"रंगांची दुनिया-१४": "आठवण: 'चाळीस वर्षांपूर्वीची 'नांदी' "!
"नाटक- एक जिव्हाळ्याची गोष्ट":
नाटक एक रोमांचक अनुभव आहे. धंदा, कला विचार या त्रिमूर्तीचा अपूर्व संगम करण्याची कुवत असलेले ते एक अनोखे विश्व आहे. मानवी जीवनामध्ये साहित्याबरोबर करमणुकीची देखील अतिशय आवश्यकता असते. संगीत, नाट्य, नृत्य आदि कलांमध्ये मध्ये माणूस रंगून जाऊ शकतो. मराठी माणसाला तर नाटक ही एक जिव्हाळ्याची अशी गोष्ट आहे. तो जेव्हा समोरच्या स्टेज वरील जे जे काय घडत जाते, ते बघतो, त्या जिवंत अनुभवांमुळे तो त्या नाट्याशी एकरूप होऊन बाहेरची दुनिया विसरून जातो. म्हणूनच आपल्या मराठी रंगभूमीची दीडशे हून अधिक वर्षांच्या वैभवशाली परंपरेचा त्याला सार्थ अभिमान आहे.
"नाट्यसृष्टीतील महत्त्वाच्या घडामोडी":
आज मी गेल्या वर्षातील-१९८० सालातील नाट्यसृष्टीच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे नजर फिरवणार आहे. पहिली अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे रंगभूमीकडे आणि एकंदरच कलाक्षेत्राकडे,
दुर्दैवाने साक्षात यमराजांची वळलेली वाकडी विखारी नजर. शांता जोग, जयराम हर्डीकर सतीश दुभाषी हे नाट्यकलावंत, तर मोहम्मद रफी सारखा जणु चित्रपट संगीतात, इंद्रपद मिळवणारा हिंदी चित्रपट सृष्टीतला गायन हिरा, पु भा भावे ह्यांच्यासारखा प्रतिभासंपन्न मनस्वी व तेजस्वी लेखक, तर साहीर लुधियानवीसारखा भावनासंपन्न व अर्थपूर्ण गीतलेखक आणि किशोर साहूंसारखा निर्माता-दिग्दर्शक हे सारे दिग्गज या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. नावे किती आणि कशी आठवावी? मृत्यूच्या या गूढ कोड्याकडे पाहिल्यावर मती कुंठीत होते आणि आपण इथे येतो कुठून? येतो तेही कशाला? काही काही म्हणून उलगडा होत नाही. अशा समयी परमेश्वराच्या चरणी लीन होणे, हाच विचार प्रामुख्याने आपल्या मनात येतो.
इथला शेर संपला की जायचे, मात्र कुठे जायचे ते माहीत नसते. कुठे माणूस जातो ते कधीही कळत नाही. त्यातून कलावंताला अपमरणाचा शापच मिळालेला जणु असतो. आविष्काराच्या ह्या दुनियेत अपरंपार ऋद्धी-सिद्धी प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी कलावंत जीवाचे रान करतो. कोणी ना कोणी, मग क्वचित एखाद्या जीवघेण्या व्यसनाचा कलावंत आपणहून आधीन होतो व आपण आपल्याच हाताने अल्पायुष्यात मरण ओढवून घेतो. खरोखर आहे कां त्याला अजून उत्तर?
१९८० ह्या सालातील मुंबई येथे रूपारेल कॉलेजच्या नयनरम्य पटांगणात झालेले हीरक महोत्सवी नाट्य संमेलन हा एक माझ्या स्मृती कोशातला एक जिव्हाळ्याचा विषय आहे. तीन दिवस चाललेल्या या आनंदसोहळ्याला, मला स्वतःला एक स्वयंसेवक म्हणून जातीने उपस्थित राहण्याचा सुयोग आला. तेथे काही विविध असे नाट्यक्षेत्रासाठी उपक्रम केले जाणार होते. त्यामध्ये पुण्याच्या भरत नाट्य मंदिरातर्फे नाट्यविषयक एक प्रदर्शन भरवले जाणार होते. या प्रदर्शनामध्ये निवडक स्वयंसेवक हवे होते. त्यामध्ये माझ्या नशिबाने माझी निवड झाली. सहाजिकच तीन दिवस झालेल्या त्या सुखद सोहळ्याला मला जातीने उपस्थित राहता आले.
आधीच मराठी माणूस नाट्यवेडे, त्यातून हा असा कधी मधीच येणारा योग. त्यामुळे अवघ्या रुपारेल परिसराला नाट्यपंढरीचे स्वरुप आले होते. मला आठवते, नाट्यसंमेलनाची व्यवस्था कशी झाली आहे, हे जातीने पाहण्यासाठी या नाट्यसंमेलनातचे नियोजित अध्यक्ष स्वरराज छोटा गंधर्व आणि स्वागताध्यक्ष पु ल देशपांडे आदल्या रात्री त्या मैदानावर आले होते. त्यांना अगदी जवळून पाहण्याचा मला जो योग आला तो अविस्मरणीयच.
स्वरश्रेष्ठ छोटा गंधर्वांची संमेलनात अवीट गोडीची संगीत मैफिल, तेथे लागून असलेल्या जागेत सर्वांगीण उभी अशी नाट्य रंगमंच रंगभूषा इ.इ. विषयक दोन प्रदर्शने, संगीत नाटकांच्या शतसंवत्सरीनिमित्त सुहासिनी मुळगावकर आणि इतर लोकप्रिय कलावंतांच्या सहाय्याने सादर केलेला शतरंग हा कार्यक्रम अशी काही या सोहळ्याची माझ्या मनात राहिलेली वैशिष्ट्ये. आणि हो, आपल्या नेहमीच्या व्यवसायातून अंग काढून संध्याकाळ रात्रीचा वेळ नाट्यवर्तुळात मला घालवायला मिळाले हा प्रमुख फायदा. अनेक नाट्य निर्मात्यांच्या कलकारांच्या बरोबर संवाद करण्याची संधी मला मिळाली.
गेल्या वर्षात तिसरा टप्पा म्हणजे
राजा शिवाजी विद्यालयातील संगीत नाटकांची शंभरी पूर्ण झाल्याबद्दल भव्य पटांगणात झालेला आठ संगीत नाटकांचा अविस्मरणीय नाट्योत्सव! मुंबईच्या गुलाबी थंडीची चाहूल त्यावेळी या सोहळ्याला लाभली होती. पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी वरुणराजाने प्राजक्तांच्या फुलासारखी नाजूक बरसात करून निसर्गाची पसंतीची पावती जणू या सोहळ्याला प्रदान केली.
छोट्या गंधर्वांची दोन सदाबहार नाटके: मृच्छकटिक, संगीत सौभद्र हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते. बेस्टने आपल्या नांवाला साजेशी अशी उत्तम बससेवा रात्रीच्या नाट्य प्रयोगानंतर उपलब्ध केल्यामुळे खराखुरा नाट्यप्रेमी अगदी मुक्त मनाने सामील होऊ शकला. चार पाच हजाराच्या आसपास असा प्रेक्षकवर्ग रात्रीचे अडीच तीन रोजच नाट्यप्रयोग संपेपर्यंत हे भाग्यवंत उपस्थित राहू शकले त्यामुळे. खरोखरच त्यांचा आनंद काय वर्णावा?
श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा प्रवेश छोटा गंधर्व व आशालता यांनी इतक्या बहारीने सादर केला की काय सांगू ! आयुष्यात अशा सुसंधी फारच मोजक्या वेळा येतात एवढेच काय ते मी म्हणेन. इतर सहा नाटके अशी होती: संगीत संशयकल्लोळ, स्वयंवर, मानापमान, शारदा होनाजी बाळा आणि एकच प्याला. मराठी संगीत रंगभूमीवरील नामवंत अशा सर्वच कलावंतांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. ह्या सोहळ्याला मध्यंतराचे वेळी आपल्या आवडीचे नट आणि अभिनेत्री अगदी जवळून पाहण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा, अनेक दिवसांनी कॉलेजच्या गॅदरींग सारखा खेळकर खोडकर अनुभवही या निमित्ताने
मला आला.
माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या शाळेत मी शिकलो, मॅट्रिक झालो, त्या माझ्या आवडत्या किंग जॉर्ज इंग्लिश स्कूलच्या (आता राजा शिवाजी विद्यालय) आवारात जवळ जवळ दोन तपांनंतर प्रवेश करायची मला संधी मिळाली. केवढा बदल झाला होता, आता त्या आसमंतात! चारी बाजूला चार पाच मजली इमारतींची माळ पसरली होती. आमच्या वेळी मैदानामध्ये एका बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये असलेले गरम गरम बटाटेवडा आणि तिखट तिखट लसणाची चटणी देणारे दिवाडकरांचे कँटीन कुठे लुप्त झाले होते. तिथे चार मजली इमला राहिला होता. तर आमच्या शाळेच्या कौलारू दुमजली इमारतीच्या कोपऱ्यात गॅलरीत असलेली खूप खूप मोठी पितळेची शाळेची घंटाही आता हरवलेली दिसली!
किती काय काय म्हणून स्मृती माझ्या मनात त्यावेळेला चाळवल्या गेल्या. पौगंडावस्थेतील अनुभवांचा उंबरठा मी पुन्हा उघडून पाहिला. त्या क्षणाला मनाच्या आतल्या गाभ्यातून मला एक वेगळीच अनुभूती झाली. हरवल्या बरोबरच काहीतरी अविस्मरणीय गवसलेही होते. संगीताचा नादब्रह्म सामर्थ्यशाली आनंददायी ठेवा मला या संगीत नाट्य महोत्सवाच्या रूपाने सापडला. सुखाची रुपेरी किनार उजळविण्याचे व दुःखाची/क्लेशाची अंधेरी झालर नाहीशी करण्याचे सामर्थ्य संगीताच्या त्या गोडव्यात असते ते मला कळले. तो आनंद आपल्या कंठातून देणाऱ्या नाट्य कलावंताच्या भाग्याचा हेवा मनात ठेवत मी हा सोहळा मनमंजूषेत ठेवला.
गेल्या वर्षातल्या नाट्यक्षेत्रात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संख्यात्मक दृष्ट्या झालेली वाढ. अनेक नवीन नाट्यसंस्था आपल्या नवीन नाटकांसह उदयाला आल्या. त्यामुळे केवळ मान्यवर अशा संस्थांच्या काम उपलब्ध होण्याव्यतिरिक्त विशाल क्षेत्र संबंधित नाटयकर्मींना उपलब्ध झाले. मात्र संख्या वाढली तर निर्मितीचा दर्जा सुधारला, असे मात्र नव्हे. उलट प्रक्षोभक केवळ शरीरवासना चाळवणारे, चावटपणाच्या धाग्यांभोवती गुंफलेले आणि शरीर प्रदर्शनाला महत्त्व देणारी, धंदा या केवळ एका दृष्टिकोनातून बेतलेल्या नाटकांची आंबटशौकी लाटच १९८० मध्ये रंगमंचावर आली. त्यात नाटकात उरलेल्या दोन महत्त्वाच्या विषयांना- कला व विचार यांना स्थान नव्हते. केवळ वासना चाळवणारे काही ही, एवढाच उद्देश जणू या नाटकांचा होता. दुर्दैवाने अशा नाटकांची संख्या त्या वर्षी वाढती होती.
अंतर्मुख होऊन वेळीच नाटकांविषयी प्रेम असणार्या आपण सर्वांनी, गांभीर्याने विचार करण्याजोगा हा विषय आहे. निर्भेळ करमणूक करता करता, एखादा नवा विचार, नवीन मार्ग, नवी दृष्टी न देता, नाटकात काहीतरी भलतंच दाखवणं हे योग्य नव्हे. तशा नाट्यकृतींचा सुकाळ होणे, हे रंगभूमीचे दुर्दैव! हे नको असलेले वादळवारे कुठवर फोफावत जाणार देव जाणे! नाट्यक्षेत्राचा आढावा घेताना मला दिसलेला हा एक विचित्र मैलाचा दगड.
एका मोक्याच्या वळणावरच आज आपली रंगभूमी एका भीषण ज्वालामुखीच्या तोंडाजवळ उभी आहे. त्यातून तावून सुलाखून ती बाहेर कशी पडते, ते येणारा काळच सांगेल. या अंधारात काजवा चमकावा, वादळात मार्ग दिसावा असा गेल्या वर्षी आलेल्या काही नाट्यकृतींच्या रूपाने जरूर आशावादाचा अंकुर मनात उपजला आहे. धंदा कला आणि विचार या त्रिमूर्तींचा थोडासा कां होईना विचार करणारी मोजकी नाटके १९८० साली रंगभूमीवर आली, हेच त्यातले भाग्य.
सुधाकर नातू
ता.क.
हा लेख "रोहिणी मासिक-फेब्रुवारी१९८१" अंकात प्रसिद्ध. तो येथे पुनःप्रकाशित केला आहे.
ह्या शिवाय......
माझा you tube channel
moonsun grandson
त्यावर एकसे बढकर एक मार्गदर्शक व प्रेरणादायी अनेक विडीओज् ........
आजच ही लिंक उघडा...........
शेअरही करा........
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा