मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-५": "भला जन्म हा तुला लाभला":

 "वाचा, फुला आणि फुलवा-५":


हल्ली कॅलेंडरचं अथवा दिनदर्शिकेचं एवढं काही महत्त्व उरलेलं नाही. येऊन जाऊन भिंतीवरती, एक "कालनिर्णय" असलं की झालं ! अशी किती तरी बरीच विविध कॅलेंडर्स आता निघाली आहेत. त्याकडे आपलं फक्त सण, मुहूर्त वा गरजेच्या सुट्ट्या कधी, संकष्टी विषयक माहितीसाठी
आपण फक्त प्रत्येक महिन्याचे पुढचं पान,
बघतो. त्याच्या पाठीमागच्या पानांकडे आपलं सहसा लक्षच जात नाही, असा माझा तरी अनुभव आहे.

म्हणून वर्षअखेरीस भिंतीवरुन कालनिर्णय दिनदर्शिका काढताना आणि नवीन वर्षाची दिनदर्शिका भिंतीवर लावण्यासाठी हातात घेताना, मला वाटलं बघूया तरी पाठीमागे काय काय आहे ते. आणि अहो आश्चर्यम् ! काय नव्हतं तिथे ? किती तरी विविध प्रकारची माहिती तर होतीच, शिवाय दिनमानाचे पंचांगासारखे नक्षत्र सूर्योदय इ.इ. अतिशय उपयुक्त माहिती देणारा मजकूर तिथे होता. ह्या व्यतिरिक्त, आपल्या ज्ञानात भर पाडणारे, आपल्या जाणिवांचा विस्तार करणारे, नवी दिशा जीवनाकडे बघण्यासाठी देणारे असे पुष्कळ पुष्कळ साहित्य लेखांच्या रूपात तिथे मला आढळून आले.

त्यामुळे मला खरोखर आनंद झाला. बाकी काही न करता ही पाठीमागची पाने मी मन लावून वाचली. त्या सर्व वाचनातून मला मिळालेला मोलाचा ऐवज, मी येथे तुमच्यासमोर उलगडणार आहे. मला खात्री आहे की तुम्हालाही तो आवडेल व उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे तुमच्याकडे अशा तर्हेचे जे काही कॅलेंडर-दिनदर्शिका असेल तर त्याच्याही मागची पाने वाचा आणि बघा काय काय मिळते ते.

२०२० आणि २०२१ ह्या दोन वर्षांच्या 'कालनिर्णय' दिनदर्शिकांमधून मला विशेष आवडलेल्या लेखांतून, काय गवसते ते मी ह्या लेखांत मांडण्याचा माझ्या परिने प्रयत्न करत आहे:

# झेन हा जपानी अध्यात्माचा प्रकार,
# मँस्लोचा मानवी प्रेरणा काय असते आणि जीवनाकडे माणूस कसा बघतो यासंबंधीचा एक महत्त्वपूर्ण लेख,
# याशिवाय सुख म्हणजे काय असतं याबद्दलचे अतिशय उपयुक्त असे विवेचन,
# भीतीचा आपल्या जीवनमानाशी कसा संबंध
# वेळ आणि वेळेचे महत्व यासंबंधी अतिशय डोळ्यात अंजन घालणारा असा एक लेख,
इ.इ.इ.
असे कितीतरी चांगले साहित्य वाचून मी आनंदित झालो.
त्यामधून येथे मी प्रथम सादर करतोय.....
"कालनिर्णय'२० मधील विशेष लेख-रसास्वाद":

१ "झेन आनंदाचा एक झरा"
लेखकः डॉ उल्हास कोल्हटकर
झेन हा जपानी अध्यात्माचा प्रकार काय असतो, त्याचे उदाहरणांसह सुलभ समजण्याजोग्या भाषेत उलगडा ह्या वाचनीय लेखांत केला आहे. मानसिक शांतीसाठी, मन रिकामे करुन एकाग्र चित्त करून रहाणे, हा झेनचा हेतू आहे. ते समजण्यासाठी दोन द्रुष्टांतवजा गोष्टी इथे चपखल मांडल्या आहेत.

गुरुकडे झेनची माहिती करून घ्यायला आलेल्या शिष्याला कप भरुन चहा देताना, गुरू चहा ओततच रहातो. सहाजिकच शिष्य त्यांना सांगतो की चहा ओतायचे थांबविले नाही, तर त्याला चहाच पिता येणार नाही. तेव्हा गुरू उलगडा करताना सांगतो की झेन समजण्यासाठी ही युक्ती होती. चहा ओतणे थांबविल्याविना जसा चहा पिता येणार नाही, तसेच मन जोपर्यंत रिकामे करत नाही, तोपर्यंत झेन उमजणार नाही. मनाच्या
चहाचा कप रिकामा करा !

हीच संकल्पना डोक्यावरचे ओझे घेऊन पुढे पुढे चालत जाणार्या गुरूच्या मागे मागे झेन म्हणजे काय ते समजून घ्यायला आलेल्या शिष्याची गोष्ट: डोक्यावरचे ओझे अर्थात् मनांतले विचारांचे काहूर नाहीसे केल्याशिवाय झेन शिकवता येणार नाही, असा द्रुष्टांत मनात घर करतो.
सारांश प्रथम मन पूर्ण रिकामं करा,
निर्विकार निर्विचार शांत रहा, ध्यान करा.

हे लिहीत असताना योगायोगाने, whatsapp वर हा संदेश माझ्या नजरेत आला:

"मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला 'निवृत्ती', निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा 'ज्ञानदेव', ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा 'सोपान", ज्ञान सोप्या मार्गाने गेलो की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी 'मुक्ताई', निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई ही चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था.
(नुकतीच ज्ञानेश्वरी ला सातशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली.)

झेन संकल्पनेला पूरक असेच विचार हा संदेश सांगतो.

२ "आनंदाचे डोही आनंदतरंग"
जयराज साळगांवकर
या लेखामध्ये मानवी जीवनातील अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला आहे. माणूस नेहमी आनंद, समाधान आणि शांती मिळवण्याकरता धडपडत असतो. यामागे त्याच्या मनात निर्माण होणाऱ्या गरजा, या मूळ असतात. त्या गरजा पुरवल्या गेल्या की, त्याला समाधान मिळू शकते, आनंद मिळतो. परंतु बऱ्याच वेळेला आपण आपल्याकडे काय काय नाही, याचाच विचार करतो आणि स्पर्धेमध्ये वाहवत जाऊन, दुसऱ्याकडे जे आहे ते माझ्याकडे आलंच पाहिजे या ईर्षेने धावत राहतो, धडपडत राहतो, संघर्ष करत राहतो, त्यामुळे आनंद मिळणे दूरच, परंतु जीवनामध्ये ताण तणाव व दुःखच वाढत जाते.

जे आपल्यापाशी आहे ते समाधान कारक आहे, असे एकदा मानले तर तुम्हाला आनंद मिळू शकतो. परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही. विशेषतः एलपीजी: लिबरायझेशन, प्रायव्हेटायजेशन आणि ग्लोबलायझेशन झाल्यापासून तर, जो तो पैशाच्या मागे धावत चाललाय. पण पैसा हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सुख देऊ शकतो, पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. कारण जर जास्त पैसा तर चिंता वाढतात, हे उघड आहे. त्यामुळे "ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असावे समाधान !" ही आपली पूर्वीची प्रवृत्ती होती, ती आठवते, तिलादेखील काहीतरी महत्व आहे, अर्थ आहे, हे जाणवते.

नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजेत.
त्याचप्रमाणे आपण कशापासून आनंद मिळवू शकतो, आपल्याला काय केल्यामुळे आनंद होतो, उत्साह वाढतो, त्याचा शोध घेतला पाहिजे. (अर्थात इथे वाईट व्यसने अर्थात अभिप्रेत नाहीत.) कुणाला लेखन, कोणाला गायला, कुणाला फिरायला, कुणाला खेळायला इ.इ. अशा तऱ्हेने आवडी असतात. आपली आवड शोधा, आपल्याला जे आवडतं ते, आपल्याला जे करून आनंद मिळतो ते, शक्यतोवर करायचं साधा. त्याचप्रमाणे परस्पर संबंध चांगले राहतील यासाठी धडपड करा तरच तुम्हाला आनंद मिळू शकेल.
समाधान मिळू शकेल.

"तुझे आहे तुजपाशी" त्याचप्रमाणे सुख समाधान शांती तुमच्यापाशीच आहे. मात्र त्यासाठी अतिरेक न करता Accept & Adopt असा जर तोल सांभाळलात, तर आणि आपल्या तब्येतीची काळजी घेतली, मनाने उगाचच चिंता केली नाही, तर, तुकोबा म्हणतात तसे
"आनंदाचे डोही आनंद तरंग"
"आनंदची अंग आनंदाचे !" या स्थितीला पोहोचता येईल, अशा तऱ्हेचा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा हा जो काही लेखकाने उलगडा केला आहे, तो खरोखरच प्रत्येकाने विचारात घेण्यासारखा आहे, अंगिकारायला आवश्यक आहे.

३ "वेळ त्यांना कळली हो !"
संजीव लाटकर

हा वेळेचे महत्व विशद करणारा, तसेच योग्य वेळ कोणती ते उलगडणारा लेख वाचल्यावर, मला सोमिवर मीच प्रदर्शित केलेल्या ह्या संदेशाची आठवण झाली:

"One has to face either of these " Qs every day: How to spend The TIME? or How to spare the TIME?
Which one you can answer?"

कोण कशी वेळ वापरतो की, वेळ मारुन नेतो, ते ह्या संदेशावरून समजून घेता येईल.

वेळ ही एकच गोष्ट अशी आहे की, जी गरीब-श्रीमंत लहान-थोर सगळ्या सगळ्या लोकांना समान असते. ती धरून ठेवता येत नाही किंवा मिळवता येत नाही. ती नेहमीच अव्याहत पुढे पुढे जात असते. अशा वेळेला, वेळेचे महत्त्व जे जाणतात आणि उपलब्ध वेळेचा बरोबर विनियोग करतात, तेच आयुष्यात काहीतरी सकस, भूषणावह योगदान देऊन यश मिळवू शकतात, अशा तऱ्हेचा घोषवारा, आपल्याला हा लेख वाचून समजू शकतो.

आपण नेहमी आजची करायची गोष्ट, उद्या तर उद्याची परवा, अशीच चालढकल करत असतो. कां? तर आपल्याला वाटतं, ही वेळ योग्य नव्हे आणि योग्य वेळेची आपण नाहक प्रतीक्षा करत बसतो. ही चूक कधीही करू नये, जी वेळ तुमच्या हातात आत्ता आहे, तीच आणि तीच वेळ योग्य आहे, असे समजून कामाला लागा, हाच या लेखातून मला मिळालेला संदेश किंवा मार्गदर्शन.

"जिथली गोष्ट, जिथल्या तिथे; जेव्हाचे ते तेव्हा आणि ज्याचे त्याला" या वि. आ. बुवांनी दिलेल्या चौदा अक्षरी गुरुमंत्राची देखील मला आठवण हा लेख वाचल्यावर झाली.

जे जे करू ते प्रत्येक उत्तम तऱ्हेने आणि जसे हवे तसेच करू, असा जर आपण मनाशी द्रुढ निश्चय केला, तर प्रत्येक गोष्ट योग्य त-हेने होऊन तुम्हाला जे इप्सित आहे, जे अपेक्षित आहे, ते मिळू शकेल. त्यामुळे आपण किती वेळ वापरतो आणि त्यातून निष्क्रिय वेळ किती वाया घालवतो याचा आपण नेहमी लेखजोखा घ्यायला हवा.

सकस निर्मिती जर हवी असेल, तर वेळ चांगल्या तऱ्हेने वापरावी आणि वेळ ही क्षणभंगूर आहे हे ह्या म्हणण्याला चोख उत्तर द्यावे, तसेच ह्या लेखामध्ये प्रतिपादित केले गेले आहे. इतिहासात कीर्तिरूपे आपल्यात जे लोक आज उरतात, असे अनेक थोर, मान्यवर व संस्मरणीय कां झाले, तर त्यांना वेळेचे अंतरंग कळले होते. म्हणूनच अखेरीस असेच म्हणता येईल की "वेळ त्यांना कळली हो ! जसं आपण "जीवन त्यांना कळले हो" असं म्हणतो ना अगदी तसं.

थोडक्यात, कोणतीही वेळ, ही अवेळ नसते तर समोर येणारी प्रत्येक वेळ ही योग्य समजून कामाला लागा.

४ "जो डर गया सो...."
विठ्ठल नाडकर्णी

या लेखामध्ये भीती या भावनेचा ऊहापोह केला आहे. भीती ही मूलभूत अशी व प्रत्येकात निर्माण होणारी भावना आहे. लहानपणी 'बागुलबुवा'ची भीती दाखवतात, जरा मोठे मुलं मोठी झाली की, त्यांना भूताची भीती वाटते, याप्रमाणे कुणाला कशाची भीती वाटेल, हे काही सांगता येत नाही. कुणाला पाण्याची भीती वाटते, तर कुणाला प्रवासाची भीती वाटते, विमानात बसायची भीती वाटते, याप्रमाणे भीती ही भावना तुम्हाला जन्मापासून कायम साथ करते. भीती ही सापाची देखील सर्वांनाच वाटते आणि त्यामागे कारण उत्क्रांती असू शकतो असं येथे मांडला आहे कारण पिढ्यानपिढ्या संक्रमण होत असताना भीती या भावनेचे देखील तसंच संक्रमण होत गेले असेल.

दुसरे असे की, भीती वाईट नाही, कारण जे जीव अंधाराला घाबरत नसत, ती प्रजाती नष्ट झाली. त्या उलट जे अंधाराला घाबरून कुठेतरी लपत, त्यांचा जीव वाचून ती प्रजाती उत्क्रांतीमध्ये सामील होऊन प्रगतीची पुढची पायरी
गाठत गेले, असंही येथे मांडलेले आहे. भीतीमुळे जरी काही वाईट गोष्टी होत असल्या, तरी भीतीचाही फायदा होतो, अभ्यास करायची जी काही प्रेरणा आहे ती परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळाले नाही तर काय होईल, या भीतीपोटी मुलं अभ्यास करू लागतात.

सहाजिकच भीती ही कोणाला चुकलेली नाही. या लेखाचं शीर्षक आहे ते मात्र थोडं त्या उत्क्रांती विषयी विचाराला छेद देणारं आहे कारण शीर्षक आहे:
"जो डर गया सो... तिथे पुढे, सो मर गया" हे आपल्याला अभिप्रेत असते, परंतु त्या उलट जे घाबरले ते वाचले, हे आपण उत्क्रांतीच्या बदलांमधून बघितलं. म्हणून "जो डर गया, सो बच गया" असं शीर्षक हवं !

थोडक्यात एक नवीन दिशा, भीती या विषयाला ह्या लेखाने दिली आणि भीतीशिवाय सुटका नाही कोणाचीच, हा मुद्दा आपल्याला समजून आला.

५ मँस्लोचा सिद्धांत आणि मानवी प्रेरणा
अविनाश धर्माधिकारी
माणसाच्या गरजा या मूलभूत असतात आणि मानवी जीवन हे कायम त्या गरजा पुरवल्या जाण्याची धडपड करत असते. आपण जन्म घेतल्यापासून ह्या गरजांचा जो आविष्कार वेगवेगळ्या रूपात, आपल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात होत जातो, त्यासंबंधी मँस्लो या मानववंश शास्त्रज्ञाने मानवी प्रेरणा कशा निर्माण होतात, त्यामागे गरजांचा काय हात असतो, त्यासंबंधी आपले विचार मांडले ते खरोखर अत्यंत मूलभूत आणि पटण्याजोगे आहेत.

एखाद्या पिरँमिड सारखी रचना, ज्यामध्ये मूलभूत गरजा या तळाला, त्या मूलभूत गरजा म्हणजे आपल्या शारीरिक, भौतिक, गरजा आणि त्याच प्रमाणे सुरक्षितता ह्या दोन गरजा पिरॅमिडच्या तळाला प्रत्येकाला अनुभवायला येतात. या गरजा भागल्यानंतर माणसाची भूक वाढते, आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे, आपुलकीची नाती असावीत अशा तऱ्हेने समाजामध्ये राहण्याची त्याची प्रेरणा ही तिसरी गरज निर्माण होते.

ते झाले की, माणूस अधिक प्रगती करत आपल्या स्वतःचा शोध घेत, आपण इतरांसाठी काय योगदान करू शकतो, आपला आत्मगौरव कसा होईल, लोकांना आपलं कौतुक कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत राहतो. त्या प्रेरणेने मधून ज्याला आपण आपण मोटिवेशन असे म्हणतो, ज्यामुळे माणसं नवीन नवीन काही ना काही तरी वेगळं करू पाहतात आणि ती समाजापुढे आणतात. कलाकार किंवा लेखक किंवा गायक-वादक खेळाडू त्यांच्या आगळ्यावेगळ्या कौशल्याने आत्मगौरव मिळवतात. सेलिब्रिटी हे त्यातूनच निर्माण होतात. तर ही मनुष्याची चौथी गरज.

ही आत्मगौरवाची भूक भागूनही काही जणांना एवढं सगळं जरी झालं, तरी ते पुरत नाही. यापुढे माणू, शेवटी मी कोण आहे, जीवनाचे गूढ काय, हे जग काय आहे आणि ब्रह्मतत्व काय आहे, या दृष्टीने शोध घ्यायला लागतो. आणि त्या ध्यान मेडिटेशन किंवा समाधी लावून म्हणा याप्रमाणे प्रयत्न करतो आणि अंतिम सत्याचा शोध व बोध घेऊ लागतो. ज्याला आपण आत्माविष्कार किंवा एकंदर जगतातील ब्रह्मांडाचा शोध घेत, त्याच्याशी तादात्म्य पावण्याची त्याची जी उर्मी, ती सर्वोच्च पाचवी, शेवटची गरज. अशा तऱ्हेने मँस्लोने पाच वेगवेगळ्या अशा रूपामध्ये मानवी गरजांचे छान विश्लेषण केले आहे.

खरोखर आपल्या पूर्वजांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! कारण या पार्श्वभूमीवर आपल्या पूर्वजांची आपल्याला जी देणगी आहे, ती खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. त्यांनी देखील मानवी जीवनातील प्रेरणांमागे, पंचकोश ही संकल्पना मांडली. ती मँस्लोच्या तळातून वर जाणाऱ्या गरजांच्या सिद्धांताशी, कुठे तरी जुळताना दिसते.

आपले पंचकोश आहेत: अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय.
पंचकोशाची संकल्पना खरोखर पूर्वसूरींची कमाल आहे, यात शंकाच नाही आणि त्याच प्रमाणे ती अधिक व्यापक आहे असे म्हणता येईल. याशिवाय या लेखांमध्ये एक अजून महत्त्वाचा सिद्धांत मांडला आहे, युंग ह्या शास्त्रज्ञाचा. त्याने मांडले: "सामूहिक कर्म, सामूहिक जाणीव आणि सामुहिक कर्माचे फळ त्या त्या समाजाला भोगावे लागते." आपणही मानतो की, आपल्या कर्माची फळे जशी असतात, ती भोगावी लागून, त्याप्रमाणे आपल्या जीवनातील रचना होऊन जाते.

पुनर्जन्माची कल्पना ही या अशा पूर्व जन्मातील ज्या काही कर्मांच्या फळांची पूर्तता झाली नाही किंवा त्याची फळे मिळाली नाहीत, ते प्रारब्ध घेऊन माणूस पुनश्च जन्माला येतो. ही संकल्पना, या लेखामध्ये आपल्याला आपल्या जीवनासंबंधी मूलभूत विचार करायला लावते. आपण आपल्या एकंदर जीवनमानाकडे बघितले की, त्याची सत्यता सूचित होते. मूलभूत गरजा सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणसाला आपोआप मिळाल्यासारख्या दिसतात, पण कित्येक जणांना ह्या साध्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी धडपड करावी लागते, हेही खरे.

मानवी जीवध व प्रेरणा ह्यासंबंधी एक नवी प्रगल्भ दृष्टी आपल्याला श्री अविनाश धर्माधिकारी यांच्या या लेखामुळे मिळते.

म्हणून मला सांगावेसे वाटते:
" बा मानवा, 'भला जन्म हा तुला लाभला', साहजिकच त्याचे चीज करण्यासाठी, जे जे काही घेण्यासारखे आणि देण्यासारखे आहे ते ते बघण्याची, वेचण्याची दृष्टी ठेव आणि मुक्तहस्ताने इतरांच्या हितासाठी ते वाटत राहा हाच संदेश."

ह्या पुढचा लेख कालनिर्णय'२१ मधील विशेष लेखांचा रसास्वाद.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क.
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा