गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'!-२": "चित्रदर्शन":

 "माझा सोशल मिडीयावरील 'संसार'!-२": "चित्रदर्शन":

आठवणींची गोडी मोठे गमतीशीर असते. आता सोशल मीडियावर सहभागी होऊन मला दहा वर्ष लवकरच पूर्ण होतील. त्यामुळे तेव्हापासून सोशल मीडियावर माझ्या स्वतःच्या वैचारिक कल्पना मांडायला मी सुरुवात केली.

सोशल मीडियाचा हा वैचारिक संसार सुरू केला, त्यातील निवडक वेचक-वेधक विविध विषयांवरील असे संदेश, या लेखमालेचे द्वारे मांडत आहे, त्यातील हा दुसरा प्रयत्न:

चुकभूल द्यावी घ्यावी !

"प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'":

"आनंदी गोपाळ" हा चित्रपट बघितला. पाल्हाळ न लावता, पहिलाच मुद्दा सांगतो की, हा चित्रपट इतका सर्वांगसुंदर आहे की, तो भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात यावा.

"त्या" वेळची माणसं, आणि "त्या" वेळचे वातावरण, तसेच कर्मठ समाजाची परंपरागत मनोधारणा, अशा माहोलात गोपाळराव जोशींसारख्या एका विक्षिप्त म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने, स्त्रियांच्या परावलंबित्वातून निर्माण झालेल्या अगतिकतेवर उपाय म्हणून, आपल्या बायकोला काहीही करून सुशिक्षित करावयाचे हा घेतलेला अट्टाहास, पाहिलेले ते स्वप्न, हा खरोखर जगावेगळा वेडेपणा होता. कारणपरत्वे आपले मूल योग्य तर्हेची लक्षणांची जाणीव, व सत्वर उपाय न मिळाल्यामुळे व डॉक्टर वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावले, या विषण्ण करणार्या जाणिवांतून आनंदीबाईंच्या मनात तर, भावी समाजाच्या भल्यासाठी, डॉक्टर होण्याचे स्फुल्लिंग निर्माण होते हीच बाब अतुलनीय! त्या आदर्शवत् ध्येयाचा पाठपुरावा, हे अद्वितीय जोडपे, अनेक अडचणी संकटे येऊनही कसे पूर्ण करते, त्याचे ह्रदयंगम चित्रण हा बोलपट प्रभावीपणे करतो.

अशा जीवघेण्या कसोटी पहाणार्या धडपडीमुळेच, आनंदीबाई जोशी, ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आणि तेही केवळ २२ वर्षांच्या अल्पायुष्यात, एखादी ग्रीक ट्रँजेडी शोभावी अशा दुर्देवी तर्हेने. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारा असला, तरी आजपर्यंत, ज्या ज्या स्रीयांनी विविध क्षेत्रांत, असे चाकोरीबाहेरचे 'पहिल्यात पहिले', असे योगदान दिले, त्या सार्यांची मांदियाळी रूपेरी पडद्यावर झळकते व ती पहात पहात सारे प्रेक्षक ताठ मानेने व भारावून जावून चित्रपटग्रहाबाहेर पडतात.

हा चित्रपट खरोखर उत्तम अभिनय योग्य असे संवाद आणि कार्यकारणभाव पटेल, परिणाम आणि कृती यांचा मेळ घालता येईल असे प्रसंग, त्याचबरोबर योग्य त्या पार्श्वभूमीचे चित्रण, त्या जोडीला अनुरूप असे संगीत ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रमुख योगदान अर्थातच नायक ललित प्रभाकर आणि नायिकेच्या रूपात भाग्यश्री मिनिंग यांनी दिले आहे. प्रथम पत्नीच्या सासुबाई झालेल्या श्रीमती कुलकर्णींचेही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे काम झाले आहे. एकूणच सर्वच पात्रे आपाआपली व्यक्तिरेखा चपखलपणे सादर करत असल्यामुळे, हा चित्रपट एक चविष्ट असा हवाहवासा मसाला बनलेला आहे. हे सारे घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून, श्री. समीर विद्वांस ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

उत्क्रांती हा सर्व सजीवांचा मूलभूत असा आविष्कार आहे, नव्हे त्यांची ती गरज आहे. सहाजिकच हजारो वर्षे स्त्रियांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्यावर जी परावलंबित्वाची, एक प्रकारच्या गुलामीची वेळ आली होती, ती द्रष्ट्या अशा अनेक समाजसेवकांच्या कामगिरीमुळे दूर झाली. त्यामध्ये गोपाळराव जोशी या माणसाचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
आज आपल्या भोवती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर काम करताना दिसतात. त्याचे मूळ गेल्या शतका दीडशतकातील क्रांतिकारक अशा समाजसुधारणांत आहे.

हा चित्रपट बघितल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना वाटेल की आज माझी जी परिस्थिती आहे, ती मी काही करून अधिक उत्तम बनविण्यासाठी कष्ट घेईन; तसेच पुरुषही स्वतःची प्रगती करता करता, आपल्या कुटुंबातील समस्त स्त्रीवर्गालाही, योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांना योग्य तो मार्ग दाखवत प्रगतीसाठी साधू शकतील. अशा तऱ्हेची प्रेरणा देणारा चित्रपट खरोखर दुर्मिळच! म्हणूनच सुमार चरित्रपटांच्या भाऊगर्दीत "आनंदी गोपाळ" हा चित्रपट एखाद्या कोहिनूर हीर्यासारखा मुकूटमणी म्हणून शोभतो.

धंदा कला आणि विचार अशा त्रिवेणी संगमातून निर्माण केली जाणारी करमणुकीची कलाकृती ही नेहमीच असामान्य मानली जाते. त्या तुलनेत "आनंदी गोपाळ" चित्रपटाने ह्या गुणत्रिवेणीचा यथोचित समतोल साधून, वेगळी दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले आहे. म्हणूनच पुन्हा सांगतो की, हा चित्रपट ऑस्कर मिळविण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येकाने तो बघावाच अशी माझी कळकळीची सुचना आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू.

ता.क.
हा लेख आवडला तर....
ही माझ्या ब्लॉगची लिंक शेअरही करा.....

https://moonsungrandson.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा