रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

"फेसबुकवरील 'माझं पान":

 "फेसबुकवरील 'माझं पान":

फेसबुकवर दररोज चौविस तास तेथील पोस्टींग ठेवणारी 'माझी कथा' अशी एक सोय आहे, हे मला त्या मानाने खूप उशिरा समजलं. केव्हातरी 'फेबु' उघडल्यावर मुखप्रुष्ठावर सर्फिंग करताना, फेसबुक'च्या पेजवर एका मराठी अभिनेत्रीचे दररोज वेगवेगळ्या पेहेरावातील फोटो पहायला मिळाले, आपले बदलते आधुनिक रूप अशा तऱ्हेने दाखवण्याची तो प्रयत्न दिसत होता. त्यामुळे मला समजले की ही काहीतरी फेसबुकवर 'माझी कथा' अशी खास सोय आहे, तिलाच मी भक्त ध्रुवासारखे कुणीही हलवू न शकणारे केवळ आणि केवळ माझ्याचसाठी असलेले 'माझं पान' असं समजून तिथे हजेरी लावू लागलो.

नवनिर्मिती करू इच्छिणाऱ्या माझ्या सारख्या माणसाला "सोशल मीडिया" ही एक प्रतिभाशक्तीची जोपासना करणारी जणु एक Gymnasium च आहे, असे मी समजत असल्यामुळे 'माझं पान' ही एक आव्हानात्मक संधीच होती. चांगल्यात चांगलं सर्वोत्कृष्ट असं आपलं मनातलं, येथे मी तेथे अधूनमधून शब्दरूप विचार सादर करू लागलो. तर कधीमधी प्रसंगानुरूप योग्य ती आकर्षक शीर्षके देऊन माझे छायाचित्र देऊ लागलो. पहाता पहाता "माझं पान" ही मला एक प्रेरणादायी अशी कल्पक दौड वाटू लागली.

त्यातून एकदा लक्षात आले की, इथे किती जणांनी विहीत चोवीस तासात हजेरी लावून आपली निर्मिती पाहिली, याची नोंद समजू शकते. त्यामुळे 'बेटर दँन द बेस्ट' अशा हेतूने दररोज आपल्या views चा-वाचटहजेरी संख्येचा आंकडा कसा वाढत जाईल यासाठी मी प्रयत्न करू लागलो. एकदा तुम्हाला अशी ईर्षा निर्माण झाली की उत्तरोत्तर अधिकाधिक चांगलं काहीतरी द्यावं असं वाटू लागतं.

मी स्वतः काही सेलिब्रिटी नाही. त्यामुळे माझा तो आंकडा "वाचकहजेरी" चा त्यांच्यासारखा कदाचित चार आकडी होणे अशक्य आहे, याची मला जाणीव आहे. परंतु उत्तरोत्तर माझी त्या दिशेने प्रगती सुरू आहे. प्रथम मी फक्त माझ्या स्नेह वर्तुळासाठी, फेबुवरील 'माझं पान' बघण्याची सोय उपलब्ध करून देत होतो हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आता सर्व साधारण सर्वांना अशा तर्हेची निवड मी केल्यापासून निदान तीन आंकड्यांचा मैलाचा दगड गाठण्याची वेळ कदाचित दूर नसेल. या प्रयत्नांचा अजून एक फायदा मी करून घेणार आहे. भाग घेतल्यापासूनचे इथे मी जे जे काही सादर केले, त्यातील उत्तमातील आपले उत्तम निवडून मी माझ्या आगामी दिवाळी अंकात एक लेख लिहीणार आहे.

हळूहळू मला लक्षात आले की फोटोच जास्त मंडळी बघतात. तेवढे विचार शब्दबद्ध असलेले काही वाचण्याचा त्रास सहन करत नाहीत. कदाचित यामध्ये वेळेचा चांगल्यापैकी उपयोग होऊन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आस्वाद घेता येऊ शकतो हे कारण असू शकेल. A picture is better than a thousand words असं उगाच कुणी म्हणत नाही. शब्दबद्ध संदेश हे वाचायला लागत असल्यामुळे यासाठी वेळ बुद्धी व श्रम हे आकलन करण्यासाठी अधिक लागणार हे उघड आहे. सर्वाधिक हजेरी अर्थातच माझ्या तरुणपणच्या चट्टेरीपट्टेरी धर्मेंद्र स्टाईल पँट व रंगीत फुल शर्ट व बुल्गालिन स्टाईल दाढी ठेवलेल्या चित्ताकर्षक फोटोला मिळाले आहेत.

"ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।।"

या मंत्रावरील ध्वनीफितीसंबंधी माझा जो संदेश मी माझ्या पानावर प्रसारित केला * * तो कदाचित ह्या फोटोच्या हजेरीसंख्येला पारही करेल अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे, आज मी उत्साहित होऊन, हे माझे विचार व्यक्त करत आहे. विचारगर्भ शब्दांचे सामर्थ्य त्यातून वादातीत सरस असते, हा माझ्यासाठी एक आंनंददायी अनुभव आहे.

ह्या निमित्ताने एक प्रामाणिक आवाहन असे की, आपणही वेळात वेळ काढून फेबुवरील माझ्या कथेला, नव्हे 'माझं पान' न चुकता पहाच पहा.

धन्यवाद
सुधाकर नातू

* * मंत्राविषयी 'माझं पान'वरील संदेश:
👍👍हा चिरस्मरणीय मंत्र, अर्थासह उलगडून दाखविणारी ध्वनीफित ऐकायला मला नुकतीच मिळाली. ती सादर करणाऱ्या अनाहूत व्यक्तीचे कौतुक वाटले. अभिनंदन.

तसा मी तो मंत्र अनेक वेळा आधी ऐकला होता व आपणही ऐकला असणारच. परंतु त्याचे महत्त्व आणि गांभीर्य मला आजपर्यंत समजले नव्हते. परंतु आज ज्या पद्धतीने ही ध्वनिफीत हया साऱ्या मंत्राचा आणि त्यामागचा गर्भित अर्थाचा उलगडा करते, त्यावरून ह्या मंत्राची मूलगामी महती समजली.

विश्व व विश्वातील जाणीवा असणारे आपण, ह्यांचे अव्याहत प्रवाहित रहाणार्या कालप्रवाहातील अस्तित्वाचे क्षणभंगुरत्व, अधोरेखित करणारा हा मंत्र, चिरशांतीच्या शाश्वतेचा आहे.

"देणार्याने देत जावे, देता देता,
घेणार्याने देणार्याचे हात घ्यावे.!"

सर्वांनी कायम मनात ठेवण्यासारखा हा मंत्र सध्याच्या आव्हानात्मक काळात तर नितांत आवश्यक आहे.

।। 'कालाय तस्मै: नम:'।।

ता.क.
इथपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, मी असेच वैशिष्ट्यपूर्ण लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्टला Share करायला विसरू नका.

असेच चित्ताकर्षक साहित्य आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

तसेच
अनोख्या नांवाचा माझा you tube चँनेल:

moonsun grandson

Subscribe करा....
त्याची ही लिंक उघडा....

https://youtu.be/45NFWw1_nLg

अनेक वैशिष्ट्यपूर्ण विडीओज् पहा

लिंकस् संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा