"राहू व केतूच्या आगामी राश्यंतराचे राशीनिहाय परिणाम":
गेल्या वर्षी २३ मार्च'१९ रोजी राहू केतूचे राश्यंतर अनुक्रमे मिथून व धनु राशींमध्ये झाल्यानंतर आतापर्यंत अनेक संकटांच्या मालिकांना आपण सर्व तोंड देत आहोत. आता ह्या वर्षी १९ सप्टेंबर'२० रोजी राहू-केतू चे पुनश्च राश्यंतर होत आहे.
१९ सप्टेंबर'२० रोजी राहू मिथूनेतून वक्री होत, व्रुषभ राशीत आणि केतू धनु राशीतून व्रुश्चिकेत प्रवेश करणार आहे. ही राहू केतूची स्थिती १६ सप्टेंबर २०२२ पर्यंत राहणार आहे. ह्या कालखंडातमध्ये राहू केतूच्या ह्या राश्यंतराचा एकंदर राशीनिहाय परिणामांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला आहे.
हे राश्यंतर, कोणाला चांगलं, कोणत्या राशीला वाईट आणि कोणत्या विशिष्ट अशा विषयांवर वाईट, ह्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि तो असा करायला लागेल की जणू काही चंद्र कुंडली धरून त्या राशीच्या कोणत्या स्थानी हे ग्रह होते आणि आता कोणत्या स्थानी ते येणार आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. अशा विचारधारेवर प्रत्येक राशीचा अभ्यास केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे निष्कर्ष काढता येतील:
१ मेष:
मेष राशीला आता काय होणार तर, त्यांच्या धनस्थानात आणि अष्टम स्थानात राहु आणि केतु येणार. धनस्थानात म्हणजे आर्थिक चणचण भासू शकेल खर्च जास्त होतील. हेच कुटुंबाचे स्थान आहे म्हणजे कौटुंबिक कलह वा काहीतरी नव्या जबाबदाऱ्या वाढू शकतील. केतू अष्टम स्थानी म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे काही त्रास वा मोठे अचानक नुकसान, प्रवासात अपघात वा गोंधळ, अशा तऱ्हेचे अनुभव येतील.
२ व्रुषभ:
व्रुषभ राशीचा जर विचार केला, चंद्राबरोबर म्हणजे तुमच्या डोक्यावर राहू आणि सप्तम स्थानात म्हणजे जोडीदार वा भागीदारीच्या स्थानात केतू ,त्यामुळे महत्वाचे विचार करताना संभ्रम निर्माण होऊ शकतील. चुकीचे निर्णय वैवाहिक जीवनांतील परस्परसंबंधात काहीना काहीतरी वितुष्ट अशा तऱ्हेचे फळे मिळू शकतात. तुमच्या वागण्याच्या पद्धतीला सुधारावे लागेल. तसेच जोडीदाराशी मतभेद टाळावे लागतील. व्यवसाय नोकरीसाठीच्या दशम स्थानापासून राहू चौथा असल्यामुळे तेथूनही तुम्हाला जास्त अपेक्षा करता येणार नाहीत. थोडक्यात व्रुषभ राशीला हे संक्रमण तेवढे फलदायी नाही.
३ मिथून:
मिथून राशीच्या व्ययांत राहु तर शत्रुक्षेत्री केतू, अशी स्थिती या कालखंडात राहणार आहे. विवाहस्थान केतू व शनीच्या पापकर्तरीयोगात असल्याने तो जुळविताना, काही अडचणी अथवा चौकशी अधिक करावी, नाहीतर फसगतीची शक्यता. तर विवाहितांमध्ये वादविवाद होतील. तसेच आरोग्यासंबंधीची काळजी वेळीच घ्यावी. पोटाचे विकार अथवा डोकेदुखी संबंधी काही समस्यांचे निरसन करणे गरजेचे ठरेल. प्रवासामध्ये किरकोळ अपघात, अडचणी हे ग्रहयोग सुचवतात. थोडक्यात तारेवरची कसरत करण्याचा काळ आहे.
४. कर्क:
कर्क राशीला राहू लाभात येत असल्यामुळे शुभ फले देऊ शकतो. मात्र त्याच वेळेस केतु पंचम स्थानात असल्यामुळे काही निर्णय चंचलतेमुळे चुकू शकतात. त्यामुळे नोकरी व्यवसायात नुकसान होऊ शकते याचे भान ठेवायला हवे. केतू पंचमात असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चलबिचल अथवा अपेक्षित यश विद्यार्थ्यांना न मिळणे आणि संतती विषयक काही समस्या वडीलधाऱ्यांना येऊ शकतात. एकंदर हा काळ संमिश्र आहे असेच म्हणावे लागेल.
५. सिंह:
सिंह राशीला दशमात राहू आणि चतुर्थात केतू यामुळे हा काळ कसोटीचा जाऊ शकतो. माता-पित्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल- त्यांच्याकाही अनारोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात महत्त्वाच्या स्थावरविषयक प्रश्नावर मतभेद होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात ताणतणाव वाढेल आणि जबाबदाऱ्या योग्य वेळेला न पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. धंद्यात आर्थिक नुकसानीचा फटका बसू शकतो. इतरांच्या तुलनेत तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका आणि प्रयत्न मात्र वाढवा असेच या कालखंडाचे सांगणे आहे.
६. कन्या:
कन्या राशीच्या बाबतीत केतू पराक्रमात तर राहू भाग्यस्थानात अशी स्थिती आहे. त्यामुळे संमिश्र फळे मिळतील. भाग्यस्थानातील राहुमुळे तुमच्यापुढे आलेल्या संधी, काही अडचणी आल्यामुळे त्यांचा फायदा विलंबाने होईल. प्रवासात वाद विवाद किंवा इतर काही अडचणी विलंब ह्यांची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भावंडांशी मतभेद होऊ शकतात. एकंदर हा काळ प्रतिकूल आहे त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
७. तुळा:
तुळा राशीचा विचार करता या राशीला राहू आठवा आणि केतू दुसरा असल्यामुळे सर्व राशींमध्ये जास्त कसोटीचा काळ जाऊ शकतो. अचानक आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेला बाधा येईल अशा घटना घडू शकतील. कौटुंबिक जीवनामध्ये अडी अडचणींचा हा काळ असू शकतो. पंचमाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे निर्णयशक्ती योग्य तऱ्हेने काम करेल असं नाही. स्पर्धात्मक परिक्षांत अपेक्षाभंग, त्याचप्रमाणे संतती विषयक काही समस्या निर्माण होऊ शकतात. अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेऊन संयमाने या कालखंडात आपल्याला येणाऱ्या परिस्थितीशी धैर्याने मुकाबला करावयाचा आहे.
८. व्रुश्चिक:
व्रुश्चिक राशींत केतू असल्यामुळे मानसिक चांचल्य वाढण्याची या कालखंडात शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे जोडीदाराच्या स्थानात राहु असल्यामुळे मतभेद अथवा सांसारिक जीवनात जबाबदाऱ्या वाढल्यामुळे होणारे एकंदर ताणतणाव अशा तऱ्हेचा अनुभव या कालखंडात येईल. चतुर्थ स्थान त्याच्या केंद्रात राहू असल्यामुळे मातुल घराण्यातील वडीलधार्या मंडळींची काळजी, त्याच प्रमाणे स्थावरासंबंधी योग्य निर्णय न होणे, मानसिक चिंता अशी फळे मिळू शकतात.
९. धनु:
धनु राशीच्या व्ययांत केतू आणि षष्ठ अर्थात शत्रू स्थानात राहू असा संमिश्र कालखंड आहे. षष्ठातील राहू उत्साह वाढवू शकतो तसेच समोर येणाऱ्या कठीण प्रसंगांना विरोधाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण करू शकतो. मात्र व्ययातील केतू द्वितीयस्थानातील शनीच्या पापकर्तरीयोगात असल्याने, तुमच्या उत्सवावर पाणी पडू शकैल. त्याचप्रमाणे बंधू-भगिनींशी मतभेद किंवा इतर अनुचित अनुभव येऊ शकतात. प्रवासातही विलंब आणि गोंधळाला तोंड द्यावे लागेल.
१०. मकर:
मकर राशीसाठी, राशीस्वामी शनी व केतू एकमेकांना लाभस्थानी आणि पंचमात राहु अशी संमिश्र स्थिती आहे. एकीकडे नोकरी-व्यवसायात चांगले आर्थिक लाभ आणि संधी, वाढता उत्साह तर दुसरीकडे आपल्या निर्णयामधील चांचल्य असा विरोधाभास अनुभवाला येईल. तसेच संततीविषयक काही महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल. कारण त्यांत चूक होण्याची शक्यता अधिक आहे. धनस्थानाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे आर्थिक बाजू सांभाळून मगच पुढे जावे लागेल, कौटुंबिक वादविवाद टाळावे लागतील. एकंदर कुछ खट्टा कुछ मीठा असा ह्या राशीला अनुभव यावा.
११. कुंभ:
कुंभ राशीच्या दोन केंद्र स्थानात राहू-केतू अशी योजना या कालखंडात येत असल्यामुळे एकीकडे मानसिक विचित्र अवस्था व स्थावरासंबधी कटकट, तर दुसरीकडे नोकरी-व्यवसाय त्याचबरोबर माता पित्यांसाठु हा अनिष्ट काळ असणार आहे. त्यांच्या आरोग्याची व अडचणींकडे वेळीच लक्ष द्या. सहाजिकच ह्या सार्या गोष्टींमुळे तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. प्रसंगी नुकसानही संभवते. मानसिक असमाधान वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. संयम ठेवा. कष्ट वाढवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
१२ मीन:
मीन राशीच्या पराक्रमात आता राहू येणार आहे. त्यामुळे उत्साह वाढता राहील आणि इतके दिवस करावयाची महत्वाची कामे पूर्ण होऊ शकतील. प्रवास लाभदायक. आपल्या जबाबदाऱ्या हिंमतीने पार पाडाल. मात्र केतू भाग्यस्थानात असल्यामुळे एकंदर अधिक अपेक्षा आपल्या भाग्योदयाच्या करू नका. जी काही फळे मिळतील नोकरी-व्यवसायात, त्यात समाधान माना. आतापर्यंत चौथा राहू असल्यामुळे मानसिक असमाधान होते, ते मात्र आता नियंत्रणात राहील, भावंडांकडून मात्र थोडाफार त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्याबरोबर मतभेद होऊ शकतात. इतरांच्या तुलनेत, मीन राशीला हा कालखंड अधिक चांगला जाऊ शकेल.
ह्याप्रमाणे आम्ही राहू-केतू यांच्या राश्यंतराची फळे मांडायचा प्रयत्न केला आहे. तो करताना हे पाप ग्रह, कोणत्या राशीला कोणत्या प्रकारची फळे देणाऱ्या स्थानात त्यांचा प्रभाव आहे, ह्याचा प्रामुख्याने विचार केला आहे. ज्योतिषाकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. आम्ही मांडलेली निरीक्षणे ही ज्याची त्याने तपासून घ्यावी आणि एकंदर आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांच्यात समतोल साधून समाधान मिळवायचा प्रयत्न करावा.
धन्यवाद
सुधाकर नातू.
ता.क.
१ मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला वयोमान झाल्यामुळे बंद केले आहे, ह्याची नोंद घ्यावी.
२ माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
moonsun grandson Channel link:
https://www.youtube.com/user/SDNatu