"टेलिरंजन-१-काही ही हं"!:
"अग्गबाई सासूबाई" मालिकेने तर सुरूवातीपासूनच "काही ही हं, दाखवण्याचा जणु चंगच बांधला आहे. झट मंगनी पट ब्याह करून कुळकर्ण्यांची आगाऊ सून ग्रहप्रवेश करण्यापासून "काही ही हं" प्रसंग दाखवण्याचा सिलसिला जो सुरू, तो तसाच आताही नव्या वेडेपणाने सुसाट चालूच आहे.......
उच्चभ्रू सोसायटींतील पाच सहा बायका नटून थटून, एकत्र माँलमध्ये शाँपिंगला न जाता, चक्क भाजी आणायला बाजारात काय जातात.....अन् तिथे शेफ अभिजीतच येऊन योगायोगाने चक्क एक भाजीविक्रेता काय बनतो....मेचक्या तिथेच, हे महिला मंडळ वाटेतल्या इतर कोणाकडे न जाता, भाजी खरेदीसाठी काय जाते....काही ही हं!
असावरी व शेफ अभिजीतनी "काही ही हं" करून एकत्र यावे म्हणून, घरातला सासरा गांवी, सून कंपनीच्या कामासाठी लोणावळ्याला आणि त्याच दिवशी मुसळधार पावसाचे थैमान अन् सोहमचे घरी न जाणे.... एकट्या असावरीला अशा वेळी ना शेजारी पाजारी, ना जवळचे नातेवाईक वा ना सोहमचे मित्र ह्यांची आठवण येतच नाही, मेचकी शेफसाहेबांचीच मदत घ्यावी लागणे, हे सारे "काही ही हं"!....
नंतर एक ओढून ताणून एकदाची घोडनवरी बनणार्या असावरीला आपल्या मुलाचा ना मोबाईल नंबर ठाऊक ना त्याच्या आँफीसचे नांव पत्ता इ.इ. माहिती....मुलगा सोहम इतका बेपर्वा की मित्राकडे गेलोय हे सांगतही नाही....अन् ही जगावेगळी आई त्याला एखाद्या कुक्कूलं बाळ असल्याप्रमाणे बबड्या बबड्या काय संबोधते.... (सारे काही चिड आणणारे, बुद्धीला न पटणारे) सारं "काही ही हं"!....
इतके बाष्कळपणाचे पोरकट खेळ झाल्यानंतर असावरी अभिजीत राजेंच्या विवाहानंतर, खरं म्हणजे "अग्गबाई सासूबाई" ही मालिका बंद करून टाकायला हवी होती, नाहीतरी लाँकडाऊनचा मुहूर्त लाभला होताच की! परंतु करणार काय? जित्याची खोड! पाणी घालून मालिका कशाही पुढे नेत राहायच्या, हा तर गुरुमंत्र आहे सर्वांचा. त्यामुळे बबड्या बबड्या करणाऱ्या असावरीचा पोरकटपणा मागे पडून आता ह्या खलनायकी बबड्याला पुन्हा काम करायला आणि मार्गावर आणायला, जे काही खुळचट कारनामे व बालीशपणा अभिजीत राजे आणि इतरांचे चाललेत, ते पाहून हसावे की रडावे कळत नाही.
प्रेक्षकांनी नेहमी कदाचित डोके गहाण ठेवून मालिका बघाव्यात अशीच सर्वांची इच्छा दिसते. तशीच मारुतीच्या शेपटासारखी लांबत चाललेली आणि अक्षरशः उबग आणणार्या "माझ्या नवऱ्याची बायको" मध्ये शनाया, मायाच्या पाठोपाठ पिंकीच्या रूपाने पांचटपणाची जी हद्द होत आहे, ती पाहून, ह्या दोन्ही मालिका खरं म्हणजे ताबडतोब बंद करून एखादी नवीन ठराविक भागांची चांगले परिणामकारक कथानक असलेली मालिका आणण्याचा शहाणपणा ह्या वाहिनीकडून दाखवला जावा, हीच अपेक्षा.
जी कहाणी ह्या दोन मालिकांची, तीच "तुझ्यात जीव रंगला" ची, तीच " जीव झाला वेडा पिसा" ची, तीच अनु सिद्धार्थच्या " मन बावरे" ची...आणि बहुधा सगळ्याच मालिकांची.....खरं म्हणजे लाँकडाऊनमुळे तीन साडेतीन महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर ह्या बहुतेक सर्व जुन्या जीर्ण शीर्ण खोडांना कायमची रजा देऊन पुनश्च हरी ओम् करत नव्या कल्पनांच्या नवनवीन मालिका वाहिन्यांनी सादर कराव्यात अशी अपेक्षा होती..पण सारेच मुसळ केरांत. म्हणून तर वेळ भरुन काढण्यासाठी होणार सून...व चार दिवस सासूचे ह्या पुराण्या मालिकांचा पुनर्जन्म घडवून आणला. उत्तमोत्तम कथा कादंबर्या नाटके चित्रपट इतकेच काय गाजलेल्या मालिका असा इतिहास असतानाही आज करमणूक क्षेत्रांत कल्पनादारिद्र्याची इतकी परिसीमा यावी ह्यापरते दुर्दैव कोणते?
कारण सगळ्यांनी मालिका पाहून, " काही ही हं" म्हणावं ही स्पर्धाच जणु ईडियट बाँक्सवर चालू होती, चालू आहे आणि चालूच रहाणार आहे!
हे म्हणजे अगदीच "काही ही हं!"
सुधाकर नातू
ता.क.१
त्यातले त्यात सोनी व स्टार प्रवाह ह्या वाहिन्या वेगळी वाट धरत आहेत हेच एक समाधान.
येथपर्यंत आल्याबद्दल आभार. ह्या लेखावरील तुमच्या प्रांजल प्रतिसादाची मी अपेक्षा ठेवतो.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.२
माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
https://www.youtube.com/user/SDNatu
शिवाय....
२०० हून अधिक असेच खुसखुशीत व वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:
http://moonsungrandson.blogspot.com
दोन्ही लिंकस् सेव्ह करा...शेअरही करा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा