात सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी ह्या छोट्या लेखात करणार आहे. 

# जन्ममृत्यू पुनर्जन्म, ही मोक्ष मिळेपर्यंतची एक प्रक्रिया आहे. मोक्ष म्हणजे जन्म म्रुत्युच्या फेर्यांतून मुक्तता. आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे आपण जन्म घेतो आणि त्यानंतर मृत्यू पावल्यानंतर, आपल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांचा जो जमाखर्च असतो, त्यानुसार आपल्याला पुन्हा जन्म मिळतो. 

# "कर्म आणि त्याचे प्रकार":

आपण जन्मापासून काही ना काहीतरी कृती अथवा कर्म सतत करत असतो. कर्मांचे तीन प्रकार आहेत: 

एक: क्रियमाण कर्म 

दोन: संचित कर्म 

आणि तीन: प्रारब्ध कर्म. 

# क्रियमाण कर्म हे असे कर्म की, ज्याचे फळ ताबडतोब मिळते. आपण एकामागोमाग एक दुसरे कार्य किंवा कृत्य करत जातो. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जी काही कृत्य करतो, त्या सर्वांना क्रियमाण कर्म म्हणतात. ही क्रियमाण कर्मे केल्यावर ती करणाऱ्याला फळ देतात. थोडक्यात प्रत्येक क्रियमाण कर्म फलद्रूप होते व फळ देऊन मगच आपल्याला त्या कर्मापासून मुक्ती मिळते. 

# संचित कर्म म्हणजे असे कर्म की, त्याचे फळ लगेच मिळत नाही, त्या करता काही काळ थांबायला लागते. उदाहरणार्थ परीक्षेचा पेपर लिहिला तरी त्याचे फळ मिळायला रिझल्ट येईपर्यंत वाट बघावी लागते. त्याचप्रमाणे आपण अशा अनेक कृती वा कर्मे करत जातो. उदाहरणार्थ माता-पित्यांना दुःख दिले, तर तुमच्या वृद्धावस्थेत त्याचे फळ तुम्हाला मिळू शकते.

# काही क्रियमाण कर्मे तात्कालिक फळे देत नाहीत, परंतु कालांतराने ती जेव्हा पक्व होतात तेव्हा तुम्हाला वेळ देऊन शांत समाप्त होतात. तो पर्यंत ही संचित कर्म म्हणून तुमच्या खाती जमा राहतात.  म्रुत्यु समयी, जीवनामध्ये अशी अनेक फलद्रुप न होऊ शकलेली संचित कर्मे, म्हणून त्याचे खातेवहीत जमा म्हणून, पुढील जन्मात भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली असतात.

# प्रारब्ध कर्म म्हणजे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते, त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. अशा रीतीने जन्मजन्मांतरांत संचित कर्मांचे असंख्य हिमालय पर्वताएवढे पर्वत तुमच्या खात्यात जमा झालेले असतात. मृत्यूसमयी जी अशी फळे पक्व होतात, तशीच संचितात जमा होतात. ती पुढच्या जन्मात जेव्हा परिपक्व होतात, त्या वेळेला त्यांचे फळ मिळते. 

# थोडक्यात कर्म केलं की त्याचे जे फळ आहे, निश्चित आहे आणि ते तुमचे तुम्हालाच ह्या भूतलावर ह्या जन्मात नाही, तर पुढच्या जन्मात भोगायला लागतेच लागते. म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी दहावेळा नव्हे, हजार वेळा विचार करावा. कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर उद्या, भोगलेच पाहिजे हा स्रुष्टीचा अलिखित नियम आहे, एवढे लक्षात ठेवावे.

# सारांश, आपल्यामुळे दुसर्‍याचे नुकसान कधी होऊ नये, एवढे जरी व्रत, तुम्ही निष्ठेने जीवनामध्ये पाळले तर तुमच्याकडून अनिष्ट अशी कार्ये होणार नाहीत. त्याउलट शक्यतोवर आपल्यामुळे इतरांना काहीतरी हितकारक असे लाभ होऊ शकतील, अशा तऱ्हेचे जर तुम्ही प्रयत्न केलेत, तर तुमच्या पदरी चांगली कर्मे केल्याचे फळ मिळू शकते. 

विज्ञानाचा विचार केला तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे एक्शन इज इक्वल टू रिएक्शन तो म्हणजे आपला कर्म सिद्धांत असे थोडक्यात म्हणायला काय हरकत आहे?

धन्यवाद

सुधाकर नातू

ता.क.

असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण वाचनीय लेख 

वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा