बुधवार, १७ जुलै, २०२४

"छाप पडलेले शब्द-D !": 👌 👍"प्रयत्नांती प्रभावशाली कामगिरी !":👌

👍"छाप पडलेले शब्द-1D !": 👌 👍"प्रयत्नांती प्रभावशाली कामगिरी !":👌 💐"आपल्याला जे आवडते आणि जे सहज जमू शकते, तेच काम आपल्याला सारखे करावेसे वाटते. तसेच काम आपल्याला नेेहमी मिळावे असेही वाटत असते. सहाजिकच पुष्कळदा जे आवडत व जमतही नाही, अशी कामे टाळण्याची आपली प्रवृत्ती असते. इंग्रजीमध्ये Procrastination ही एक मानसिक अवस्था वर्णिलेली आहे. त्यामध्ये अळम टळम करत, आजचं काम उद्या, उद्याचं परवा अशी चालढकल सतत केली जाते. त्यामुळे समस्या उलट अधिक वाढतात व मानसिक ताण, चिंता निर्माण होतात. त्या उलट हे काम मला कां येेत नाही, कां जमू नये, असे आव्हान स्वीकारून त्या नावडत्या कामाला जर तुम्ही भिडलात, तर तुम्ही सहजपणे हळूहळू ते करू शकता, एवढेच नाहीतर चांगली कामगिरी देखील तुमच्याकडून होते. जीवनात आनंद मिळवायचा असेल तर अशाच अशक्य न आवडणाऱ्या कामांबद्दल आपण प्रयत्न करायला हवेत, हे उलगडणारा हा सोबतचा लेख खरंच अंतर्मुख करणारा आहे. प्रत्येकाने त्यापासून जागृत होऊन आपल्यात सुधारणा करायला हवी, प्रयत्न करून न जमणारी कामे यशस्वी करायला हवीत. मला त्याची आठवण ठेवायचं कारण माझ्या बाबतीत तसे शतशः खरे झालेले आहे. मला स्मार्टफोन वापरायच्याबद्दल भीती वाटे, जुनाच फोन मी वापरे. माझा मुलगा माझ्या मागे खूप लागला होता की, तुमच्या वाढदिवसाला मी स्मार्टफोन देतो. पण मला वाटायचे की, स्मार्टफोनवरील काचेवर आपण कसे काय बरे लिहिणार आणि काम करणार ! त्यामुळे मी एक दोन वर्ष टाळलं, पण शेवटी त्याने मला तो दिलाच. त्यानंतर जे घडले ते तुमच्यासमोर माझ्या सोशल मीडियावरील ब्लॉग व्हिडिओ Sudha डिजिटल दिवाळी अंक व विविध डिजिटल लेखसंग्रह, फेसबुकवरील 'रसिकांची दुनिया' खाजगीसमूह, whatsapp 'आकाशातील पाळणे' हा अभिवाचन मंच अशा अनेक रूपाने आता उपलब्ध झाले आहे. आता तर त्याला 'Moonsun Grandson' 'वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री'असे रूप झाले आहे: 'ह्या हृदयीचे त्या हृदयी करू, जाणिवांचा भवताल विस्तारू !" ह्या ध्येयाने मी आता सतत त्या कामांमध्ये रस घेत असतो. मी नाउमेद न होता, जिद्दीने प्रयत्न केले, म्हणून हे सगळे होत गेले, असेच मला या लेखाने पुन्हा सांगितले. सारांश आव्हाने स्वीकारावीत, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करावेत शेवटी यश आपलेच असते, हाच धडा !":💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू ############ 👍"छाप पडलेले शब्द-2 D !":👌 👍" चांंगुुलपणाची गर्भश्रीमंती !":👌 💐 "नुकत्याच पार पडलेल्या t20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारत विश्वविजयी झाला, ही खरोखर सर्व भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब होती. त्यामागे खेळाडूंचे जसे योगदान होते त्याचप्रमाणे त्या संघाला घडवणाऱ्या प्रशिक्षक श्री राहुल द्रविड यांचेही समर्थ मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यानिमित्ताने सर्व टीमला 125 कोटी रुपयांचे बक्षीस आयसीसीतर्फे देण्यात आले. तर प्रशिक्षक द्रविड यांना रूपये पाच कोटी व त्यांच्याबरोबरच्या सपोर्ट देणाऱ्या टीमला प्रत्येकी अडीच कोटी रूपये देण्याचे आयसीसीने ठरवले. परंतु द्रविड यांची थोरवी अशी की, त्यांनी सर्वांना समान बक्षीस द्यावे असे सांगून जास्तीचे रुपये अडीच कोटी नाकारले.अशा तऱ्हेचे चांगुलपणाचे गुण त्यांच्यात पहिल्यापासूनच आहेत हे आपण ध्यानात घेेतले पाहिजे. क्रिकेटची कारकीर्द संपल्यानंतर बहुतेक जण काही ना काहीतरी रूपाने टीमला जोडलेला राहतो आणि त्यामध्ये संघाचे परीक्षक व्हावं ही नेहमी इच्छा असू शकते. पण त्या पायरीपर्यंत जाण्यापूर्वी द्रविड यांनी विविध मधल्या पायऱ्या ओलांडतच प्रशिक्षण घेत, स्वतःला घडवत, मगच संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली, हे खरोखरच भूषणावर आहे. अशा तऱ्हेचा निस्प्रुह न्यायीपणा आणि चांगुलपणा खरोखर हल्ली दुर्मिळ होत चाललेला आहे. त्या दृष्टीने सोबतचे वृत्त हे खरोखर प्रत्येकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आनंदाश्रू आणणारे आणि द्रविड यांना मानवंदना करणारे असणार यात शंका नाही. अशा तऱ्हेची सद्गुणी, सज्जन निस्वार्थी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत, हे दुर्दैवच नव्हे कां? विशेषत: सध्याच्या राजकारणात जे काही आपल्याला प्रताप दिसतात, त्यावरून राजकारण्यांनी या आदर्श पासून धडा घ्यावा अशीच ही घटना आहे. श्री द्रविड यांना सहर्ष मानवंदना व मनःपूर्वक शुभेच्छा !":💐 धन्यवाद श्री सुधाकर नातू ###### 👍"छाप पडलेले शब्द-3 D !":👌 👍" प्रगतीची क्षितिजे-भरारीच्या वाटा!":👌 💐 " बारावीनंतर घरोघरी आपल्या पाल्याचे भवितव्य कसे उज्वल होईल याचा घोर पालकांना लागतो. अनेक स्पर्धा परीक्षा, पदव्यांचे मार्ग समोर खुले असतात. सध्याची स्पर्धात्मक परीक्षांची जी काही दयनीय आणि शंकास्पद स्थिती झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर खरोखर यापुढे कुठल्या कोर्सला जाऊन काय फायदा होणार, याची चिंता अर्थातच वाढत जाणार. कोणे एके काळी एमबीएला खूप मागणी होती आणि वावही होता. परंतु एमबीए आणि तत्सम पदव्या व पदविका देणाऱ्या संस्थांचे जाळे पसरले, खरे पण एकंदर स्तर घसरत गेला. त्यामुळे एमबीए होऊनही विशेष काही प्रगती व आर्थिक उन्नती होईल याची शाश्वती नाही, कारण पैशाला बासरी प्रमाणे एमबीए तयार होऊ लागले. इंजीनियरिंगला जशी विद्यार्थ्यांनी धाव घेतली आणि अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस बाजारू वृत्तीने निर्माण होत गेली, त्याचप्रमाणे परिस्थिती एमबीएची देखील झाली आहे. त्यातले त्यात 'आयआयएम' सारख्या वा तत्सम नावाजलेल्या संस्थांमध्ये जर एमबीए केले, तर फायद्याचे होऊ शकते. परंतु त्याचीही सध्या शाश्वती नाही. त्यात भर म्हणून बीबीए, बीएमएम, बीसीए, बीएफएम.. अशासारख्या विविध पदव्यांचे जाळे विद्यार्थ्यां समोर घोंगावत आहे. त्यामुळे खरोखर काय केल्याने आपले आर्थिक व सामाजिक भवितव्य सुधारेल याची खात्री उरलेली नाही. आधीच नोकऱ्या मर्यादित, बेकारी वाढत चाललेली, नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यताही धूूसर आणि स्पर्धा तीव्र यामुळे खरोखर आगामी पिढीचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. ह्या पार्श्वभूमीवर सोबतचे एमबीए प्रवेशासंबंधीचे वृत्त प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वाचावे आणि मगच निर्णय घ्यावा, अशी एकंदर स्थिती आहे. एका महत्त्वाच्या विषयाला योग्य तऱ्हेने ईथे वाचा फोडली आहे !":💐 ######## 👍"छाप पडलेले शब्द-4 D !":👌 👍" मुंबईमधील लोकल ट्रेनचा जीवघेणा प्रवास !":👌 💐 "मुंबई ही देशाची राजधानी असल्यामुळे संपूर्ण देशांमधून अनेक लोक मुंबईकडे रोजगारासाठी धाव घेतात. गेल्या 50 /60 वर्षात तर माणसांंचे लोंढेच्या लोंढे आल्यामुळे, चिंचोळे बेट असलेल्या मुंबई शहरावर प्रचंड लोकसंख्येचा भार पडला आहे. त्यामुळे अर्धी अधिक मुंबई झोपडपट्ट्या आणि लोकवस्ती सर्व दूर उपनगरांमध्ये अशी स्थिती आहे. आज मुंबईची दाटीवाटीने राहणारी लोकसंख्या 2 कोटी व घनता 73 हजार दर चौरस मैल एवढी प्रचंड झाली आहे. ती 1970 मध्ये 58 लाख होती. पश्चिम रेल्वेने डहाणूपासून,तर मध्य रेल्वेने कर्जत कसाऱ्या इतक्या दूरवरच्या अंतरावरून माणसं कामासाठी मुंबईकडे प्रवास करत असतात. दररोजचे जवळजवळ तीन ते चार तास त्यांचे अशा प्रवासातच जातात. त्या मानाने लोकल ट्रेनची सुविधा बिलकूूल चांगली नाही. उलट मेंढरं कोंबून भरावी त्याप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये अक्षरश: लोंंबकळत माणसं जात असतात आणि हे चित्र काही गेल्या 50/ 60 वर्षात बदललेलं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बस टॅक्सी ऑटो रिक्षा अशा अनेक सार्वजनिक वाहनांच्या सुविधा उपलब्ध असूनही, मुंबईमध्ये जाण्या येण्यासाठी अर्ध्याहून अधिक माणसं लोकल ट्रेनचाच उपयोग करतात. विशेषत: महिलांची गर्दी ही खरोखर चिंताजनक अशा अवस्थेत प्रवास करते. शिवाय सगळ्यात महत्त्वाची मुंबई शहराची बाब म्हणजे आणि लोकल ट्रेनच्या व्यवस्थेमधली बाब म्हणजे टॉयलेट किंवा स्वच्छतागृहांची प्रचंड कमतरता ! त्यामुळे विशेषतः महिलांना कठीण जाऊन त्यांना त्रास होतो. त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षांमध्ये इतकी प्रगती झाली, उंच उंच इमारती उठल्या,परंतु लोकल ट्रेनची सेवा मात्र जशीच्या तशीच आहे विलंबाने धावणारी, आणि दररोज अनेक जीवांचे प्राणांशी खेळणारी. लोकल ट्रेनच्या प्रवासामध्ये एका वर्षांमध्ये जितकी माणसं मरतात तो आकडा बघून खरोखर कोणालाही शरम वाटावी. चार लाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या व्यवस्थेमध्ये सहा लाईन/आठ लाईन अशा करून जास्तीत जास्त लोकलस् उपलब्ध करणं अत्यावश्यक आहे. त्यातले त्यात महिलांचे डबे थोडेफार वाढले, खास महिलांसाठी देखील लोकल ट्रेन निर्माण झाल्या,12/ 15 डब्यांच्या लोकलही सुरू झाल्या. हे जरी खरे असले तरी सोबतच्या वृत्ताप्रमाणे महिलांची लोकल ट्रेनने प्रवास करण्याची अवस्था किती दयनीय आणि चिंताजनक आहे ते समजले अक्षरशः War footingवर ही व्यवस्था ताबडतोब सुधारली पाहिजे असं वाटतं !":🤣 ##### 👍"छाप (पड)लेले शब्द-5D !":👌 👍" सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा !":👌 🤣 "आरोग्य आणि शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या अशा क्षेत्रांकडे दुर्लक्ष होत गेले, तर एकंदर भौतिक प्रगती कितीही झाली तरी, प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसांचे जीवन कितपत सुसह्य होणार याची शंका वाटते. एकूण अर्थसंकल्पात आपण आरोग्य आणि शिक्षणावर त्यामानाने समाधानकााक पैसा खर्च करत नाही. मनुष्यबळाची शारीरिक, मानसिक क्षमता आरोग्य विषयाशी संबंधित, तर मनुष्यबळाचे कौशल्य आणि योगदान हे शिक्षणाच्या पायावर अवलंबून. अशा वेळेला अवाढव्य मनुष्यबळाचा आपण योग्य तो उपयोग करून घेत नाही, असेच म्हणायला नको कां? सोबतच्या वृत्तामध्ये महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजले आहेत, आणि संबंधित 40 वाहने एकाच जागी पडून आहेत, ह्याचे आरोग्य विभागाला काहीही सोयर सुतक नाही, ही कुणालाही व्यथित करणारी बाब आहे. त्यामुळे दुर्गम भागातील माणसांचे, विशेषत: आदिवासींचे काय हाल होत असतील, याची कल्पना करता येत नाही. पण शहरातील आपापल्या वातानुकूलित केबिनमध्ये मशगूल असणाऱ्या मंडळींना त्याचे काय सोयर सुतक ! अशा तऱ्हेची वृत्ते वाचनात आली की, संवेदनशील मन व्यथीत होते आणि वाटते, 'हम कभी भी नही सुधरेंगे !":🤣

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा