शुक्रवार, १९ जुलै, २०२४

दिवाळी अंकांची मांदियाळी- पसंतीची मोहोर!"

दिवाळी अंकांची मांदियाळी": समस्त रसिकांनी चवीने अनुभूती घेत वाचावी, अशी... मला लेखनाप्रमाणे वैचारिक वाचनाची मनापासून आवड आहे. त्यांत दर वर्षींचा दिवाळी अंकांची मांदियाळी हा तर अपूर्व खजिनाच असतो. मी जे जे वाचतो, त्यातील मला भावलेले रूचलेले काही खास अंतर्मुख करणारे गवसले तर त्या त्या लेखकांना वा संपादकांना, माझ्या पसंतीची बावनकशी मोहोर पाठविल्याशिवाय मला चैनच पडत नाही. ही स्वानंदमयी 'वारी'ची आत्मानंद देणारी कहाणी आहे......... "दिवाळी अंकांची मांदियाळी": "असाही एक "वामनावतार !": 'इकतारा' प्रकाशन काढत असलेल्या 'सायकल' ह्या मुलांच्या मासिकाच्या आँगस्ट-सप्टेंबर २०२० च्या अंकात श्री वरुण ग्रोव्हर ह्यांनी लिहीलेल्या, अभिनयसम्राट इरफान खानसंबंधी लेखाचे 'अक्षर' दिवाळी अंक'२० मधील मराठी रुपांतर-'त्या चार भेटी' वाचणे, हा जणु वामनावताराप्रमाणे तीन/चार पावलात समस्त दिवाळी अंकांचे विश्व अनुभवणे भासावे, इतक्या ताकदीचा अनुभव आहे. इरफानच्या सहवासातील मोजक्या क्षणांचा लेखकाने उलगडलेला हा पट, वाक्यावाक्यांतून शब्दाशब्दातून आपल्याला खिळवून टाकतो. त्या मनस्वी तपस्वी अभिनेत्याची आपल्या कलेवरील असीम निष्ठा, प्रत्येक आगळ्यावेगळ्या भूमिकेचा सखोल अभ्यास करून ती जीवंत करण्याचे अविरत प्रयत्न, आपोआपच मनावर ठसा उमटवून जातात. १९८७ मध्ये नँशनल स्कूल आँफ ड्रामामधून पदवी घेणार्या ह्या गुणवंताची जगाने दखल घेण्यासाठी त्याला थोडी थोडकी नव्हे तर चक्क पंचवीस वर्षे तपश्चर्या करावी लागणे, ही बाब तर संवेदनशील वाचकाला चटका लावणारी आहे..... इरफानबरोबरच्या चार भेटींचा संवेदनशील मनाने घेतलेल्या ह्या लेखाजोख्यात, प्रत्यक्ष इरफान ह्यांच्या भावना, द्रुष्टिकोन अथवा स्वतः लेखकाचे विचार, हे जणु चिरंतन शाश्वत सत्याचे वा तत्वांचे ठसेच आहेत. नमुना म्हणून ह्या निवडक नोंदी पहा: # त्याच्या त्या जीवघेण्या आजारासंबंधी: "एक महान अभिनेता एका मोठ्या आजाराला कसा सामोरा जातो, असं जर कोणी स्क्रिप्ट घेऊन त्याच्याकडे आला असता त्यातील व्यक्तिरेखा तो आजार कसा स्वीकारते, कसा समजून घेते, प्रेक्षकांसाठी अनुभवांचं एक नवीन जग उलगडण्यासाठी स्वतःला कसा आकार देते-तर त्याने ती भूमिका अगदी अशाच पद्धतीने साकार केली असती. शांतपणे कुतुहूल शाबूत ठेवून आणि ग्रेसफुली." # "एखाद्या कलेवर प्रभुत्व मिळवणं, म्हणजे त्यात पूर्णपणे बुडून जाणं अगदी उध्वस्त होणे अशी तुलना त्याने आपोआपच केली होती." # "के. आसिफच्या आयुष्याचा जर विचार केला तर त्याच्या 'मुघल-ए-आझम' चित्रपटाच्या निर्मितीरूपी प्रवासावर जर सिनेमा केला तर मला-(इरफानला ) आसिफची भूमिका करायला खूप आवडेल." हे सांगताना, अचानक त्याला एवढा वेळ आलेला कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला होता. तो असाच या सिनेमाच्या प्रेमाविषयी तो भरभरून बोलत होता. दुर्दैवाने त्या काळातल्या गोष्टींचे नीट जतन झालेलं नाही आणि एका दशकाहून अधिक काळ हा सिनेमा बनवण्यावर आसिफने कसा घालवला, याविषयी फारसे संशोधन झालं नाही, म्हणून तो (इरफान ) हळहळ व्यक्त करत होता. ह्या कहाणीमधला सर्वात कोणता भाग त्याला सर्वात आकर्षित करतो, असं मी-(लेखकाने ) विचारल्यावर तो म्हणाला, "फना हो जाना"! अर्थात् उद्ध्वस्त होऊन जाणं ! एका सिनेमावर एका माणसाने पंधरा वर्ष अथक मेहनत घेतली, त्या निर्मितीमधल्या छोट्या छोट्या बारकाव्यांविषयी तो कसा आग्रह होता, जणू काही सिनेमा नव्हे, तर तो आपलं उसवलेलं आयुष्यच पुन्हा जोडू पाहत होता. खरंच आहे हे. के. आसिफने हा सिनेमा करताना स्वतःला पार उस्कटवून टाकलं." # अभिनय संकल्पनेवरील लेखकाचे हे भाष्य तर प्रतिभेच्या कमालीची परिसीमाच आहेः "अभिनय करणं इतर कलांपेक्षा खूप खूप वेगळं असतं. अशासाठी की, त्यातून काही ठोस मूर्त अशी कलाकृती निर्माण होत नाही. इतकंच नाही तर अभिनयाच्या बाबतीत कला आणि कलाकार यांच्यात फरक करणं शक्य नसतं. चित्राला आपण स्पर्श करू शकतो, लेखन प्रकाशित होतं, तर संगीत टेप करून जपू शकतो. पण अभिनेत्याची कला म्हणजे तो किंवा ती अभिनय करण्याची करणारी व्यक्तीच असते. त्यामुळे ही कला जर समजून घ्यायची, तर त्या कलावंताला समजून घेणं हा एकच मार्ग आहे." खरंच आहे हे सारं. कारण अभिनेत्याचा आविष्कार हा तो समोर बघणार्या अनुभवणार्या रसिकांच्या मनःपटलावर उमटत रहाणारी, शब्द रहित अमूर्त प्रतिमाच तर असते ! 'अक्षर' दिवाळी अंक'२० अजून आपण वाचला नसेल तर आवर्जून तो मिळवा व वाचा... सुधाकर नातू, माझ्या सॅमसंग गेलेक्सी स्‍मार्टफोन वरून पाठवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा