👍👍👍👍💐💐
"रंगांची दुनिया":
।।रसिकता रुजवूया।।
।।रसिकता फुलवूया।।
।।आनंद घ्या, आनंद द्या।।
👍👍👍👍💐💐
"मनभावन क्षण !":
"पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" यावरच पुढचं सारं सांगतो आहे:
टीव्ही बघताना रात्रीच्या 'प्राइम टाईम'मध्ये 'पाणी' घातलेल्या, लांबवत नेलेल्या मालिका कधीकधी बघाव्याच वाटत नाही. असा एक तरी तास रात्रीच्या वेळेला मिळतो असा माझा अनुभव आहे. त्याला मी "गोल्डन अवर" मानतो.
रात्रीचा नऊ ते दहा हा माझा हल्ली "प्राईम टाईम" मधील 'गोल्डन अवर" आहे. त्यावेळेला मी टीव्ही चॅनेल सर्फिंग करतो वा अवांतर वाचन. अशा वेळेला, त्या रात्री नवल घडले आणि "एबीपी माझा" वर "माझा कट्टा" या कार्यक्रमात वर्ल्डकप विजेत्या १९८३ सालच्या संघाचे कर्णधार श्री कपिल देव प्रत्यक्ष हजर होते. त्यांच्या बरोबरच्या गप्पा ऐकत राहणे, हा एक नोस्टँल्जिक अनुभव होता. नुकताच त्या चित्तथरारक विजयावर आधारित, '83' हा रोमहर्षक आणि नाट्यमय चित्रपट मी नुकताच पाहून आल्यामुळे तर त्या पुनःप्रत्यकारी गप्पांची रंगत अधिकच वाढत गेली.
साधेसुधे निगर्वी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या, वागण्यात सहजसुंदरता, प्रामाणिक, पारदर्शक बोलण्यांतून सेलिब्रिटी श्री कपिल देव ह्यांनी ते प्रेरणादायी विश्वविजयी अनुभव गप्पांमध्ये सांगितले. त्या गप्पांतील प्रत्येक अनुभव निश्चितच मार्गदर्शक आणि अंतर्मुख करणारे होता. आपल्या मर्यादा आणि आपल्या आवडीनिवडी यांचे मनमोकळेपणाने वर्णन करणारे कपिल देव, मित्रभावाने सर्वांशी संवाद साधत असल्याने, वेळ कसा गेला ते समजलेच नाही. त्यांची झिबांब्वे संघाविरुद्धची अफलातून विक्रमी १७५ नाबादची खेळी, विश्वकप अंतिम विजयी सामना व आपले सहकारी खेळाडू, त्यांची वैशिष्ट्ये, आपले वैयक्तीक, कौटूंबिक अनुभव त्यातील आईवरील त्यांचे प्रेम, क्रिकेट व्यवस्थापन, IPL बद्दल आणि बदलत्या काळातील अतीक्रिकेटची आव्हाने यांचा देखील त्यांनी परामर्श घेतला. त्यामधील हे बोल त्यांच्या सरळमार्गी Down to earth माणूसपणाचे दर्शन घडवतात:
"कर्णधार म्हणून मी मैदानावर जेव्हा जातो, तेव्हा मी टीमचा सूत्रधार असतो. परंतु मैदानाबाहेर, ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर माझ्या सहकाऱ्यांचे ऐकणारा एक साधा माणूस असतो."
"आपल्या क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूने हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की, आपण देशासाठी खेळतो. स्वतःपेक्षा, देश सर्वोच्च आणि क्रिकेटचे व्यवस्थापन करणारी संस्था ही महत्त्वाची."
" आमच्या वेळी खेळायला जाताना आम्हाला आई-वडिलांची व पालकांची भीती वाटत असे, पण आता उलटे आहे. स्वतः पालकच आपल्या मुलाला घेऊन मैदानात येतात आणि सांगतात याला आयपीएलमध्ये खेळायला मिळेल असे ट्रेनिंग द्या !"
.......
...........
आजच्या काळात कपिलजींसारखा माणूसच विरळा.
इतके त्या रात्री पुरे झाले नाही म्हणून की काय, मधल्या काळात सर्फिंग करताना "सह्याद्री" वरती डॉक्टर विद्याधर ओक व विघ्नेश जोशी यांच्या संगितीक गप्पाही पहायला, नव्हे ऐकायला मिळाल्या. तो सुरेल संगीतसुरांचा मधूर आनंद वेगळ्याच पातळीवर मनाला घेऊन गेला, स्वर्गीय सुखाचा परमानंद म्हणजे काय, ते तेव्हाच जाणवले !
गोविंदराव पटवर्धन यांच्यासारख्या दिग्गजांचा शिष्य असलेले, गोरेपान अत्यंत देखणे व्यक्तिमत्व लाभलेल्या डॉक्टर विद्याधर ओक, (मला तर रसिकसम्राट रामूभैय्या दाते ह्यांची आठवण आली.) सहजतेने लिलया पेटीवर-संवादिनीवर आपली बोटे अशी सफाईने फिरवत होते की, पावसाची अचानक भिजवून टाकणारी सर यावी, त्यातून निघणारे, सुमधुर सुस्वर ऐकतच राहावे असे होते.
संवादिनीमधली गोविंदराव पटवर्धन यांची शिकवण, तसेच सुधीर फडके यांच्या कष्टाळू शिस्तीची वैशिष्ट्येही त्यांनी बोलताना उलगडली. वैविध्यपूर्ण नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत, भावगीत तसेच हिंदी चित्रपटातली गीते अशा विविध इंद्रधनुष्यी सुरांच्या दुनियेत श्रोत्यांना त्यांनी आपल्या संवादिनीच्या किमयेने अक्षरशः चिंबचिंब करून टाकले. असा कार्यक्रम सहसा होणे नाही, तो बघायला मिळाला हे माझे भाग्य आणि त्या अद्भुतरम्य क्षणांची गोडी शब्दात सांगणे मला तरीही अशक्यच !
तो ताल सुरांचा संगीतमय अनुभव पुनश्च तुमच्यासाठी......
ही लिंक उघडा........
अन् नादमय विश्वात धुंद व्हा.....
https://youtu.be/upJPNaNTOMs
नववर्षदिनाच्या रात्री अचानक अवतरलेले हे दोन कार्यक्रम म्हणजे, माझ्या अनुभवविश्वांतले "मनभावन क्षण" कां होते, ते तुम्हालाही मान्य व्हावे! ते इथे मी फक्त वेचले-जागवले इतकेच.
रंग खेळू चला, रंग उधळू चला....
"रंगांची दुनिया" ह्या सप्तरंगांनी फुलत बहरत जावी, हीच सदिच्छा !...
धन्यवाद.
सुधाकर नातू
२/१/२०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा