"टेलिरंजन: काही ही हं" ! भाग२:
टीव्हीवरील मालिका नेहमी तेच तेच घीसेपीटे फॉर्म्युले वापरतात असे दिसून येते.
त्यातील एक:
आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जोडीदारा बद्दल नेहमी असूया तिटकारा बाळगून, ते दोघे दूर कसे होतील, अशा तऱ्हेचे कारनामे येथील संभाव्य वा सांप्रतच्या सासूबाई नेहमी करत असताना दिसतात. उदाहरणार्थ "माझा होशील ना?" या मालिकेमध्ये आपली लाडाची मुलगी सई आणि आदित्य एकत्र येऊ नयेत आणि सईने श्रीमंत डॉक्टर सुयश पटवर्धन बरोबर लग्न करावे, म्हणून तिची आई कायम काहीना काहीतरी आटापिटा करते. शेवटी तर तिची इतकी मजल जाते की, आपल्या मुलीला असाध्य रोग आहे अशी थाप मारून, सईने डॉक्टरशीच विवाह करावा असा प्रयत्न करायला आदित्यला भाग पाडते! तिच्या मनात कोण आहे ह्याची ह्या आयांना फिकीर नसते. हम करे सो कायदा!
अगदी तशीच गोष्ट आपल्याला इतर मालिकांमध्येही दुर्दैवाने पाहावी लागते. "रंग माझा वेगळा" मधली माजखोर आई सौंदर्या इनामदार काळ्या रंगाचा कां इतका पराकोटीचा दुस्वास करते कुणास ठाऊक. त्यामुळे आपला चांगला डॉक्टर मुलगा कार्तिक आणि त्याच्यावर प्रेम करणारी काळी दीपा, हे नेहमी दूर राहतील, असा प्रयत्न करत राहते. परंतु अखेर त्यांचा विवाह करून द्यावा लागतो. तो विवाह मोडावा म्हणून, ऐन लग्नाच्या वेळी तिने केलेला भयानक प्रकार कोणालाही राग यावा असाच होता. गंमत अशी की दीपाची सावत्र आई राधाई ह्या कटु कारस्थानांत सामील होते !
दीपा व डॉ कार्तिक ह्या दोघांचा विवाह झाल्यावर सुद्धा सौंदर्या, कार्तिकच्या जीवाला धोका आहे, असे एका 'विकत' घेतलेल्या ज्योतिषाकर्वी सांगून दीपाला आणि त्याला दूर करायचा आटोकाट प्रयत्न आई सौंदर्या करत राहते! "जीव झाला वेडा पिसा" मध्ये देखील अशीच कहाणी पहायला मिळते. नायक शिवा आणि त्याची पत्नी सिद्धी यांनी वेगळे व्हावे, घटस्फोट द्यावा म्हणून त्याची आई, काका आणि गांवची बिलंदर पुढारी असलेली आत्याबाई देखील अशाच कारवाया करत असतात.
वर्तमानांतीलच नव्हे तर ऐतिहासिक घटनांवर आधारित "स्वामिनी" मालिकेमध्ये देखील आई पेशवीणबाई, गोपिकाबाई आपल्या मुलाचा माधवरावांचा त्यांना पसंत नसलेला विवाह
रमाबरोबर नाईलाजाने झाल्यावर, ती दोघं दूर कसे रहातील, अखेर विभक्त कसे होतील आणि त्याचे दुसरे लग्न कसे करून देता येईल, ह्याची चिंता करत विविध उचापती करत असलेल्या दिसतात. म्हणजे आईने आपल्या मुलांच्या मनाची, त्यांचे कुणावर खरे प्रेम आहे, त्याची पर्वा न करता आपल्याला योग्य वाटते तसंच व तेच करत राहायचं, करण्यात हा काय अनिष्ट प्रकार?
बहुतेक वेळा अशा आयांना वा सासूबाईंना आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जोडीदार हा नेहमीच नावडता असतो ही त्यातली समान बाजू.
मालिकांच्या दुसरा फाँर्मुला:
बनेल पती-सीधीसाधी पत्नी आणि वो-त्याची छचोर प्रेयसी हा प्रेमाचा त्रिकोण. हा प्रकार इतका गुळगुळीत झालाय, अक्षरशः सगळ्यांना कंटाळा, वीट यावा इतका जर कुठे ताणला जात असेल, तर तो म्हणजे, "माझ्या नवऱ्याची बायको" मध्ये! इथे बिनदिक्कत कहरच केला जात आहे. प्रथम पत्नी राधिका, नंतर शनाया त्यानंतर माया अशा एकामागोमाग एक, बायका व माशुका बदलून गुरुनाथचे चाळे चालू आहेत, ते खरोखर
नालायकपणाचा कळस आहेत. समाजापुढे कुठला आदर्श या मालिका दाखवतात, ते त्यांचे त्यांनाच जाणे.
तोच त्रिकोणी अभिलाषेचा प्रकार एक ग्रामीण वातावरणात आणि तर दुसरी शहरी, अशा दोन मालिकांत दिसतो. "लग्नाची बायको आणि वेडिंग वाईफ" असे उघड उघड विवाहबाह्य प्रेमाचे समर्थन करणार्या मालिकेमध्ये, फाँरेन रिटर्नड (टँक्सी ड्रायव्हर) मदन चक्क आपल्याबरोबर आणलेली (प्रेयसी) म्हणजे इंग्लंडची राजकुमारी आहे, अशी थाप मारून तिला आपल्याच घरी काय आणतो आणि कुटुबियांच्या गांवकर्यांच्या डोळ्यात धूळ फेकून त्या प्रेयसीबरोबर चक्क लग्नही काय लावून घेतो! त्याची भोळीभाबडी पत्नी काजोल इतकी बावळट कशी, असाच आपल्याला प्रश्न पडत राहतो. त्यांचे इतर कुटुंबीयही मदनच्या कायमच विश्वास ठेवत राहतात. हा ग्रामीण प्रकार झाला.
अगदी तसाच प्रकार सध्या गाजत असलेल्या "आई कुठे काय करते?" ही बाकीदृष्ट्या चांगली कौटुंबिक मालिका शोभावी अशी मालिका असूनही, इथे खलनायक छुपा रुस्तुम अनिरुद्ध आपल्या भोळ्याभाबड्या बायकोला अरुंधतीला न कळू देता, ऑफिसमधल्या संजना बरोबर दहा वर्ष विवाहबाह्य संबंध ठेवतो. एवढेच नाही तर, नंतर तिच्या आग्रहाने चक्क संजनाशी लग्न करायला तयार होईपर्यंत त्याची मजल गेली आहे! आश्चर्य हे की ह्या लंपट मतलबी, तीन तरुण अपत्यांच्या बापाला एवढा आत्मविश्वास आहे, की तो त्याच्या बायकोला पटवू वा गुंडाळू शकेल!
"सुखांच्या सरींनी मन बावरे" या मालिकेत तर हे दोन्ही फॉर्मुले वापरलेले दिसतात. उद्योजिका श्रीमती सत्यवादीबाईसाहेब, आपल्या मुलाचा सिद्धार्थचा विवाह अनु बरोबर होऊ नये म्हणून प्रचंड जंग जंग पछाडत रहाते, परंतु
त्यात त्यांना यश येत नाही. नंतर विवाह होण्या आधी, नंतर हे दोघे वेगळे व्हावे, म्हणून चक्क विवाहापूर्वी अनुकडून सहा महिन्याने घटस्पोट देण्याचे कागदपत्र ही बाई तयार करते. नंतर त्रिकोणाची प्रेमाच्या-एक तर्फी प्रेम इथे अर्थात हे सानविच्या वेगवेगळ्या खलनायकी कृत्यांमुळे पुढे येते. सिद्धू आणि अनु यांनी वेगळे व्हावे आणि आपण सिद्धुला मिळवावे म्हणून ही तरुणी कदाचित वेडसर असावी मनोरुग्ण असावी, अशा तर्हेच्या अनेक कृत्यांनी मालिका भरून टाकते
प्रेमत्रिकोण संकल्पनेचे हे सगळे आणि अत्यंत अश्लाघ्य असे अवतार मालिकांना पूर्व नियंत्रण वा सेन्सॉरशिप नाही म्हणून बिनधास्तपणे दाखवले जातात. हे मालिकांमधील प्रकार बघून वाटतं की आपण कुठे चाललो आहोत? कदाचित चंगळवादी सध्याच्या समाजाची एकंदर नीतिमत्ता पूर्वीसारखी राहिलेली नसल्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी चालू शकतं, असाच समज अशा मालिकांवरून होतो. सहाजिकच आंबटशौकीन प्रेक्षक जोपर्यत हे स्वीकारत काय राहतात, तोपर्यंत पाणी घालत राहिलेल्या या मालिकांचे इमले उभे राहतील. परंतु कधीकधी इतका कळस होतो की मजल्यावर मजले घडवणाऱ्या मालिका शेवटी कंटाळवाण्या होऊन हा सारा खेळ फसतो.
दूरदर्शन अर्थात टीव्हीसारखे माध्यम कसे वापरू नये याचा जणू काही वस्तुपाठच इथे नेहमी गिरवला जातो आहे, हे कितपत योग्य? ह्यासाठी म्हणायचे:
"टेलिरंजन: काही ही हं" !
सुधाकर नातू
ता.क.
"१ रंगभूमी-रसिकांना आत्मानंद देणारा अपूर्व त्रिवेणी संगम".....
२ "तुझे आहे तुजपाशी":
जे आपल्याजवळ आहे त्यांत समाधान मानायला कां हवे ते चटका लावणारा विडीओ....
३ "आशावादी रहा, हेही दिवस जातील, ही खात्री बाळगा."....
४ "सोशल मिडीयावरील सहभाग कशासाठी, कुणासाठी हा अट्टाहास?.....
५ "माणसं वाचायला शिका........
६ "जीवनातील ताणतणाव घालविण्यासाठी एक व्यावहारिक गुरुमंत्र......
७ "वैयक्तिक विकास आत्मप्रेरणेसाठी सुलभ मार्गदर्शन.....
हे व असेच चाळीसहून अधिक एकसे बढकर एक विडीओज् पहाण्यासाठी.........
माझा you tube channel
moonsun grandson
आजच ही लिंक उघडा...........
शेअरही करा........
moonsun grandson
open the link.....
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा