मंगळवार, २० जुलै, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-भाग३":

 "वाचा फुला आणि फुलवा-भाग ३": 

कधी कधी वर्तमानपत्रातदेखील उत्तम साहित्य वाचायला मिळते. आजच्या-२१जुलैच्या महाराष्ट्र टाईम्स पुरवणीमध्ये तशा वळणाचे तीन छोटेसे लेख वाचायला मिळाले. 

"जीवनात रंग भरणारी मैत्री":

त्यातील एक लेख चार मैत्रिणींच्या समूहाची काँलेजपासून वयाची साठी पार करेपर्यंतच्या पन्नास वर्षातील जीवाभावाच्या मैत्रीची वाटचाल अगदी मोजक्या शब्दात आणि बदलत जाणार्या परिस्थितीमधील वैशिष्ट्ये वर्णन करणारा होता. त्या निखळ, नितळ मैत्रीमध्ये गप्पा काय होत हे जरी आठवत नसले, तरी एकमेकांशिवाय करमत नसे हे त्यातून ध्वनित होत होते. तसेच पन्नास वर्षे उलटून गेल्यावरही वेगवेगळे स्थान बदल व वैयक्तिक जीवनातील कडू गोड घडामोडी होऊनही, अजून त्यांची मैत्री तशीच कशी दृढ आहे, त्याचा तो धांडोळा होता. 

मैत्री या विषयाचा मतितार्थ पटवणारा, ती कसकशी फुलत जाते,  योग्य ती दिशा कशी मिळते आणि त्यामध्ये एकमेकींबद्दलचा जिव्हाळा, सुखदुःखामध्ये सामील व्हायची मनापासूनची इच्छा, तसेच एकमेकींना सहाय्य देत, आवड-निवड जपत, एकमेकींना स्पेस देत, आपोआपच ती मैत्री कशी दृढ होते, याचा हा लेख म्हणजे वस्तुपाठच होता. 

"अभ्यासू समर्पित व्यक्तिमत्त्व":

दुसरा लेख, आपल्या एका प्राध्यापकांबद्दल क्रुतज्ञता व्यक्त करणारा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्ये तर त्यांत वर्णन केली होतीच, त्याचप्रमाणे त्यांचा, स्वतःच्या विषयातील जो सखोल अभ्यास आणि तो इतरांना समजावून सांगण्याची जी हातोटी होती तीसुद्धा त्या लेखामध्ये व्यवस्थितपणे उलगडली होती. कठीण विषय असूनही त्या विषयात त्यामुळे  तिची मैत्रीणही ज्ञानगंगेच्या त्या प्रवाहात सामील होत, दोघींचीही त्या विषयात प्रगती कशी झाली हे अगदीच थोडक्यात वर्णन केले होते. एखादं व्यक्तिमत्व कसं वेगळं अन् वैशिष्ट्यपूर्ण असतं ते चपखलपणे मांडणारा तो लेख अगदी छोटासा परंतु प्राध्यापकांची जीवनप्रतिमा आपल्या पुढे हुबेहूब दर्शविणारा होता.

"मुलांशी कसे वागू नये?":

स्पर्धात्मक जीवनामध्ये पालकांनी मुलांशी कसे वागू नये, याचा योग्य तो धडा देणारा, आत्मपरीक्षण करायला लावणारा तिसरा लेखही वाचनीय होता. मुलं वाढत असताना त्यांच्यासमोर आई-वडिलांची भांडणे वाद-विवाद आणि ते आपल्या आई-वडिलांना कसे वागवतात, त्याचेही चित्र जर योग्य नसेल, तर मुलांवर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो, त्या त्या लेखामध्ये सोदाहरण उलगडले होते. 

मुलांना चांगल्या संस्थेत शिक्षण देणे, त्यांना जे जे हवे ते ते मागताच पुरवणे आणि पैसा वाटेल तसा त्यांच्यावर ओतणे, म्हणजे आपले कर्तव्य पार पाडले असे समजणाऱ्या पालकांसाठी हा लेख म्हणजे अक्षरशः डोळ्यात अंजन घालणारा होता. अशा तर्‍हेच्या वातावरणात मुले वाढली की, कशी विपरीत परिस्थिती येऊ शकते, तेही समोर उभी करणारा हा सारा मजकूर निश्चितच अंतर्मुख करणारा आणि सध्याची विचित्र परिस्थिती दर्शविणारा होता. उद्याची पिढी अधिकाधिक एककल्ली, स्वार्थी आणि विधीनिषेध शून्य बनण्याचा धोका कसा "आ" वासून उभा आहे, ते बिंबविणार्या ह्या लेखाने जीवनशैलीचे आयुष्याच्या जडणघडणीतील महत्व पटविले.

वर्तमानपत्राच्या केवळ चतकोरभर पानात बेतलेले ते तीन लेख, वाचनीय, मनाला भिडणारे, तसे  कसे उत्तम लिहावे, त्यामधील बारकावे कोणते, हे सांगणारे होते. असे लेखन सगळ्यांना जमतेच असे नाही आणि तसे लेखन जमण्यासाठी पारदर्शकता, सकस जीवनानुभव व संवेदनशील मनाची भट्टी जमायला हवी, हेच यातून जाणवले. सुरुवातीपासून अखेरपर्यंत सलग वाचावा, असा हा साहित्यमेळा अनुभवायला मिळाला, तो आनंददायी होता, माझ्यासारख्या लेखनाची आवडणार्या माणसासाठी तर एक मार्गदर्शक धडा होता.

धन्यवाद

सुधाकर नातू

ता.क.

असेच तीनशेहून अधिक वैविध्यपूर्ण, वाचनीय लेख 

वाचण्यासाठी पुढील लिंक संग्रही ठेवा.....

https://moonsungrandson.blogspot.com

आपल्या स्नेहवर्तुळांत ती शेअरही करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा