'कोरोना' महामारीच्या सध्याच्या विचित्र काळामध्ये गेली दीड वर्ष जवळ-जवळ घरामध्ये कोंडून घेऊन एक प्रकारची कोंडी झाली आहे, एकलकोंडेपणा आला आहे. त्यामुळे दररोज त्याच त्याच प्रकारचे काम, त्याच त्याच पद्धतीचे वातावरण आणि तीच तीच माणसे सभोवती, सहाजिकच जीवनामध्ये नको इतका कंटाळवाणा एकजिनसीपणा आलेला आहे. हे जवळजवळ सगळ्याच मंडळींबाबतचे एक कटू सत्य आहे. विविध प्रकारचे मानसिक अस्वास्थ्य, नैराश्य व उद्विग्नता असे वेगवेगळे अनुभव प्रत्येकालाच येत आहेत. उद्या परवा वा पुढेही काहीच भवितव्य नाही अशा तऱ्हेची पोकळी व सर्वसाधारण मनस्थिती सगळ्यांचीच आहे.
अशा वेळेला काय करायचं, म्हणजे परत मनाला उभारी येईल असा प्रश्न कायमचा मधून मधून आपल्याला सतावत असतो. माझीही काही वेगळी परिस्थिती नाही. गेले दीड पावणे दोन वर्ष मी याच एका प्रकारच्या एकलकोंडेपणाचा अनुभव घेत आलो आहे आणि त्यामुळे करायचं काय याचा मी अधून मधून सातत्याने विचार करत आलो, इथपर्यंत येऊन पोहोचलो. त्यासंबंधीचे माझे अनुभव तुम्हाला माझ्या विविध व्हिडीओजमधून वा ध्वनिफितींमधून आणि लेखांमधून सातत्याने मी प्रदर्शित करत आलो आहे. माझे अनुभव, विचार वा कल्पना तुमच्या पुढे मांडत आलो आहे आणि हाच माझा विरंगुळा ठरत आलेला आहे. पण अखेरीस मला देखील पुन्हा तोचतोचपणाचा आता अक्षरशः कंटाळा आला आहे आणि आता काय करायचं हा प्रश्न आ वासून समोर उभा आहे. त्याचे उत्तर काढणं सोपं नसतं. अर्थात असा अनुभव मी गेल्या दीड वर्षात तीन चार वेळा तरी घेतला. दर वेळेला कुठलीतरी नवीन संकल्पना निर्माण करून त्यात मग्न होऊन काळ पुढे नेत आलो.
आता पुन्हा तशाच संभ्रमित अवस्थेत असताना, योगायोगाने मला अचानक एक चांगला लेख वाचायला मिळाला 'चतुरंग लोकसत्ताच्या पुरवणी' मध्ये, "ज्याच्या त्याच्या कॉफी बीन्स" हा तो लेख. त्या लेखामध्ये लेखिकेने-सारिका कुलकर्णी ह्यांनी, अशी कोंडी झालेल्या मनस्थितीची बाब प्रकर्षाने पुढे आणली आहे. एक उदाहरण फार चांगलं दिलं आहे: अत्तर आपल्याला सुवासिक म्हणून खूपआवडतं आणि जेव्हा आपण अत्तराची निवड करण्याकरता वेगवेगळ्या अत्तरांचे वास घ्यायला लागतो, त्या वेळेला, काही वेळाने आपले नाक काम बरोबर करत नाही आणि वास काही घेता येत नाही. ही देखील तोच तोचपणाची स्थिती असते. त्यावर बदल म्हणून आपल्याला कॉफीच्या बियांचा वास देतात, ज्यामुळे पुन्हा तुम्ही अत्तराचे वास घ्यायला मोकळे होता. असं चपखल उदाहरण घेऊन, विविध प्रकारच्या मंडळींचा बदल घडवण्याचे अनुभव लेखिकेने त्या लेखात वर्णिलेले आहेत.
"कोरोना" महासंकटात व लाँकडाउनच्या कोंडमार्यापासून, त्याच त्या वातावरणापासून सुटका म्हणून आपणही काही ना काही नित्य नवे उपाय शोधले पाहिजेत, हे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी माझी एक कल्पना अशी आहे: सोशल मीडियावर आपल्याला जसे व्हिडिओज येतात तसेच्या तसे त्या विषयांबद्दल काहीही माहिती न देता, आपण पुढे ढकलतो. यापेक्षा आपण आपल्याला भावलेल्या व्हिडिओचा नीट आस्वाद घेतल्यानंतर इतरांना तो पाठवण्यापूर्वी, त्यांना त्याची पूर्वकल्पना योग्य तऱ्हेने जर दिली तर चांगलेच. अशी मला आयडिया सुचली आणि मी ती लगेच अमलात आणली कशी ते पुढच्या दोन उदाहरणावरून तुम्हाला कळेल-एक श्री निळू फुल्यांची दूरदर्शन सह्याद्री वरील बहारदार मुलाखत व दुसरा हवेत उडणार्या मोटारगाडीचा विडीओ ! ## ( लेखाच्या शेवटी वाचा.)
ह्यामधूनच मला अजून एक नवा मार्ग सापडला, तो म्हणजे नुसते दर वेळेला ध्वनीफिती बनवा, व्हिडिओ बनवा ब्लागवर लेख लिहा, यापेक्षा सोशल मीडियावर आपण काय काय बघतो, पाहतो वा कुठे वाचतो अनुभवतो, त्यातील जर आपल्याला काही चांगलं पुढे शेअर करावं वाटलं तर त्यासाठी आपल्या कल्पनाशक्तीचा असाही उपयोग करता येईल ही नवीन संकल्पना यापुढे माझ्याकडून अमलात आणली जाईल.
दुसरी एक संकल्पना माझ्या मनामध्ये आली ती अशी की, आपण फोनवरून एखाद्या परिचिताशी, मित्राबरोबर गप्पा मारायच्या आणि त्या गप्पा रेकॉर्ड करायच्या. त्या ध्वनीफितीमध्ये जर काही चांगलं घेता वा देता येण्याजोगं असलं, तर तसा प्रयत्न करावयाचा. त्यासाठी अगोदरच संभाषण करणार्या दोघांनी तशी तयारी करायची, अशी ती संकल्पना वा आयडिया मला कशी सुचली. आकाशवाणी वर जसा "पुन्हा प्रपंच" असा लोकप्रिय कार्यक्रम असायचा तसा. ह्या संदर्भातील एक आठवण सांगतो. वर्ष-दीड वर्षापूर्वी मी "थप्पड" चित्रपट बघितल्यावर माझ्या एका तरुण परिचिताबरोबर मी फोन-संवाद साधला होता आणि तो संवाद रेकॉर्ड केल्यावर मला जाणवलं की तिथे जे रेकॉर्डिंग आहे ती ध्वनीफित सोशल मीडियावर शेअर करण्याजोगी आहे. ही नवीन संकल्पना त्या प्रयत्नासारखाच एक उपयुक्त विरंगुळा वा बदल आहे.
ह्या पुढे आधी मित्राला कल्पना देऊन परस्परांना सुलभ अशा कुठल्याही विषयावर गप्पा एकमेकांशी मारावयाच्या. त्यामधून वेगवेगळे विचार निर्माण होतील असा प्रयत्न करायचा. त्यामधून जर ध्वनिफीत एखादी चांगली जमलीच, तर ती सोशल मिडियावर शेअर करायची. म्हणजे इथे आपल्या विचार करणे, विचार घेणे, कल्पना करणे, शेअर करणं, हा जो काही आवडता छंद आहे त्याला नवा मार्ग मिळणार आहे. हीच माझी जणु काँफी बिन्स ! त्याच त्याच माहोलापासून, बदल हा असा यापुढे घडवता आला, तर घडवायचा. बघू या जमतं कां !
तुम्हीही एवढे वाचल्यावर आता तुमच्या परिस्थितीत असाच एखाद्या बदलाचा विचार करू लागला असाल. तसे जेव्हा गवसेल, तेव्हा तो बदल आम्हालाही प्रतिसादात कळू द्या.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
## १ "श्री निळू फुलेंची "एक बहारदार मुलाखत":
"यु ट्युब"वर सर्फिंग करताना कधी कधी असा एखादा अप्रतिम कार्यक्रम नजरेला येतो की बोलता सोय नाही. श्रीराम रानडे, ह्यांनी श्री. निळूभाऊ फुले यांच्या 'दूरदर्शन'वरील बहारदार मुलाखतीचा कार्यक्रम त्यातीलच एक. अचानक तो गवसला आणि न चुकता शेवटपर्यंत मी चवीने बघितला आणि खरोखर कृतकृत्य झाल्यासारखे वाटून गेले.
दिलखुलासपणे, मनमोकळ्या आणि प्रामाणिक प्रांजल गप्पांमधून निळू फुले कसे घडत गेले, अंगभूत गुणवत्ता, निरीक्षणशक्ती आणि प्रामाणिक कष्ट ह्यांचे जोरावर, यशाचे प्रतिष्ठेचे शिखर कसकसे गाठतं गेले, त्याचे चित्रमय भावचित्र आपल्याला अनुभवायला मिळते. यातील अनेक मनाजोगत्या आणि स्मरणात ठेवाव्यात अशा आठवणी देखील, मनाला अंतर्मुख करतात. शेवटी गप्पांमध्ये "आपला दिवस चांगला कसा गेला अस़ं तुम्हाला केव्हा वाटतं?" या प्रश्नाला निळूभाऊंनी दिलेले मनापासूनचे उत्तर, शिवाय "अजूनही आशेला वाव आहे, अजूनही विविध क्षेत्रात चांगली माणसं समाजासाठी, माणसांसाठी उपयुक्त काम करत आहेत" हे त्यांचे बोलही निश्चितच मनात कायम ठेवण्याजोगे आहेत.
शेवटी जाता जाता हा महत्वपूर्ण प्रश्न व त्याचे उत्तर आपण रोज दिले पाहिजे असं वाटून गेलं. तो प्रश्न अर्थातच हा:
"आपला दिवस चांगला कसा गेला अस़ं तुम्हाला केव्हा वाटतं ?"
ह्या दिलखुलास मुलाखती मुळे माझा तरी दिवस आज चांगला जात आहे, असे वाटले.
त्याकरिता तुम्हीही, जरूर पुढील चित्रफीत पहा आणि पुनःप्रत्ययाचा आनंद घ्या.
धन्यवाद.
सुधाकर नातू
## २
"हवेत भरारी घेणारी मोटरगाडीचा विडीओ":
"कल्पनांची भरारी !"
# ता.क. (मुद्दाम प्रारंभीच !):
सोशल मिडीयावर आपण पुष्कळदा आलेले काही विडीओज् तसेच्या तसे पुढे पाठवतो. त्यांच्या विषयासंबंधी थोडी ओळख करून देणे उपयुक्त ठरू शकते अशी कल्पना मनात आली म्हणून हा संदेश":
# काही वर्षांपूर्वी पूर्वी मी एका मराठी नियतकालिकात 'प्रगतीची क्षितिजे' या नावाचे एक सदर लिहीत असे. त्यामध्ये मी नवनवीन काही संकल्पना सुचवत असे.
# मला आठवते जाहिरात व्यवसाय उत्तरोत्तर महत्त्वाचा होत जाईल आणि आपण जे कपडे घालतो त्यावरही जाहिराती छापून, लोक अशा तऱ्हेचे कपडे घालून वावरतील, असे एका लेखात लिहिले होते. आज ती संकल्पना प्रत्यक्षात आलेली दिसते, जेव्हा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू त्यांच्या गणवेषांवर जाहिराती मिरवताना आपण पाहतो तेव्हा.
# दुसरी एक अफलातून संकल्पना त्या वेळेला माझ्या मनात रस्त्यावरील एकंदर ट्रॅफिक जँममुळे मनात आली होती. (अर्थात आता तर ट्रॅफिक जॅम एवढा भयंकर असह्य झाला आहे.) त्यावेळेला एका लेखात मी कल्पना मांडली होती की, आपण ज्या मोटारीत आहोत ती जर उडवता आली तर किती बहार होईल ! आपोआप ट्रँफिक कोंडीमधून आपण बाहेर पडून, पाहिजे त्या ठिकाणी लवकर आपल्याला जाता येईल. ती त्यावेळेला अक्षरशः वेडगळ कल्पना होती. कदाचित तुमच्याही मनात आजकाल प्रवास करताना तसं काही येतही असेल.
# आज हे आठवायला पुढे पाठवलेली एक व्हिडिओ क्लिप पहा: ज्यामध्ये जगात प्रथमच मोटार हवेतून विमानाने सारखी उडताना दाखवली आहे !:
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा