रविवार, २८ मे, २०२३

" आपके साथ, जीवन भकास !":

"सबके साथ, जीवन भकास":

येथे मला, एका गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधायचे आहे. सध्या कुणा विशीतल्या तरुणाला अचानक हार्ट फेल होऊन म्रुत्यु येतो, तर कुणी खेळाडू असाच मैदानावर खेळता खेळता राम म्हणतो. चाळीशींत कोणे एके काळी लागणारा चष्मा पहिली दुसरीतल्या मुलांना लागतो. पन्नाशी साठीनंतर येणारे उच्च रक्तदाब वा मधुमेहासारखे आजार आता वयाच्या पंचविशी वा तिशीत शिरकाव करताना दिसत आहेत. कँन्सर सारखा भयावह जीवघेणा रोग कुणाला केव्हा जडेल ह्याचाही काही नेम राहिला नाही. विविध प्रकारच्या जीवघेण्या अपघातांमुळे तर माणसे दररोज किड्यामुंगीसारखी मरताना दिसत आहेत. एकी कडे शरीर विज्ञान व मेडीकल संशोधन अचंबित करणारे पराक्रम करत असताना, अनारोग्याची ही वयातीत अनिश्चितता भयावह आहे. जीवनातील स्पर्धा विकोपाला गेली आहे, अपेक्षा उंचावत असताना प्रयत्न अपुरे पडत आहेत आणि ताणतणाव असह्य मर्यादा गांठत आहेत. दुसर्या बाजूला सार्वजनिक आरोग्यसेवेलाच अव्यवस्थेमुळे आयसीयुमध्ये घालण्याची वेळ आलेली दिसत आहे. खाजगी आरोग्यसेवा उत्तरोत्तर महागडी व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची झाली आहे. गरीब श्रीमंतामधली विविध आर्थिक स्तरांवरील दरी भयानक रूंदावत चाललेली आहे, ते वेगळेच!

हे असे कसे कां व कुणामुळे झाले त्याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. ऐहीक प्रगती व श्रीमंती म्हणजेच जीवनातील यश असे मानण्याच्या नवसंस्क्रुतीने जो तो अक्षरश: सुसाट धावत सुटला आहे. अशा तर्हेच्या जीवन तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर, तंत्रज्ञानाच्या अचाट प्रगतीमुळे जीवनशैलीत आमुलाग्र बदल होऊन माणूसामाणसातील आपुलकीचे नाते भंग पावताना दिसत आहे. माणसे एखाद्या रोबोटचा अवतार बनण्याचा व त्यांची बेटे बनण्याचा धोका आ वासून उभा आहे.

"सबका साथ, सबका विकास" ऐवजी

"सबके साथ जीवन भकास" असे म्हणायला लागण्याची वेळ आता खरोखर दूर नाही. जीवनविषयक आणि सार्वजनिक विकासविषयक मूलभूत संकल्पनांचाच गांभीर्याने पुन्हा सर्वांनीच विचार करणे ऐरणीवर येणे गरजेचे आहे.

#####################################

"आत्मवंचना  !":

खाजगी वृत्तवाहिन्यांवर वाढते अपघात आणि गुन्हेगारी स्वरूपाचे घोटाळे याच्याच जास्तीत जास्त बातम्या येत असतात.

त्यातील काल अचानक 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून दाखवलेली बातमी आणि ती दृश्ये खरोखर कुणालाही लाज वाटावी अशीच होती. एक ट्रक नाशिक जवळ रस्त्यावरून जात असताना, त्यातील काही खोके खाली पडले. ते दारूच्या बाटल्या असलेले खोके पाहून माणसांची जी धावपळ त्या बाटल्या गोळा करायला झाली, ते पाहणे हे खरोखर मान खाली घालायला लावणारे होते. एवढेच नव्हे तर त्यात लहान मुलेही बाटल्या उचलायला धावत होती. 

आप्पलपोटेपणा आणि दुुसर्यांंच काही करून फुकटात जे मिळेल ते ओरबाडून, अशा तऱ्हेचे वाढते सायबर फसवणुकीचे गुन्हे तर आपण पाहत आलो आहोतच. परंतु हा प्रकार दारूच्या बाटल्या उचलण्याचा हा खरोखर विदारक होता आणि माणसांची नैतिकता किती ढासळत चालली आहे, त्यातून व्यसनाधीनतेचा जर असा अतिरेक होत असेल तर, उज्वल भविष्याची स्वप्न पाहणे ही खरोखर आत्मवंचनाच ठरणार नाही कां? कारण When character is lost, everything is lost!"


धन्यवाद 

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा