सोमवार, १९ जुलै, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-भाग २":

 "वाचा, फुला आणि फुलवा-भाग २":

"एक जुनी आठवण-पुन्हा":

मी सहज माझा टेबलमधला खण आवरत होतो आणि अचानक मला एक जुने नोटबुक दिसले. ड्रॉईंग बुक होते ते. ह्या बहुमोल ड्रॉईंग बुकची मला आठवणच गेले कित्येक वर्षे झाले नव्हती. हे ड्रॉईंग बुक म्हणजे जवळजवळ सात वर्षांपूर्वी मी एक संकल्पना प्रत्यक्षात आणली होती, तिचेच प्रत्यक्ष स्वरूप होते.

टीव्हीवरील मालिका बघून कंटाळा आला आणि मग लक्षात आलं की, आपण आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतो. तर मी ठरवलं की, रात्री रोज आठ ते नऊ प्राइम टाईम मध्ये, मालिका बघायच्या नाहीत, त्या वेळेला आपल्याला जे काही उत्तम, संग्राह्य विचारधन, वेगवेगळ्या वाचनातून मिळतं, त्याची कात्रणे एका ड्रॉईंग बुकमधील कोऱ्या कागदांवर चिटकवायची ही ती संकल्पना. तिची मला खरोखर इतकी गोडी लागली की, जवळजवळ काही दिवसातच ५० पानांचा एक अतिशय बहुमुल्य विचारधन आणि साहित्य असणारं असं ट्रेझर बुक त्यामुळे बनलं. इतक्या वर्षांनी ते गवसलं आणि लक्षात आलं मात्र, तत्क्षणी माझं "वाचा, फुला आणि फुलवा" ह्या सदर सुरू झालं. त्याचाच हा भाग दुसरा:

"विचार कसे ?":

//मनात कमीत कमी विचार यावेत. 

//जे विचार मनात येतील ते सर्व बोलून दाखवू नयेत. तारतम्याने निवड करून योग्य त्या व्यक्तीशी योग्य तेच, वेळ पाहून बोलावे.

//शक्यतो सकारात्मक, नवनिर्मितीच्या मार्गाने जाणारे विचार करावेत आणि त्याप्रमाणेच आपली कृती व्हावी.

---------------------

"सुविचार": 

# कोणाच्या तरी मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहावे. 

# केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. 

# आपल्या सुख-दुःखाचे निर्माते आपणच असतो.

# सतत नावीन्याचा ध्यास घ्यावा, काही नवे शिकण्याची आत्मसात करण्याची किमया साधत राहावे. 

# फक्त ध्येय व उद्दिष्ट मनाशी बाळगून चालत नाही, त्यासाठी अपार कष्ट हवेत. 

# आपली दुर्बलता हाच आपल्या आयुष्यातील मोठा दोष आहे. 

# कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ हवा.

# दुसऱ्याचे वाईट चिंतून वा करून, आपले कधीही भले होत नाही.

--------------------

"वाट पाहू नका !": 

@ जे जे जेव्हा घडायचे असेल, ते ते तेव्हा, केव्हाही घडू द्या. जे जेव्हा घडेल, तेव्हा तेव्हा ते खुल्या दिलाने जसेच्या तसे स्वीकारा.

@ ना खंत, ना खेद अशी वृत्ती असू द्या. 

@ वेळेच्या, घड्याळाच्या काट्यांपासून मुक्त व्हायचा प्रयत्न करा, पुष्कळसे ताणतणाव, अपेक्षांचे ओझे त्यामुळे कमी होईल वा दूर होईल.

---------------------

"मजेशीर व्याख्या:" तुम्हाला कोणती आवडली ते तुमचे तुम्हीच ठरवा:

$ अनुभव: सभ्य शब्दात मांडलेल्या चुका. 

$ मोह: जो आवरला असता, माणूस सुखी राहतो, पण जर आवरला नाही, तर अजून सुखी होतो !

$ शेजारी: तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते, तो.

$ सुखवस्तू: वस्तुस्थितीत सुख मानणारा.

# वक्तृत्व: मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना, दोन तास घोळवणे.

# लेखक: चार पानात लिहून संपणार्या गोष्टींसाठी, चारशे पानं खर्ची घालणारा.

$ फॅशन: शिंप्याच्या हातून झालेल्या चुका. 

$ पासबुक/बँकबुक: जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव-( जर भरपूर बॅलन्स असेल तर)

$ गॅलरी: वरच्या मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा.

$ लेखणी: एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन.

$ छत्री: एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ ! 

$ कॉलेज: शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे एक साधन. 

$ परीक्षा: पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ.

$ दाढी: कुरुपपणा लपवण्याचे रुबाबदार साधन. 

$ काटकसर: कंजूषपणाचे एक गोंडस नाव. 

(दैनिक चौफेर-२७/१०/१४)

---------------------

सध्या ट्रेजरबुकमधून इतके पुरे. आपणही या संकल्पनेचा जरूर विचार करा. जेव्हा शक्य असेल तेव्हा, रोज एक तास निवडून, अशा तऱ्हेची माहिती वा ज्ञान गोळा करायचा प्रयत्न करा आणि आनंद व समाधानाचे धनी व्हा.

शेवटी जाता जाता...... 

हा लेख लिहीताना 'सोमि'वर आलेला हा संदेश:

"*जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा आयुष्य सुंदर असते पण जेव्हा तुमच्यामुळे इतरांना आनंद होतो तेव्हा आयुष्य सार्थकी लागते . आपल्यामुळे कधीही कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका . हसावता नाही आलं तरी अश्रूंचे कारण बनू नका . दुसऱ्यांच्या दुवा घ्या तळतळाट नको* .

 *फक्त गरज पडल्यावर आठवण काढणाऱ्या माणसांवर कधीच रागवू नका .. कारण काही माणसं देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो*.

*संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होय . दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे . जेव्हा आपण दुसऱ्यासाठी दिवा लावतो तेव्हा आपलीही वाट उजळून निघते . फक्त माणूसकी जपायला शिका सर्व नाती आपोआप निभावली जातील*."

--------------------

धन्यवाद

सुधाकर नातू

ता.क.

असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण वाचनीय लेख 

वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा