रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-४":


"वाचा, फुला आणि फुलवा-४":
सोशल मीडियावर दररोज आपल्याला खूप खूप काही मिळू शकतं, फक्त त्याकरता दृष्टी हवी, विचारांची दिशा हवी आणि मोकळे मन हवे, तरच तुमच्याही असं काही ना काही पदरात पडू शकेल, हेच मला या लेखातून सांगायचे आहे......

सोशल मिडीयावरील वाचलेली ही एक पोस्ट, खरोखरच विचार करायला आणि अंगिकारायला लावणारी आहे:

"एकदा मी चालत घरी येत होतो.
रस्त्यात एका विजेच्या खांबावर एक कागद लावला होता. जवळ जाऊन बघितलं तर
त्यावर लिहिलं होतं,"ह्या रस्त्यावर काल माझी एक
पन्नास रुपयाची नोट हरवली होती. मला डोळ्यानं नीट्स दिसत नाहीये. ज्याला कोणाला पन्नास
रुपयाची नोट मिळाली असेल त्याने ती कृपया खालील पत्त्यावर आणून द्यावी.”
हे वाचल्यावर का कुणास ठाऊक त्या पत्त्यावर
जाण्याची इच्छा झाली. मी त्या पत्त्यावर गेलो, घरात कोणी आहे का, म्हणून विचारल्यावर एक म्हातारी काठीचा आधार घेत बाहेर आली.
घरात ती एकटीच राहत होती.

तिला डोळ्यानं नीट दिसत देखील नव्हतं. मी तिला म्हटलं,"आज्जी, तुमची हरवलेली ५०
रुपयाची नोट मला मिळाली, ती मी द्यायला आलो आहे." हे ऐकून ती म्हातारी रडू लागली.
म्हणाली,"बाळा,अजूनपर्यंत जवळजवळ ५०-६० लोक मला ५० रुपयाची नोट देऊन गेलेत.
मी अशिक्षित आहे. मला नीट दिसत देखील
नाही. माझी ही अशी अवस्था बघून मला मदत करण्याच्या उद्देशाने कोणी ते लिहिलंय
मला माहित नाही." खूप आग्रह केल्यावर
आज्जीने पैसे घेतले. पण मला एक विनंती
केली की,"बाळा,ते मी नाही
लिहिलंय. माझी दया आली असेल म्हणून कोणीतरी लिहिलं असेल. जातांना तू तो कागद फाडून टाक.”

मी हो म्हणून ते टाळलं खरं; पण माझं अंतर्मन मला सांगू लागलं की हेच ५०-६० लोकांना
पण तिने सांगितलं असणार. अद्याप कोणीच तो कागद फाडला नाही. ज्याने कोणी त्या वृद्ध
महिलेला मदत म्हणून हा उपाय शोधून काढला त्या व्यक्तीप्रती माझं मन कृतज्ञतेनं
भरून आलं.

एखाद्याला मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत;
पण अशा प्रकारची सेवा करण्याची कल्पना
माझ्या मनाला स्पर्शून गेली. मी देखील तो कागद न फाडता घरी गेलो. मदत करण्याचे मार्ग अनेक आहेत; फक्त कर्म करण्याची तीव्र इच्छा हवी.!

(माझ्या वाचनात whatsapp वर आलेला अनामिक लेखकाचा सुंदर लेख मनात घर करून गेला.)🙏"

कधी कधी, मला असा चकीत करणारा अनुभव येतो, की मी सोशल मिडीयावर लिहीलेल्या संदेशाला समर्पक व नवी दिशा दाखविणारा प्रतिसाद येतो. त्याचीच ही दोन उदाहरणे:
माझा सोमिवरील संदेश:

"Nobody is indispensable":
काळाच्या तात्कालिक गरजेप्रमाणे, काळाच्या ओघात, नेहमीच समर्थ पर्याय निर्माण होत असतात. Nobody is indispensable. अमूकच व्यक्ती पर्याय होईल, ह्याची कुणालाच कधीही खात्री देता येत नाही, आजवरचा इतिहास हेच सांगतो. भाबडी आशा बाळगण्याखेरीज, आपण काहीही करू शकत नाही. जे जे जसे जसे घडत रहाते, त्याचाच परीपाक उद्या घडत असतो आणि हे चक्र अव्याहतपणे चालू रहाणे हा निसर्गनियम आहे. अखेरीस, सुयोग्य परिस्थितीच अपेक्षित पर्याय पुढे आणते."

ह्यावर आलेला अंतर्मुख करणारा प्रतिसाद:
"😀 हे खरे आहे , कुठल्याही परिस्थितीला आणि व्यक्तिला चांगले वाईट पर्याय हे नक्कीच असतात आणि भविष्यात ते वेळोवेळी पुढे देखिल येतात. पण नुसते भाबडे आशावादी राहुन, वैचारिक मंथन करुन, रामभरोसे सोडुन काहीही साध्य होत नाही. काळाच्या ओघात ध्येयनिष्ठ खंबीर पर्याय आपणहुन निर्माण होत नाहीत.

त्यासाठी आपल्याला, कोणालातरी समर्पित होऊन, ध्येयाने झपाटून हातपाय मारावे लागतात. जरुर पडल्यास सर्वमान्य लाटेवर आरूढ होऊन चालु असलेला आपला सुखासीन प्रवास त्याग करून प्रवाहाच्या विरुद्ध मार्गक्रमणा करावी लागते. आणि तेच सोपे नसते. त्यासाठी दुरद्रृष्टी आणि आपल्या ध्येयाशी बांधिलकी असावी लागते. पण आपण त्याची दखल घेत नाही. किंबहुना असे काही घडते आहे याची आपल्याला कल्पनाच नसते. आपली अनास्था, अनभिज्ञता , अज्ञान, बेपर्वाई वृत्ती आणि फाजील आत्मविश्वास त्यास कारणीभूत असतो.

कोणाच्या तरी ध्येयनिष्ठेतुनच खरेतर असे असंख्य चांगले, समर्थ, समृद्ध पर्याय निर्माण होतात. यालाच सामाजिक प्रबोधन आणि क्रांती म्हणतात. यासाठी प्रसिद्धी झोतात न येता समर्पित आयुष्य जगणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्था असतात. त्यांना पदे, पैसा , श्रेय यांच्याशी काही देणेघेणे नसते. आपली ध्येये साध्य करण्यासाठी मोबदल्याची अपेक्षा न करता ते अविरत झटतात, अनंत काळ धीराने कार्यरत राहतात. समाजाला अशा दीपस्तंभांची नितांत गरज असते. आणि अशा छोट्या मोठ्या दीपस्तंभांशी जेव्हा सामान्य भोंदू लोकांची गाठ पडते तेव्हा संघर्ष अटळ असतो तसेच त्याचा निकाल देखिल निश्चित असतो. ध्येयनिष्ठावानांचा विजय हा विधिलिखित असतो."
👍🏽👍🏽✌🏽✌🏽

माझा सोमिवरील संदेश:

""म्रुगजळ !":
सध्या तरी कोणत्याही एका पक्षावर विसंबून रहाण्याजोगी परिस्थिती दिसत नाही. राजकारण हे विचार केंद्री अथवा धोरण केंद्री न रहाता, ते अधिकाधिक नेत्रुत्व केंद्री आणि पर्यायाने व्यक्ती व आत्मकेंद्री बनत चालले आहे. पक्षापेक्षा शिखर नेत्रुत्वाचे महत्व आणि त्यालाच प्राधान्य मिळत चाललेले आपण पहात आहोत. एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वच पक्षांचे अधिकार, धोरणे आणि वाटचाल शिखर नेत्रुत्व केंद्री झालेली दिसतात. पक्षांच्या तसेच दूरगामी जनहिताचे द्रुष्टिने हे असे होणे कितपत् योग्य ठरू शकेल हा एक यक्षप्रश्नच आहे.

त्रिशंकू वा आघाड्या काय दिवे लावतात अथवा एक हाती कारभारही कशी बेपर्वाई किंवा एकाधिकारशाही गाजवतो, त्याचा अनुभव गांठीशी आहेच. Benevolent, good Governance हे एक म्रुगजळच झाले आहे..............."

ह्याला आलेला,
विचारांना वेगळी दिशा दाखवणारा हा प्रतिसाद:
"😀 ६० वर्ष अराजकता शांतपणे सहन करुन आज जेव्हा उंदीर बिळातून बाहेर यायला लागले आहेत तेव्हा आपल्याला हे विचार सुचायला लागले आहेत हेच देशाचे दुर्दैव. आजवरचे नेते आणि पक्ष सत्तेत कां आले आणि त्यांनी देशासाठी, धर्मासाठी आणि स्वतःसाठी काय साध्य केले ? किती कमाई केली?"

थोडक्यात सोशल मीडियावर भाग तुम्ही कशासाठी घेता, केवळ टाईम पास हाच हेतु असला तर काहीच उपयोग नाही. पुस्तके मासिके नियतकालिके वाचून जे मिळणार नाही, ते इथे तुमच्याही पदरात पडू शकेल, फक्त ते वेचण्याची चोखंदळ जागरूकता मात्र हवी, हेच मला या लेखातून सांगायचे आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता. क.
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडून........
असेच वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........

https://moonsungrandson.blogspot.com

हा लेख पसंतीस आला तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:
moonsun grandson
With over 50 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा