"घडविते हात':
"संस्कृतीकारणाचे अध्वर्यू":
महाराष्ट्र टाईम्स मधील "महामुंबईचे षडदर्शन" हे नियमित येणारे सदर मी नेहमी वाचतो. आज दिनांक ३० डिसेंबर'२१ रोजी या सदरामध्ये 'घडविते हात'
"संस्कृतीकारणाचे अध्वर्यू" या शीर्षकाखाली श्री दिनकर गांगल आणि त्यांच्या 'ग्रंथाली' ह्या वाचक चळवळीचा धावता आढावा अरुण जोशी आणि सुदेश हिंगलासपूरकर ह्यांनी समर्पक शब्दात घेतला आहे. वाचनसंस्कृतीवर प्रेम करणार्यांनी हा लेख मुळापासूनच संपूर्ण वाचण्याजोगा आहे.
त्यामधील काही अंश मला भावले आणि कदाचित माझ्याशीही त्यांचा वैयक्तिक संबंध असल्यामुळे, मी ते इथे देत आहे:
"माणसे वाचणे, ती जोडणे त्यांच्यातून काही ज्ञान जोखणे त्यांना बोलायला-लिहायला उद्युक्त करणे, त्यासाठी पूर्ण वेळ देणे-दिशा देणे आणि काहीतरी नव्याने सादर करणे हे त्यांचे काम अव्याहत सुरूच आहे. दगडाच्या आत मूर्ती दिसणारा आणि अनावश्यक भाग तासून ती साकारणारा हा शिल्पकार साहित्य-संस्कृतीच्या विश्वात गेली पाच दशके सजगपणे वावरतो आहे. आजही काही सुचले लिहावेसे वाटले की दिनकर गांगल यांचा विचार घ्यावा असे वाटणारे अनेक आहेत. वयाच्या ८३ व्या वर्षी तोच उत्साह आणि उत्तम ते जतन करण्याचा व नवं ते घडवण्याचा त्यांचा प्रयत्न वर्धिष्णू आहे."
"ग्रंथालीने जी पुस्तके प्रसिद्ध केली यापैकी ८० टक्के पुस्तकांचे लेखक पहिल्यांदा लिहिते झाले होते, यामागे गांगल यांना विविध गोष्टींबद्दल असणारे कुतुहूल आणि त्या त्या व्यक्तींमध्ये विषयांमध्ये दिसलेला स्पार्क हाच धागा होता."
माझ्या वैयक्तिक जीवनात श्री दिनकर गांगल यांचे म्हणूनच मोठे योगदान आहे त्यांनीच माझ्यातील लेखनगुण आणि रंगभूमी व करमणूक क्षेत्र यावरील माझे प्रेम ध्यानात घेऊन, महाराष्ट्र टाईम्स मध्ये "शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावरून" ह्या रंगभूमीविषयक सदराची संधी त्यांनी मला दिली. तेथूनच 'रंगांच्या दुनिये'तील लेखनाची माझी मुशाफिरी जी सुरू झाली, ती आजतागायत.
त्यांचे योगदान एवढ्यावरच माझ्यासाठी पुरे होत नाही. कालांतराने पुढे मी विविध क्षेत्रांवर, विशेषत: व्यवस्थापन क्षेत्रातही लेख लिहित होतो आणि कार्पोरेट क्षेत्रातील माझी अनुभवाची शिदोरी त्यांनी अचूक हेरली. "ग्रंथाली" तर्फे मला लिहायला लावले. त्यांना पसंत पडेल इतका मजकूर मला सुधारायला लावला. त्याचेच फलित म्हणजे महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून त्या वर्षी पारितोषक मिळालेले "प्रगतीची क्षितिजे" हे माझे पहिलेवहिले पुस्तक, त्यांनी ग्रंथाली तर्फे प्रसिद्ध केले.
फेसबुकवरील "रंगांची दुनिया" हा माझा समूह कदाचित याच पायावर उभा राहिला असे म्हणता येईल. सहाजिकच मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा